गॅस संपला, 'चूल' विझली; एलपीजी तुटवड्यामुळे कोणत्या उद्योगांचा 'कणा' मोडण्याची भीती?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
अमेरिका-इस्रायल यांच्या इराणसोबतच्या संघर्षाचा जगभरात पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण झाला आहे.
केंद्र सरकार तुटवडा नसल्याचं म्हणत असले तरी देशात जीवनाश्यक वस्तू कायदा लागू करण्यात आला आहे. कारण, एलपीजीवर अवलंबून असलेल्या उद्योगांवर संकट आलं आहे.
रेस्टॉरंटला व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा कमी होत नसल्यानं ते अडचणीत सापडले आहेत, तर काही छोट्या व्यावसायिकांनी लाकडांचा पर्याय निवडला.
काही ठिकाणी एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे घरगुती खाणावळी, मेस असे छोटे व्यवसाय संकटात सापडले आहेत.
पण, फक्त रेस्टॉरंट किंवा फूड इंडस्ट्रीवर एलपीजी तुटवड्याचा परिणाम झाला असे नाही, तर अनेक उद्योग आहेत ज्यावर परिणाम पाहायला मिळतो आहे.
कोणकोणत्या व्यवसायांवर परिणाम होतो आहे याचाच घेतलेला हा आढावा.
एमआयडीसीतील लहान उद्योगांवर परिणाम
नागपुरातील हिंगणा एमआयडीसी विदर्भातील मोठी एमआयडीसी आहे.
इथं साधारण 1 हजाराच्या वर उद्योग आहेत. मोठ्या उद्योगांसह स्मॉल स्केल आणि एमएसएमईअंतर्गत अनेक उद्योग इथं आहेत.
यापैकी सर्वाधिक उद्योगांमध्ये एलपीजीचा वापर होतो. इंजिनिअरिंग, फूड प्रोसेसिंग, पावडर कोटिंग, फार्मास्युटिकल्स, फॅब्रिकेशन आणि पॅकेजिंग, प्लास्टीक यांसारख्या अनेक उद्योगांमध्ये एलपीजीचा वापर केला जातो.
एक हजार उद्योगांपैकी जवळपास 70 टक्के उद्योगांमध्ये एलपीजीचा वापर होतो.

फोटो स्रोत, Kuni Takahashi/Getty Images
इंजिनिअरींगमध्ये कटिंगसाठी, फूड प्रोसेसिंगमध्ये हिटिंगसाठी, प्लास्टीकमध्ये मेल्टींगसाठी, फॅब्रिकेशनमध्ये इंडस्ट्रीयल प्रोसेससाठी, सिरॅमिक आणि ग्लास तयार करताना एलपीजीचा वापर होतो.
"पण, गेल्या तीन दिवसांपासून या इंडस्ट्रीला पुरवठा झाला नाही. पुढचे दोन दिवस काम होऊ शकेल फक्त इतका साठा इंडस्ट्रीजवळ उरला. त्यानंतर पुरवठा झाला नाहीतर उद्योग बंद पडतील. फूड प्रोसेसिंग, बेकींगवाले उद्योग तर लवकर ठप्प होतील. त्याचा परिणामही आता जाणवायला सुरुवात झाली आहे", असं हिंगणा एमआयडीसीचे अध्यक्ष पी. मोहन यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
पुढे ते म्हणतात, "एलपीजी उद्योगांना परवडणारा गॅस आहे. तसेच लवकर उपलब्ध देखील होतो. त्यामुळे लहान उद्योग सर्वाधिक एलपीजीचा वापर करतात."
मोठे उद्योग गुंतवणूक करून लगेच एलपीजीचा पर्याय शोधतील. पण, लहान उद्योगांसाठी या गोष्टी शक्य नाहीत. त्यामुळे सरकारनं आमचे उद्योग बंद होऊ नये यासाठी प्रयत्न करावे अशीही मागणी त्यांनी केली.
स्टील उद्योगावर परिणाम
स्टील उद्योगासाठी एलपीजी हे महत्वाचं इंधन आहे. ज्या उद्योगांमध्ये हिटिंगची गरज असते अशा सर्व उद्योगांसाठी एलपीजी लाईफलाईन समजलं जातं. कारण, एलपीजी तापमान नियंत्रित ठेवतो, एकसारखं हिटिंग करते आणि 'प्री हिटिंग टाइमट पण कमी करते. तसेच हे एक स्वच्छ इंधन आहे आणि लवकर उपलब्धही होते. सोबतच मेंटनन्स सुद्धा कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उद्योजक एलपीजीचा वापर करतात.
स्टील उद्योगामध्ये फर्नेस हिटिंग करण्यासाठी, मेटल कटिंगसाठी आणि गॅल्वनायझेशन (लोखंड किंवा स्टीलला गंजण्यापासून वाचवण्यासाठी त्यावर जस्ताचा संरक्षक थर देणे) प्रक्रियेसाठी एलपीजीचा वापर होतो. तसेच एलपीजीनं हिटिंग केल्यानं स्टीलच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज देखील सुधारतात.

