सर्वोत्कृष्ट चित्रपटासह 'वन बॅटल आफ्टर अनादर'ला सहा ऑस्कर, इतर चित्रपटांची कशी आहे कामगिरी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 10 मिनिटे
जागतिक चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ऑस्कर सोहळा पार पडला. जगभरातील शेकडो चित्रपटांचा विचार पुरस्कारासाठी केला जातो.
जगभरातील चित्रपट रसिकांना या पुरस्कारांची उत्सुकता होती. कारण ऑस्कर हा एका वर्षातील चित्रपटाच्या कामगिरीसाठी जरी दिला जात असला, तरी ऑस्कर मिळणं ही गोष्ट 'लाइफ टाइम अॅचिव्हमेंट' पेक्षा नक्कीच कमी नसते.
ऑस्कर विजेता किंवा विजेती अभिनेता-अभिनेत्री, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांचा जेव्हा एखाद्या जाहीर कार्यक्रमात उल्लेख केला जातो तेव्हा हे आवर्जून सांगितलं जातं.
केवळ सन्मान म्हणूनच नाही तर हे पुरस्कार व्यवसायासाठी देखील महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच जेव्हा एखाद्या ऑस्कर विजेत्या निर्माता, दिग्दर्शक, कलाकाराचा नवीन चित्रपट येणार असतो तेव्हा देखील 'फ्रॉम अॅकेडमी अवार्ड विनर' असं ट्रेलरमध्ये सांगितलं जातं.
जितकं महत्त्व कलाकार या पुरस्काराला देतात तितकं महत्त्व, कदाचित त्याहून जास्त महत्त्व फॅन्सला या पुरस्कारांचं आहे. हे कुणीही नाकारणार नाही. आपल्या आवडत्या कलाकाराला निदान एकदा पुरस्कार मिळावा म्हणून फॅन्स किती आशेनी दरवेळी त्या सोहळ्याकडे पाहत असतात.
या पुरस्कारांमुळे आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडते ती म्हणजे नवीन पिक्चर्सचे सजेशन आपल्याला मिळतात. ऑस्कर पुरस्कारामुळे अनेक चांगले चित्रपट आपल्या पर्यंत प्रतिनिधिक स्वरूपात पोहचतात.
दरवर्षी जगभरात लाखो चित्रपट प्रदर्शित होतात त्यातून 10 चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन देण्यात आले होते. या पुरस्कारासाठी प्रामुख्याने हॉलिवूडमधील चित्रपटांचा विचार केला जातो आणि जगभरातील चित्रपटांना बेस्ट इंटरनॅशनल फीचर्समध्ये स्थान दिले जाते.
या वर्षी ऑस्कर सोहळ्यात बाजी मारली आहे ते पॉल थॉमस अँडरसन दिग्दर्शित वन बॅटल आफ्टर अनादरने. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह एकूण सहा पुरस्कार या चित्रपटाला मिळाले आहेत.
कोणत्या चित्रपटांची ऑस्करमध्ये कशी कामगिरी झाली हे आपण या लेखातून पाहू.
ऑस्करचे सर्व विजेते आणि नामांकन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता.
बेस्ट पिक्चर या कॅटेगरीमध्ये यावर्षी 10 चित्रपटांना स्थान होते. हे चित्रपट कसे होते, त्यांची थीम काय होती त्याबरोबरच त्यांची ऑस्करमध्ये कशी कामगिरी राहिली हे आपण या लेखातून पाहू.
वन बॅटल आफ्टर अनादर
पॉल थॉमस अँडरसन दिग्दर्शित 'वन बॅटल आफ्टर अनादर'ला 13 नॉमिनेशन्स मिळाली होती.
सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता (2 नामांकनं), कास्टिंग, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, पटकथा लेखन अशा विविध कॅटेगरींमध्ये वन बॅटल आफ्टर अनादरला नामांकने मिळाली होती.
त्यापैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सहायक अभिनेता, कास्टिंग, एडिटिंग, पटकथा लेखन ( अॅडप्टेड स्क्रीन प्ले) या सहा कॅटेगरींमध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळाले.

