ड्रिल, अचूक टायमिंग आणि झिरो नॉईज: कोट्यवधींची चोरी होऊन महिना उलटला तरी कोणालाच कसं कळलं नाही?

भिंतीतील हे छिद्र 27 डिसेंबर 2025 रोजी एका प्रचंड ड्रिलनं पाडलेलं होतं.

फोटो स्रोत, Gelsenkirchen police

फोटो कॅप्शन, भिंतीतील हे छिद्र 27 डिसेंबर 2025 रोजी एका प्रचंड ड्रिलनं पाडलेलं होतं.
    • Author, बेथानी बेल
    • Role, जर्मनी रिपोर्टर
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

जर्मनीत गेल्या काही वर्षात घालण्यात आलेला हा प्रचंड मोठा दरोडा आहे, अशी तिथली सार्वत्रिक भावना आहे. कारण, त्याचं स्वरूपही तसंच आहे.

पायाखालची जमिन सरकवणारी ही घटना ख्रिसमस नंतरच्या एका शांत वीकेंडला घडलीये.

चोरांच्या एका टोळीनं जर्मनीतल्या एका बँकेत असा दरोडा टाकलाय की, त्याची खबरबातही कुणाला लागली नाही.

जर्मनीच्या पश्चिमेकडील गेल्सेनकिर्चेन शहरातील हाय स्ट्रीट बँकेवर हा दरोडा पडलाय.

बँकेत शिरण्यासाठी चोरांनी इंडस्ट्रियल ड्रिलचा वापर करून भिंतीतून छिद्र पाडलं. त्यांनी 3 हजारांहून अधिक सिक्योरिटी बॉक्सेस फोडले आणि या बँकेत ठेव म्हणून ठेवण्यात आलेले लाखो 'युरो' चोरले.

कहर म्हणजे, इतका भलामोठा दरोडा टाकल्यानंतर हे चोर यशस्वीरित्या पळूनही गेले.

आता या गुन्ह्याला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. परंतु, पोलीस अद्याप कोणालाही अटक करू शकलेले नाहीयेत.

संपूर्ण आयुष्याची बचत गमावली

अर्थातच, या दरोड्यामुळे बँकेच्या अनेक ग्राहकांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे.

काही जण सांगतात की, त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सगळीच बचत गमावलेली आहे, तर काहींनी मौल्यवान दागिने आणि त्यांच्याकडच्या बहुमोल वस्तू गमावल्या आहेत.

या दरोड्यामुळे बहुसंख्य ग्राहकांना धक्का बसला असून त्यांच्या मनात संतापाची भावना आहे.

बँकेसारख्या संस्थेवरील त्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे, असंही काहींचं म्हणणं आहे. पण, एकंदरीतच या प्रकरणामुळे अनेक जटील असे प्रश्न नक्कीच उपस्थित झालेले आहेत.

नॉर्थ राइन-वेस्टफेलियाचे इंटेरिअर मिनिस्टर हर्बर्ट रूल यांनी या जटील प्रश्नांना वाचा फोडली आहे.

पोलिसांनी असा अंदाज लावला आहे की, चोर शेजारच्या कार पार्कमधून इमारतीत घुसले होते.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पोलिसांनी असा अंदाज लावला आहे की, चोर शेजारच्या कार पार्कमधून इमारतीत घुसले होते.

त्यांनी उपस्थित केलेला सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, इतका मोठा दरोडा टाकला जात असताना कुणाच्याही हे कसं काय लक्षात आलं नाही?

शिवाय, यातूनच दुसरा प्रश्न उपस्थित होतो की, हे आतल्याच कुणाचं तरी काम आहे का?

लोक असाही प्रश्न उपस्थित करत आहेत की, इंडस्ट्रियल ड्रीलचा वापर करून भिंत फोडली जात असताना कुणालाच आवाज कसा काय आला नाही?

शिवाय, या दरोडेखोरांना बँकेत पैशांच्या तिजोऱ्या नेमक्या कुठे आहेत, ते ठिकाण अचूकपणे कसं काय कळलं?

बँकेची सुरक्षा व्यवस्था इतकी कमकुवत आहे का?

दरोडेखोरांनी पाडलं भलंमोठं भगदाड

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

साक्षीदारांनी पुढे यावं आणि या दरोड्याबाबत माहित असलेल्या गोष्टी सांगाव्यात, असं आवाहन गेल्सेनकिर्चेनमधील पोलिसांनी केलेलं आहे.

तपासकर्त्यांना असं वाटतं की, या दरोडेखोरांनी शहराच्या बुअर भागातील शेजारच्या बहुमजली कार पार्कमधून निएनहॉफस्ट्रास येथील स्पार्कासे सेव्हिंग बँकेत प्रवेश केला असावा.

