'चकिंग'ची चर्चा असलेला पाकिस्तानी गोलंदाज ट्रम्प कार्ड ठरणार? 'पॉज'वर अश्विननं काय मार्ग सुचवला?

उस्मान तारिक

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 6 मिनिटे

'त्यानं जे केलं ते तर भारतीय क्रिकेटपटूंनाही समजणार नाही.'

'हा भारताविरुद्धचा हुकमाचा एक्का असेल.'

टी-20 विश्वचषकातील पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील सामन्यात एका वाहिनीवरील समालोचनादरम्यान सुरू असलेली ही चर्चा.

पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारिक याच्यावर ही चर्चा केंद्रीत होती. त्याची गोलंदाजीची विशिष्ट अ‍ॅक्शन याआधीही चर्चेचा विषय ठरलेली आहे.

पाकिस्ताननं या सामन्यात अमेरिकेचा 32 धावांनी पराभव केला. त्यात उस्मान तारिकने चार षटकांत फक्त 27 धावा देत तीन विकेट घेतल्या.

या सामन्यातल्या काही क्लिप भारतात सोशल मीडियावर झपाट्यानं पसरल्या. काही यूझर्सनं त्यावर प्रतिक्रिया देत उस्मान तारिकच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

उस्मान चेंडू टाकण्यापूर्वी ज्या पद्धतीनं थांबतो किंवा पॉज घेतो, ते नियमांत बसतं का? असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.

मात्र, या संपूर्ण वादात भारताचा माजी फिरकी गोलंदाज आर. अश्विनने उस्मान तारिकचा बचाव केला आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटूंचे मत काय?

श्रीवत्स गोस्वामी नावाच्या एका सोशल मीडिया यूझरनं 'एक्स'वर एका अमेरिकन फलंदाजाचा उस्मानच्या चेंडूवरील विकेटचा व्हीडिओ शेअर केला.

व्हीडिओमध्ये उस्मान चेंडू टाकण्यापूर्वी क्षणभर थांबताना किंवा पॉज घेताना दिसत आहे.

त्यावर श्रीवत्स गोस्वामी यांनी लिहलंय की, "फुटबॉलमध्येही आता खेळाडूंना पेनल्टी रन-अप दरम्यान थांबण्याची परवानगी नाही. मग हे कसं नियमांत बसतं? अ‍ॅक्शन ठिक आहे पण पॉज? तोही चेंडू टाकण्याआधी त्यापूर्वी? हे चालू शकत नाही."

श्रीवत्स गोस्वामी यांच्या पोस्टचा हवाला देत आर. अश्विननं लिहिलं की, "फुटबॉलमध्ये हे मान्य नाही हे खरं असलं तरी, तर एखाद्या फलंदाजाला पंचांना न सांगता स्विच करून (स्विच करणं म्हणजे फलंदाजी करता अचानक बाजू बदलने) चेंडू खेळण्याची परवानगी असेल, तर मग सर्व निर्बंध फक्त गोलंदाजांवरच का असावेत? गोलंदाजांना तर पंचांना न कळवता दुसऱ्या हाताने गोलंदाजी करण्याचीही परवानगी नाही. मग, हा नियम आधी बदलला पाहिजे."

माजी भारतीय क्रिकेटपटूंचे मत काय?

फोटो स्रोत, Getty Images

तर, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी एका व्हीडिओमध्ये पाकिस्तानी फिरकी गोलंदाजी मजबूत असल्याचं म्हणत, उस्मान तारिकची अ‍ॅक्शन रंजक असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं, "उस्मानची अ‍ॅक्शन रंजक आहे. असं वाटतं की तुम्ही टीव्ही पाहत असताना अचानक कोणीतरी पॉज घेतला. तो थांबतो आणि नंतर गोलंदाजी करतो. हळू गोलंदाजी करतो.

मला त्यात काही अडचण वाटत नाही. तुम्ही उभे राहून पॉज घेऊन गोलंदाजी करू शकता. त्याबाबतचा काहीही नियम नाही. शिवाय हळू गोलंदाजी करताना त्याच्या हाताचा कोपरा वाकलेला नसतो."

भारत-पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, हात न वाकवता चेंडूचा वेग 20-25 किमीने वाढवणं शक्य आहे का? असा प्रश्नही आकाश चोप्रा उपस्थित करतात.

हा वाद एवढा वाढला की आर. अश्विननं एक्सवर आणखी एक मोठी पोस्ट लिहिली. त्यानं त्यात म्हटलं की, "पहिली गोष्ट म्हणजे, अ‍ॅक्शन योग्य आहे की नाही हे फक्त आयसीसी बॉलिंग अ‍ॅक्शन टेस्टिंग सेंटरमध्येच तपासता येतं."

