पंतप्रधान मोदींनी केलं तारिक रहमान यांचं अभिनंदन; बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला दिल्या सदिच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

फोटो स्रोत, @narendramodi

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
वाचन वेळ: 6 मिनिटे

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP)ने सार्वत्रिक निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे.

बीएनपीने आता 300 पैकी 204 जागा जिंकल्या आहेत. बांगलादेशात सरकार स्थापन करण्यासाठी 151 जागांची आवश्यकता असते.

जमात-ए-इस्लामी 76 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. इतरांनी 10 जागा मिळवल्या आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

त्यांनी लिहिलंय की, "तारिक रहमान यांच्याशी बोलणं आनंददायी होतं. बांगलादेश निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयाबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं. बांगलादेशच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न ते करत आहेत, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच पाठिंबा व्यक्त केला."

पंतप्रधान मोदींनी लिहिलंय की, "सखोल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध असलेले दोन जवळचे शेजारी देश असल्याकारणाने, मी दोन्ही देशांच्या शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी भारताच्या कटीबद्ध असल्याचा पुनरूच्चार केला."

स्थानिक माध्यमांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, बीएनपी जवळजवळ दोन-तृतीयांश जागा जिंकू शकते.

बीएनपी हा माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा पक्ष आहे. त्यांच्या निधनानंतर, त्यांचे पुत्र तारिक रहमान यांना त्यांचे प्रमुख नेते म्हणून पाहिले जाते.

दरम्यान मतमोजणी सुरु असताना दोन्ही पक्षांनी मतदानात हेराफेरीचा आरोप केला आहे. 2024 मध्ये शेख हसीनांना सत्तेवरून काढून टाकण्याच्या उद्देशाने युवा चळवळीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल सिटीझन्स पार्टी (NCP) ने निकालांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला आहे.

बांगलादेशातील एनसीपी या पक्षाने फेरमोजणी करण्याची मागणी केली आहे.

इतर दोन पक्षांच्या उमेदवारांनीही असेच आरोप करून निवडणूक आयोगाकडे संपर्क साधला आहे. बीएनपी ने जमात-ए-इस्लामीवर फसवणुकीचा आरोप केला आहे.

मोदी

जमात-ए-इस्लामीने एवढं यश कसं मिळवलं?

बीबीसीचे प्रतिनिधी सौतिक बिस्वास यांचं विश्लेषण

जमात-ए-इस्लामीने बांगलादेशाच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी मुख्यतः तीन गोष्टींवर काम केलं. निवडणूक लढवण्याची रणनीती, भावना आणि पक्ष म्हणून केलेलं रचनात्मक काम.

आवामी लीगवर निवडणूक लढवण्यास बंदी असल्याने बीएनपी व्यतिरिक्त जमात आणि त्यांच्या सहयोगी पक्षांची युती हा एकच पर्याय मतदारांकडे होता.

त्यामुळे बीएनपीच्या विरोधकांना केवळ जमात हाच पर्याय होता आणि त्यामुळेच या पक्षाला पहिल्यांदाच एवढं ऐतिहासिक यश मिळालं आहे. याआधी झालेल्या निवडणुकांमध्ये 1991 साली जमातने त्यांची सर्वोत्तम आकडेवारी गाठली होती. त्यावेळी या पक्षाने 6% मतं मिळवून 18 जागा जिंकल्या होत्या.

शफीकुर रहमान

फोटो स्रोत, Sajjad HUSSAIN / AFP via Getty

फोटो कॅप्शन, शफीकुर रहमान हे जमात-ए-इस्लामीचे अमीर आहेत.

जमातने अगदी सुरुवातीपासूनच सोशल मीडियावरील प्रचारात आघाडी मिळवली होती. जमातच्या विरोधकांनी या प्रचारावर 'हा अपप्रचार' असल्याची टीका देखील केली होती.

जमातच्या प्रचारामध्ये धर्म हा मुख्य मुद्दा होता. बऱ्याच मतदारसंघामध्ये बंडखोरांनी जमात विरोधी मतांची विभागणी केली आणि याचा फायदा या पक्षाला झालेला दिसून येतो आहे.

बांगलादेश इन्स्टिट्यूट ऑफ पीस अँड सिक्युरिटी स्टडीज (BIPSS) या थिंक टँकचे शफकत मुनीर म्हणतात की, "सोशल मीडियाचा वापर, धर्माचा वापर आणि मतपत्रिकेवर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असणे ही पक्षाच्या वाढीची तीन मुख्य कारणे आहेत."

