मुंबईत मेट्रोच्या पुलाचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू

व्हीडिओ कॅप्शन, मुंबईत मेट्रोच्या पुलाचा भाग कोसळला, एक जणाचा मृत्यू
मुंबईत मेट्रोच्या पुलाचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू

मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ शुक्रवारी दुपारी मेट्रोच्या पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. दुपारी सुमारे 12.20 वाजता उंच मेट्रो पुलाच्या पॅरापेट भिंतीचा सुमारे 6x4 फूट आकाराचा तुकडा रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऑटो रिक्षा आणि एका खाजगी कारवर पडला.

या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

मुंबईत मेट्रोच्या पुलाचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू

फोटो स्रोत, UGC

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयानं (सीएमओ) सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे, तसेच मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या पोस्टमध्ये म्हटलंय की, "मुंबईतील मुलुंड परिसरात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळल्यानं झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत."

सीएमओनं लिहिलंय की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकार मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करेल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च उचलेल."

चौकशी समिती स्थापन- एमएमआरडीए

एमएमआरडीएनं या घटनेनंतर आपली बाजू स्पष्ट केली आहे.

ते म्हणतात, "आज दुपारी 12:15 वाजता, मुलुंड अग्निशमन केंद्राजवळच्या बांधकामाधीन मेट्रो लाईन 4 कॉरिडॉरच्या (वडाळा-कासारवडवली) पियर पी 196 जवळ एक घटना घडली. यात पॅरापेटचा (छताच्या बाजूची छोटी भिंत) एक भाग उंचीवरून खाली पडला आणि एका ऑटोरिक्षावर आदळला.

प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत 4 नागरिक जखमी झाले आणि त्यांना लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. जखमींच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. तसंच त्यांना सर्व आवश्यक वैद्यकीय मदत दिली जात आहे. एमएमआरडीए जखमींचा सर्व वैद्यकीय खर्चाचा भार उचलणार आहे. लागू असलेल्या धोरणांनुसार त्यांना आर्थिक मदत दिली जाईल. तसंच आर्थिक मदत प्राधान्यानं होईल याची खातरजमा एमएमआरडीए करणार आहे."

"ही घटना घडल्यानंतर लगेच, प्रकल्पाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी तो परिसर सुरक्षित केला. हा परिसर अडथळा लावून (बॅरकेटिंग) बंद करण्यात आला आहे. बीएमसी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांबरोबरच्या समन्वयातून तपशीलवार संरचनात्मक सुरक्षितता मूल्यांकन सुरू करण्यात आलं आहे."

एमएमआरडीएनं, पॅरापेटचा भाग पडण्यामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी, एमएमआरडीएचे संचालक (प्रकल्प) बसवराज एम. भद्रगोंड यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. ही समिती बांधकामाची पद्धत, गुणवत्ता नियंत्रण प्रोटोकॉल, पर्यवेक्षणाची यंत्रणा आणि नियमांचं पालन होत असल्याबद्दलच्या नोंदी तपासणार आहे. यावर एक सविस्तर अहवाल प्राधान्यानं मागवण्यात आला आहे.

"सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या काही वृत्तांमध्ये पूर्वी अधोरेखित केलेल्या ठिकाणाच्या दृश्यांचा उल्लेख आहे. यासंदर्भात एमएमआरडीए स्पष्ट करू इच्छितं की सध्याची घटना पिअर नंबर पी196 जवळ घडली आहे. तर जी दृश्यं शेअर केली जात आहेत ती याच पिअरशी संबंधित नाहीत तर वेगळ्या ठिकाणाशी संबंधित आहेत. ही दोन्ही ठिकाणं कॉरिडॉरच्या रचनेत वेगळी आणि भौगोलिकदृष्ट्या वेगळी आहेत. ही घटना पूर्वी अधोरेखित करण्यात आलेल्या ठिकाणी घडल्याचं सूचवणारी कोणतीही माहिती, तथ्यात्मकदृष्ट्या चुकीची आहे. तरीदेखील, संपूर्ण पारदर्शकतेची खातरजमा करण्यासाठीच्या चौकशीचा भाग म्हणून या पैलूची तपासणी केली जाईल."

"खबरदारीचा उपाय म्हणून, प्राथमिक निष्कर्ष किंवा अहवाल समोर येईपर्यंत त्या टप्प्यातील बांधकाम तात्पुरतं थांबवण्यात आलं आहे."

सार्वजनिक सुरक्षितता सर्वात महत्त्वाची बाब आहे. चौकशी अहवाल समोर आल्यानंतर यासंदर्भात जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसंच भविष्यात याप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवल्या जातील. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील माहिती दिली जाईल, असं एमएमआरडीएनं सांगितलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)