फोटो स्रोत, Dhiraj Singh/Bloomberg via Getty Images
"एलपीजी ज्वलनशील असल्यानं जास्त साठा करता येत नाही. इंडस्ट्रीजवळ जवळपास चार ते पाच दिवसांचा साठा असतो. आता तीन दिवस झाले पुरवठा बंद आहे. अनेक लहान उद्योग दररोज सिलिंडर भरून घेतात. आता त्यांना सिलिंडर मिळणं बंद झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावरही परिणाम झाला आहे. तसेच स्टील उद्योगासाठी एलपीजी अत्यावश्यक आहे. पुढचे दोन दिवस सिलिंडर मिळालं नाहीतर अनेक उद्योग तात्पुरते बंद होण्याच्या मार्गावर असतील. सरकारनं एलपीजीच्या आयातसाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी", अशी मागणी चेम्बर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे अध्यक्ष आणि उद्योजक डॉ. दीपेन अग्रवाल यांनी केली.
पुढे ते म्हणतात, घरगुती सिलिंडर पुरवठा चालू राहावा. पण, त्यासोबतच उद्योगांसाठी सुद्धा एलपीजी उपलब्ध करून द्यावा. नाहीतर आमचे उद्या येत्या तीन दिवसांत बंद होतील.
'कमी पाहुण्यांमध्ये कार्यक्रम करा किंवा पुढे ढकला'
सध्या लग्नाचा सीजन सुरू झाला आहे. तसेच अनेक लहान लहान कार्यक्रम सुरूच असतात. कार्यक्रमाचे सगळं नियोजन ठरलेलं असतं. पण, आता व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे हे कार्यक्रम कसे होणार? असा प्रश्न केटरींग व्यवसाय करणाऱ्यांना पडला आहे.
आज उद्या कार्यक्रम होऊ शकतील असे सिलिंडर काही केटरींगवाल्यांजवळ उपलब्ध आहेत. पण, पुढे सिलिंडरशिवाय कार्यक्रम कसे होणार? असा सवाल पिंपरी चिंचवडचे केटरींग असोसिएशनचे अध्यक्ष अण्णा कुदळे उपस्थित करतात.
ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "आम्हाला सिलिंडरचा साठा ठेवता येत नाही. अचानक पुरवठा बंद झाला. कसंतरी एखादं सिलिंडर मिळालं तर उद्याचे कार्यक्रम होतील. त्यानंतर काहीच पर्याय नाही. डिझेलच्या भट्ट्या लावायचा विचार सुरू आहे. पण, डिझेल बंद झालं तर काय करायचं? त्यामुळे कार्यक्रम पुढे ढकलता येतील का? किंवा कमी पाहुण्यांमध्ये कार्यक्रम करता येतील का? यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना विनंती करत आहोत. सिलिंडर सुरळीत झाल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम न घेणं हा एकमेव पर्याय आहे."

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP via Getty Images
तर पुण्यातील विनायक जोशी केटरींगवाले यांच्याकडे मार्च महिन्यात सात लग्नाचे ऑर्डर आहेत. पण, त्या लग्नात सिलिंडरशिवाय जेवणाची सुविधा कशी उपलब्ध करून देणार असा प्रश्न त्यांना पडला आहे.
ते म्हणतात, लोकांनी सहा महिन्याआधी बुकिंग केलं आहे. आता अचानक सिलिंडरचा पुरवठा बंद झाला आहे. कालचा कार्यक्रम कसातरी पूर्ण झाला. आता आमच्याकडे काहीच उरलं नाही. आमच्या ग्राहकांसोबत कार्यक्रम पुढे ढकलता येईल का? यासाठी बोलणं सुरू आहे. पण, कोणी ऐकणार नसेल तर कोळशाच्या भट्ट्या लावून त्यांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल.
एलपीजीच्या किंमती वाढल्यानं रिक्षा चालक दरवाढ करणार
अनेक रिक्षा एलपीजीवर चालतात. सध्या फ्युएल स्टेशनवर रिक्षांसाठी साठा उपलब्ध आहे. पण, अचानक किंमत वाढल्यानं रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत.
अचानक किंमती वाढल्यानं आम्हाला भाडं परवडत नाही. किंमती वाढवल्या तसं आता आरटीओनं मीटरचं टेरीफ वाढवून द्यावं. सध्या गॅस उपलब्ध आहे. पण, भाव वाढले त्यामुळे आम्ही सुद्धा भाडं वाढवण्याचा विचार करत आहोत, असं विदर्भ ऑटोरिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











