सोशल मीडियावरचा AI 'स्लॉप' काय आहे? त्याबाबत लोक इतके संतापले का आहेत?

- Author, जो टिडी
- Role, सायबर प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
- वाचन वेळ: 11 मिनिटे
थिओडोरला आठवतं की त्या आर्टिफिशिल इंटेलिजन्स (एआय) स्लॉपमुळे त्याचा संयम सुटला होता.
एआय स्लॉप म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार करण्यात निकृष्ट दर्जाचं, अनेकदा सत्यता नसलेलं, लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा पैसे कमावण्यासाठी तयार करकण्यात आलेला डिजिटल कॉन्टेंट.
थिओडोरचा संयम या फोटोमुळे सुटला. दक्षिण आशियातील गरीब, कृश झालेल्या दोन मुलांचा हा फोटो होता. काही कारणामुळे, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण मुलांसारखी असून त्यांच्या चेहऱ्यावर दाट दाढी होती.
त्यातल्या एका मुलाला हात नव्हते आणि फक्त एकच पाय होता. तर दुसऱ्या मुलाच्या हातात एक फलक होता. त्यावर लिहिलं होतं, आज माझा वाढदिवस आहे आणि या फोटोला लाईक करा.
ती दोघं मुसळधार पावसात एका गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध वाढदिवसाचा केक घेऊन बसले होते. ते असं का बसले होते? त्यामागचं कारण न समजण्यासारखं होतं.
तो फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चा वापर करून तयार करण्यात आला होता, हे दाखवणाऱ्या अनेक स्पष्ट खुणा त्यात दिसत होत्या. मात्र फेसबुकवर तो फोटो अतिशय व्हायरल झाला. त्याला जवळपास 10 लाख लाईक्स आणि हार्ट इमोजी मिळाले.
त्यामुळे थिओडोर चिडला.

फोटो स्रोत, Left: Théodore. Right: “Baby Bubbles and Babbles” Facebook page.
"ते पाहून माझं डोकं चक्रावलं. एआयनं बनवलेल्या ते मूर्खपणाचे फोटो फेसबुकवर सर्वत्र पसरलेले होते. त्यांची कोणतीही पडताळणी केल्याशिवाय त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता. माझ्यासाठी ते सर्व वेडेपणाचं, विवेकशून्य होतं," असं 20 वर्षांचा थियोडोर म्हणाला. तो पॅरिमधील विद्यार्थी आहे.
म्हणून थियोडोरनं एक्स (आधीचं ट्विटर) या सोशल मीडियावर एक अकाउंट सुरू केलं. त्याला त्यानं 'इन्सेन एआय स्लॉप' असं नाव दिलं. मग त्यानं लोकांची फसवणूक करणारं कॉन्टेंट त्याला सापडल्यावर, त्यावर उघडपणे टीका करण्यास आणि त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.
त्यानंतर इतरांनी थिओडोरची दखल घेतली. लवकरच त्याचा इनबॉक्स लोकांच्या संदेशांनी भरला. हे लोक त्याला तथाकथित एआय स्लॉप म्हणजे लोकप्रिय झालेलं एआयद्वारे निर्मित निकृष्ट कॉन्टेंट पाठवत होते.
काही सामान्य विषय समोर येऊ लागले. धर्म, सैन्य किंवा गरीब मुलं मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी करत आहेत.
"तिसऱ्या जगातील मुलं एखादी प्रभावी गोष्ट करत असल्यास, ते नेहमीच लोकप्रिय होतं. उदाहरणार्थ, आफ्रिकेतील एखादा गरीब मुलगा कचऱ्यापासून चाकोरीबाहेरची अतिशय वेगळी मुर्ती बनवतो. मला वाटतं की लोकांना ते समाधानाचं वाटतं, त्यामुळे ते बनवणारे विचार करतात, छान, चला अशाच प्रकारच्या आणखी गोष्टी तयार करूया," असं थिओडोर म्हणतो.
थिओडोरच्या अकाउंटचे लवकरच 1,33,000 हून अधिक फॉलोअर्स झाले.
