ट्रम्प यांनी ज्या खार्ग बेटावर हल्ला केल्याचा दावा केला त्याला इराणची 'लाईफलाईन' का म्हटलं जातं?

खार्ग बेटावरील हल्ल्यानंतर अमेरिका या बेटावर कब्जा करू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, खार्ग बेटावरील हल्ल्यानंतर अमेरिका या बेटावर कब्जा करू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
    • Author, फर्जाद सैफीकरन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अजूनही सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या महत्त्वाच्या खार्ग बेटावर हल्ला केल्याचा दावा करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

"काही वेळापूर्वी माझ्या आदेशावरून अमेरिकच्या सेंट्रल कमांडने मध्य पूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली हवाई हल्ले केले. या हल्ल्यात खार्ग बेटावरील सर्व लष्करी तळ पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. खार्ग बेट हे इराणच्या सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक मानले जाते", असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिलं की, "सध्या मानवतावादी आणि नैतिक कारणांमुळे मी या बेटावरील तेलाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला न करण्याचा निर्णय घेतला आहे."

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून संपूर्ण मध्य पूर्वेतील तेल शुद्धीकरण प्रकल्प (रिफायनरीज) आणि तेल साठवण टँक हल्ल्यांचे लक्ष्य बनले आहेत.

इस्रायलच्या सैन्याने आतापर्यंत तेहरानमधील रेय, शहरान आणि अकदसियेह येथील तेल डेपो तसेच कराज शहरातील फरदिस भागावर हल्ले केले आहेत. इराण सरकार 'सैन्य डेपो म्हणून वापर' करत असलेल्या इंधन टँक्स या हल्ल्याचे लक्ष्य होते, असं इस्रायली सैन्यानं सांगितलं आहे.

दरम्यान, इराणही प्रत्युत्तर देण्यात मागे राहिला नाही. त्याने पर्शियन आखात परिसरातील अनेक देशांतील रिफायनरीज आणि तेल डेपोंवर हल्ले केले आहेत.

आता खार्ग बेटावरील हल्ल्यानंतर अमेरिका या बेटावर कब्जा करू शकतो, असा अंदाज लावला जात आहे.

खार्ग बेट हे इराणच्या सर्वात मोठ्या तेल साठ्याचे मुख्य केंद्र आहे. देशातील जवळपास 90 टक्के कच्च्या तेलाची निर्यात याच छोट्या बेटावरून होते.

खार्ग बेट सध्या चर्चेत का?

यावर्षी जूनमध्ये झालेल्या 12 दिवसांच्या युद्धापूर्वीही खार्ग बेटाचं नाव इस्रायलच्या संभाव्य लक्ष्यांमध्ये घेतलं जात होतं.

इस्रायलचे माजी पंतप्रधान आणि मुख्य विरोधी पक्षनेते यायर लॅपिड यांनी एक्सवर पोस्ट केली. त्यानंतर सर्वांचं लक्ष खार्ग बेटाकडे वेधलं गेलं.

तेहरान आणि करज येथील तेल डेपोवर हल्ला झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी लिहिलं, "इस्रायलने खार्ग बेटावरील इराणचे सर्व तेल क्षेत्रं आणि ऊर्जा उद्योग नष्ट करायला हवेत. असा निर्णय घेतला तर इराणची अर्थव्यवस्था कोसळेल आणि सरकारही पडू शकते."

उपग्रहावरून घेतलेला खार्ग बेटाचा फोटो.

फोटो स्रोत, Gallo Images/Orbital Horizon/Copernicus Sentinel Data 2024

फोटो कॅप्शन, उपग्रहावरून घेतलेला खार्ग बेटाचा फोटो.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इस्रायलने इराणच्या तेल डेपोंवर हल्ले केल्यानंतर, अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी इस्रायलला आपली लक्ष्ये काळजीपूर्वक निवडण्याचं आवाहन केलं.

त्यांनी एक्सवर लिहिलं की, "आपलं ध्येय इराणच्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणं आहे. यामुळे सध्याच्या राजवटीच्या पतनानंतर त्यांना नवीन आणि चांगलं आयुष्य सुरू करण्याची संधी मिळेल. हे साध्य करण्यासाठी इराणची तेल अर्थव्यवस्था महत्त्वाची असेल."

7 मार्च रोजी ॲक्सिओस या न्यूज वेबसाइटने अमेरिकेच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने खार्ग बेटावर ताबा मिळवण्याच्या शक्यतेवरही चर्चा झाली होती, असं वृत्त दिलं होतं.

पेंटागॉनचे माजी वरिष्ठ सल्लागार मायकेल रुबिन यांनी मागील आठवड्यात त्यांनी ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांशी खार्ग बेटाचं महत्त्व आणि त्यावर ताबा मिळवण्याच्या मुद्द्यावर चर्चा केल्याचे 'पॉलिटिको'ला सांगितलं होतं.