फोटो स्रोत, Warner Bros
हॉलिवूडमधील महत्त्वाच्या दिग्दर्शकांपैकी पॉल थॉमस अँडरसन एक मानला जातो. आतापर्यंत त्याच्या 4 चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी आणि त्याच चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी त्याला ऑस्कर नामांकनं मिळाली आहेत. आणि यावेळी दोन्ही कॅटेगरी मध्ये त्याला पुरस्कार मिळाले तसेच पटकथेचाही पुरस्कार मिळाला आहे.
या दिग्दर्शकाचा 'देअर विल बी ब्लड' हा चित्रपट तुम्ही पाहिला असण्याची शक्यता आहे. अनेक सुंदर चित्रपट त्याने चित्रपटसृष्टीला दिले आहेत.
दरवेळी वेगळं काही देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. अतिशय वेगवान पटकथा हे त्याच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य असतं. विषय कोणताही असो त्याची हाताळणी एखाद्या थ्रिलरप्रमाणे तो करतो.
त्याच्या चित्रपटात काम केलं आणि त्या अभिनेत्याला ऑस्कर नामांकनं मिळालं नाही, असं अभावानेच पाहायला मिळतं.
'वन बॅटल आफ्टर अनादर' हा आताच्या काळावर भाष्य करणारा अँटी-वॉर मूव्ही आहे. विषय अत्यंत गंभीर असला तरी मांडणी कॉमेडी आहे.
हा चित्रपट पाहताना एक जाणवलं की, समजा आपण बॅकग्राउंड स्कोअर बंद करून जर दृश्यं पाहिली तर आपल्याला वाटू शकतं की, हा फार गंभीर चित्रपट आहे, पण त्याचं पार्श्वसंगीतच खरं तर आपल्यासाठी तो टोन सेट करतं.
युद्धाची पार्श्वभूमी असली, तरी वडील-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. त्याच बरोबर श्वेत-अश्वेत संघर्ष, वर्ग लढा या संघर्षांची किनार या चित्रपटाला आहे.
सिनर्स
चित्रपट सोहळा सुरू होण्याआधीच जर कोणत्या चित्रपटाने काही विक्रम रचला असेल तर तो सिनर्स आहे.
'ऑल अबाउट इव्ह', 'टायटानिक', 'ला ला लँड' या चित्रपटांना आतापर्यंत प्रत्येकी 16 नामांकनं मिळाली होती. आता या यादीत 'सिनर्स' देखील गेला आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा लेखन, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता आणि सहायक अभिनेत्री, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, अशा विविध कॅटेगरीमध्ये सिनर्सला नामांकन मिळालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतील प्रोहिबिशन एराच्या (दारूबंदी) पार्श्वभूमीवर जुळ्या भावांची ही कथा आहे. श्वेत-अश्वेत संघर्ष या कथेच्या केंद्रस्थानी आहे.
प्रसिद्ध बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डनचा मुलगा आणि हॉलिवूड अभिनेता मायकल बी. जॉर्डनने या जुळ्या भावंडांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी जॉर्डनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला आहे.
कृष्णवर्णीयांसाठी पार्टी अरेंज करण्याचे काम हे दोघे भाऊ करतात. त्यासाठी लागणारे संगीतकार, दारू याची सोय ते करतात.
'सिनर्स'ची अजून काही चर्चा करणे म्हणजे खरे तर स्पॉयलर्स देण्यासारखे आहे. पण एक गोष्ट नक्की सांगू शकतो, जेव्हाही हॉरर चित्रपटांचा विषय काढला जाईल तेव्हा 'सिनर्स' पूर्व आणि 'सिनर्स' नंतर अशा विभागणी होऊनच ही चर्चा केली जाईल.

