अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंबातील सत्तासंतुलन नक्की कसं बदललंय?

अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंबातील सत्तासंतुलन नक्की कसं बदललंय?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

राजकारणात प्रत्येक गोष्टीचे आडाखे बांधता येतात. पण एका गोष्टीबद्दल कुणीच चर्चा करत नाही किंवा त्याबाबत आडाखे बांधत नाहीत, ती गोष्ट म्हणजे अचानक येणारा मृत्यू!

प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे आणि आता अजित पवार; व्यक्ती जाते, पण त्यांच्यामागे उरतो तो वारसा. राजकारणाचा, समाजकारणाचा आणि कुटुंबाचा. मग इथून खरी स्पर्धा सुरू होते, हा वारसा कोण चालवणार आणि खरा वारसदार कोण होणार?

महाजन आणि मुंडेंचे वारस आता ठरलेत. पण पवार कुटुंबासमोर आता यक्ष प्रश्न आहे, तो म्हणजे वारसदार शोधायचा कुणाचा? अजित पवारांचा की शरद पवारांचा?

तसं पवार कुटुंबात आतापर्यंत चर्चा होती ती शरद पवार यांचा खरा वारसदार कोण ठरणार याची. शरद पवार यांचं उतारवय पाहता ती चर्चा स्वाभाविकही होती. पण अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर मात्र सर्वच गोष्टी बदलल्यात.

त्यात सुनेत्रा पवार यांनी तातडीनं उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आपण आणि त्यांनंतर त्यांची मुलंच अजित पवार यांचे वारसदार असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.

याचाच अर्थ, आता शरद पवार यांच्या अपरोक्षच त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीचं राजकारण कुणाकडे जाणार हे ठरवलं जातंय.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या दिवशी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी शड्डू ठोकून आपल्याला हे मान्य नसल्याचं दाखवून दिलं. परिणामी अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबात एकी दिसून आली होती, तरीही प्रत्यक्षात कुटुबीयांमध्ये मतभेद नाहीत तर मनभेद आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो.

अर्थात, अजित पवार आणि शरद पवार यांच्या कुटुंबांमध्ये पडलेली फूट पहाटेच्या शपथविधीपासून पक्षफुटीपर्यंत वेळोवेळी दिसून आली आहे. पण यानंतर प्रत्येकवेळी 'आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत' हे दाखवण्याचा प्रयत्न कायम करण्यात आला.

पवार कुटुंबातील सध्याच्या घडामोडींवरून सुनेत्रा पवार आणि त्यांची दोन मुलं विरुद्ध शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार असे गट पडल्याचं दिसून येतंय.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचं कुटुंब

फोटो स्रोत, Raju Shinde/Hindustan Times via Getty Images)

फोटो कॅप्शन, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचं कुटुंब

अजित पवारांच्या हयातीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा झाली होती आणि ती अजित पवार यांनी शेवटची इच्छा होती, असं शरद पवारांच्या जवळचे सर्व नेते सांगत आहेत; तर सुनेत्रा पवारांच्या पक्षातले लोक मात्र त्या चर्चांना आता फारसं महत्त्व देत नसल्याचं दिसून येतंय.

पण यातून काही प्रश्न उपस्थित होत आहेत, ते म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र करून पुन्हा सर्व सूत्र शरद पवारांना हातात घ्यायची आहेत का? त्यांना ती सूत्रं हवी असतील, तर का?

शरद पवारांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत झालेल्या चर्चांमध्ये आपण प्रत्यक्ष सहभागी नव्हतो, असं सांगितलं आहे. प्रत्यक्षात समोर आलेल्या बैठकांच्या व्हीडिओंमध्येतरी पवार दिसत आहे.

असं असलं तरी दोन्ही पक्ष एकत्र आलेले त्यांना नकोत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं नाही. शिवाय दोन्ही पक्ष एकत्र येणार होते म्हणजे पवारांच्या नेत्यांना भाजपबरोबर सत्तेत सहभागी व्हायचं होतं का? आणि मग हे पवारांना चालणार होतं का? चालणार आहे का?

