इराण युद्ध सुरू असतानाही 'होर्मुजची सामुद्रधुनी' ओलांडणारी 'ही' 100 जहाजं कुणाची?

तेल टँकर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, केलीन डेव्हलिन, टॉम एजिंग्टन, यी मा
    • Role, बीबीसी व्हेरिफाय
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून, होर्मुझ सामुद्रधुनीतून सुमारे 100 पेक्षा कमी जहाजं गेली आहेत, असं बीबीसी व्हेरिफायला दिसून आलं आहे. इराणच्या सैन्याने अधूनमधून या मार्गावरील जहाजांवर हल्ले केले आहेत.

बीबीसी व्हेरिफायने एका डेटाचा अभ्यास करून ही माहिती समोर आणली आहे.

जगातील सर्वात व्यस्त जलमार्गांपैकी एक असला तरीही 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या इराण युद्धामुळे दररोज जाणाऱ्या जहाजांची संख्या सुमारे 95 टक्क्यांनी कमी झाली आहे.

युद्धापूर्वी, संयुक्त सागरी माहिती केंद्राच्या (जॉइंट मेरिटाइम इन्फर्मेशन सेंटर) माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीमधून रोज सुमारे 138 जहाजे जात होती.

ही जहाजे जागतिक तेल पुरवठ्यापैकी एक पंचमांश इतकी वाहतूक करत होती.

शिपिंग विश्लेषक केप्लरच्या माहितीनुसार, या महिन्यात आतापर्यंत (20 मार्च) होर्मुझमधून 99 जहाजं गेली आहेत, म्हणजे दररोज सरासरी फक्त 5 ते 6 जहाजं.

बीबीसी व्हेरिफायने होर्मुझमधून कोणती जहाजे जात आहेत आणि त्यांना काय धोके आहेत, हे पाहिलं.

भारताच्या दिशेने 6 जहाजं रवाना

बीबीसीच्या अभ्यासानुसार, अलीकडच्या जहाजांच्या प्रवासांपैकी (क्रॉसिंग) सुमारे एक तृतीयांश जहाजं इराणाशी कोणत्या ना कोणत्या कारणांनी संबंधित होती.

यातील काही जहाजे इराणच्या ध्वजाखाली चालत आहेत. यात एकूण 14 जहाजांचा समावेश आहे. इतर काही जहाजांवर युरोप किंवा अमेरिका यांनी निर्बंध लादले होते, कारण त्यांचे संबंध तेहरानच्या तेल व्यापारांशी आहेत.

इतर 9 जहाजं कंपन्यांच्या मालकीची होती आणि त्या कंपन्यांचे पत्ते चीनशी संबंधित होते, तर 6 जहाजं भारतात जाणार असं समोर आलं होतं.

होर्मुझची सामुद्रधुनी

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक जवळजवळ बंद झाली आहे.

काही जहाजं जी इराणशी संबंधित नाहीत तीही इराणच्या बंदरांवर थांबली आहेत, आणि त्यात ग्रीक कंपन्यांच्या मालकीची जहाजंही आहेत, असं विश्लेषणातून समोर आलं आहे.

जी जहाजं होर्मुझ सामुद्रधुनीमधून यशस्वीरित्या जात आहेत, ते नेहमीच्या मार्गापेक्षा लांबचा मार्ग घेताना दिसतात.

पाकिस्तानचा मात्र मार्ग वेगळा, पण का?

या मार्गावरून 15 मार्चला गेलेल्या पाकिस्तानचा ध्वज असलेल्या तेलवाहक जहाजाचा ट्रॅकिंग डेटा सांगतो की, हे जहाज सामुद्रधुनीमधून जाताना सरळ मध्यभागी न जाता इराणच्या किनाऱ्याजवळून गेले.