फोटो स्रोत, Warners Bros
संगीत या चित्रपटाचा आत्मा आहे. त्याप्रमाणेच बेस्ट ओरिजनल स्कोअरचा ऑस्कर लुडविग गोरानसन या संगीतकाराला मिळाला. लुडविगचे बेस्ट ओरिजनल स्कोअरसाठीचे हे तिसरे ऑस्कर आहे. याआधी ब्लॅक पँथर, ओपनहायमर या चित्रपटांच्या संगीतासाठी त्याला ऑस्कर मिळाले होते.
सिनर्सची मुख्य कथा ही एकाच दिवसात घडते. अतिशय वेगवान घटनाक्रम आणि तांत्रिकदृष्ट्या सशक्त असा हा चित्रपट पाहायला देखील तितकीच मजा येते.
मार्व्हल सुपरहिरो मूव्ही 'ब्लॅक पँथर' आणि 'वाकांडा' फॉरेव्हर चित्रपटाचा दिग्दर्शक रायन कुगलर या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.
सिनर्स हा त्या अर्थाने सुपरहिरो मूव्ही जरी नसला, तरी सर्व टीमची कामगिरी सुपरहिरोंपेक्षा कमी झाली नाहीये हे या 16 नॉमिनेशन्सहून दिसून आलं.

फोटो स्रोत, Getty Images
कुगलरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे नामांकन मिळाले होते पण त्याला तो पुरस्कार मिळाला नाही पण पटकथा लेखन ( ओरिजनल स्क्रीन प्ले) साठी त्याला ऑस्कर मिळाला आहे. कुगलर 39 वर्षांचा आहे त्याने फक्त हे खाते उघडले आहे आणि भविष्यात तो आणखी पुरस्कार मिळवेल अशी आशा त्याच्या चाहत्यांना नक्कीच वाटत असेल.
सिनेमॅटोग्राफीसाठी ऑटम डुराल्ड अरापॉवला ऑस्कर मिळाला आहे. या कॅटेगरीत महिलेला मिळालेला हा पहिला ऑस्कर आहे.
फ्रँकेन्स्टाइन
गिलेर्मो डेल टोरो या दिग्दर्शकाचा 'फ्रँकेन्स्टाइन' या चित्रपटाला तब्बल 9 नॉमिनेशन्स मिळाली होती त्यापैकी तीन पुरस्कार या चित्रपटाने पटकावले आहेत.
बेस्ट कॉस्ट्युम डिजाइन, बेस्ट मेकअप अँड हेअर स्टायलिंग आणि बेस्ट प्रोडक्शन डिजाईन या तीन कॅटेगरीमध्ये फ्रँकेन्स्टाइनला पुरस्कार मिळाला.
'फ्रँकेन्स्टाइन' ही जगप्रसिद्ध कादंबरी आहे. सुरुवातीच्या काळातील सायन्स फिक्शन साहित्यात आणि जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींमध्ये मेरी शेलींच्या 'फ्रँकेस्टाइन'चं स्थान आहे. या नंतर शेकडो लेखकांनी या थीमवर कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
50 हून अधिक चित्रपट या कादंबरीवर किंवा प्रमुख कथानकाचा आधार घेऊन आले आहेत. तेव्हा गिलेर्मो डेल टोरो वेगळं काय करतील याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना होती. पण टोरोंची कलाकृती ही नेहमीच त्यांचीच कलाकृती असते. विषय कोणताही असला, तरी टोरोंच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्या कलाकृतीवर उमटलेला असतो.

