'माझ्या नवऱ्यानेच मला एका कोठ्यावर विकून टाकलं होतं'; सेक्स वर्कर्सची कैफियत

अमली पदार्थांचे व्यसन, गर्भपात आणि न संपणारे शोषण - सेक्स वर्कर्सची कैफियत
    • Author, प्रेरणा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

(इशारा: या लेखामध्ये दिलेली काही माहिती अस्वस्थ करणारी असू शकते.)

सरकारी आकडेवारीनुसार, भारतात 10 लाख महिला सेक्स वर्कर्स आहेत आणि स्वयंसेवी संस्थांच्या मते ही संख्या 30 लाख आहे.

भारतात मोठ्या संख्येनं महिलांना 'सेक्स वर्क'मध्ये ढकललं जातं.

त्यांना प्रचंड शोषणाला, हिंसेला सामोरं जावं लागतं. कधीही न संपणारा सामाजिक भेदभाव हेच त्यांच्या आयुष्यातलं वास्तव आहे .

दिल्लीतील जीबी रोडची गणना भारतातील सर्वात मोठ्या रेड लाईट एरियामध्ये केली जाते.

येथील मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये अंदाजे 2500 महिला सेक्स वर्कर्स राहतात आणि दररोज शोषणाचा सामना करतात.

रुखसाना तेव्हा फक्त 13 वर्षांची होती जेव्हा तिला या व्यवसायात ढकलले गेले.

ती सांगते, "माझ्या नवऱ्यानेच मला जीबी रोडवरच्या एका कोठ्यावर विकून टाकलं होतं."

त्या दिवसांची आठवण सांगताना ती सांगते की, सुरुवातीला तिला कित्येक दिवस एका अगदी छोट्या आणि अंधारलेल्या खोलीत कोंडून ठेवलं जायचं, जेणेकरून ती तिथून पळून जाऊ शकणार नाही.

हे सांगताना तिचा कंठ दाटून आला होता आणि डोळे पाण्याने भरले होते.

रुखसाना पुढे सांगते, "मासिक पाळी सुरू असतानाही माझ्याकडून जबरदस्तीने काम करून घेतलं जायचं."

वीसपेक्षा जास्त गर्भपात

तिच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला जेव्हा मुली कोणत्याही पुरुषासोबत जाण्यास नकार देतात, तेव्हा त्यांच्या पिण्याच्या पाण्यात नशेच्या गोळ्या मिसळल्या जातात.

नशेचं भीषण व्यसन, दररोजची मारहाण, 20 पेक्षा जास्त वेळा झालेला गर्भपात आणि कधीही न संपणारे शोषण... अवघ्या 13 वर्षांच्या रुखसानाने आपल्या आयुष्याची पुढची 14 वर्षे अशाच नरकयातनेत घालवली.

पण हे सगळं सहन करणारी ती एकटीच नाहीये; जीबी रोडवर राहणाऱ्या बहुतेक महिलांची कहाणी अशीच आहे.

रुखसाना सांगते की, तिच्या नवऱ्यानेच तिला देहविक्रीच्या दलदलीत ढकललं
फोटो कॅप्शन, रुखसाना सांगते की, तिच्या नवऱ्यानेच तिला देहविक्रीच्या दलदलीत ढकललं

अशीच कहाणी आहे ज्योतीची...

तिला नोकरीचं आमिष दाखवून तिच्याच गावातील एका महिलेनं जीबी रोडच्या दलालाला विकलं होतं.

तेव्हा ती फक्त 14 वर्षांची होते. ज्या बाईने तिला विकलं, तिच्याच नवऱ्याने सगळ्यात आधी ज्योतीवर बलात्कार केला.

त्या धक्क्याने ती कित्येक दिवस आजारी होती. हे सगळं तर रोजचंच होतं. काही वर्ष उलटली तेव्हा मुलं जन्माला घालण्यासाठी दबाव टाकला जाऊ लागला. गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत मी काम केलं."

