तारिक रहमान : शेख हसीनांच्या रॅलीवर ग्रेनेड हल्ल्याचा आरोप ते सत्तेपर्यंत मारलेली मजल, कसा आहे प्रवास?

तारिक रहमान
    • Author, रकीब हसनत
    • Role, बीबीसी न्यूज बांगला
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच बीएनपीने विजय मिळवला आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधानपदासाठी आता बीएनपीचे प्रमुख तारिक रहमान यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

तारिक रहमान यांनी प्रथमच संसदीय निवडणुकीत बीएनपीचे नेतृत्व केले. त्याचबरोबर, त्यांनी स्वतःही पहिल्यांदाच या निवडणुकीत भाग घेतला होता.

तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बीएनपी ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. या विजयानंतर तारिक रहमान बांगलादेशचे नवीन पंतप्रधान होऊ शकतात.

बीएनपीची विजयाकडे वाटचाल सुरू असली तरी, यावेळी शेख हसीनांच्या अवामी लीग पार्टीला निवडणुकीत सहभागी होऊ दिलं गेलं नाही.

निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी आई खालिदा झियांच्या निधनानंतर, तारिक रहमान यांनी पक्षाचं नेतृत्व हाती घेतलं होतं.

पक्षाचे सर्व संघटनात्मक कार्यक्रम आणि संपूर्ण निवडणूक प्रचार मोहीम त्यांच्या देखरेखीखाली चालली. तारिक रहमान यांचे समर्थक त्यांना बांगलादेशाचे संभाव्य पंतप्रधान मानत आहेत.

तारिक रहमान : शेख हसीनांच्या रॅलीवर ग्रेनेड हल्ल्याचा आरोप ते सत्तेपर्यंत मारलेली मजल, कसा आहे प्रवास?

फोटो स्रोत, Getty Images

बीएनपी देखील तारिक रहमान यांना पक्षाचा एकमेव नेता म्हणून सादर करत आहे. मात्र, राजकीय विरोधक त्यांच्यावर यापूर्वी करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्याच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

परंतु, रहमान आणि त्यांचा पक्ष बीएनपीने भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळले असून मागील अवामी लीग सरकारने केलेला हा दुष्प्रचार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तारिक रहमान

फोटो स्रोत, NurPhoto via Getty Images

फोटो कॅप्शन, खालिदा झिया यांच्या निधनानंतर तारिक रहमान यांनी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली

रहमान यांनी सुमारे 17 वर्षे लंडनमध्ये राजकीय आश्रय घेतला होता.

माजी राष्ट्रपती झिया उर रहमान यांनी बीएनपीची स्थापना केली होती. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांनी या पक्षाचं यशस्वीपणे नेतृत्व केलं होतं.

पक्षाचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी अल्पावधीतच सत्ता काबिज केली होती. आता या पक्षाची संपूर्ण जबाबदारी तारिक रहमान यांच्या खांद्यावर आहे.

अवामी लीगच्या राजवटीत तारिक रहमान यांनी पक्षाला एकसंध ठेवण्यात यश मिळवलं आहे.

अवामी लीगवरील बंदीनंतर बीएनपीचा मित्रपक्ष असलेला जमात-ए-इस्लामी त्यांचा सर्वात मोठा स्पर्धक पक्ष म्हणून समोर आला आहे.

रहमान यांचं नेतृत्व

2007 मध्ये बांगलादेशमध्ये लष्कराचा पाठिंबा असलेल्या काळजीवाहू सरकारच्या कार्यकाळात तारिक रहमान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

जवळपास 18 महिने ते तुरुंगात होते. त्यानंतर सप्टेंबर 2008 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर ते कुटुंबासह लंडनला गेले होते.

तारिक रहमान तिथे सुमारे 17 वर्षे होते. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ते पुन्हा ढाका येथे परतले होते.

खालिदा झियांची प्रकृती बिघडल्यानंतर तारिक रहमान 26 डिसेंबरला ढाका येथे परतले. 18 महिने तुरुंगात आणि 17 वर्षे लंडनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी बांगलादेशाच्या राजकारणात पुनरागमन केले.

रहमान बांगलादेशला आल्यानंतर 30 डिसेंबरला खालिदा झियांचा मृत्यू झाला. त्यानंतर 10 दिवसांनी, म्हणजे या वर्षी 9 जानेवारीला बीएनपीच्या राष्ट्रीय स्थायी समितीने तारिक रहमान यांची औपचारिकपणे पक्षाध्यक्ष म्हणून निवड केली.