फोटो स्रोत, Netflix
याआधी त्यांचे शेप ऑफ वॉटर आणि नाइटमेअर अॅली हे चित्रपट देखील ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट या कॅटेगरीत नॉमिनेट झाले होते. तसंच त्यांच्या 'पिनाकिओ'ला बेस्ट अॅनिमेशन चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
टोरोंचं वैशिष्ट्य म्हणजे मिथक आणि वास्तव यांचा सुंदर मिलाफ. त्यांच्या चित्रपटांची पार्श्वभूमी जरी काल्पनिक किंवा मिथकांच्या प्रभावाखाली असली, तरी वास्तवतेचं भान कधीच सुटलेलं नसतं.
'फ्रँकेन्स्टाइन' देखील अनेक प्रश्न उपस्थित करतो. आयुष्याचा अर्थ काय, जन्म, मृत्यू, विवेक, विचार, प्रेम, मैत्री या शाश्वत मूल्यांवर गहन विचार या चित्रपटात केला आहे. पाहायला नितांत सुंदर चित्रपट आणि तितकाच विचार करायला भाग पाडणारा. क्रिएचरची भूमिका करणाऱ्या जॅकब एलर्डीला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचं नामांकन मिळालं होतं पण त्याला पुरस्कार मिळाला नाही.
हॅमनेट
2021 मध्ये 'नोमॅडलँड' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे पुरस्कार पटकावले होते. क्लोई झाओ या चित्रपटाच्या दिग्दर्शक होत्या. हॅमनेट हा त्यांचा चित्रपट आहे. क्लोई झाओ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पण नामांकन मिळाले होतं.

फोटो स्रोत, Getty Images
हॅमनेट हा विल्यम शेक्सपिअरच्या आयुष्यावरील चित्रपट आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर दोघे पती-पत्नी कसे सावरतात. विल्यम शेक्सपिअरला त्याची पत्नी कशी साथ देते आणि आपल्या दुःखावर मात करत तो त्यातूनच कलाकृती कशी निर्माण करतो हा चित्रपटाचा विषय आहे.

फोटो स्रोत, Universal Picture
त्याकाळातील वेशभूषा, परिसर, सेट, भाषा या गोष्टींच्या सहाय्याने क्लोई झाओ यांनी शेक्सपिअरचा काळ उभा केलाय. शेक्सपिअरवरील कलाकृती तितकीच कलात्मक असायला हवी आणि चाहत्यांची अपेक्षा क्लोई पूर्ण करतात.
शेक्सपिअरची पत्नी अॅग्नेस शेक्सपिअरची भूमिका साकारणाऱ्या जेसी बकलेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला आहे.
या चित्रपटाला एकूण 8 ऑस्कर नामांकने मिळाली होती. पण केवळ एकाच पुरस्कारावर हॅमनेटला समाधान मानावे लागणार आहे.
द सेंटिमेंटल व्हॅल्यू
हा नॉर्वेचा चित्रपट आहे आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्ये देखील या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे.
सेंटिमेंटल व्हॅल्यूने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्कर पटकावला आहे.
स्कँडिनेव्हियन चित्रपटांचं एक वैशिष्ट्य असतं, की ते भावनिक गुंतागुंतीवर भाष्य करतात.
स्कँडिनेव्हियन देश हे जगातील इतर देशांच्या तुलनेत राजकीयदृष्ट्या स्थिर आणि सामाजिक- आर्थिकदृष्ट्या प्रगत मानले जातात.