सरकारी आकडेवारीनुसार भारतात 2023 मध्ये 2189 महिलांना बळजबरीने देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्यात आले
फोटो कॅप्शन, सरकारी आकडेवारीनुसार भारतात 2023 मध्ये 2189 महिलांना बळजबरीने देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्यात आले

"बाळंतपण झाल्यानंतर काही दिवसांतच कोठ्याची मालकीण बाळाला आईपासून वेगळं करते, जेणेकरून त्या महिला पुन्हा कामाला लागतील आणि बाळाच्या मायेपोटी वर्षानुवर्षे तिथेच अडकून पडतील," असं ती सांगते.

जीबी रोड - शोषणाची खोलखोल दलदल

रुखसाना आणि ज्योती... या दोघींनी कसंबसं या पाशातून स्वतःला सोडवून घेतलं आणि आज त्या जीबी रोडच्या त्या नरकातून बाहेर पडल्या आहेत. पण, असं नशीब प्रत्येकीच्या वाट्याला येत नाही.

तिथेच काम करणारी एक महिला, आपली ओळख उघड न करण्याच्या अटीवर जे भयंकर वास्तव सांगते ते ऐकून मन हेलावून जातं.

ती म्हणते, "समजा एखादी मुलगी एकदा का या जीबी रोडवर आली ना, तर इथून बाहेर पडणं तिच्यासाठी जवळजवळ अशक्य असतं."

दिल्लीतील 'जीबी रोड' हा भारतातील सर्वात मोठ्या रेड लाईट एरियापैकी एक मानला जातो
फोटो कॅप्शन, दिल्लीतील 'जीबी रोड' हा भारतातील सर्वात मोठ्या रेड लाईट एरियापैकी एक मानला जातो

ती पुढे सांगते, "एक तर इथल्या भिंतींना इतके पहारे आहेत की, तुम्ही साधं बाहेर पाऊलही टाकू शकत नाही. समजा चुकून बाहेर पडलातच, तर या रस्त्याच्या कानाकोपऱ्यात असे दलाल बसलेले असतात जे तुम्हाला ओळखतात आणि ओढत पुन्हा त्याच कोठ्यावर आणून सोडतात. एकदा का तुमच्या कपाळावर 'जीबी रोड'चा शिक्का बसला, की तुमच्या घरच्यांसाठीही तुम्ही मेलेले असता. तुमच्या प्रत्येक कागदपत्रावर पत्त्याच्या जागी जेव्हा 'जीबी रोड' लिहिलं जातं, तेव्हा समाज केवळ तुमच्याकडेच नाही, तर तुमच्या निष्पाप मुलाकडेही अत्यंत घृणेनं आणि तिरस्कारानं बघतो."

याचा शेवटचा आणि भयानक परिणाम म्हणजे, या महिला वर्षानुवर्षे हिंसा आणि शोषणाच्या त्या दलदलीत खोलवर रुतत जातात आणि कित्येकदा तिथेच त्यांचा जीवही जातो.

देहव्यापार आणि हिंसेचा खेळ

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

2 वर्षांपूर्वीची गोष्ट... जीबी रोडच्या एका काळोखलेल्या कोठ्यावर काही ग्राहकांनी अचानक गोळीबार केला आणि त्या धुमश्चक्रीत एका 30 वर्षांच्या निष्पाप सेक्स वर्करचा जीव गेला.

अशाच प्रकारे, याच वर्षी गाझियाबादच्या सैन विहार नाल्यात एका महिला सेक्स वर्करचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. तपासाअंती पोलिसांनी सांगितलं की, तिच्याच एका ग्राहकाने तिची निर्घृण हत्या केली होती.

संयुक्त राष्ट्राच्या (UNAIDS) एका धक्कादायक अहवालानुसार, दर 5 पैकी एका सेक्स वर्करला गेल्या एका वर्षात शारीरिक किंवा लैंगिक हिंसेचा सामना करावा लागला आहे.

इतकंच नाही, तर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या (OHCHR) एका संशोधनातून हे समोर आलं आहे की, भारतातील 50% सेक्स वर्कर्सनी कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या प्रकारची हिंसा अनुभवलेली आहे.

या अभ्यासात एक भयानक वास्तव उघड झालं आहे. जेव्हा पोलीस या कोठ्यांवर छापे टाकतात, तेव्हा पकडल्या गेलेल्या अनेक महिलांना मारहाण आणि लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागतं. ज्यांच्याकडून संरक्षणाची अपेक्षा असते, त्यांच्याकडूनच अनेकदा अन्याय होतो.