'तारिक रहमान यांचं अभिनंदन' - पंतप्रधान नरेंद्र मोदी

मतमोजणीचं दृश्य
फोटो कॅप्शन, मतमोजणीचं दृश्य

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएनपीचे नेते तारिक रहमान यांचं अभिनंदन केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटलं आहे की, बांगलादेशातील संसदीय निवडणुकीत बीएनपीला निर्णायक विजय मिळवून दिल्याबद्दल मी तारिक रहमान यांचे हार्दिक अभिनंदन करतो.

हा विजय बांगलादेशातील जनतेचा तुमच्या नेतृत्वावरील विश्वास दाखवून देतो. भारत लोकशाही, प्रगतीशील आणि समावेशक बांगलादेशच्या समर्थनात उभा राहील.

आमचे बहुआयामी संबंध मजबूत करण्यासाठी आणि आमची समान विकास उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.

'विजयी मिरवणूक काढणार नाही' - बीएनपी

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ने या निवडणुकीत मोठ्या विजयाचा दावा करत देशव्यापी प्रार्थना कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

पक्षाचे वरिष्ठ संयुक्त सरचिटणीस रुहुल कबीर रिझवी यांनी गुरुवारी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, शुक्रवारच्या नमाजनंतर ढाकासह देशभरातील मशिदींमध्ये प्रार्थना केली जाईल.

निवडणुकीतील विजयानंतर बीएनपीकडून कोणतीही विजयी मिरवणूक किंवा सभा काढली जाणार नाही.

याशिवाय, देशभरातील मंदिरे, चर्च, पॅगोडा आणि इतर प्रार्थनास्थळांवर त्या त्या धर्माच्या लोकांना प्रार्थना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

तारिक रहमान

फोटो स्रोत, Syed Mahamudur Rahman/NurPhoto via Getty Images

फोटो कॅप्शन, तारिक रहमान

कोण आहेत तारिक रहमान?

सुरुवातीच्या कलांमधून असं दिसतंय की बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी पुढचं सरकार स्थापन करेल. त्यांचे नेते आहेत तारिक रहमान.

माजी पंतप्रधान खालिदा झिया आणि माजी राष्ट्रपती झिया उर रहमान यांचे ज्येष्ठ पुत्र तारिक रहमान 17 वर्षं युकेमध्ये निर्वासित म्हणून राहिले होते. पण ऐन या निवडणुकीच्या तोंडावर, 2025च्या अखेरीस ते बांगलादेशच्या राजकारणात परतले.

तारिक रहमान

फोटो स्रोत, Syed Mahamudur Rahman/NurPhoto via Getty

फोटो कॅप्शन, तारिक रहमान हे माजी पंतप्रधान खालिद झिया यांचे पुत्र आहेत.

तारिक रहमान यांचं नाव अनेक वर्ष बांगलादेशात वादग्रस्तराहिलं आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, गुन्हेगारीचे अनेक आरोप झाले, पण गेल्या दोन वर्षांत त्यांना मोठ्या आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आलं, त्यामुळं त्यांच्या पुनरागमनाचा मार्ग अचानक मोकळा झाला.

जेव्हा ते ढाकामध्ये आजारी आईला भेटायला, तिच्यासोबत राहायला परतले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत झालं. एक जाहीर सभा झाली, त्यात त्यांनी स्वतःला खालिदा झियांचा वारसदार आणि बीएनपीचा नेता म्हणून जाहीर केलं.

आता रहमान बीएनपीचे अध्यक्षच नाही तर बांगलादेशचे पुढचे पंतप्रधानही होऊ शकतात. दुभंगलेल्या बांगलादेशला एकत्र आणण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

निवडणूक प्रक्रियेपासून भारतानं राखलं अंतर

भारताची सर्वात मोठी चिंता म्हणजे बांगलादेशात येणारं नवीन सरकार भारताच्या ईशान्य भागाच्या सुरक्षेबद्दल काय भूमिका घेईल.

दिल्लीतील विश्लेषक हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्याचं म्हणतात. त्यांच्या मते, या मुद्द्यावर तडजोडीला वाव आहे, असं भारताला वाटत नाही.

विशेष बाब म्हणजे, बांगलादेशातील गेल्या 3 निवडणुकांच्या तुलनेत यावेळेस भारताचा 'हस्तक्षेप' असल्याची कोणतीही मोठी तक्रार ऐकू आली नाही.

यामागचं एक मोठं कारण म्हणजे, भारतानं यावेळेस संपूर्ण निवडणूक प्रक्रियेपासून मुद्दाम अंतर राखलं आहे.

