टी 20 विश्वचषक : न्यूझीलंडचा पराभव करत भारत तिसऱ्यांदा बनला जगज्जेता, विजयानंतर सूर्यकुमार, गंभीर काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडला 96 धावांनी पराभूत करत भारतानं तिसऱ्यांदा जगज्जेतेपद मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारतानं विजयासाठी न्यूझीलंडसमोर 256 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण न्यूझीलंडला 159 धावाच करता आल्या.
भारताकडून अभिषेक शर्मानं संजू सॅमसनच्या साथीनं तडाखेबाज सुरुवात केली. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केल्या.
त्यांतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ईशान किशननेही अर्धशतकी खेळी केली. अखेरच्या काही ओव्हरमध्ये धावा थांबल्या होत्या. पण शिवम दुबेनं शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत भारताला 255 धावांपर्यंत पोहोचवलं.
न्यूझीलंडनंही आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली होती. पण पण नंतर भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केलं. बुमरानं 4, तर अक्षरनं न्यूझीलंडचे 3 फलंदाज बाद केले.
त्यामुळं न्यूझीलंडचा डाव 159 धावांवर आटोपला. बुमरा सामनावीर तर संजू सॅमसन मालिकावीर ठरला.
भारतानं या विजयासह अनेक विक्रमही रचले आहेत.
- सलग दोन टी 20 विश्वचषक जिंकणारा भारत पहिला संघ बनला आहे.
- त्याचबरोबर यजमान देशानं विश्वचषक जिंकण्याची कामगिरी करणाराही भारत पहिला देश ठरला आहे.
- तसंच तीन टी 20 विश्वचषक विजयाची कामगिरी करणाराही भारत पहिला संघ बनला आहे.
विजयानंतर कोण काय म्हणालं?
सूर्यकुमार यादवनं या विजयानंतर बोलताना म्हटलं की, "या विजयाचा आनंद दीर्घकाळ असेल. माझ्यावर सगळ्यांनी विश्वास दाखवला आणि नेतृत्व करण्याची संधी दिली. आम्हाला माहिती होतं की, आम्ही दोन वर्षांपासून चांगलं खेळत होतो.
संजू ऐन मोक्याच्या वेळी संघात आला. अभिषेकचा, ईशानचा फॉर्म वेळेवर परत आला. बुमरा ही राष्ट्रीय संपत्ती आहे. असे गोलंदाज दुर्मिळ असतात. तो संघात असला की, बऱ्याच चिंता दूर होतात," असं सूर्यानं म्हटलं.
यानंतर पुढचे लक्ष्य ऑलिम्पिक गोल्ड मेडल आणि टी 20 विश्वचषक असेल, असंही सूर्यकुमार यादवनं म्हटलं. 2024 पासून आम्ही सतत चांगलं क्रिकेट खेळत आहोत. आम्ही आयसीसीच्या स्पर्धा जिंकल्या. हा प्रवास अत्यंत खास होता आणि तो सुरुच ठेवणार आहोत," असंही सूर्यकुमार यादवनं म्हटलं.

फोटो स्रोत, ANI
"ही निळी जर्सी परिधान केल्यानंतर काहीही गृहित धरून चालत नाही" अशी प्रतिक्रिया कोच गौतम गंभीरनं दिली.
हा विजय राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना समर्पित करत असल्याचंही गंभीरनं म्हटलं. त्यांनी निरपेक्षपणे संघासाठी खूपकाही केलं असल्याचंही त्यानं म्हटलं.
तर "आम्ही चांगलं खेळलो. स्पर्धेतील कामगिरीसाठी मला संघातील सर्व सदस्यांचा अभिमान आहे. वेगवेगळ्या वेळी आम्ही आव्हानांचा सामना केला आणि सुपर 8 तसंच सेमिफायनलमध्येही चांगली कामगिरी केली," अशा भावना यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनरनं व्यक्त केली.

फोटो स्रोत, ANI
संजू सॅमसन 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' ठरला आहे.
"न्यूझीलंडच्या सिरीजनंतर मी पार मोडून पडलो होतो. पण मी स्वत:वर काम केलं आणि परतलो. त्यामुळे, आज सगळ्या गोष्टी माझ्या बाजूने उभं राहू शकल्या. वरिष्ठ खेळाडूंच्या मदतीमुळेच मी चांगली कामगिरी करू शकलो. मी सचिन तेंडुलकर सरांशीही बोललो होतो. त्यांच्याकडून गाईडन्स घेतल्यानंतर मला क्लॅरिटी मिळाली आणि त्यामुळे आजची कामगिरी शक्य झाली," असं संजू म्हणाला.
या सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच'चा किताब जसप्रीत बुमराला मिळाला आहे.
तो म्हणाला की, "हे मैदान माझ्यासाठी खास होतं. मी माझा सगळा अनुभव आजच्या सामन्यात वापरला. या टुर्नामेंटपूर्वी, मी थोडा साशंक होतो. पण मी खूप काम केलं आणि आज ही चांगली कामगिरी करू शकलो."

