बीडच्या द्वारका वाघमारे यांनी शेती करून गाव कसं बदललं?
बीड जिल्ह्यातील काठवडा गावात दलित शेतकरी महिला द्वारका वाघमारे यांनी गायरान जमिनीवर स्वावलंबी शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला. एकेकाळी रोजगारासाठी सतत स्थलांतर करणाऱ्या त्यांच्या कुटुंबाने आज गावातच स्थिरावून शेतीत नवा मार्ग दाखवला आहे.
सासऱ्यांच्या हातची पडीक गायरान जमीन कष्टाने कसून द्वारका वाघमारे यांनी Agro Ecological (कृषि-पर्यावरणीय) शेती सुरू केली. गेल्या पाच वर्षांपासून जागर प्रतिष्ठान, महिला किसान मंच आणि सोपेकॉम या संस्थांच्या मदतीने त्या कडधान्य, गावरान बाजरी आणि स्थानिक पिकांवर आधारित स्वावलंबी शेती करत आहेत.
या प्रयोगाची खास गोष्ट म्हणजे सुरुवातीला 3 महिलांनी सुरू केलेल्या या प्रयोगात आज गावातील विविध जात-समुदायातील 40 महिला सहभागी झाल्या आहेत. महिलांनी एकमेकांशी बी-बियाण्यांची देवाणघेवाण करून स्थानिक अन्नसुरक्षा आणि पोषणाला चालना दिली आहे.
दुष्काळी भागात स्थलांतरित कुटुंबांतील महिलांना घर, मुलं, मजुरी आणि अनिश्चित उत्पन्न यांचा मोठा संघर्ष करावा लागतो. द्वारका वाघमारे यांच्या आयुष्यातही असेच कठीण दिवस होते. पण शेतीच्या माध्यमातून त्यांनी केवळ स्वतःचं आयुष्य बदललं नाही, तर गावात सामाजिक बदल घडवून आणला.
आज काठोडा गावात दारूबंदी झाली आहे, महिलांचा सन्मान वाढला आहे आणि जातीय भेदभाव कमी झाला आहे, असं द्वारका सांगतात. ग्रामसभा, आरोग्य शिबिर किंवा गावातील महत्त्वाच्या बैठकींमध्ये द्वारका वाघमारे यांना सन्मानाने बोलावलं जातं.
एकेकाळी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबाची ही कथा आज महिला सशक्तीकरण, स्वावलंबी शेती आणि ग्रामीण सामाजिक बदलाचं उदाहरण बनली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केलं आहे. शेती आणि अन्न निर्मितीतील महिलांचे योगदान मान्य करणं, लिंगभेद दूर करणं आणि महिला शेतकऱ्यांना सक्षम करणं हा यामागील मुख्य उद्देश आहे.
रिपोर्ट- प्राजक्ता धुळप
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