या दरोडेखोरांनी कार पार्क आणि बँकेला जोडणाऱ्या 'एस्केप डोअर'शी छेडछाड केली असावी, असंही त्यांना वाटतं.

सामान्यतः हा दरवाजा बाहेरून उघडता येत नाही. कदाचित, या टोळीनं दरवाजा पूर्णपणे बंद होणार नाही याची खात्री केली असावी. आणि त्यामुळे त्यांना कार पार्कमधून बँकेच्या इमारतीत सहज प्रवेश करता आला असावा.

पोलिसांचा असाही कयास आहे की, चोरांनी अनेक सुरक्षा यंत्रणांना चकवा देऊन तिजोरीच्या शेजारी असलेल्या एका 'अर्काईव्ह रूम'मध्ये प्रवेश केलाय. ही अर्काईव्ह रूम बँकेच्या तळघरात आहे.

दरोडेखोरांनी ड्रीलचा वापर करत तिथल्या भिंतीला एक भलमोठं भगदाड पाडलं आणि आतल्या स्ट्राँगरूममध्ये प्रवेश केला. दरोडेखोरांनी पाडलेलं हे भोक जवळजवळ 40 सेमी (15.7 इंच) रुंद होतं. याच स्ट्राँगरूममधील तिजोऱ्यांमध्ये ठेवी ठेवण्यात आल्या होत्या.

बँकेच्या भिंतीच्या दुसऱ्या बाजूने दिसणारं दृश्य.

फोटो स्रोत, Gelsenkirchen Police

फोटो कॅप्शन, बँकेच्या भिंतीच्या दुसऱ्या बाजूने दिसणारं दृश्य.

ही चोरी शनिवार, 27 डिसेंबर ते सोमवार, 29 डिसेंबर या दरम्यान झाली असावी, असंही अधिकाऱ्यांना वाटतं.

या तिजोऱ्यांजवळ पोहोचण्यापूर्वीच हे चोर जवळजवळ पकडले गेले असावेत. कारण, 27 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता बँकेमध्ये आगीचा अलार्म वाजला होता आणि गेलसेनकिर्चेनमधील अग्निशमन दलाला सूचनाही मिळाली होती. सोबत, एका खाजगी सुरक्षा कंपनीलाही इशारा मिळाला होता. या दरोडेखोरांनीच अलार्म वाजवला असावा.

पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे 20 जवान सकाळी सव्वासहा वाजता बँकेत पोहोचले होते, मात्र बँकेला आग लागून नुकसान झाल्याचं कोणतंही लक्षण त्यांना दिसून आलं नाही, अशी माहिती पोलिसांनीच आपल्या निवेदनात दिली आहे.

हर्बर्ट रूल यांनी नंतर उघड केलं की, हा फायर अलार्म तिजोरी ठेवलेल्या स्ट्राँगरूममधून आला होता. मात्र, अग्निशमन दलाचे जवान तिथे प्रवेश करू शकले नाहीत. कारण, ते प्रवेशद्वार रोल शटरनं बंद होतं. शिवाय, त्यांना तिथे ना कसल्याही प्रकारचा धूर दिसला, ना त्यांना आगीचा वास आला. त्यामुळे, कुठे आग लागली आहे वा काही नुकसान घडतंय, हे त्यांच्या लक्षात आलं नाही.

त्यामुळे, त्यांनी असा निष्कर्ष काढला की हा अलार्म चुकीमुळे वाजला असावा. पुढे रूल म्हणाले की, अशाप्रकारे खोटे अलार्म वाजणंही असामान्य गोष्ट नाहीये.

त्यांनी या घटनेची माहिती राज्य संसद समितीला दिली आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की पोलिसांना त्यावेळी बँकेची झडती घेण्याचा अधिकार नव्हता. कारण, तेव्हा परिस्थिती अग्निशमन दलाच्या अखत्यारित होती आणि पोलिसांना बँकेची झडती घेण्यासाठी वॉरंटची आवश्यकता होती.

दरोडेखोरांनी ठेवी असलेल्या तिजोऱ्यांच्या स्ट्राँगरूममध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे ठेवलेल्या जवळजवळ सर्व म्हणजेच 3,250 पेटारे उघडले. अर्थातच, त्यांनी तिथे असलेली रोख रक्कम, सोनं आणि दागिने चोरले.

नेमकी किती चोरी झालीये ते स्पष्ट नाही

हर्बर्ट रूल यांनी बँकेच्या कम्प्यूटर सिस्टीमच्या सहाय्याने इत्यंभूत माहिती दिली. त्यांनी सांगितलंय की, तिथला पहिला पेटारा 27 डिसेंबर रोजी पावणेअकरा वाजता उघडण्यात आला. तर, शेवटचा पेटारा त्याच दिवशी दुपारी दोन वाजून 44 मिनिटांनी उघडण्यात आला.