"दुसरं म्हणजे, 15 डीग्री (अंश) नियम आहे. त्यानुसार कोपरा सरळ ठेवावा लागतो आणि गोलंदाज 15 अंशांवर गोलंदाजी करत आहे की नाही, हे पंचांना मैदानावर ठरवणं अशक्य आहे."

"यावर एकमेव उपाय म्हणजे रिअल-टाइम कॉम्पिटिशन टेस्टिंग टूल हवं. हा एक संभ्रमाचा मुद्दा आहे आणि एखाद्यावर या मुद्द्याचा फायदा घेत असल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. गोलंदाजीचा विचार करता, क्रीजच्या आत थांबणं नियमात बसतं की नाही? तर मला वाटतं की ते पूर्णपणे कायदेशीर आहे कारण ती त्याची रेग्युलर बॉलिंग अ‍ॅक्शन आहे."

उस्मान तारिकने स्वतःच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनबाबत काय म्हटलं?

उस्मान तारिकनं सुमारे एक वर्षापूर्वी एका मुलाखतीत म्हटलं होतं त्याची गोलंदाजीची अ‍ॅक्शन वेगळी वाटण्याचं कारण म्हणजे, त्याच्या हाताला 'दोन कोपरं' आहेत.

गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर तो डॉक्टरांकडे गेला होता आणि त्यानं दोन्ही हात तपासले होते.

उस्मान तारिकच्या मते, त्याच्या शरीराची रचना इतर सामान्य व्यक्तींपेक्षा वेगळी आहे. "जन्मापासूनच हे असं आहे आणि दोन कोपरांमुळं मी माझा हात सरळ होऊ शकत नाही."

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं गेल्या वर्षी 7 मे रोजी एका निवेदनात म्हटलं होतं की, क्वेटा ग्लॅडिएटर्सचा फिरकी गोलंदाज उस्मान तारिकची लाहोरमधील बायोमेकॅनिक्स लॅबमध्ये चाचणी झाली होती. तिथे त्याची गोलंदाजीची अ‍ॅक्शन पास करण्यात आली होती.

पीसीबीच्या मते, 13 एप्रिल रोजी लाहोर कलंदर्सच्या पीएसएल सामन्यादरम्यान उस्मानच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ही चाचणी करण्यात आली होती.

अश्विननंच उपायही सुचवला

अश्विननंच उस्मान तारिकचा फलंदाजांनी कशाप्रकारे सामना करायला हवा यासाठीच्या काही टिप्सही दिल्या आहेत. त्याने अॅश की बात नावाच्या यूट्यूब चॅनेलवरील एका व्हीडिओमध्ये बोलताना या टिप्स दिल्या.

उस्मान तारिक जर थांबून गोलंदाजी करत असेल, तर फलंदाजालाही बाजुला सरकण्याचा अधिकार आहे, असं अश्विननं म्हटलं.

"बॉल कधी येणार आहे हे मला माहिती नाही, मला वाटलं की गोलंदाज थांबला आहे', असं फलंदाज बाजुला हटून सांगू शकतो, असं अश्विननं म्हटलं.

मी असतो तर असं केलं असतं असंही अश्विन यावेळी म्हणाला. जिंकण्यासाठी नियमात जे काही आहे ते मी करेल असं त्यानं म्हटलं.

त्यामुळं गोलंदाज चेंडू कधी टाकेल हे मला समजत नाही, त्यामुळं मी बाजुला सरकलो हे नियमांत आहे, असं सांगता येत असल्याचं अश्विननं म्हटलं.

जर मी सरकलो तर अंपायरकडे जबाबदारी असते, अंपायर गोलंदाज किंवा फलंदाज कुणाला तरी इशारा देऊ शकतात.

फलंदाजांसाठी कृती किती धोकादायक!

अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानच्या विजयानंतर ईएसपीएनवरील एका चर्चेत, वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इयान बिशप यांनी उस्मान तारिकच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनबद्दल भाष्य केलं.

त्यांनी म्हटलं की, "तो वेगवेगळ्या अँगलने गोलंदाजी करतो. राऊंड आर्म आणि ओव्हर द टॉप. त्यामुळं बॉलचा बाऊन्स वेगळ्या पद्धतीचा असतो. पण महत्त्वाचं म्हणजे तो चेंडू टाकण्यापूर्वी पॉज घेतो आणि फलंदाजाचे पाय किंवा तो कोणता फटका खेळू शकतो हे पाहतो. त्यानंतर टाकलेला चेंडू फलंदाला तसं करण्यापासून रोखण्यासाठी टाकलेला असतो."