अजित पवार आणि शरद पवार

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, अजित पवार यांच्या अकस्मात जाण्यानं जी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, त्यातून प्रचंड गुंतागुंतीचे आणि राजकारणाची दिशा आणि दशा बदलू शकतील, असे कळीचे प्रश्न उभे राहिले आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या एकीकरणाच्या चर्चेत शरद पवारांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार यांसारखे नेते उपस्थित होते. चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पाडल्याचा दावा केला जात आहे.

शिवाय, एकत्रिकरणानंतर सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्री केलं जाणार होतं, असंसुद्धा आता पवारांच्या पक्षातले नेते खासगीत सांगत आहेत. पण आता मात्र सर्व थंड बस्त्यात गेल्याची स्थिती आहे.

दुसरीकडे, सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवून हरलेल्या सुनेत्रा पवार यांना लगेचच राज्यसभेची खासदारकी मिळाली. राज्यसभेच्या तालिका सभापतींमध्ये त्यांचं नाव आलं. त्यांनी काही तासांसाठी राज्यसभेचं कामकाजही हाकलं आणि आता पतीच्या पश्चात त्या थेट राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या.

महाराष्ट्राला आपण पुरोगामी राज्य म्हणत असलो, तरी महाराष्ट्रात आजतागायत महिला मुख्यमंत्री झालेली नाही. ज्या ज्या वेळी संभाव्य महिला मुख्यमंत्र्यांच्या नावांची चर्चा झाली त्या त्या वेळी सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर राहिलं आहे. पण सुनेत्रा यांचं नाव या चर्चात कुठेच नव्हतं आणि आज त्या उपमुख्यमंत्री आहेत.

आतापर्यंत शरद पवार यांनी त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखतींमधून कायम त्यांचा वारसदार कुणीही असू शकतो असं सांगितलं आहे. त्यांच्यासाठी त्यांचा वैचारिक वारसदार महत्त्वाचं असल्याचं त्यांनी अनेकदा स्पष्ट केलंय. पण सध्याच्या घडीला मात्र असंच दिसून येतंय की, त्यांना वारसदार कुटुंबातूनच पाहिजे आणि तो त्यांनाच ठरवायचा आहे.

शरद पवार, अजित पवार

फोटो स्रोत, ANI

शरद पवार यांच्या हातात खरंच कंट्रोल उरला आहे का?

राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांच्या मते, "आधीपासूनच कुटुंब म्हणून पवार एकत्र राजकारण करत आहेत, असं नाहीये. त्यामुळे सोयीनुसार आपले निर्णय घेण्यासाठी लोक स्वतंत्र आहेत. रोहित पवार आणि सुप्रिया सुळेही त्यांचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत. पण त्याबाबत आता लगेच भाष्य करणं कठीण आहे. भाजपबरोबर जाऊन अजित पवारांच्या पक्षाची अवस्था काय होईल, पवारांच्या पक्षाची पुढे स्थिती काय असेल, हे पाहावं लागेल. त्यावर सर्व गोष्टी ठरतील. त्यामुळे लगेच अंदाज बांधता येणार नाही."

जेष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांनी पवार कुटुंबाचं राजकारण जवळून पाहिलं आहे. त्यांच्या मते "कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार यांना वाटतं की, आपलं ऐकावं, पण सुनेत्रा आणि त्यांची मुलं ऐकतील असं वाटत नाही. त्याचबरोबर त्यांना सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची लुडबुड नकोय. पवार एकीकडे भाजपसोबत जाणार नाही म्हणतात आणि आता विलीनीकरण व्हावं ही अजित पवारांची इच्छा पूर्ण व्हावी असं म्हणतायत. म्हणजे पवारांचा विचार बदलला का? असं असेल तर मग सुप्रिया केंद्रात मंत्री होऊ शकतात, तर रोहित पवार, जयंत पाटील राज्यात मंत्री होतील. पण तटकरे, पटेल, भुजबळ, मुंडे यांना हे नको आहे असं दिसतंय."