गाझियाबाद सिव्हिल लाइन्सच्या एसीपी प्रियाश्री पाल यावर भाष्य करताना म्हणतात, "माझ्या पाहण्यात तरी पोलिसांकडून शोषणाचं असं कोणतंही प्रकरण सध्या आलेलं नाही, पण मी हे पूर्णपणे नाकारूही शकत नाही. समाजातले पूर्वग्रह आणि पक्षपातीपणामुळे कदाचित अनेकींना अशा भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला असेल. पण आता 2026 कडे पाऊल टाकत असताना, आम्हाला एक आशा आहे की 'मिशन शक्ती' आणि अशाच इतर मोहिमांमुळे समाजातील दुर्बल घटकांसाठी, विशेषतः या महिलांसाठी परिस्थिती नक्कीच बदलेल आणि त्यांना सुखाचे दिवस येतील."

पण सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या या सर्व योजना आणि सरकारी प्रयत्न कागदावरच राहतात की काय, असं स्वयंसेवी संस्थांना वाटतं. त्यांच्या मते हे प्रयत्न 'पुरेसे' नाहीत.

सेक्स वर्करच्या हक्कांसाठी अनेक वर्षांपासून लढा देणाऱ्या मीना शेषु यांचा सवाल काळजाला हात घालणारा आहे.

त्या म्हणतात, "शक्ति मिशन'च्या माध्यमातून तुम्हाला हा देहव्यापार मुळासकट उखडून टाकायचा आहे, पण या व्यवसायात घुसवली गेलेली 'हिंसा' संपवण्याचं काय? या मिशनअंतर्गत तुम्ही महिलांना या दलदलीतून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेऊ इच्छिता, पण त्यांच्या काळजाच्या तुकड्यांचं म्हणजे त्यांच्या मुलांचं काय? त्यांचा खर्च कोण उचलणार?"

गाझियाबादच्या एसीपी प्रियाश्री पाल ज्यांनी या परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे
फोटो कॅप्शन, गाझियाबादच्या एसीपी प्रियाश्री पाल ज्यांनी या परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे

कित्येक महिला या नरकात फक्त गरिबीपोटी येतात. मग तुम्ही त्यांना कायमस्वरूपी रोजगार देणार का? त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी उचलणार का?

फक्त महिलांना एखादं कौशल्य शिकवलं किंवा ट्रेनिंग दिली म्हणजे सगळं संपलं, असं होत नाही. पोटाची भूक आणि मुलांचं भविष्य या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?

गेल्या जवळपास एका दशकापासून जीबी रोडवरील महिलांचे हक्क आणि त्यांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या 'कट-कथा' या संस्थेच्या फील्ड मॅनेजर प्रज्ञा बसेरिया यांचं म्हणणं देखील असंच काहीसं रोकठोक आहे.

त्या म्हणतात, "असं मुळीच नाहीये की सरकार किंवा एनजीओकडून काहीच प्रयत्न झाले नाहीत. प्रयत्न तर नक्कीच होतात, पण अडचण अशी आहे की, या महिलांच्या 'दीर्घकालीन पुनर्वसनाची' कोणतीही ठोस योजना आखली जात नाही. फक्त तात्पुरती मदत देऊन हा प्रश्न सुटणारा नाही, तर त्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी वर्षानुवर्षांच्या नियोजनाची गरज आहे."

त्या पोटतिडकीनं सांगतात, "जेव्हा तुम्ही एखाद्या सेक्स वर्करला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं स्वप्न पाहता, तेव्हा फक्त तिची सुटका करून चालत नाही. तिच्या मानसिक आरोग्यापासून ते तिच्या मुलांचा सांभाळ, रोजगाराच्या संधी आणि राहण्याचं ठिकाण... या सगळ्याचा विचार करावा लागतो.