तेव्हा त्यांच्या चित्रपटांतून राजकीय, सामाजिक, आर्थिक संघर्ष तितक्या प्रमाणात पाहायला मिळत नाही, पण त्याचवेळी भावनांच्या विविध छटा त्यांच्या चित्रपटात पाहायला मिळतात.
'द सेंटिमेंटल व्हॅल्यू' देखील याला अपवाद नाही. आईच्या मृत्यूनंतर वडील आणि मुलींचं नातं कसं बनतं याची ही कौटुंबिक गोष्ट आहे.
वडील हे यशस्वी आणि मान्यताप्राप्त दिग्दर्शक आहे. त्यांच्या 2 मुलींपैकी 1 मुलगी नाट्य अभिनेत्री आहे. तिने आपल्या चित्रपटात काम करावे अशी त्यांची इच्छा आहे. पण आईच्या मृत्यूनंतर ती त्यांच्यापासून भावनिकदृष्ट्या दूर गेलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर ही कथा घडते.
या चित्रपटातील भूमिकेसाठी रेनेट रेइंस्वे या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगरीत नामांकन मिळाले आहे.
बुगोनिया
यार्गोस लांथीमोस या दिग्दर्शकाचा 'बुगोनिया' हा एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे. 2023 मध्ये आलेला यार्गोस लांथीमोसचा 'पुअर थिंग्स' या चित्रपटाची 2024 च्या ऑस्कर सोहळ्यात भरपूर चर्चा होती. पुअर थिंग्सला तब्बल 11 नॉमिनेशन्स होते आणि 4 ऑस्कर्स चित्रपटाने जिंकले होते. त्यात एम्मा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
2026 च्या ऑस्कर सोहळ्यात 'बुगोनिया' पुन्हा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून नॉमिनेट झाला. या चित्रपटात देखील प्रमुख भूमिकेत एम्मा स्टोन आहे. एम्मा स्टोन या वेळीही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगरीत नॉमिनेट झाली होती.
बुगोनियाची थोडक्यात कथा अशी आहे. टेडी (जेसी प्लेमॉन ) नावाचा एक 'सायन्स नर्ड' तरुण आहे. त्याला असं वाटतं की, एका फार्मासिटिकल कंपनीची सीईओ मिशेल फुलर (एम्मा स्टोन) ही एलियन आहे. पृथ्वी नष्ट करण्याच्या उद्देशाने ती पृथ्वीवर आली आहे. जर पृथ्वी वाचायवायची असेल तर आपल्याला मिशेल फुलरकडून त्यांचा प्लॅन काढून घ्यावा लागेल. यासाठी तो तिचं अपहरण करतो. मग पुढे काय होतं यावर हा चित्रपट आहे.

फोटो स्रोत, Universal
यार्गोस लांथीमोस या दिग्दर्शकाचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत गंभीर विषय तो डार्क कॉमेडीच्या माध्यमातून समोर आणतो. हा चित्रपट देखील याला अपवाद नाही. धमाल चित्रपट आहे. तितकाच तो आपल्याला प्रश्न देखील विचारतो. मानव म्हणून आपण कोण आहोत आणि आपली भूमिका काय असायला हवी यावरचं भाष्य म्हणजे हा चित्रपट आहे.
F-1
ब्रॅड पिटची मुख्य भूमिका असलेला F1 हा देखील ऑस्कर शर्यतीत होता. या चित्रपटाला एकूण 4 नॉमिनेशन्स मिळाली होती. त्यापैकी बेस्ट साऊंडचा ऑस्कर या चित्रपटाला मिळाला.
2025 मध्ये जगभरात सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटामध्ये F1 चा समावेश आहे. तब्बल 630 मिलियन डॉलर्स ( सुमारे 5800 कोटी रुपये) या चित्रपटाने कमावले आहेत.

फोटो स्रोत, APple Tv+/F1
F1 हा चित्रपट एक टिपिकल कमर्शियल स्पोर्ट्स ड्रामा आहे. एक 'अंडरडॉग' हिरो आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी येतो. तो अशा क्रीडा प्रकारात आहे की, जिथे अत्यंत तरुण खेळाडूंचे वर्चस्व आहे. एखाद्या स्पोर्ट्स ड्रामात असतात तसे चढउतार या सिनेमात देखील आहेत, पण वैशिष्ट्य हे आहे की हे F1 रेसच्या पार्श्वभूमीवर होत आहे.
वायूवेगाने पळणाऱ्या चकचकीत कार्स आणि त्यातला थरार पाहायला आवडत असतील, तर हा चित्रपट नक्की तुमच्यासाठी आहे. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आणि मनोरंजन करणारा तरीही कथेवर घट्ट पकड असलेला हा चित्रपट आहे.
मार्टी सुप्रीम
पिंग पाँग किंवा आपण ज्याला टेबल टेनिस म्हणतो या खेळाचा एक खेळाडू मार्टी माउजर.
मार्टी राइजमन या खेळाडूच्या आयुष्यातील काही प्रसंगांवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाला एकूण 9 नामांकने मिळाली पण एकही पुरस्कार मिळाला नाही.
चित्रपटाचा दिग्दर्शक जोश सफदी आहे. त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि बेस्ट ओरिजनल स्क्रीन प्लेसाठी (पटकथा) नामांकनं मिळाली होती.