एआय स्लॉपचा हा तीव्र हल्ला आता थांबवता येण्यासारखा नाही. थिओडोर त्याला अविश्वसनीय, घाईघाईनं बनवलेले व्हीडिओ आणि फोटो असं म्हणतो. तंत्रज्ञान कंपन्यांनी एआयला स्वीकारलं आहे.
काही कंपन्यांचं म्हणणं आहे की त्यांनी एआय 'स्लॉप'च्या काही प्रकारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अर्थात तरीदेखील सोशल मीडियावर अजूनही बरंचसं याप्रकारचं कॉन्टेंट दिसत आहे.
फक्त काही वर्षांच्या कालावधीतच सोशल मीडियाच्या वापराचा अनुभव पूर्णपणे बदलला आहे. हे कसं घडलं आणि त्याचा समाजावर काय परिणाम होईल?
कदाचित सर्वात निकडीचा प्रश्न हा आहे की, या सर्व गोष्टींची सोशल मीडियाच्या अब्जावधी युजर्सना खरोखरंच किती पर्वा आहे?
सोशल मीडियाचा 'तिसरा टप्पा'
ऑक्टोबरमध्ये कंपनीच्या तिमाही निकालांच्या यशामुळे उत्साही वातावरणातील आणखी एका बैठकीदरम्यान मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी आनंदानं जाहीर केलं की सोशल मीडियानं आता तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. हा टप्पा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर केंद्रित आहे.
सोशल मीडियाचा पहिला टप्पा म्हणजे, जेव्हा तुम्ही थेट फॉलो करत असलेल्या मित्र, कुटुंब आणि इतर अकाउंटमधून सर्व कॉन्टेंट येत होतं.
"दुसरा टप्पा म्हणजे, जेव्हा आपण सर्व क्रिएटरद्वारा तयार करण्यात आलेलं कॉन्टेंट जोडलं. आता एआयमुळे कॉन्टेंट तयार करणं आणि त्यात मिश्रण करणं, बदल करणं सोपं झालं आहे. त्यामुळे यात कॉन्टेंटच्या आणखी मोठ्या साठ्याची भर पडणार आहे," असं झुकरबर्ग यांनी भागधारकांना सांगितलं होतं.
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि थ्रेड्स या सोशल मीडिया साईट्स, मेटा ही कंपनी चालवते. थ्रेड्स लोकांना फक्त एआयद्वारे निर्मित कॉन्टेंट पोस्ट करण्याची परवानगी देत नाहिये, तर अशा प्रकारचं अधिक कॉन्टेंट तयार करणं शक्य होईल यासाठीची उत्पादनंदेखील त्यांनी लाँच केली आहेत.
फोटो आणि व्हीडिओ तयार करणारे टूल आणि अधिकाधिक शक्तिशाली फिल्टर्स आता सर्वत्र उपलब्ध करून दिले जात आहेत.
यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बीबीसीनं संपर्क साधला असता, मेटानं जानेवारीतील तिमाही निकालांच्या बैठकीचा संदर्भ दिला.

फोटो स्रोत, Reuters
या बैठकीत, त्यांनी सांगितलं होतं की, कंपनी एआयवर आणखी लक्ष केंद्रित करते आहे. त्यांनी एआय स्लॉप म्हणजे एआयद्वारे तयार होणाऱ्या निकृष्ट कॉन्टेंट रोखण्यासाठीच्या कोणत्याही कारवाईचा उल्लेख केला नाही.
झुकरबर्ग म्हणाले, "लवकरच आपल्याला नवीन मीडिया फॉरमॅटचा स्फोट पाहायला मिळेल. हा फॉरमॅट अधिक गुंतवून ठेवणारा आणि संवादात्मक असेल. हे सर्व निव्वळ एआयमधील प्रगतीमुळेच शक्य होईल."
