जनरल मनोज मुकुंद नरवणे कोण आहेत? त्यांचं पुस्तक प्रकाशित होण्याआधीच गदारोळ का माजलाय?

जनरल मनोज मुकुंद नरवणे हे डिसेंबर 2019 ते एप्रिल 2022 या कालावधीत भारतीय लष्कराचे 28वे लष्करप्रमुख (Chief of Army Staff) होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जनरल मनोज मुकुंद नरवणे हे डिसेंबर 2019 ते एप्रिल 2022 या कालावधीत भारतीय लष्कराचे 28वे लष्करप्रमुख होते.
वाचन वेळ: 5 मिनिटे

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद (एमएम) नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरुन लोकसभेत 2 आणि 3 जानेवारी रोजी चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. यामागचं कारण ठरलं काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं भाषण.

राहुल गांधी यांनी नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाबाबत (फॉर स्टार्स ऑफ डेस्टिनी) कॅरव्हान मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखातील काही उतारे वाचण्याचा प्रयत्न केला होता.

राहुल गांधी सोमवारी लोकसभेत बोलताना म्हणाले की, "या मासिकात नरवणेजी म्हणतात की हे त्यांचं आत्मचरित्र आहे, जे सरकार प्रकाशित करू देत नाही. मला यातल्या फक्त पाच ओळी वाचायच्या आहेत."

मात्र, भाजप नेत्यांनी त्यावर आक्षेप घेत हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही त्यामुळे त्याचा संदर्भ कसा काय देता येईल, म्हणत प्रश्न उपस्थित केला.

यानंतर राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांकडे इशारा करत म्हटलं, "हे लोक म्हणतात की आम्ही दहशतवादाविरुद्ध लढतो, पण त्यांना एका 'कोट'ची (परिच्छेद) भीती वाटते. यात असं काय लिहिलं आहे की ज्यामुळे हे घाबरले आहेत आणि मला बोलू देत नाहीत? जर हे घाबरत नसतील, तर मला वाचू द्यावं."

माध्यमांच्या माहितीनुसार, राहुल गांधी ज्या अप्रकाशित पुस्तकातील उतारे वाचत होते, ते पुस्तक जानेवारी 2024 मध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार होतं. मात्र, भारतीय लष्कर या पुस्तकाची चौकशी करत आहे.

या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी पेंग्विन रँडम हाऊसकडे असून इंग्रजी वृत्तपत्र 'द इंडियन एक्सप्रेस'मध्ये जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, पुस्तकासंदर्भातील तपास पूर्ण होईपर्यंत पुस्तकातील माहिती किंवा सॉफ्ट कॉपी कोणालाही देऊ नये, असं सांगण्यात आलं होतं.

या तपासात संरक्षण मंत्रालयही काही प्रमाणात सहभागी असल्याचं सांगितलं जात होतं. तेव्हापासून ही तपासणी सुरू आहे.

कोण आहेत मनोज मुकुंद नरवणे?

जनरल मनोज मुकुंद नरवणे हे डिसेंबर 2019 ते एप्रिल 2022 या कालावधीत भारतीय लष्कराचे 28वे लष्करप्रमुख (Chief of Army Staff) होते.

कोरोनाच्या काळात आणि गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षावेळी त्यांनी भारतीय सैन्याचं नेतृत्व केलं.

मनोज नरवणे यांचं सुरुवातीचं शिक्षण पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेतून झालं. त्यानंतर त्यांनी खडकवासला (पुणे) येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून लष्कराचं शिक्षण घेतलं. नंतर इंडियन मिलिटरी अकादमीतून भारतीय सैन्यात अधिकारी झाले.

खडकवासला (पुणे) येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या माध्यमातून भारतीय सैन्यात अधिकारी झाले.

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद (एमएम) नरवणे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद (एमएम) नरवणे
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यांना वाचन-लेखनाची विशेष आवड आहे. त्यांनी इंदौरच्या देवी अहिल्या विद्यापीठातून कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट स्टडीजमध्ये एम.फिल. केलं आहे.

मनोज नरवणे यांचे वडील मुकुंद नरवणे हे हवाई दलात अधिकारी होते. त्यांची पत्नी शिक्षिका असून नरवणे दाम्पत्याला दोन मुली आहेत.

जनरल नरवणे यांच्या लष्करी कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 2020 मधील लडाखमधील संघर्ष.

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, "अधिकृत लष्करी नोंदी आणि त्यांच्या आधीच्या विधानांनुसार, जून 2020 मध्ये पेट्रोलिंग पॉइंट 14 येथे तणाव शिगेला पोहोचला होता. चिनी सैन्याने नियुक्त केलेल्या बफर झोनमधून तंबू हटवण्यास नकार दिला. कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हिंसक चकमक झाली."

"जनरल नरवणे यांनी भारताच्या रणनीतीत मोठा बदल केला. आधी केवळ संरक्षणात्मक धोरण होतं, मात्र त्यांनी 'ऑफेन्सिव्ह डिफेन्स'चा अवलंब केला."

अहवालात पुढे म्हटलं आहे की, नरवणे यांनी कैलास रेंजवर भारतीय रणगाडे तैनात केले. त्यामुळे चिनी सैन्याला माघार घ्यावी लागली.

16 जून 2020 हा दिवस त्यांनी आपल्या कारकिर्दीतील 'सर्वात दुःखद दिवस' असल्याचं म्हटलं होतं, कारण त्या दिवशी 20 जवान शहीद झाले होते."

नरवणेंच्या वर्गमित्रांनी त्यांच्याबाबत काय सांगितलं?