फोटो स्रोत, A24
1950 च्या दशकात ही कथा घडते. मार्टी माउजर (तिमोथी शलामेट) हा उत्कृष्ट खेळाडू आहे, पण त्या काळात पिंग पाँग खूप मोठा खेळ नाहीये. या खेळाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूला देखील फारसा मान मरातब नाहीये.
तेव्हा अशा परिस्थितीत मार्टीला अनेक गोष्टी करून खेळ खेळायचाय. मार्टी हा इतका बेभरवशाच्या आहे की, तो पुढच्या क्षणाला काय करेल याचा अंदाज लावणं कठीण आहे. त्यातून एक एक गोष्टी घडत जातात. पिरिअड फिल्म असली तरी करमणूकप्रधान आहे.
द सिक्रेट एजंट
सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट या दोन्ही कॅटेगरीत या चित्रपटाला नामांकनं मिळाली होती.
एमिली लेसक्लॉक्स यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. एमिली या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांची निर्मिती असलेल्या 'बकारो' या पोर्तुगीज चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरपूर चर्चा झाली होती.
'द सिक्रेट एजंट' हा चित्रपट देखील पोर्तुगीज आहे. नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध वेबसीरिज 'नारकोज'मध्ये पाबलो एस्कोबारच्या भूमिकेमुळे वॅगनर मोरा हा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचला.
त्याच वॅगनर मोराने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. वॅगनर मोराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन देखील मिळाले होतं.

द सिक्रेट एजंट हा ब्राझिलच्या सामाजिक-राजकीय व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट आहे. कथा दोन वेगवेगळ्या काळात घडते. मुख्य कथा घडते ती 70च्या दशकात. त्या काळात तिथे लष्कराचे शासन होते. अत्यंत जटील सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते.
वॅगनर मोराचा सहज सुंदर अभिनय आणि चित्रपटाची पटकथा या जमेच्या बाजू आहेत.
ट्रेन ड्रीम्स
ट्रेन ड्रीम्सचं वर्णन करताना नेटफ्लिक्सची साइट Tudum म्हटलंय की 'extraordinary films about ordinary lives.'
ही एका कुटुंबाची कथा आहे. कथेचा नायक हा रेल्वे ट्रॅक बनवण्याचे काम करत असतो. काही दिवस काम आणि काही दिवस कुटुंबासोबत तो घालवतो. इतकंच, हेच कथानक आहे.
त्याला आयुष्य देखील भरपूर मिळतं. तर तो इतके वर्षं कसा राहतो? हीच या चित्रपटाची कथा आहे.
डेनिस जॉन्सन या प्रसिद्ध लेखकाच्या ट्रेन ड्रीम्स याच पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाला अडाप्टेड स्क्रीन प्लेसाठी नॉमिनेशन मिळालं होतं.

फोटो स्रोत, Netflix
सर्व दृश्यं अतिशय सुंदर आहेत. 'मेडिटेशन्स ऑन लाइफ' असंच या चित्रपटाचं वर्णन करावं लागेल. गोष्टी संथ होत जातात, पण आयुष्य तसंच असतं ना. ते तरी कुठे दरवेळी रेल्वेसारखं धावत असतं?
हा चित्रपट पाहणे एक वेगळा अनुभव आहे. शांत चित्रपट आवडत असतील, तर हा चित्रपट जरूर पाहावा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