"फलंदाजाला बॉल बॅटच्या ऑफ सेंटरने मारण्यास भाग पाडतो. फलंदाजाला बॉलचा बाऊन्स उसळी किंवा व्हेरिएशनचा फायदा होत नाही. तो अशीच गोलंदाजी करत राहील तोपर्यंत तो खास ठरेल, असं मला वाटतं.

वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इयान बिशप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इयान बिशप

दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांनी याच चर्चेत म्हटलं की, हा छोटासा पॉज त्याला फलंदाजांच्या तुलनेत एक पाऊल पुढं नेतो.

त्यांच्या मते, "याचं कारण म्हणजे, त्याला यामुळं वेगवेगळे व्हेरिएशन करण्याचं स्वातंत्र्य मिळतं. गेल्या काही सामन्यांत आपल्याला त्यानं सर्वोत्तम आणि आघाडीच्या फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवल्याचं दिसलं आहे. त्याची ही वेगळी अ‍ॅक्शन या विश्वचषकात पाकिस्तानसाठी निर्णायक ठरू शकते."

नियम काय आहेत?

या प्रकरणातील तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी बीबीसी उर्दूने लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसमधील बायोमेकॅनिक्स तज्ज्ञ प्रोफेसर मोहम्मद ओवैस यांच्याकडून माहिती घेतली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं यापूर्वी त्यांना गोलंदाजांच्या अ‍ॅक्शन तपासण्यासाठी नियुक्त केलं होतं.

त्यांनी सांगितलं की, "गोलंदाजी करताना पॉजचा मुद्दा असेल तर त्यात काहीही अडचण नाही. कोपराच्या कोनात (बॉलिंग करताना) बदल 15 अंशांपेक्षा जास्त असता कामा नये. हा बदल 15 अंश किंवा त्यापेक्षा कमी असेल तर चेंडू वैध मानला जाईल."

कोपराच्या कोनात बदल म्हणजे बॉलिंग करताना हात कोपरामधून 15 अंशांपेक्षा जास्त वाकलेला नसावा.

ते म्हणाले की, "एखादा गोलंदाज थांबून गोलंदाजी करत असेल तर त्यालाही तेच नियम लागू होतात हे निश्चित आहे. आयसीसीच्या नियमांमध्ये अशाप्रकारे थांबून गोलंदाजी करण्याबाबत काहीही नियम नाही. नियम फक्त हात कोपरातून 15 अंशांपेक्षा अधिक वळण्याबाबतचा आहे."

उस्मान तारिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उस्मान तारिक

प्राध्यापक ओवैस यांच्या मते, "कधीकधी गोलंदाजाची हाताची रचनी नैसर्गिकरित्या खूप लवचिकता असते. त्यामुळं उघड्या डोळ्यांना गोलंदाज चकिंग म्हणजे चुकीच्या अ‍ॅक्शनने गोलंदाजी करत आहे असं वाटू शकतं.

पण आयसीसीच्या कॅमेऱ्यांनी तपासल्यानंतर ते चकिंगच्या श्रेणीत येत नाही. चाचणीत गोलंदाज चकिंग करत असल्याचं सिद्ध न होणं हे शक्य आहे."

आयसीसीच्या नियमांनुसार, कोणत्याही गोलंदाजाची अ‍ॅक्शन तपासण्यासाठी वेगवेगळ्या कोनातून 12 इन्फ्रारेड आयआर कॅमेरे आणि दोन हाय-स्पीड कॅमेरे बसवले जातात. त्याचं निरीक्षण आयसीसी सॉफ्टवेअरद्वारे केलं जातं आणि ती अ‍ॅक्शन योग्य आहे की नाही ते ठरवलं जातं.

कोण आहे उस्मान तारिक?

ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार उस्मान तारिकने नोव्हेंबर 2023 मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय टी 20 स्पर्धेतून पदार्पण केलं आहे. त्यानं 2024 मध्ये पीएसएलमध्येही भाग घेतला होता. पण त्याला फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही.

पण 2024-25 दरम्यान त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत जोरदार पुनरागमन केलं. त्यानं 15 सामन्यांमध्ये 22 विकेट्स घेतल्या.

या काळात त्याच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनबद्दल दोन तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी पहिली तक्रार 2024 च्या पीएसएल दरम्यान होती.

पण लाहोर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये चाचणीनंतर त्याला योग्य ठरवण्यात आलं. त्यानंतर त्यानं गोलंदाजी सुरू ठेवली.

पण पुन्हा पुढच्या पीएसएल स्पर्धेत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतरही तपासात त्याची अ‍ॅक्शन योग्य ठरली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.