त्या जहाजाने बहुधा 'इराणकडून मिळालेल्या काही सूचनांचे पालन' केल्यामुळे ते पुढे गेल्याचे दिसतं, असं यूएस डिफेन्स थिंक टँक रँड कॉर्पोरेशनचे वरिष्ठ संशोधक ब्रॅडली मार्टिन यांनी सांगितलं

होर्मुझची सामुद्रधुनी

जहाजाच्या मार्गावरून असं लक्षात येतं की, कदाचित त्या ठिकाणी सुरुंग (माइन्स) असू शकतात किंवा इराणच्या अधिकाऱ्यांना जहाज ओळखण्यास सोपं जावं यासाठी हा मार्ग निवडला असावा, असं मार्टिन यांनी म्हटलं.

विंडवर्ड मेरीटाईम ॲनालिटिक्समधील मिशेल विसे बॉकमन सांगतात की, जहाजांना वेगळा मार्ग घ्यायला भाग पाडल्याने ती जहाजे आता इराणच्या क्षेत्रीय पाण्यात प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे त्या तेहरानच्या समुद्री नियमांनुसार चालतात.

"मला असं वाटतं की, जहाजांवर हल्ला आणि पाण्यातील सुरुंगीची भीती दाखवून इराण या मार्गावर नियंत्रण ठेवत आहे."

"याच कारणामुळे सर्व जहाजांना सरळ आंतरराष्ट्रीय सागरी मार्गाऐवजी वळसा घालून इराणच्या किनाऱ्याजवळून जावं लागत आहे," असं त्यांनी बीबीसी व्हेरिफायला सांगितलं.

जहाजं वेगळा मार्ग निवडत आहेत, याला अमेरिकेतल्या सेंटर फॉर नेव्हल ॲनालिसिसचे मायकेल कॉनेल यांनीही सहमती दर्शवली.

ते म्हणतात की, "कदाचित जहाजांनी इराणी अधिकाऱ्यांसोबत करार केला असेल, ज्यामुळे ठरवलेल्या मार्गावरून गेले तर ते सुरक्षित राहतील."

जहाजांना असलेले मुख्य धोके

युद्ध सुरू झाल्यापासून आम्ही 20 व्यापारी जहाजांवर इराणच्या किनाऱ्याजवळ हल्ले झाले असल्याची खात्री केली आहे, पण ही सर्व जहाजं होर्मुझ सामुद्रधुनीच्या जवळ नव्हती.

11 मार्च रोजी थायलंडचा ध्वज असलेली एक मोठी मालवाहक जहाज 'मयुरी नारी' होर्मुझ मार्गावरून जाताना दोन प्रोजेक्टाइलचा त्यावर हल्ला झाला होता.

थायलंडचा ध्वज असलेल्या 'मयुरी नारी' नावाच्या जहाजावर 11 मार्च रोजी हल्ला झाला होता.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, थायलंडचा ध्वज असलेल्या 'मयुरी नारी' नावाच्या जहाजावर 11 मार्च रोजी हल्ला झाला होता.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एकूण 23 कर्मचाऱ्यांपैकी तिघे अद्यापही बेपत्ता आहेत. ज्यावेळी जहाजावर हल्ला झाला त्यावेळी, ते इंजिन रुममध्ये अडकले होते, असं सांगितलं जातं.

बचावलेल्या कर्मचाऱ्यांना 'समुद्रात झालेल्या दोन स्फोटांमुळे मोठा धक्का बसला आहे, असं जहाजाच्या मालकांनी बीबीसी व्हेरिफायला सांगितलं.

त्याच दिवशी आणखी दोन जहाजांवर हल्ला झाला - ग्रीक कंपनीच्या मालकीचे 'स्टार ग्वेनेत' आणि अमेरिकन कंपनीच्या मालकीचे 'एमटी सेफेसी विष्णू'.

'व्यापारी किंवा व्यावसायिक जहाजांच्या मार्गांना युद्धभूमी बनवता येत नाही,' असं एमटी सेफेसी विष्णूच्या मालकांनी बीबीसी व्हेरिफायला सांगितलं.