तारिक रहमान यांनी पक्षासाठी डझनभर प्रचारसभा घेतल्या

फोटो स्रोत, Parvez Ahmad/Drik/Getty Images

खालिदा झियांना 2018 मध्ये भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर, तारिक रहमान लंडनमध्ये राहून कार्यवाहक अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडत होते.

त्यापूर्वी, 2002 मध्ये खालिदा झिया यांनी त्यांना पक्षाचे वरिष्ठ संयुक्त सरचिटणीस म्हणून नियुक्त केलं होतं. सात वर्षांनंतर, 2009 मध्ये बीएनपीच्या पाचव्या राष्ट्रीय संमेलनात त्यांना वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं गेलं.

तारिक रहमान यांचं व्यक्तिमत्व

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बांगलादेशचे पहिले लष्करी शासक आणि माजी राष्ट्रपती झिया उर रहमान व माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे मोठे पुत्र तारिक रहमान यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1965 रोजी झाला.

बीएनपीच्या वेबसाइटवर त्यांची जन्मतारीख 20 नोव्हेंबर, 1965 अशी नोंदवलेली आहे. मात्र, निवडणूक प्रतिज्ञापत्रात तारीख तीच असली तरी जन्म वर्ष मात्र 1968 सांगण्यात आलं आहे.

बीएनपीच्या वेबसाइटनुसार, ढाका येथील बीएएफ शाहीन कॉलेजमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तारिक रहमान यांनी ढाका विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध विभागात प्रवेश घेतला. मात्र, त्यांनी तिथे आपले शिक्षण पूर्ण केलं की नाही याची माहिती उपलब्ध नाही.

दुसरीकडे, निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात तारिक रहमान यांनी आपली शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक म्हणजेच बारावी असल्याचे सांगितले आहे.

बीएनपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ती संग्रामाच्या काळात अनेक इतर लष्करी अधिकाऱ्यांच्या कुटुंबांसह झियाउर रहमान यांच्या कुटुंबालाही कैद करण्यात आलं होतं. त्यांची दोन्ही मुलं, तारिक रहमान आणि दिवंगत अराफत रहमान हे देखील कैदेत होते.

तारिक रहमान दिनाजपूर येथील जाहीर सभेत

फोटो स्रोत, Parvez Ahmad/Drik/Getty Images

फोटो कॅप्शन, तारिक रहमान दिनाजपूर येथील जाहीर सभेत

पक्षाच्या वेबसाइटनुसार, तारिक रहमान यांनी लष्करी शासक हुसेन मोहम्मद इरशाद यांच्या विरोधातील आंदोलनातही भाग घेतला होता. 1988 मध्ये बगुडा जिल्ह्यातील बीएनपीच्या गावतली उपजिल्हा युनिटचा सदस्य म्हणून औपचारिकपणे पक्षात प्रवेश केला होता.

तरीही, पक्षाचे अनेक नेते आणि अध्यक्षीय सल्लागार परिषदेतील काही सदस्य म्हणतात की, तारिक रहमान यांचा राजकीय प्रवास 1991 मधील संसदीय निवडणुकीपासून सुरू झाला. त्या वेळी खालिदा झिया यांनी पाच जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्याची जबाबदारी तारिक यांच्यावर होती.

पण 2001 च्या संसदीय निवडणुकीपासून पक्षातील त्यांची पकड मजबूत होऊ लागली. त्या वर्षी बीएनपीच्या नेतृत्वाखालील चार पक्षांच्या आघाडीला दोन-तृतीयांश बहुमत मिळाले होते.

बीएनपी सरकारच्या त्या कार्यकाळात हवाभवन प्रकरणावर तारिक रहमान आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, जो नंतर देशभर चर्चेचा मुद्दा बनला.

तारिक रहमान

फोटो स्रोत, @BNPBdMediaCell

फोटो कॅप्शन, या वेळी निवडणुकीत बीएनपीसमोर शेख हसीनांचा पक्ष अवामी लीग नसल्याने याचा फायदा थेट बीएनपीला झाला आहे.

राजकीय विश्लेषक प्रा. महबूब उल्लाह बीबीसी बांगलाला सांगतात की, "2001 च्या संसदीय निवडणुकीपूर्वी हवा भवनचा वापर निवडणूक कार्यालय म्हणून केला गेला. निवडणुकीची रणनीती बनवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. यात तारिक रहमान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती."