"जर ट्रम्प यांना क्षेपणास्त्र हल्ले आणि बॉम्ब हल्ल्यांच्या पुढे जाऊन इराणवर दबाव आणायचा असेल तर, खार्ग बेटावर ताबा मिळवणं महत्त्वाचं आहे. हे बेट इराणी सरकारचं एक महत्त्वाचं आर्थिक केंद्र आहे. ते ताब्यात घेतल्यास ते आर्थिक स्त्रोतापासून वंचित राहू शकतात," असं त्यांचं म्हणणं आहे.

खार्ग बेट आणि तेल साठ्यांचं मुख्य ठिकाण

खार्ग हे एक छोटंसं प्रवाळ बेट (कोरल आयलंड) असून त्याचं क्षेत्रफळ सुमारे 20 चौरस किलोमीटर आहे. हे इराणच्या नैऋत्य भागात असून प्रशासकीयदृष्ट्या ते बुशहेर प्रांताचा भाग आहे.

या बेटावरील तेल प्रकल्पांच्या परिसरात अनेकदा हरणं फिरताना दिसतात. हे बेट हरणांच्या वास्तव्यासाठी आणि प्रजननासाठी अनुकूल मानलं जातं. काही वर्षांपूर्वी हरणांना इथे आणण्यात आलं होतं. अलीकडील अहवालांनुसार आता त्यांची संख्या बेटाच्या क्षमतेपेक्षाही जास्त झाली आहे.

लहान असलं तरी खार्ग बेट इराणसाठी खूप महत्त्वाचं आहे, विशेषतः तेल निर्यातीसाठी. खार्ग हेच इराणच्या तेल निर्यातीचं मुख्य टर्मिनल आहे.

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, TRUTH SOCIAL/DONALD TRUMP

देशाच्या दक्षिणेकडील तेलसमृद्ध भागांच्या जवळ असल्यामुळे, समुद्रातील चांगलं स्थान आणि तेलाच्या मोठ्या टँकरसाठी लागणारी पुरेशी खोली इथे आहे. यामुळे खार्ग बेट इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीसाठी आणि टँकरमध्ये तेल भरून पाठवण्यासाठी (लोडिंग) सर्वात योग्य ठिकाण मानलं जातं.

खार्ग बेट हे इराणच्या तेल क्षेत्रांचं मुख्य केंद्र मानलं जातं. इथे मोठ्या प्रमाणात कच्चं तेल साठवलं जातं आणि इथूनच त्याची निर्यातही केली जाते. हे त्याचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.

खार्गपासून सुमारे 75 किलोमीटर पश्चिमेला इराणचा सर्वात मोठा अबुझर हा ऑफशोर तेल प्रकल्प आहे. पर्शियन आखातामध्ये इराणच्या बहुतांश तेल उत्पादनाचं मुख्य स्रोत हाच प्रदेश मानला जातो.

अबुझार तेल क्षेत्रात तीन मुख्य उत्पादन प्लॅटफॉर्म्स आहेत आणि प्रत्येकाची क्षमता प्रतिदिन सुमारे 80 हजार बॅरल तेल आहे. अबुझरची तेल रिफायनरीही खार्ग बेटावरच आहे.

यामुळेच इराणमधील सर्वात मोठ्या तेल साठवण केंद्रांपैकी एक खार्ग बेटावर आहे.

इराणी ऑइल टर्मिनल्स कंपनीच्या माहितीनुसार, खार्ग बेटावर 40 पेक्षा जास्त कच्च्या तेलाच्या साठवणीचे टँक्स आहेत आणि त्यांची एकूण क्षमता 2 कोटी बॅरलपेक्षा जास्त आहे.

लहान असूनही तेल निर्यातीच्या दृष्टी खार्ग बेट इराणसाठी खूप महत्त्वाचे आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लहान असूनही तेल निर्यातीच्या दृष्टी खार्ग बेट इराणसाठी खूप महत्त्वाचे आहे.

देशाच्या दक्षिणेकडील तेल क्षेत्रांतून काढलेलं कच्चं तेल समुद्राखाली टाकलेल्या पाइपलाइनमधून या टँक्सपर्यंत आणलं जातं.

डिसेंबर 2023 मध्ये इराण ऑइल टर्मिनल्स कंपनीचे सीईओ अब्बास घरीबी यांनी खार्ग बेटावर कच्च्या तेलाच्या साठवण क्षमतेत 20 लाख बॅरलने वाढ करण्याची घोषणा केली होती.