या दरोडेखोरांनी चार तासांत बहुतांश पेटारे उघडले की नाही हे स्पष्ट नाहीये कारण, तेव्हा रेकॉर्डिंग सिस्टमनं काम करणं बंद केलं असण्याची शक्यता आहे.

साक्षीदारांनी पोलिसांशी बोलताना नंतर सांगितलंय की, त्यांना कार पार्कच्या जिन्यामध्ये अनेक पुरुष दिसले होते. शिवाय, 27 डिसेंबरच्या मध्यरात्री हे लोक मोठ्या बॅगा घेऊन जात होते.

अधिकाऱ्यांना चोरीची नेमकी रक्कम माहित नाही. मात्र, जर्मन मीडियाचा अंदाज आहे की, या दरोड्यामधलं नुकसान हे 100 दशलक्ष युरोपर्यंतचं असू शकतं.

29 डिसेंबर रोजी शिल्लक राहिलेल्या कचऱ्याचे फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केले आहेत.

फोटो स्रोत, Gelsenkirchen Police

फोटो कॅप्शन, 29 डिसेंबर रोजी शिल्लक राहिलेल्या कचऱ्याचे फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केले आहेत.

पोलिसांनी नंतर कार पार्कच्या सिक्योरिटी कॅमेऱ्यांमधील फोटो जारी केले आहेत. त्यांनी व्हीडिओ फुटेज देखील प्रसिद्ध केलेलं आहे. या फुटेजमध्ये अनेक पुरुषांचे चेहरे झाकलेले दिसत होते. तसेच, फुटेजमध्ये दोन कारदेखील दिसत होत्या. त्यातली एक कार काळ्या ऑडी आरएस 6 होती तर दुसरी कार पांढऱ्या रंगाची मर्सिडीज सिटन होती. या दोन्ही कारच्या नंबर प्लेट बनावट होत्या.

असा काही दरोडा पडला आहे ही गोष्टच 29 डिसेंबरपर्यंत उजेडात आलेली नव्हती. खरं तर सोमवारी 3 वाजून 58 मिनिटांनी आणखी एक फायर अलार्म वाजला, तेव्हा अग्निशमन दलाचे जवान बँकेत पुन्हा आले. तेव्हा मात्र त्यांना ठेवी ठेवलेले पेटारे पूर्णपणे अस्ताव्यस्त आढळले.

हर्बर्ट रूल म्हणाले की, ते दृश्य एखाद्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यासारखं दिसत होतं. 5 लाखांहून अधिक वस्तू जमिनीवर विखुरलेल्या होत्या. या सगळ्या वस्तू तिजोरीतील होत्या आणि चोरांनी त्या मागे सोडलेल्या होत्या.

सीसीटीव्हीत काय दिसलं?

पोलिसांनी सांगितलं की, चोरांनी उरलेल्या वस्तूंवर पाणी आणि केमिकल्सचा फवारा केल्यामुळे अनेक वस्तूंचं नुकसान झालेलं आहे. तरीही पोलीस अधिकारी या ढिगाऱ्यातून काळजीपूर्वक परिक्षण करत काही सुगावा मिळतोय का, वा या वस्तूंच्या मालकांची ओळख पटतेय का, याचा तपास करत आहेत.

बँकेवर असा भयानक दरोडा पडलाय ही बातमी बाहेर फुटताच, स्पार्कासे बँकेच्या बाहेर जवळपास दोनशेच्या आसपास संख्येने ग्राहक जमलेले होते. हे सारे संतापलेले ग्राहक बँकेच्या आत जाऊ देण्याची मागणी करत होते. त्यावेळी, अनेक गस्ती गाड्यांसह पोलिसांनी सुरक्षा वाढवली आणि बँकेचं प्रवेशद्वार सुरक्षित केलं.

63 वर्षीय जोआकिम अल्फ्रेड वॅग्नर यांनी त्यांच्या नुकसानाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, हजारो युरो किमतीचं सोनं त्यांनी गमावलं आहे. त्यांनी त्यांच्या वडिलांचे आणि आजी-आजोबांचे दागिने देखील गमावले आहेत.

29 डिसेंबरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन मुखवटा घातलेले पुरुष दोन वाहनांसह दिसत आहेत.

फोटो स्रोत, Gelsenkirchen police

फोटो कॅप्शन, 29 डिसेंबरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन मुखवटा घातलेले पुरुष दोन वाहनांसह दिसत आहेत.