जसं की, आम्ही 'ड्रीम व्हिलेज' उभारलं, जेणेकरून जीबी रोड सोडून ज्या महिला आमच्याकडे येतील, त्यांना हक्काचं छप्पर मिळेल, खाण्यापिण्याची सोय होईल. आम्ही त्यांना 10 हजारांची आर्थिक मदत देतो, एखादं कौशल्य शिकवतो, रोजगाराच्या संधी देतो. पण इतकं करूनही, आमच्या कित्येक 'दीदी' पुन्हा त्याच जीबी रोडच्या दलदलीत परत जातात. कारण, तिचे घरखर्च आणि गरजा या तुटपुंज्या मदतीत पूर्ण होत नाहीत."

त्या पुढे म्हणतात, "तिथे बसलेली कोठ्याची मालकीण त्यांना पैशांचं आणखी आमिष दाखवून पुन्हा बोलावून घेते. त्यांना पावलोपावली हे जाणवून दिलं जातं की, 'ही बाहेरची दुनिया तुमच्यासाठी नाहीये. इथे तुम्हाला कधीच मानसन्मान मिळणार नाही.' हाच मानसिक दबाव त्यांना पुन्हा त्याच अंधाऱ्या कोठड्यांकडे खेचून नेतो."

खरोखर, हा केवळ पैशांचा प्रश्न नसून समाजात त्यांना स्वीकारण्याचा आणि सन्मानाने जगू देण्याचा मोठा लढा आहे.

कायदा, न्यायालय आणि विदारक वास्तव

भारतात 'वेश्याव्यवसाय' पूर्णपणे बेकायदेशीर नाही, पण 'अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायदा, 1956' नुसार 'वेश्यालय' चालवणं, दलाली करणं, कुणाला जबरदस्ती या व्यवसायात ढकलणं, सार्वजनिक ठिकाणी गिऱ्हाईकं शोधणं आणि अल्पवयीन मुलांना यामध्ये सामील करणं हा गंभीर गुन्हा आहे.

इतकंच नाही, तर कुणाचं शोषण करून, हिंसा करून किंवा मानवी तस्करीद्वारे देहव्यापार करून घेणं हा कायद्यानं मोठा अपराध मानला जातो.

आजपासून 3 वर्षांपूर्वी, म्हणजेच 2022 मध्ये, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच 'सेक्स वर्क'ला एका 'व्यवसाया'चा दर्जा दिला होता.

न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की, "या महिलांनाही सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे."

सेक्स वर्कर्सच्या अधिकारांसाठी झटणाऱ्या 'कट-कथा' संस्थेच्या प्रज्ञा बसेरिया
फोटो कॅप्शन, सेक्स वर्कर्सच्या अधिकारांसाठी झटणाऱ्या 'कट-कथा' संस्थेच्या प्रज्ञा बसेरिया

पण सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक आदेशानंतरही, 'सन्मान' आणि 'स्वाभिमान' हे दोन शब्द अजूनही या महिलांच्या नशिबी आलेले नाहीत.

त्या दिवशी घडलेली एक घटना सांगताना ज्योतीचे डोळे पाणावतात.

ती आठवण सांगते की, दोन दिवसांपूर्वी ती रस्त्यावरून जात असताना एका माणसानं तिला ओळखलं आणि भररस्त्यात विचारलं, "तू तीच आहेस ना, जी कोठ्यावर राहायची?"

ती हुंदके देत म्हणते, "ते ऐकून मला खूप वाईट वाटलं... आजही लोक आम्हाला त्याच नजरेने बघतात."

खरोखर, कायदा बदलला तरी समाजाची दृष्टी बदलणं हे आजही एक मोठं आव्हान आहे.

(NCRB चा अहवाल एक भयावह सत्य समोर आणतो. या अहवालानुसार, एकट्या 2023 सालात भारतातून 3 लाख 24 हजार 763 महिला बेपत्ता झाल्या. त्याच वर्षीच्या आकडेवारीनुसार, 2189 महिलांची देहव्यापाराच्या बाजारात तस्करी करण्यात आली.

इतकंच नाही, तर 12 चिमुरड्या मुलींना या व्यापारात ढकलण्यासाठी विकलं गेलं. या दलदलीतून 3038 महिलांची सुटका करण्यात प्रशासनाला यश आलं असलं, तरी स्वयंसेवी संस्थांचा दावा काही वेगळाच आहे. त्यांच्या मते, पडद्यामागची खरी संख्या या सरकारी आकड्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)