त्यांचं म्हणणं होतं की, त्या निवडणुकीत विजय मिळवून बीएनपीच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आलं होतं. पण हवाभवनवर बीएनपीचा ताबा कायम राहिला आणि यावरून वाद निर्माण झाला.

2001 च्या निवडणुकीपासूनच पक्षात तारिक रहमान यांची सक्रियता वाढत गेली. 22 जून 2002 रोजी वरिष्ठ संयुक्त सरचिटणीस पद तयार करून त्यावर त्यांची नियुक्ती करण्यात आली.

राजकीय विश्लेषक आणि संशोधक मोहिउद्दीन अहमद बीबीसी बांगलाला म्हणाले की, "पक्षीय राजकारणातील ही त्यांची मोठी झेप होती. झियाउर कुटुंबाचा सदस्य असल्यामुळे त्यांना ते पद दिलं गेलं. नंतर त्यांच्या भोवती एक समांतर नेतृत्व तयार झालं होतं."

भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाद

बांगलादेशातील या निवडणुकीत बीएनपीचा थेट सामना त्यांचाच पूर्वीचा मित्रपक्ष जमात-ए-इस्लामीशी होता. पक्षाची धोरणं ठरवणाऱ्यांना रहमान यांची "मुक्ती युद्ध आणि उदारमतवादी लोकशाही" चे एकमेव समर्थक नेते अशी प्रतिमा निर्माण करायची होती.

याआधी बीएनपीच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या काळात (2001-06) बनानीमधील पक्षाध्यक्षांचं कार्यालय वादात सापडलं होतं. त्याला हवा भवन म्हणूनही ओळखळं जातं.

बीएनपी 2001 मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान खालिदा झिया सत्तेत असूनही, रहमान यांच्या नेतृत्वाखालील हवा भवन हे सत्तेचे समांतर केंद्र बनलं होतं अशी चर्चा झाली आहे.

रहमान आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. त्यांनी आणि त्यांच्या पक्षानं मात्र नेहमीच ठामपणे हे आरोप फेटाळले आहेत. हा केवळ राजकीय दुष्प्रचार करण्यात आला असल्याचंही ते म्हणालेत.

बीएनपी सरकारच्या याच कार्यकाळात 2004 मध्ये, अवामी लीगनं विरोधी पक्षनेत्या शेख हसीना यांच्या ढाक्यातील रॅलीवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यासाठी तारिक रहमान आणि हवा भवन यांना जबाबदार ठरवलं होतं.

पुढं, अवामी लीगच्या कार्यकाळात तारिक रहमान यांना या प्रकरणी आरोपी बनवण्यात आलं आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली.

पण आता अवामी लीगचं सरकार कोसळल्यानंतर तारिक यांना या आरोपांतून मुक्तता मिळाली आहे. बीएनपीनं मात्र हे आरोप आधीच फेटाळून लावले आहेत.

तारिक रहमान

फोटो स्रोत, Anadolu via Getty Images

फोटो कॅप्शन, तारिक रहमान 17 वर्षांनी गेल्या वर्षी 25 डिसेंबर रोजी ढाक्याला परतले.

तारिक रहमान यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात एकूण 77 खटल्यांची नोंद आहे. अंतरिम सरकारच्या काळात त्यांना सर्व खटल्यांमधून निर्दोष मुक्तता किंवा त्यांनी सुटका करण्यात आली आहे.

बीएनपीच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या शेवटच्या काळात झालेला व्यापक राजकीय हिंसाचार आणि संघर्ष यानंतर जानेवारी 2007 मध्ये बांगलादेशात लष्कराच्या पाठिंब्याने काळजीवाहू सरकारनं सत्ता हाती घेतली होती.

तारिक रहमान यांना त्यावेळी भ्रष्टाचाराच्या आरोपांत 18 महिने तुरुंगात घालवावी लागली होती. त्यांना अटकेनंतर बुलेटप्रूफ जॅकेट आणि हेल्मेट घालून ढाका न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

हे घडण्याच्या अवघ्या सहा महिन्यांच्या आधीपर्यंत पंतप्रधानांचे पुत्र म्हणून पक्ष आणि प्रशासनात त्यांच्याबाबत प्रचंड आदर आणि त्यांचा प्रभावही होता.

त्यानंतर त्यांच्या पक्षानं अटकेदरम्यान झालेल्या छळाचा मुद्दा जोरकसपणे मांडला होता. अटकेनंतर त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करण्यात आले होते असा रहमान यांचा आरोप आहे.