युट्युबचे मुख्य कार्यकारी अधिकारी नील मोहन यांनी 2026 मधील त्यांच्या भविष्याविषयीच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, फक्त डिसेंबर महिन्यातच 10 लाखांहून अधिक युट्युब चॅनल्सनी कॉन्टेंट तयार करण्यासाठी या प्लॅटफॉर्मच्या एआय टूलचा वापर केला.
"ज्याप्रमाणे सिंथेसायझर, फोटोशॉप आणि सीजीआयनं ध्वनी आणि दृश्यांमध्ये क्रांती घडवून आणली. त्याचप्रमाणे एआयदेखील ते स्वीकारण्यास तयार असणाऱ्या कल्पक लोकांसाठी वरदान ठरेल," असं त्यांनी लिहिलं आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे देखील मान्य केलं की 'एआय स्लॉप म्हणजे निकृष्ट कॉन्टेंटबद्दलची' चिंता वाढते आहे. ते म्हणाले की 'निकृष्ट दर्जाचं, पुनरावृत्ती होणारं कॉन्टेंट' शोधण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी प्रणालीत सुधारणा करण्यासाठी त्यांची टीम काम करते आहे.
मात्र, कशाची वाढ व्हावी आणि काय वाढू दिलं नाही पाहिजे, यासाठी परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यांनी लक्षात आणून दिलं की, एकेकाळी विशिष्ट गटापुरतं मर्यादित असलेलं एएसएमआर (डोक्याला मुंग्या आणणारे शांत, सुखकारक आवाज) आणि लाईव्ह व्हीडिओ गेम खेळणं यासारखं कॉन्टेंट आता मुख्य प्रवाहात आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कॅपविंग या एआय कंपनीच्या संशोधनानुसार, नव्यानं उघडलेल्या युट्युब अकाउंट दाखवलं जाणारं 20 टक्के कॉन्टेंट आता 'निकृष्ट-गुणवत्तेचे एआय व्हीडिओ' असतात.
विशेषकरून यात शॉर्ट-फॉर्म व्हीडिओ सर्वात जास्त लोकप्रिय किंवा सक्रिय होते. कारण कॅपविंगला आढळलं की संशोधकांनी तयार केलेल्या नवीन अकाउंटवर दाखवण्यात आलेल्या पहिल्या 500 युट्युब शॉर्ट्स क्लिपपैकी 104 क्लिपमध्ये अशाप्रकारचं कॉन्टेंट आढळलं.
क्रिएटर इकॉनॉमी म्हणजे कॉन्टेंट तयार करण्यासंदर्भातील आर्थिक बाब, हा एक मोठा प्रेरक घटक असल्याचं दिसतं. कारण लोक आणि चॅनल एंगेजमेंट आणि व्ह्यूजमधून पैसे कमाऊ शकतात.
काही एआय चॅनल आणि व्हीडिओला मिळालेले व्ह्यूज पाहता, लोक खरोखरंच याप्रकारच्या कॉन्टेंटकडे आकर्षित होत आहेत - किंवा किंबहुना, आपण काय पाहावं हे अल्गोरिदम ठरवत आहेत.
कॅपविंगनुसार, भारतातील 'बंदर अपना दोस्त' हे सर्वाधिक व्ह्यूज असलेलं एआय स्लॉप चॅनल आहे. त्याला 2.07 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. त्यातून त्याच्या क्रिएटर्सना वार्षिक अंदाजे 40 लाख डॉलर्सची (अंदाजे 36 कोटी 60 लाख रुपये) कमाई झाली आहे.
मात्र यावर एकप्रकारची तीव्र प्रतिक्रियादेखील उमटते आहे.
अनेक व्हायरल एआय व्हीडिओंच्या खाली, त्या कॉन्टेंटचा निषेध करणाऱ्या संतप्त प्रतिक्रियांचा भडिमार दिसणं, ही आता सामान्य बाब झाली आहे.
महाकाय राक्षस आणि पोटातील प्राणघातक परजीवी
पॅरिसचा विद्यार्थी असलेल्या थिओडोरनं या प्रतिक्रियेला चालना देण्यास मदत केली.