शरद पवार

फोटो स्रोत, Bhushan Koyande/Hindustan Times via Getty Images

अद्वैत मेहता पुढे म्हणतात की, "सुनेत्रा पवारांनी शरद पवारांना न भेटताच शपथ विधीला जाणे, त्या शपथ विधीवरून परत बारामतीला पोहोचण्याच्या आत पवार यांनी मुंबईला जाणे यावरून सगळं आलबेल नाही, हे स्पष्ट होतंय."

"शिवाय, यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना देखील शरद पवारांनी सक्रीय होणं नको आहे. त्यामुळे पवारांना गाफील ठेवत त्यांनी सुनेत्रांच्या उपमुख्यमंत्रिपदाची खेळी केली. पण याचा अर्थ असा नाही की, सुप्रिया सुळेंचा बारामतीवर क्लेम कायम राहण्यासाठी शरद पवार मोदी-शहांशी जवळीक करणारच नाहीत, असं नाही."

"सध्याच्या स्थितीत लगाम भाजपकडे आहे आणि त्यामध्ये सुनेत्रा पवारांना म्हणणं मांडण्याची संधी आहे, तर पवारांकडे त्या अर्थाने फक्त वाट पाहणं एवढंच आहे," असंही अद्वैत मेहता म्हणतात.

पण म्हणून शांत बसून राहाणं हा काही शरद पवार यांचा स्वभाव नाही. 30 नोव्हेंबर 2024 ला मुंबईतकसाठी जेष्ठ पत्रकार मिलिंद खांडेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी म्हटलं होतं की, "शरद पवारांचं राजकीय करिअर संपता संपता त्यांच्या समोर फारच कठीण पर्याय आहेत. पण, मला नाही वाटत की म्हणून ते ते शांत बसून राहतील. ते काहीतरी नक्की करतील."

शरद पवार

फोटो स्रोत, Facebook

शरद पवारांनी थेट सुनेत्रा यांना त्यांच्या घरी जाऊन भेटण्याकडे याच दृष्टिकोनातून पाहाता येऊ शकतं. अर्थात ही भेट भावनिक होती, त्यात राजकराणाचा भाग नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

पण, सुनेत्रांनी पवारांना भेटायला न जाणं किंवा आशीर्वाद घ्यायला न जाणं आणि शरद पवारांनी थेट जाऊन त्यांची भेट घेणं यातून राजकीय अर्थ नक्कीच काढले जाऊ शकतात.

पण पवार कुटुंबाचं राजकारण हे 1+1=2 असं अजिबात नाही. पक्ष म्हणून वेगवगेळे असलेली ही मंडळी त्यांच्या वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकारी संस्थांमध्ये एकत्र काम करताना दिसून येतात. त्यासाठीच्या बैठका आणि कामकाजांमध्ये देखील एकत्र दिसून येतात.

शरद पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि युगेंद्र पवार अशी पवार कुटुंबातली सहा मंडळी सध्याच्या घडीला राजकारणात सक्रिय आहेत. यांच्यातले मतभेद आणि मनभेद गेल्या काही काळात सतत दिसून आले असले तरी त्यांच्यातला नात्यांचा गुंता एकाच वेळी सहज सुटेल असा आणि दुसऱ्यावेळी अजिबात सुटणार नाही, असा आहे.

कर्जत-जामखेडमध्ये विधानसभेला अजित पवारांनी सभा न घेऊन रोहित पवारांना अप्रत्यक्ष मदत केल्याचा राम शिंदे यांचा आरोप असो, विद्या प्रतिष्ठान संस्था चालवण्यासाठी एकमेकांना दिलेली साथ असो किंवा अजित पवारांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी त्यांच्या हयातीत केलेले सर्व प्रयत्न असोत. ही त्याचीच उदाहरण आहेत.

राजकारण हे शक्यता, पर्याय, संधी, कुरघोड्या आणि चॉईसवर चालत असतं. पवार कुटुंबासाठी त्यात आणखी एक गोष्ट ऍड होते ते म्हणजे 'नातं,' कधी ते हाडवैरी असल्याचं भासतं कधी ते 'तुझ्या तोंडात साखर पडो' बोलून अजित पवारांच्या मुखातून बाहेर येत असतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)