फोटो स्रोत, ANI
या विजयानंतर अभिषेक शर्मा म्हणाला की, "एक गोष्ट स्पष्ट होती की, आजचा दिवस फारच धमाकेदार असणार आहे. कर्णधार आणि कोच दोघांचाही माझ्यावर विश्वास होता. पण पहिला वर्ल्डकप असल्याने हे तितकंही माझ्यासाठी सोपं नव्हतं. पण माझ्यावर इतर खेळाडूंनी आणि सगळ्याच सहकाऱ्यांनी विश्वास दाखवल्यानेच हे शक्य झालं."
वरूण चक्रवर्ती म्हणाला की, "एकापाठोपाठ दोन आयसीसी ट्रॉफी मिळवण्याचा आनंद वेगळाच आहे."
शिवम दुबे आपला आनंद व्यक्त करताना म्हणाला की, "या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनच मी ठरवलं होतं की, सिक्स ठोकणं हेच माझं काम आहे आणि त्याप्रमाणे मी काम करत गेलो. आजचा क्राऊडसुद्धा अमेझिंग होता. चाहत्यांच्या प्रार्थना आणि प्रेमामुळेच हे शक्य झालं."

फोटो स्रोत, ANI
अर्शदीप सिंग म्हणाला की, "सध्या आमचे इमोशन्स कसे आहेत, हे सांगता येणार नाही, इतकं भारावलेलं असं वातावरण आहे. पण पहिल्यापासूनच विश्वास होता की, आम्ही चांगली कामगिरी करू."
पुढे तो म्हणाला की, "बॉलर्सची भूमिका हीच असते की जर 250 धावा झाल्या असतील तर कमीतकमी धावांवर समोरच्या संघाला गुंडाळणं हेच ध्येय होतं. आता पुढचे दोन दिवस आम्ही मोठी पार्टी करणार आहोत."
"आम्ही चांगलं खेळलो. स्पर्धेतील कामगिरीसाठी मला संघातील सर्व सदस्यांचा अभिमान आहे. वेगवेगळ्या वेळी आम्ही आव्हानांचा सामना केला आणि सुपर 8 तसंच सेमिफायनलमध्येही चांगली कामगिरी केली," अशा भावना यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनरनं व्यक्त केली.
न्यूझीलंडची इनिंग
न्यूझीलंच्या टीम सायफर्ट आणि फिन अॅलन यांनी पहिल्या ओव्हरमध्ये शांत सुरुवात केली. पण शिवम दुबेनं फिन अॅलनचा एक सोपा झेल सोडला.
त्यानंतर हार्दिकच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये सायफर्टनं फटकेबाजी करत 21 धावा लुटल्याचं पाहायला मिळालं.
त्यानंतर सूर्यकुमारनं तिसऱ्या ओव्हरसाठी अक्षर पटेलच्या रुपानं तिसरा गोलंदाज बोलावला. अक्षरनं या ओव्हरमध्ये फिन अॅलनला बाद करत भारताला मोठं यश मिळवून दिलं.
फिन अॅलननं सेमिफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात एकहाती सामना फिरवला होता.
त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये बुमरानं पहिल्याच चेंडूवर रचिन रविंद्रला बाद केलं. ईशान किशननं त्याचा उत्तम झेल घेतला.