एक्स या सोशल मीडियावर नव्यान मिळालेल्या प्रभावाचा वापर करून त्यानं, मोठ्या प्रमाणात व्ह्यूज असलेल्या विचित्र एआय कार्टूनच्या पुराबद्दल युट्युबच्या मॉडरेटर्सकडे तक्रार केली. त्याच्या मते हे कॉन्टेंट अस्वस्थ करणारं आणि हानिकारक होतं. तर काही वेळा ते मुलांना लक्ष्य करून बनवण्यात आलं आहे, असं त्याला वाटलं.
त्या व्हीडिओंना 'मांजर तिच्या पिल्लाला पोटातील प्राणघातक परजीवींपासून वाचवते' अशी नावं होती आणि त्यात भयानक स्वरूपाची दृश्य दाखवण्यात आली होती.
एका शॉर्ट क्लिपमध्ये दाखवण्यात आलं होतं की नाईट ड्रेसमध्ये असलेली एक महिला परजीवी खाते आणि नंतर एका रागावलेल्या महाकाय राक्षसात तिचं रुपांतर होतं. त्या राक्षसाला शेवटी येशू ख्रिस्त बरं करतो.

फोटो स्रोत, 'Sprung Nexus' YouTube account
युट्युबनं ती चॅनल्स काढून टाकली. त्यांनी आम्हाला सांगितलं की या चॅनल्सनी त्यांच्या समुदायविषयक मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांनी असं केलं.
त्यांनी सांगितलं की "कॉन्टेंट कसा तयार करण्यात आला आहे, याची पर्वा न करता, त्यांच्या युजर्सना उच्च गुणवत्तेच्या कॉन्टेंटशी जोडण्यावर त्यांचं लक्ष केंद्रित आहे." ते म्हणाले की "निकृष्ट गुणवत्तेच्या एआय कॉन्टेंटचा प्रसार कमी करण्यासाठी" ते काम करत आहेत.
मात्र, त्या अनुभवामुळे तसंच त्यासारख्या इतर असंख्य अनुभवांमुळे थिओडोर हताश झाला आहे, खचून गेला आहे.
अगदी, पिंटरेस्टसारख्या वरवर पाहता सुखावह जीवनशैलीच्या वाटणाऱ्या वेबसाईट्सना देखील याचा फटका बसला आहे. ही वेबसाईट पाककृती आणि अंतर्गत सजावटीच्या कल्पनांसाठीचं एक व्यासपीठ आहे.
एआय स्लॉप म्हणजे एआयद्वारे निर्मित निकृष्ट गुणवत्तेच्या कॉन्टेंटच्या पुरामुळे युजर्स इतके निराश झाले आहेत की कंपनीनं एआयद्वारे निर्मित कॉन्टेंटसाठी एक नवीन ऑप्ट-आऊट प्रणाली सुरू केली आहे. मात्र ही प्रणाली युजर्सं त्यांच्या परिपूर्ण घराची चित्रं एआयद्वारे निर्मित असल्याचं मान्य करण्यावर अवलंबून आहे.
कॉमेंट्समधून व्यक्त होणारा संताप
माझ्या फीडवर (आणि मला माहित आहे की प्रत्येकाचं फीड वेगळं असतं - त्यात कॉमेंट्सचाही समावेश आहे) - एआय स्लॉपविरुद्ध अखंडपणे तीव्र विरोध व्यक्त केला जातो आहे.
मग ते टिकटॉक असो, थ्रेड्स असो, इन्स्टाग्राम असो किंवा एक्स असो, या प्रकारच्या कॉन्टेंटविरुद्ध एक लोकशक्तीची चळवळ उभी राहिलेली दिसते आहे.
काहीवेळा मूळ पोस्टला मिळालेल्या लाईक्सपेक्षा एआयवर रोष व्यक्त करणाऱ्या कॉमेंट्सला अधिक लाईक्स मिळालेले असतात. नुकतंच एका व्हीडिओच्या बाबतीत असंच घडलं आहे.
या व्हीडिओमध्ये एक स्नोबोर्डरला (बर्फावर बोर्डच्या सहाय्यानं घसरण जाणारा) एका लांडग्याला अस्वलापासून वाचवताना दाखवलं आहे.