हल्ल्याच्या वेळी जहाज इराकच्या किनाऱ्याजवळ उभे होते, आणि यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. जळत असलेल्या जहाजातून वाचण्यासाठी सर्व 28 कर्मचाऱ्यांना पाण्यात उडी मारावी लागली, असं एस व्ही अंचन यांनी सांगितलं.

"हे पुरुष आणि महिला सैनिक नाहीत. ते व्यावसायिक आहेत, जे जागतिक व्यापार चालू ठेवतात."

ड्रोन, क्षेपणास्त्र, वेगवान हल्लेखोर बोटी (फास्ट अटॅक बोट्स) आणि कदाचित सुरूंग या धोक्यांमुळे जहाजांसमोर मोठं आव्हान उभं आहे, असं किंग्ज कॉलेज फ्रीमन एअर अँड स्पेस इन्स्टिट्यूटचे अरुण डॉसन म्हणतात.

"जर पारंपरिक माइन्सवीपर जहाजावर एकाच वेळी हल्ला झाला तर माइन्स म्हणजेच सुरूंग शोधणे आणि निष्क्रिय करणे खूप कठीण होईल," असं अरुण डॉसन यांनी सांगितलं.

होर्मुझचा भूगोल इराणच्या बाजूने

इराणला होर्मुझ मार्गाचा भूगोल (जमिनीची रचना) आपल्या फायद्यासाठी वापरता येतो. हा मार्ग केवळ अरुंद आणि उथळच नाही तर याचा समुद्रकिनारा हा डोंगराळ आहे, त्यामुळे इराण अचानक हल्ले करु शकतं. यामुळे जहाजांना हल्ल्याला प्रतिक्रिया देण्यासाठी वेळही कमी मिळतो.

ओळख टाळण्यासाठी किंवा लक्षात येऊ नये यासाठी, अनेक जहाजं आपली ट्रॅकिंग सिस्टिम बंद करत असल्याचे दिसते. ज्याला एआयएस (ऑटोमॅटिक आयडेंटीफिकेशन सिस्टिम) म्हणतात.

"या जहाजांपैकी बहुतेक जहाजे काळजी न घेता मार्ग ओलांडत आहेत," असं केप्लरचे दिमित्रीस अँपॅटझिडिस म्हणाले.

खार्ग बेट खाडीच्या उत्तर भागात आहेत आणि ते इराणच्या जवळपास 90 टक्के कच्च्या तेलाच्या निर्यातीचं केंद्र आहे

फोटो स्रोत, Gallo Images/Orbital Horizon/Copernicus Sentinel Data 2024

फोटो कॅप्शन, खार्ग बेट खाडीच्या उत्तर भागात आहेत आणि ते इराणच्या जवळपास 90 टक्के कच्च्या तेलाच्या निर्यातीचं केंद्र आहे

जहाजं ओमानच्या आखातामध्ये प्रवेश करताना आपले ट्रॅकर्स बंद करतात. त्यामुळे ते नकाशांवर दिसून येत नाहीत. काही तास किंवा दिवसांनी दुसऱ्या ठिकाणी ते दिसू लागतात.

यामुळे जहाजांना आपले ठिकाण लपवायला मदत होत असली, तरी सामुद्रधुनीतील जहाजांचा मागोवा घेत असलेल्या केप्लरसारख्या कंपनीला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

"आमच्या विश्लेषकांनी सर्व काही मॅन्युअल तपासून आणि उपग्रहाच्या (सॅटेलाइट) प्रतिमांचा उपयोग करून पडताळणी केली आहे," असं अँपॅटझिडिस यांनी बीबीसी व्हेरिफायला सांगितलं.

(डॅनियल पालुम्बो आणि जोशुआ चीथम यांचे अतिरिक्त वार्तांकन.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)