बिहारच्या राजकारणात मोठा बदल, मुख्यमंत्री नितीश कुमारांनी भरला राज्यसभेचा अर्ज

नितीश कुमार यांनी भरले राज्यसभेचे नामांकन

फोटो स्रोत, IPRD

फोटो कॅप्शन, नितीश कुमार यांनी भरले राज्यसभेचे नामांकन
वाचन वेळ: 4 मिनिटे

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा अर्ज भरण्यासाठी गृहमंत्री अमित शाह देखील पाटण्यात उपस्थित होते.

नितीश कुमारांनी उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांच्या भविष्याबाबत होणाऱ्या विविध चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नितीश कुमारांनी एक पोस्ट करून याची माहिती दिली आहे.

नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात तब्बल दोन दशकानंतर एक मोठा बदल घडणार आहे.

नितीश कुमार बिहारचं राजकारण सोडून राज्यसभेचा रस्ता निवडू शकतील अशी मोठी चर्चा बिहारमध्ये होत होती.

नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, "मागच्या दोन दशकांमध्ये तुम्ही माझ्यावर मोठा विश्वास दाखवला. त्याच विश्वासाच्या जोरावर आम्ही बिहार आणि तुम्हा सर्वांची सेवा केली आहे."

नितीश कुमारांनी लिहिलं आहे की, "तुमच्या विश्वास आणि पाठिंब्यामुळेच आज बिहार विकास आणि आदराचा एक नवीन आयाम सादर करत आहे. यासाठी मी यापूर्वीही अनेक वेळा तुमचे आभार मानले आहेत."

नितीश कुमार यांच्या उमेदवारी अर्जानिमित्त गृहमंत्री अमित शहा पटना येथे पोहोचले.

फोटो स्रोत, IPRD

फोटो कॅप्शन, नितीश कुमार यांच्या उमेदवारी अर्जानिमित्त गृहमंत्री अमित शहा पटना येथे पोहोचले.

नितीश कुमार म्हणाले, "माझ्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासूनच मला बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची इच्छा होती. या संदर्भात, मी या निवडणुकीत राज्यसभेचा सदस्य होण्याचा प्रयत्न करीत आहे."

"मी तुम्हाला पूर्ण प्रामाणिकपणे खात्री देऊ इच्छितो की तुमच्याशी असलेले हे संबंध भविष्यातही कायम राहतील आणि विकसित बिहार उभारण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्याचा माझा संकल्प अबाधित राहील. स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आणि मार्गदर्शन असेल," असं नितीश कुमार या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

नितीश कुमार दोन दशकांपासून बिहारच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिले आहेत

नितीश कुमार 2005 पासून बिहारच्या सत्ताकारणाचा महत्त्वाचा भाग राहिले आहेत. त्यानंतर दोन दशकं नितीश कुमार बिहारमध्ये सत्तेत राहिले आहेत.

नितीश कुमार

फोटो स्रोत, ANI

2000 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर नितीश कुमार त्यांचं बहुमत सिद्ध करू शकले नव्हते. त्यानंतर 2005 मध्ये भाजपच्या पाठिंब्याने नितीश कुमार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले होते.

2014-15 मध्ये, काही महिन्यांसाठी, नितीश कुमार यांनी त्यांच्याच पक्षाच्या जितन राम मांझी यांना मुख्यमंत्री बनवलं होतं. त्यानंतर पुन्हा नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री बनले आणि मग 'सत्ता कुणाचीही असो मुख्यमंत्री नितीशच असतील' असं म्हटलं जाऊ लागलं.

जनता दल युनायटेड (जेडीयू)मध्ये सध्या काय चाललंय?

गुरुवारी सकाळी, या बातम्या प्रकाशित होऊ लागल्यानंतर जनता दल युनायटेड (जेडीयू) च्या अनेक कार्यकर्त्यांनी बिहारमधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.

जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असावेत अशी मागणी या आंदोलनात केली होती. मागच्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

नितीश कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर जेडीयूचे कार्यकर्ते निदर्शने करत आहेत.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, नितीश कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर जेडीयूचे कार्यकर्ते निदर्शने करत आहेत.

नितीश कुमार यांनी सर्वाधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे.

लोजपा (आर)चे नेते चिराग पासवान यांनी याबाबत लिहिलं की, "एनडीए आघाडीकडून राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल नितीश कुमार यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुमचा अनुभव, समर्पण आणि सामाजिक सेवेची भावना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात देश आणि समाजाच्या हितांना बळकटी देईल असा पूर्ण विश्वास आहे."

भाजपच्या नेत्यांनी काय म्हटलं?

केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार गिरीराज सिंह म्हणाले, "त्यांनी यापूर्वी राज्यसभेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. कोणीही त्यांच्यावर जबरदस्ती करू शकत नाही; ते स्वतःच्या मर्जीने जात आहेत. त्यांनी विधान परिषद, बिहार विधानसभा आणि लोकसभा या तिन्ही सभागृहांतून लोकांची सेवा केली आहे."

नितीश कुमार यांच्या घोषणेनंतर, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सम्राट चौधरी यांनी त्यांचं अभिनंदन केलं.

सम्राट चौधरी यांनी लिहिलं की, "तुमचे दूरदर्शी नेतृत्व, सुशासनासाठी अढळ वचनबद्धता आणि बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी तुमचे सततचे प्रयत्न हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. तुमचा अनुभव आणि नेतृत्व राज्यसभेची प्रतिष्ठा आणखी मजबूत करेल असा आम्हाला विश्वास आहे."

'ही जनतेचा विश्वासघात आहे,' - काँग्रेस

बिहारच्या सत्तेत होणारा हा बदल मतदारांचा विश्वासघात आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे.

नितीश कुमार यांच्या या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत प्रतिक्रिया दिलीय.

त्यांनी लिहिलंय, "बिहारची निवडणूक सुरु असताना काँग्रेस जे सातत्याने म्हणत होतं ते खरं झालं आहे. जी-2 यांच्यातर्फे नेतृत्व आणि सरकारमध्ये बदल करण्यात आले आहेत. हा जनमताचा अपमान आहे."

राष्ट्रीय जनता दलाचे नेते मृत्युंजय तिवारी म्हणाले, "काल बिहारच्या राजकारणात अचानक एक भुकंप घडला. कुणालाही याचा अंदाज आला नाही की निवडणुकीनंतर भाजप एवढ्या लवकर नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकेल."

कार्ड

"आमचे नेते तेजस्वी यादव सतत म्हणत होते की भाजप जेडीयूला संपवल्याशिवाय आणि नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून काढल्याशिवाय शांत बसणार नाही. जेडीयूचे अनेक लोक भाजपसोबत मिळून काम करत होते. असं असलं तरी अनेकांना नितीश कुमारच मुख्यमंत्री राहावेत असंही वाटत होतं. हे एक मोठं राजकीय अपहरण आहे."

आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी लिहिलंय की, "हे ट्विट नितीश कुमार यांनी स्वतः लिहिलेलं किंवा लिहून घेतलेलं नाही तर ते दिल्लीवरून आल्याचं स्पष्ट दिसतंय. यामुळे जेडीयूच्या आत्मा दुखावला आहे."

यावर प्रतिक्रिया देताना जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, "ते बिहारचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यांचा कार्यकाळ अखेर संपेल हे स्वाभाविक होते. अर्थात, हा बिहार सरकार आणि त्यांच्या मित्रपक्षांचा अंतर्गत विषय आहे. मात्र, नितीश कुमार हे एकेकाळी इंडिया ब्लॉकमध्ये आमचे सहकारी होते आणि त्यामुळे, निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यांनी त्यांचे राज्यसभेत जाणं ही महत्त्वाची घटना आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)