 तारिक रहमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2007 मध्ये अटक झाल्यानंतर तारिक रहमान

विश्लेषक मोहिउद्दीन अहमद यांच्या मते, "संशोधनादरम्यान मला विविध पक्षांच्या लोकांशी झालेल्या चर्चांतून तारिक रहमान यांच्यावर खरंच अत्याचार करण्यात आले होते, असं समजलं होतं. त्यांचा उद्देश रहमान यांच्या आई खालिदा झिया यांना देश सोडण्यास भाग पाडणं हा होता."

तारिक रहमान हे 11 सप्टेंबर 2008 रोजी देश सोडून कुटुंबासह लंडनला गेले होते. त्यावेळी खालिदा झिया देश सोडून गेल्या नव्हत्या.

पण, असं म्हटलं जातं की, लष्करी नेतृत्वाशी झालेल्या करारानुसार रहमान यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. त्यानंतर रहमान यांनी देश सोडण्यापूर्वी भविष्यात राजकारणात सहभागी होणार नाही, अशा प्रकारचं लेखी आश्वासन दिलं होतं, असं वृत्तं माध्यमांमध्ये आलं होतं.

"खालिदा झिया यांनी स्वतः त्यावेळी तारिक आता राजकारण करणार नाहीत. ते लंडनमध्ये शिक्षण घेतील, असं सांगितलं होतं," असं अहमद म्हणाले.

बीएनपीचे दिवंगत नेते मौदुद अहमद यांनी त्यांच्या 'कारागारे केमोन छिलाम (तुरुंगात कसा होतो) 2007-2008' या पुस्तकात लिहिलं आहे की, "खालिदा झिया यांनी लष्कराशी तारिक आता राजकारणात सक्रिय राहणार नाहीत, असा करार केलेला असू शकतो. कदाचित रहमान यांनीही अशा एका बाँडवर स्वाक्षरी केली असेल."

बीएनपीने मात्र बराच काळ असंच म्हटलं की, तारिक रहमान वैद्यकीय उपचारांसाठी लंडनमध्ये होते. पण, 24 एप्रिल 2018 रोजी पक्षाचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी पहिल्यांदाच कबूल केले की, रहमान यांनी 2012 मध्ये युकेमध्ये राजकीय आश्रयासाठी अर्ज केला होता आणि त्यांचा अर्ज एका वर्षाच्या आत मंजूर करण्यात आला होता.

बांगलादेशमध्ये परतले

बांगलादेशात 2007 मध्ये लष्कराच्या पाठिंब्यावरील काळजीवाहू सरकार सत्तेत आल्यानंतर अवामी लीगच्या अध्यक्षा शेख हसीना यांच्यानंतर, बीएनपी नेत्या खालिदा झिया यांनाही अटक करण्यात आली. त्यांचा मुलगा अराफत रहमान (दिवंगत) यांनाही खालिदा यांच्यासोबत अटक करण्यात आली.

मात्र नंतर नंतर एका आदेशाद्वारे अराफत यांना उपचारांसाठी थायलंडला हलवण्यात आलं. तिथून ते मलेशियाला गेले. त्याठिकाणी जानेवारी 2015 मध्ये त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले.

तारिक रहमान

फोटो स्रोत, Munir UZ ZAMAN / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, तारिक यांनी सिल्हेट येथून निवडणूक प्रचाराची सुरुवात केली.

राजकीय विश्लेषक मोहिउद्दीन अहमद यांच्या मते, "तारिक रहमान यांनी प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाला एकसंध ठेवण्यात यश मिळवलं. हे सगळं असूनही पक्षाचे नेते म्हणून त्यांचं देशात पुनरागमन हे पुन्हा उभारी घेतल्यासारखं आहे."

बीबीसी बांगलाशी बोलताना त्यांनी म्हटलं की, "तारिक यांनी केवळ राजकारणाचा क्रूर चेहरा तर पाहिलाच पण त्यांना देशातील संघर्ष आणि सूडाच्या राजकारणाचा अनुभवही मिळाला आहे."

मोहम्मद मुजीबूर अहमद म्हणतात, "तारिक रहमान हे स्वतःच्या बळावर बीएनपीचे एक सर्वोच्च नेते म्हणून उदयास आले आहेत आणि अवामी लीगच्या अनुपस्थितीमुळे त्यांना एक व्यासपीठ मिळालं आहे. पण आता त्यांना जनतेमध्ये परीक्षेत पास होण्याचं आव्हान पेलावं लागेल."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.