खार्ग बेटावर फक्त कच्चं तेल साठवलं जात नाही, तर निर्यातीपूर्वी इथे तेलाचं मोजमाप, गुणवत्ता तपासणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या तेलाचं वर्गीकरणही केलं जातं.

इराणच्या आण्विक करारानंतर काही काळासाठी इराणला तेल उत्पादन वाढवून ते विकण्याची परवानगी मिळाली होती. त्यावेळी इराणने आपल्या तेल साठवण टँक्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु, खार्ग बेटावर जागा कमी आहे आणि तिथलं हवामान अनेकदा वादळी असतं. त्यामुळे 2016 मध्ये बुशेहर प्रांतातील गानावेह शहरापासून सुमारे 28 किमी दूर ओमिड तेल साठवण प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाची क्षमता सुमारे 1 कोटी बॅरल इतकी आहे.

असं म्हटलं जातं की, गानावेह येथे उभारण्यात आलेलं ओमिड तेल टँक केंद्र हे खासगी क्षेत्रातील सर्वात मोठं तेल साठवण केंद्र आहे.

खार्ग बेटावरील बंदर आणि सुविधा

खार्ग बेटावर दोन प्रमुख किनारे आहेत - पूर्व आणि पश्चिम. 1955 मध्ये तेल कंपन्यांच्या एका करारानंतर खार्गमध्ये तेल लोड करण्याचे डॉक आणि कच्च्या तेलाचे साठवण टँक्स तयार करण्याचं काम सुरू झालं.

पूर्व किनारा (इस्टर्न बँक) टी आकाराचा आहे आणि इथे एकाचवेळी 6 टँकर उभे राहू शकतात, ज्यांची क्षमता 2 लाख 75 हजार टन आहे. पश्चिम भागात चार बर्थ आहेत, जिथे 5 लाख टन क्षमता असलेले टँकर तेल भरतात.

खार्ग बेटावर कच्च्या तेलाची गुणवत्ता सतत तपासण्यासाठी एक रासायनिक प्रयोगशाळा आहे. ही प्रयोगशाळा आयएसओ/आयइसी 17025 मानकानुसार प्रमाणित आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त प्रयोगशाळांमध्ये मोजली जाते.

खार्ग बेटावरील मिथेनॉल प्रकल्प आणि तेलाच्या विहिरी

फोटो स्रोत, Kaveh Kazemi/Getty Images)

फोटो कॅप्शन, खार्ग बेटावरील मिथेनॉल प्रकल्प आणि तेलाच्या विहिरी

पूर्व किनारा (इस्टर्न बँक) टी आकाराचा आहे आणि इथे एकाचवेळी 6 टँकर उभे राहू शकतात, ज्यांची क्षमता 2 लाख 75 हजार टन आहे. पश्चिम भागात चार बर्थ आहेत, जिथे 5 लाख टन क्षमता असलेले टँकर तेल भरतात.

खार्ग बेटावर कच्च्या तेलाची गुणवत्ता सतत तपासण्यासाठी एक रासायनिक प्रयोगशाळा आहे. ही प्रयोगशाळा आयएसओ/आयइसी 17025 मानकानुसार प्रमाणित आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त प्रयोगशाळांमध्ये मोजली जाते.

पेट्रोकेमिकल उद्योगाचे केंद्र

खार्ग पेट्रोकेमिकल कंपनीही याच बेटावर काम करते. तिचा उद्देश तेल उत्पादनादरम्यान निघालेला गॅस किंवा वायू जाळण्याऐवजी तो उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतरित करणं आहे.

या कंपनीचे मुख्य उत्पादन म्हणजे- मिथेन, सल्फर (गंधक), प्रोपेन, ब्यूटेन आणि नाफ्थालिन.

खार्ग बेटावर एक पेट्रोकेमिकल कंपनी देखील आहे, जी तेल उत्पादनातून निघालेला गॅस वापरून उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतर करते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, खार्ग बेटावर एक पेट्रोकेमिकल कंपनी देखील आहे, जी तेल उत्पादनातून निघालेला गॅस वापरून उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतर करते.

सुमारे 8 हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या बेटावर इस्लामिक आजाद युनिव्हर्सिटीची सागरी विज्ञान आणि कला शाखाही आहे. इथे शिकवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या विषयांमध्ये पेट्रोलियम आणि सागरी अभ्यासाचा समावेश आहे.

इराण-इराक युद्धादरम्यान इराणच्या 90 टक्क्यांपेक्षा जास्त तेलाची निर्यात खार्ग बेटातून व्हायची. याच कारणामुळे इराकने या लहान बेटावर सुमारे 2800 हल्ले केले होते. त्या काळातील प्रसिद्ध 'टँकर वॉर'चा मोठा भागही खार्ग बेटाजवळ झाला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)