फोटो स्रोत, ANI
नंतर अक्षर पटेलनं पुढच्याच ओव्हरमध्ये ग्लेन फिलिप्सला बोल्ड करत भारताला सामन्यात आघाडी मिळवून दिली.
सायफर्टनं एका बाजूनं फटकेबाजी करत प्रयत्न सुरू ठेवले. त्यानं 23 चेंडूमध्ये अर्धशतकही पूर्ण केलं.
पण आठव्या ओव्हरमध्ये हार्दिक पटेलनं चौथ्या चेंडूवर चॅपमनला बोल्ड केलं आणि भारताला चौथी विकेट मिळवून दिली.
सूर्यकुमारनं पुढच्या ओव्हरसाठी पुन्हा वरुणच्या हाती चेंडू सोपवला. त्याच्याही पहिल्याच चेंडूवर अर्धशतकी खेळी करणाला सायफर्ट बाद झाला.
ईशान किशनचं त्याचा उत्तम झेल घेतला.
नंतर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर हार्दिक पटेलनं एक सोपा झेल सोडला. पण त्याच ओव्हरमध्ये अक्षर पटेलनं टाकलेल्या चेंडूवर डॅरेल मिशेलनं एक फटका खेळला आणि पुन्हा एकदा ईशान किशननं उत्तम झेल घेत मिशेलला परत पाठवलं.
त्यानंतर बुमरानं 16 व्या ओव्हरमध्ये सलग दोन चेंडूवर नीशम आणि मॅट हेन्री या दोघांना एका पाठोपाठ बोल्ड केलं.
त्यामुळं न्यूझीलंडचा स्कोर 8 बाद 142 असा झाला होता.
त्यानंतर बुमरानं 18 व्या ओव्हरमध्ये सँटनरला बोल्ड करत न्यूझीलंडला नववा धक्का दिला. शेवटी अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर तिलकरत्नेनं डफीचा झेल घेतला आणि हाच क्षण क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांत लिहिला गेला.

फोटो स्रोत, ANI
भारताची इनिंग
पहिल्या ओव्हरपासून सांभाळून खेळत अभिषेक आणि संजू सॅमसननं डावाची सुरुवात केली. पहिल्याच ओव्हरमध्ये संजू सॅमसननं शॉर्ट बॉलवर सनसनीत षटकार खेचर इरादे स्पष्ट केलं.
त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अभिषेक आणि संजूनं सांभाळत फलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 7 तर दुसऱ्या ओव्हरमध्ये भारतानं 5 धावाच केल्या.
पण तिसऱ्या ओव्हरमध्ये भारतानं 15 धावा घेतल्या. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये आणखी फटकेबाजी करत 24 धावा घेतल्या.
या जोरावर भारतीय संघानं 4 ओव्हरमध्येच 50 धावांचा टप्पा गाठला. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या ओव्हरमध्येही न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई झाली.

फोटो स्रोत, ANI
अभिषेक शर्मानं 18 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्या जोरावर भारतानंही पॉवरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये 92 धावा करत इरादे स्पष्ट केले.
भारतानं केलेल्या फटकेबाजीचा दबाव न्यूझीलंडच्या गोलंदाजांवरही पाहायला मिळाला. पहिल्या पाच षटकांत न्यूझीलंडनं 8 वाईड बॉल्स टाकले आहेत. म्हणजे एक षटक जास्त.
रचिन रविंद्रनं अभिषेक 52 धावांवर खेळत असताना त्याला बाद केलं. अभिषेकनं 6 चौकार आणि 3 षटकार खेचत सुरुवातीला भारताला चांगली आघाडी मिळवून दिली.

फोटो स्रोत, ANI
पण अभिषेक बाद झाल्यानंतरही धावांचा ओघ थांबला नाही. भारतानं 8 व्या ओव्हरमध्येच 100 धावांचा टप्पा ओलांडला. 8 ओव्हरनंतर भारताचा स्कोअर 1 बाद 110 झाला होता.
त्यानंतर ईशाननंही काही क्लास फटके लगावले. तर संजू सॅमसननंही चांगली फलंदाजी करत स्पर्धेतलं सलग तिसरं अर्धशतक पूर्ण केलं.
संजून 33 चेंडूमध्ये अर्धशतकी खेळी पूर्ण केलं. त्यात 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे.
12 व्या ओव्हरमध्ये 24 धावा करत भारतानं 161 चा टप्पा गाठला.
त्यानंतरही ईशान आणि संजूनं फटकेबाजी सुरू ठेवली. ईशान किशननं 23 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्या जोरावर भारतानं 15 ओव्हरमध्येच 203 धावा केल्या.
संजू सॅमसन आज शतक करणार असं वाटू लागलं होतं. पण 89 धावांवर असताना नीशमच्या चेंडूवर एक फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.