बांगलादेशात 12 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुकांचं मतदान पार पडलं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशात 12 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुकांचं मतदान पार पडलं

अनेक जाणकारांना वाटतं की भारताच्या या संयमामागचं कारण, 2024 मध्ये बांगलादेशात झालेल्या आंदोलनाचा अनुभव आहे. त्यात भारताच्या विरोधातील राग स्पष्टपणे दिसून येत होता. त्यावेळेस शेख हसीना यांच्याबरोबरच भारताच्या विरोधातदेखील संतप्त घोषणाबाजी झाली होती.

जवळपास दीड वर्ष 'सहभाग' असण्याच्या निवडणुकीची मागणी करूनदेखील, अखेर अवामी लीग निवडणुका लढवू शकली नाही. असं असूनही भारतानं साधा डिप्लोमॅटिक निषेधदेखील केला नाही.

आता भारताची पारंपारिक सहकारी असलेल्या अवामी लीगचं राजकीय भवितव्य, बऱ्याच अंशी या गोष्टीवर अवलंबून आहे की पुढील सरकार कसं स्थापन होईल.

बांगलादेशमध्ये 12 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या निवडणुकीशी संबंधित याच अनिश्चित बाबींमुळे बांगलादेशातील यावेळच्या निवडणुका भारतासाठी इतक्या महत्त्वाच्या बनल्या आहेत.

ईशान्य भारताच्या सुरक्षेबाबतची चिंता किती गंभीर आहे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

शेख हसीना यांच्या जवळपास 16 वर्षांच्या कार्यकाळात, ईशान्येतील सशस्त्र फुटीरतावादी गटांना बांगलादेशात कोणताही आश्रय मिळाला नाही, तसंच पाठिंबादेखील मिळाला नाही, हा भारतासाठी मोठ्या दिलाशाची बाब होती.

याच्या उलट, बांगलादेशनं अनूप चेतिया आणि अरविंद राजखोवा यांच्यासारख्या महत्त्वाच्या उल्फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम) नेत्यांना भारताच्या ताब्यात दिलं. हे नेते नंतर भारत सरकारबरोबर शांतता चर्चेचं नेतृत्वदेखील करू लागले.

याच कारणामुळे, बांगलादेशातील नवीन सरकार या मुद्द्याबाबत काय भूमिका घेतं, याकडे भारताचं अत्यंत बारकाईनं लक्ष असेल.

अर्थात, काही माजी मुत्सद्द्यांचं म्हणणं आहे की सुरक्षेशी संबंधित चिंतांकडे आवश्यकतेपेक्षा जास्त वाढवून पाहिलं जात आहे. त्यांना वाटतं की बांगलादेशच्या भारतावरील दैनंदिन अवलंबित्वामुळे दोन्ही देशांमधील संबंध स्वाभाविकपणे स्थिर राहतील.

भारताचे माजी मुत्सद्दी आणि राजदूत सौमेन रे म्हणतात, "भारत आता एक जागतिक शक्ती आहे. भारत जगातील चौथ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर असेल. त्यामुळे जेव्हा शेजारी देशात निवडणूक होते, तेव्हा एका जागतिक शक्ती म्हणून आपल्याला चिंता वाटणं स्वाभाविक आहे."

ते म्हणाले, "मात्र याचा अर्थ असा नाही की आपण सुरक्षेच्या मुद्द्याबाबत आवश्यकतेपेक्षा जास्त चिंताग्रस्त असलं पाहिजे. सिलीगुडीपासून मिझोरम आणि आसामपर्यंत, आपण आधीच नवीन हवाईतळ बनवले आहेत. सैन्याची भक्कम तैनाती आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीही मोठी समस्या नाही."

भारताला बांगलादेशात एक स्थिर, लोकशाही आणि लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सरकार पाहायचं आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारताला बांगलादेशात एक स्थिर, लोकशाही आणि लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सरकार पाहायचं आहे

स्मृती पटनायक, दिल्लीतील मनोहर पर्रिकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेच्या सीनियर फेलो आहेत. या मुद्द्याबाबत त्यांचं मत अधिक कडक आहे. त्यांचं म्हणणं आहे की ईशान्य भागातील सुरक्षेबाबत भारत आपली भूमिका थोडीशीही शिथिल करणार नाही.

त्या बीबीसीला म्हणाल्या, "ईशान्य भागातील सुरक्षा भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हे असं क्षेत्र आहे, ज्यात भारत कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही."

त्यांच्या मते, "आणि ही गोष्ट बांगलादेशमधील सर्व भागधारकांना स्पष्टपणे सांगण्यात आली आहे."

"तुम्ही पाकिस्तानबरोबर हवे तेवढे संबंध वाढवा, त्यांना सुरक्षा मंजुरीशिवाय बांगलादेशात बोलवा, तो आमच्या चिंतेचा विषय नाही. मात्र हे सर्व ईशान्य भारताच्या सुरक्षेची किंमत मोजून होऊ शकत नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.