पुण्यातील शाळेत नरवणेंसोबत शिकलेल्या त्यांचे वर्गमित्र असणाऱ्या डॅा.अजित कानिटकर यांनी नरवणे हे कायमच मितभाषी पण विचारांची स्पष्टता असलेले होते असं सांगितलं.

ते म्हणाले," वडील एअरफोर्स मध्ये असल्याने त्यांनी डिफेन्समध्ये करीअर करायचं हे नक्की ठरवलं होतं. तसे ते शाळेतून एनडीए मध्ये गेले. शाळेत असताना ते कायम टॅापर होते. आम्ही वर्गमित्र त्यांना 'थिंकींग जनरल' म्हणतो. आमच्या शाळेला मैदान नव्हतं. दुसऱ्या शाळेच्या मैदानावर आम्ही खेळायचो. खेळात आणि अभ्यासात नरवणे कायम पुढे होते. आर्मी साठी जसा स्ट्रॅटजिस्ट लागतो तसे ते होते. शाळेत 11 वी नंतर मी नागालँडमध्ये समाजकार्यासाठी गेलो होतो. नंतर जवळपास 20 वर्षांनी नरवणे तिथे होते. त्यांना तो भाग तळहातासारखा माहित होता हे मला आमच्या चर्चेत जाणवलं."

" ते कायम संयमित विचार करतात. तसंच ते तोलूनमापून बोलतात तसंच पण निर्मविनोदीसुद्धा आहेत."

चीन चा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यांना तिथे चीनच्या सीमेवर एक नवा विभाग उभा करण्याची जबाबदारी सरकारने दिली होती. ती त्यांनी पार पाडली. तसंच कोव्हिडच्या काळातही लोकांसाठी आर्मीच्या माध्यमातून मदत केली.

2023 साली पुस्तकातील काही भाग आला होता समोर

इंडियन एक्सप्रेसमधील एका लेखात असा दावा करण्यात आला आहे की, "हे पुस्तक 2020 मध्ये चीनसोबत पूर्व लडाखमध्ये झालेल्या लष्करी संघर्षावर आधारित आहे. यात गलवान खोऱ्यातील चकमक आणि अग्निपथ योजनेचाही उल्लेख आहे. तसेच 31 ऑगस्ट 2020 च्या रात्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या संभाषणाचाही उल्लेख आहे."

कोरोना महामारीच्या काळात आणि गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षावेळी त्यांनी भारतीय सैन्याचं नेतृत्व केलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना महामारीच्या काळात आणि गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षावेळी त्यांनी भारतीय सैन्याचं नेतृत्व केलं.

इंडियन एक्सप्रेसमधील रिपोर्टनुसार डिसेंबर 2023 मध्ये वृत्तसंस्था पीटीआयने जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील काही उतारे प्रसिद्ध केले होते. त्यातही 31 ऑगस्टच्या संध्याकाळी घडलेल्या घटनेचा सविस्तर उल्लेख होता. याच घटनेवर आधारित लेख आता कारवाँ मासिकातही प्रकाशित झाला आहे.

लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याच लेखातील उतारे संसदेत वाचण्याबाबत म्हटलं होतं.

यानंतर काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावर कॅरव्हान मासिकात प्रकाशित लेखातील पानांचे फोटो पोस्ट केले, ज्यात 31 ऑगस्टच्या संध्याकाळी घडलेल्या घटनेचा उल्लेख आहे.

नरवणेंनी लष्करात पार पाडलेल्या जबाबदाऱ्या

लंडन स्पीकर ब्युरोच्या मते, जनरल नरवणे यांच्या कार्यकाळात 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत 11,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची अनेक मोठे शस्त्रास्त्र खरेदी प्रकल्प सुरू करण्यात आले. यामुळे भारतीय सैन्याची स्वदेशी शस्त्रनिर्मितीची क्षमता वाढली आणि परदेशी वस्तूंवरील अवलंबित्व कमी झालं.

लष्करप्रमुख होण्यापूर्वी नरवणे हे कोलकात्यामध्ये पूर्व विभागाचे प्रमुख होते. त्यांनी दिल्ली एरिया जनरल ऑफिसर म्हणूनही लेफ्टनंट म्हणूनही काम पाहिलंय. जनरल नरवणे हे ऑपरेशन पवन दरम्यान श्रीलंकेत तैनात असलेल्या भारतीय शांतता दलाचे सदस्य होते. त्यांनी म्यानमारमधील भारतीय दूतावासातही तीन वर्षे सेवा बजावली आहे.

दिल्लीत नियुक्ती होण्याआधी नरवणे कोलकात्यामध्ये पूर्व विभागाचे प्रमुख होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिल्लीत नियुक्ती होण्याआधी नरवणे कोलकात्यामध्ये पूर्व विभागाचे प्रमुख होते.

दिल्लीमध्ये जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणूनही काम केलं आहे. ऑपरेशन पवनदरम्यान ते श्रीलंकेत तैनात असलेल्या भारतीय शांतिसेनेचे सदस्य होते. त्यांनी म्यानमारमधील भारतीय दूतावासातही तीन वर्षे सेवा बजावली आहे.

माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांना अनेक सन्मान मिळाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील बटालियनचं नेतृत्व केल्याबद्दल सेना पदक, आसाम रायफल्सचे महानिरीक्षक (उत्तर) म्हणून नागालँडमधील सेवेसाठी विशिष्ट सेवा पदक, स्ट्राईक कॉर्प्सचं नेतृत्त्व केल्याबद्दल अतिविशिष्ट सेवा पदक तसेच, आर्मी ट्रेनिंग कमांडमध्ये जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून सेवा दिल्याबद्दल परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.