फोटो स्रोत, ANI
त्याच ओव्हरमध्ये ईशान किशनही फटका मारताना बाद झाला. तर सूर्यकुमार यादवही पहिल्याच चेंडूवर भोपळा न फोडता बाद झाला.
त्यानंतर भारताच्या धावांचा वेग कमी झाला. त्यानंतर हार्दिकनं पुन्हा धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण तोही फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला.
शिवम दुबेनं शेवटच्या ओव्हरमध्ये धावा 24 करत भारताला 255 धावांपर्यंत पोहोचवलं.
अभिषेकला सूर गवसला, संजूचे शतक पुन्हा हुकले
टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माला अखेर फायनलमध्ये सूर सापडला. शर्माला या स्पर्धेत त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावता आलेली नव्हती.
सुपर एटमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध लढतीचा अपवाद वगळता अभिषेक स्वस्तात बाद झालेला दिसला.
अहमदाबादमध्ये मात्र त्यानं 21 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांसह 52 धावांची खेळी केली. तसंच संजू सॅमसनसह सलामीला 98 धावांची भागीदारीही रचली.
मग आठव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रचिन रविंद्रच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक सीफर्टनं त्याचा झेल टिपला. अभिषेक बाद झाला, तरी तोवर त्यानं जबाबदारी पार पाडली होती.

फोटो स्रोत, ANI
सलग तिसऱ्या मॅचमध्ये संजू सॅमसननं अर्धशतकाची वेस ओलांडली. सलग तिसऱ्या मॅचमध्ये सॅमसनला शतकाचं सुख लाभलं नाही. पण त्यानं भारताच्या डावाची अगदी भक्कम पायाभरणी केली.
संजूनं सुपर एटच्या अखेरच्या लढतीत ईडन गार्डनवर सुरू केलेली खेळी, वानखेडेवर सुरू ठेवली होती. अहमदाबादमध्येही त्यानं त्याच जोमानं फलंदाजी केली.
सॅमसननं 46 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 8 षटकारांसह 89 धावा केल्या. त्यानं सलामीला अभिषेक शर्मासह 98 धावांची भागीदारी रचली. मग ईशान किशनसह 105 धाव केल्या.

फोटो स्रोत, ANI
त्याचबरोबर ईशान किशननेही फटकेबाजी कायम ठेवत अर्धशतकी खेळी केली. त्यामुळं भारताच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी फायनलमध्ये अर्धशतकं केली आहे.
अभिषेक बाद झाल्यानंतर इशान किशन फलंदाजीला आला होता. त्यावेळी धावांचा वेग प्रचंड होता. विकेट पडल्यानंतर हा वेग कमी होणार असं वाटत होतं.
पण ईशाननं न्यूझीलंडच्या या इराद्यांवर पाणी फेरलं. त्यानंही त्याच स्टाईलमध्ये फटकेबाजी करत धावा जमवायला सुरुवात केली.
4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं त्यानं 25 चेंडूमध्ये 54 धावा केल्या. पण फटकेबाजीच्या प्रयत्नात तो बाद झाला.
एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट
भारताची पहिली विकेट अभिषेकच्या रुपात पडली. अर्धशतकानंतर रचिन रविंद्रच्या चेंडूवर विकेटकिपरकडं कॅच देत तो बाद झाला.
त्यानंतर नीशमनं एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट घेतल्या.
सोळाव्या षटकात न्यूझीलंडच्या जेम्स नीशमनं भेदक मारा करत न्यूझीलंडला सामन्यात परत आणलं. त्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर त्यानं संजू सॅमसनची विकेट काढली. मॅककॉन्चीनं लाँग ऑनला त्याचा अप्रतिम झेल टिपला.
त्याच षटकात पाचव्या चेंडूवर ईशान किशन चॅपमनकडे झेल देऊन बाद झाला. आणि पुढच्याच चेंडूवर रचिन रविंद्रनं सूर्यकुमार यादवचा अफलातून झेल टिपला.
त्यानंतर मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात हार्दिक झेलबाद झाला. सँटनरनं उंच उडालेला त्याचा झेल घेतला.

बुमरा, अक्षरचे घरचे मैदान
जसप्रीत बुमरा आणि अक्षर पटेल गुजरातचं प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम हे त्यांच्यासाठी होम ग्राऊंडच आहे.
साहजिकच या दोघांनी सुरुवातीलाच भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिले, तेव्हा चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. अक्षर, अक्षर आणि बूम बूम बुमरा अशा घोषणा ऐकू येऊ लागल्या.

दोन षटकांच्या मध्ये चाहत्यांना गुंतवून ठेवण्यासाठी डीजे गाणी लावत होता.
मोबाईलचा फ्लॅश ऑन करून तालावर फिरवायला सांगत होता. एरवी लाखभर चाहत्यांना खिळवून ठेवणं सोपं नसतं. पण टीम इंडियानं आपल्या खेळानं तेच केलेलं दिसलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