फोटो स्रोत, Unknown
या व्हीडिओला स्वत:ला 932 लाईक्स मिळाले होते. त्याउलट एका कॉमेंट करणाऱ्याला 2,400 लाईक्स मिळाले होते. त्यानं कॉमेंट केली होती की, "जर तुम्ही या एआय कचऱ्याला कंटाळले असाल तर हात वर करा."
पण अर्थातच, यात सहभागी होऊन लोक कदाचित त्यांना आवडत नसलेल्या गोष्टीलाच खतपाणी घालत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी सर्वप्रकारचा सहभाग हा चांगलाच असतो. तिथे आपल्याला गुंतवून ठेवणं हेच महत्त्वाचं असतं.
त्यामुळे तुमच्या सोशल फीडवर तो अप्रतिम, मनाला स्पर्श करणारा किंवा धक्कादायक व्हीडिओ खरा आहे की नाही, यामुळे खरंच काही फरक पडतो का?
'ब्रेन रॉट' इफेक्ट (मेंदूची क्षमता कमी होणं)
एमिली थॉर्सन अमेरिकेतील सिराक्यूज विद्यापीठात सहायक प्राध्यापक आहेत. त्या राजकारण, चुकीची माहिती आणि गैरसमज यामध्ये तज्ज्ञ आहेत. त्या म्हणतात की लोक सोशल मीडियावर काय करत आहेत, यावर ते अवलंबून असतं.
त्या म्हणतात, "एखादी व्यक्ती जर फक्त मनोरंजनासाठी शॉर्ट व्हीडिओ प्लॅटफॉर्म वापरत असेल, तर एखादी गोष्ट फायदेशीर किंवा उपयुक्त आहे की नाही याबद्दलचा त्यांचा निकष फक्त ती 'गोष्ट मनोरंजक आहे का?' इतकाच असतो."
त्या पुढे म्हणतात, "मात्र जर कोणी त्या प्लॅटफॉर्मचा वापर एखादा विषय शिकण्यासाठी किंवा समुदायातील सदस्यांशी जोडलं जाण्यासाठी करत असेल, तर त्यांना एआयद्वारे तयार करण्यात आलेलं कॉन्टेंट अधिक समस्या असलेलं वाटू शकतं."
एआय स्लॉपबद्दल लोकांना काय वाटतं, हे ते कॉन्टेंट कशाप्रकारे सादर केलं जातं यावरदेखील अवलंबून असतं.
जर एखादी गोष्ट स्पष्टपणे विनोद म्हणून बनवली असेल, तर ती तशीच स्वीकारली जाते. मात्र जेव्हा एआय स्लॉप विशेषकरून फसवणूक करण्यासाठी तयार केला जातो, तेव्हा त्याचा लोकांना राग येऊ शकतो.
मी अलीकडेच पाहिलेला एक एआयद्वारे निर्मित व्हीडिओ हे त्याचंच द्योतक आहे. तो एका बिबट्याच्या थक्क करणाऱ्या शिकारीचा, एक आश्चर्यकारक वास्तववादी, नैसर्गिक-इतिहास-शैलीचा व्हीडिओ आहे. या व्हीडिओवरील कॉमेंट्समध्ये काही प्रेक्षक फसलेले होते. तर काहीजण गोंधळलेले होते.
"हा कोणत्या माहितीपटातील आहे? कृपया सांगा - आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर झालेला नाही, हे दाखवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे," असं एका कॉमेंट करणाऱ्यानं विचारलं होतं.

इटलीतील पादोवा विद्यापीठातील अलेस्सांद्रो गालेआझ्झी सोशल मीडियावरील गैरवर्तन आणि इको चेंबर्सवर संशोधन करतात.
ते म्हणतात की एखादा व्हीडिओ एआयद्वारे निर्मित आहे की नाही हे तपासण्यासाठी, मानसिक प्रयत्न करावे लागतात. त्यांना भीती वाटते की दीर्घकाळात लोक हे तपासणंच सोडून देतील.