जोआकिम अल्फ्रेड वॅग्नर यांच्या अपार्टमेंटमध्येही अशा घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी या बँकेत सेफ डिपॉझिट बॉक्स भाड्यानं घेतला होता. त्यांना वाटलं होतं की, किमान इथे तरी त्यांच्या मौल्यवान ठेवी सुरक्षित राहतील. "उद्वेगानं मी खूप रडलो," असं ते सांगतात.

बँकेनं सांगितलंय की, या सिक्योरिटी बॉक्सचा विमा सहसा प्रत्येक बॉक्समागे 10 हजार 300 युरो इतका असतो.

वॅगनर यांनी आता बँकेविरुद्ध खटला दाखल केला आहे. ते नुकसान भरपाई मागत आहेत. त्यांचे वकील डॅनियल कुहलमन यांनी बँकेवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. दुसऱ्या क्लायंटने या सिक्योरिटी बॉक्समध्ये 4 लाख युरो इतकी रोख रक्कम जमा केली होती. त्यांना, हे पैसे एका फ्लॅटच्या विक्रीतून आले होते आणि त्यांना ते निवृत्तीनंतरच्या काळासाठी वापरायचे होते.

बँकेनं म्हटलं आहे की, आम्ही स्वत:चं या गुन्ह्याचे बळी आहोत. पुढे बँकेनं म्हटलंय की, आमचा परिसर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित करण्यात आलेला होता.

'हे नुकसान केवळ पैशांचं किंवा मालमत्तेचं नाही'

काही क्लायंटकडे त्यांच्या तिजोरीच्या पेट्यांमध्ये असलेल्या वस्तूंच्या अधिकृत पावत्या आहेत, तर काहींकडे नाहीयेत.

हर्बर्ट रूल सांगतात की, "स्पार्कसे बँकेला कोणत्या बॉक्समध्ये काय आहे, याची सुस्पष्ट माहिती नाही. कारण, प्रत्येक व्यक्ती त्यांच्या बॉक्समध्ये हवं ते हव्या त्या पद्धतीनं साठवू शकते."

रूल म्हणाले की, या गुन्ह्याचा मानसिक परिणाम फार गंभीर आहे आणि हे भावनिक नुकसान कमी लेखू नये, यावरही त्यांनी भर दिला.

पुढे त्यांनी सांगितलं की, "यातल्या पीडितांना मदतीची आवश्यकता आहे. कारण, हे नुकसान केवळ पैशांचं किंवा मालमत्तेचं नाही. या गुन्ह्यामुळे अनेकांच्या मनातील सुरक्षिततेच्या भावनेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवरील त्यांचा विश्वासही कमी झाला आहे."

पोलिस प्रमुख टिम फ्रॉममेयर यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना म्हटलंय की, "हा दरोडा नॉर्थ राइन-वेस्टफेलियाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या गुन्हेगारी प्रकरणांपैकी एक आहे."

कार पार्कमधील सीसीटीव्हीमध्ये आणखी एका चोराचे छायाचित्र

फोटो स्रोत, Gelsenkirchen police

फोटो कॅप्शन, कार पार्कमधील सीसीटीव्हीमध्ये आणखी एका चोराचे छायाचित्र

पुढे त्यांनी सांगितलं की, "माझ्या डिपार्टमेंटला आणि त्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना या प्रकरणाचं गांभीर्य किती आहे, याची जाणीव आहे. हे आर्थिक नुकसान खूप मोठं आहे. यामुळे, लोक अनिश्चितता आणि निराशा अनुभवत आहेत, याचीही आम्हाला कल्पना आहे."

हा दरोडा उघडकीस आल्यानंतर लगेचच बँकेबाहेर एक मोर्चा काढण्यात आला. जर्मनीतील अति-उजव्या अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) पक्षाने हा मोर्चा आयोजित केला होता. त्यामुळे, काही लोकांनी या पक्षावर असा आरोप केला की, ते अधिकच समस्या निर्माण करत आहेत.

जर्मन मॅगझीन असलेल्या डेर स्पीगलने या प्रकरणावर भाष्य केलं आहे. या मॅगझीनमध्ये म्हटलं आहे की, चोरी हा आता एक राजकीय मुद्दा बनला असून हा गुन्हा एका मोठ्या समस्येचं प्रतीक बनला आहे.

"अनेकांना वाटतं की सुरक्षेसंदर्भात देण्यात आलेली आश्वासनं पोकळ आहेत, तर काहींना वाटतं की संस्था अपयशी ठरत आहेत. शिवाय, कुणालाही यासाठी जबाबदार धरलं जात नाहीये, अशीही भावना जोर धरते आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)