"माझ्या मते, एआयचा वापर करून तयार करण्यात आलेल्या निरर्थक, कमी दर्जाच्या कॉन्टेंटच्या पुरामुळे लोकांचं एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा कालावधी कमी होऊ शकतो," असं ते म्हणतात.
फसवण्याच्या उद्देशानं तयार केलेला अधिक विनोदी कॉन्टेंट आणि माशांनी बूट घातलेले किंवा गोरिला जिममध्ये वेटलिफ्टिंग करत असल्याचा स्पष्टपणे खोटा एआय स्लॉप कॉन्टेंट यामध्ये ते फरक करतात.
मात्र अधिक तऱ्हेवाईक कॉन्टेंटदेखील कदाचित हानिकारक ठरू शकतो. ते 'ब्रेन रॉट' म्हणजे 'मेंदूची क्षमता कमी होण्याच्या' धोक्याबद्दल बोलतात. आपण सतत सोशल मीडियाच्या संपर्कात आल्यामुळे आपल्या बौद्धिक क्षमतेची हानी होत असल्याच्या कल्पनेला ब्रेन रॉट म्हणतात.
"मी म्हणेन की एआय स्लॉपमुळे ब्रेन रॉट इफेक्ट वाढतो. यामुळे लोक असा कॉन्टेंट पटकन पाहू लागतात, जो त्यांना माहित असतो की खरा असण्याची शक्यता नाही तसंच कदाचित अर्थपूर्ण नाही किंवा मनोरंजकही नाही," असं ते म्हणतात.
मॉडरेशन टीममध्ये कपात
एआय स्लॉपच्या पलीकडे एआयद्वारे निर्मित काही कॉन्टेंटचे खूपच गंभीर परिणाम होऊ शकतात.
इलॉन मस्कची xAI ही कंपनी आणि एक्स हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांना अलीकडेच त्यांचे नियम बदलण्यास भाग पडलं. ग्रोक या चॅटबॉटचा वापर महिला आणि मुलांचे कपडे डिजिटल पद्धतीनं काढण्यासाठी केला जात असल्याचं समोर आल्यानंतर त्यांना हे बदल करावे लागले होते.
अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर, रस्त्यवर रडणाऱ्या लोकांचे आणि अमेरिकेचे आभार मानणाऱ्या लोकांचे बनावट व्हीडिओ पसरवण्यात आले होते. याप्रकारच्या कॉन्टेंटमुळे लोकांचं मत तयार होऊ शकतं. अमेरिकेचा हा हल्ला प्रत्यक्षात असता त्यापेक्षा अधिक लोकप्रिय होता, अशी समजूत किंव आभास त्यातून निर्माण होऊ शकतो.
अनेक लोक बातम्यांसाठी फक्त सोशल मीडियाचाच वापर करत असल्यामुळे ही बाब विशेषकरून चिंताजनक आहे, असं विश्लेषक म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. मॅनी अहमद, ओपनऑरिजिन्स या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी एआयद्वारे निर्मित फोटो आणि खरे फोटो यामध्ये फरक करते. डॉ. मॅनी अहमद म्हणतात, खरं कॉन्टेंट पोस्ट करणाऱ्यांना त्यांचे व्हीडिओ आणि फोटो अस्सल असल्याचं सिद्ध करता येईल यासाठी आपल्याला नवीन पद्धतीची आवश्यकता आहे.
"आपण आधीच अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत, जिथे फक्त इन्स्पेक्शन करून तुम्ही खरं काय आहे हे आत्मविश्वासानं सांगू शकत नाही. खोटं किंवा बनावट काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, आपल्याला अशा पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे, ज्यामुळे अस्सल कॉन्टेंटला सार्वजनिकरित्या त्याचा स्त्रोत सिद्ध करता येईल," असं ते म्हणाले.
तुम्हाला कदाचित वाटेल की ही जबाबदारी सोशल मीडिया कंपन्या घेऊ शकतात. मात्र मेटा आणि एक्ससह अनेक सोशल मीडिया कंपन्यांनी त्यांच्या मॉडरेशन टिममध्ये कपात केली आहे.
त्यांनी अधिक सामूहिक दृष्टीकोन स्वीकारला आहे. एखादं कॉन्टेंट बनावट आहे किंवा दिशाभूल करणारं आहे हे दाखवण्यासाठी आता युजर्सवर अधिक अवलंबून राहण्याकडे त्यांचा कल आहे.
स्लॉपमुक्त सोशल मीडिया?
मग, जर सध्याच्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या स्लॉप म्हणजे एआयद्वारे निर्मित निकृष्ट कॉन्टेंट पसरू देण्यात मोठ्या प्रमाणात खूश असतील, तर एखादा नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पुढे येऊन स्लॉप मुक्त पर्यायाचं आश्वासन देत, शेवटी सध्याच्या कंपन्यांना आव्हान देऊ शकेल का?
मात्र हे अशक्य वाटतं. कारण एआयद्वारे निर्मित कॉन्टेंटची ओळख पटवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे.
एखादा व्हीडिओ किंवा फोटो हा निश्चितपणे बनावट आहे की नाही हे मशीन आता अचूकपणे ओळखू शकत नाहीत. एखादं कॉन्टेंट 'स्लॉप' आहे की नाही या कॉन्टेंटनुसार होणाऱ्या निर्णयाबाबत मशीनला आणखी संघर्ष करावा लागेल.
मात्र, जर एखादा नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आला आणि लोकांनी त्यांच्या कृतीतून (अधिक अचूकपणे सांगायचं तर नजरेनं आणि अंगठ्याच्या वापरातून) त्याला पसंती दिली, तर त्यामुळे परिस्थिती बदलू शकेल. यासंदर्भात मला 'बीरिअल' नावाच्या सोशल मीडियातील स्पर्धक प्लॅटफॉर्मच्या उदयाची आठवण येते.

फोटो स्रोत, Unknown
हे फ्रेंच ॲप कोरोनाच्या संकटकाळात लोकप्रिय झालं. हे ॲप युजर्सना अचानक कोणत्याही फिल्टरशिवाय काढलेल्या सेल्फीद्वारे त्यांचं खरं रूप दाखवण्यास प्रोत्साहन देतं.
अर्थात, 'बीरिअल' हे ॲप अद्याप फेसबुक आणि स्नॅपचॅटसारख्या प्लॅटफॉर्म इतकं यशस्वी झालेलं नाही. कदाचित ते त्या पातळीवर कधीच पोहोचणार नाही. मात्र त्यामुळे इतर प्लॅटफॉर्मना याची दखल घ्यावी लागली. काही प्रकरणांमध्ये तर त्यांनी या कल्पनेची नक्कल केली.
जर एआय स्लॉपला विरोध करणारा एखादा स्पर्धक पुढे आला, तर कदाचित पुन्हा असं घडू शकतं.
थिओडोरबद्दल बोलायचं तर, त्याला वाटतं की आपण ही लढाई हारलो आहोत आणि आता एआय-स्लॉप इथे कायमचा राहणार आहे.
त्याच्या मेलबॉक्समध्ये त्याच्या 1,30,000 फॉलोअर्सकडून अजूनही मेसेज, पोस्ट येत असूनही तो आता पूर्वीइतक्या पोस्ट टाकत नाही. तसंच ऑनलाइन जीवनातील या नवीन वास्तवाशी त्यानं मोठ्या प्रमाणात जुळवून घेतलं आहे.
"माझ्या अनेक फॉलोअर्सच्या उलट, मी एआयचा कट्टर विरोधक नाही. मी, पटकन मनोरंजन करण्यासाठी आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एआय स्लॉपमुळे होणाऱ्या ऑनलाइन प्रदूषणाच्या विरोधात आहे."
(शीर्षक फोटोचे क्रेडिट: बीबीसी; एआय फोटो अडोब फायरफ्लायचा वापर करून तयार करण्यात आला आहे)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











