कॅब ड्रायव्हरचं बँक खातं भाड्यानं घेत शेअर मार्केटमध्ये कसा केला 550 कोटींचा घोटाळा ? किती होतं भाडं?

फोटो स्रोत, Bhargav Parikh
- Author, भार्गव पारिख
- Role, बीबीसी गुजराती
- वाचन वेळ: 6 मिनिटे
अहमदाबादमधील एका कॅब ड्रायव्हरचं बँक खातं दरमहा 25,000 रुपये भाड्यानं घेऊन शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
एका टोळीनं कमी प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये 'कृत्रिम वाढ' करून मनी लाँडरिंग घोटाळा केला आहे.
या टोळीला पकडण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) या प्रकरणात अहमदाबाद पोलिसांची मदत घेतली आहे. आतापर्यंत याप्रकरणी 5 जणांची नावं समोर आली आहेत.
या लोकांनी बेकायदेशीर पैसे जमा करण्यासाठी ड्रायव्हरच्या बँक खात्याचा वापर केला. नंतर त्यांनी त्या खात्यातून हे पैसे काढून घेतले. पोलीस या पाचही आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
कमी माहिती असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत असामान्यरित्या वाढ झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
मुरे ऑर्गनायझर्स लिमिटेड, प्रधीन लिमिटेड आणि कॅक्राफ्टन डेव्हलपर्स लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत 2025 मध्ये तब्बल 1,000 टक्क्यांहून अधिकनं वाढ झाली.
हे तिन्ही पेनी स्टॉक प्रकारातील शेअर्स होते. या शेअर्सच्या किंमतीत असामान्य म्हणजे खूप अधिक प्रमाणात वाढ किंवा बदल दिसून आले.
यामुळं सेबी या शेअर बाजाराच्या नियामक संस्थेनं डिसेंबर 2025 मध्ये या कंपन्यांच्या शेअर्समधील ट्रेडिंगवर बंदी घातली. तसंच सेबीनं या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) सोपवला.

फोटो स्रोत, Bhargav Parikh
ईडीच्या तपासातून समोर आलं की या 3 पेनी स्टॉक्समध्ये अहमदाबादमधील गुलबाई टेकरा भागातील रोनक ट्रेडर्स, तसंच नवरंगपुरामधील कमलेश ट्रेडिंग आणि मिठाखली भागातील प्रदीप ट्रेडर नावाच्या फर्म्सनी मोठ्या प्रमाणात व्यवहार केल्यामुळे या 3 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत झालेली वाढ झाली.
या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्यासाठी ईडीनं अहमदाबाद पोलिसांकडे मदत मागितली आहे.
ईडीचे सहाय्यक संचालक हृदयेश कुमार यांनी या प्रकरणात शेअर बाजारात 550 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यासाठी फसवणुकीसाठीच्या कलम 318, 319 अंतर्गत आणि खोटी किंवा बनावट कागदपत्र तयार केल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम 336, 335 आणि 340 अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्याची मागणी केली आहे.
ईडीच्या सहाय्यक संचालकांनी अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की 2024 मध्ये प्रदीप ओध याच्या नावानं बँक खातं उघडण्यात आलं होतं. प्रदीप अहमदाबादमधील एका कॅब कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होता.
या बँक खात्यात शेअर बाजारातील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करण्यात आले होते. तसंच अशाच इतर दोन बँक खात्यांमध्येही पैसे जमा करण्यात आले होते.
बँक खात्याचं भाडं 25 हजार रुपये
प्रदीप ओध यानं तपासादरम्यान पोलिसांना सांगितलं की त्याची ओळख किरण परमार नावाच्य व्यक्तीशी झाली. किरणनं त्याला सांगितलं की जर त्यानं व्यवसायातील कर वाचवण्यासाठी त्याचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड यासारखी कागदपत्रं जर दिली, तर तो (किरण) त्याच्या (प्रदीप) नावानं बँक खातं उघडेल आणि त्यात पैसे जमा करेल.
हे बँक खातं त्याच्या मित्रांकडून वापरण्यात येणार होतं. त्यासाठी ते दरमहा 25,000 रुपये द्यायचे. याशिवाय प्रदीप ज्या चेकवर सही करायचा, त्यासाठी त्याला प्रत्येक चेकमागे 400 रुपये मिळत होते.

फोटो स्रोत, Getty Images
प्रदीपला वाटत होतं की अशाप्रकारे पैसे कमावता येतील, म्हणून त्यानं बँक खाती भाड्यानं दिली होती. इतर दोन बँक खाती कमलेश कलाल आणि रोनक ओडे यांच्या नावानं उघडण्यात आली होती.
या बँक खात्यांमधून पैशांची जी फेरफार करण्यात आली किंवा गैरव्यवहार करण्यात आला, त्यातून या पेनी स्टॉक्सच्या किंमतीत मोठी वाढ झाली.
ईडीच्या तपासानुसार, 2024 मध्ये अहमदाबादमध्ये सुरू करण्यात आलेल्या 3 ट्रेडिंग फर्म्सच्या नावानं शेअर्सच्या किमतीबद्दल टिप्स देण्यात आल्या.
त्यासाठी टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडियाचा वापर करण्यात आला. त्यानंतर या शेअर्सच्या किंमतीमध्ये कृत्रिमरित्या वाढ करण्यात आली.
यासंदर्भात 2024 मध्ये नवी मुंबई सायबर क्राइम सेलमध्ये तक्रार करण्यात आली. तर 2025 मध्ये बंगळुरू पूर्व विभाग क्राइम ब्रँचमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. अखेरीस अहमदाबाद सायबर क्राइम आणि गांधीनगर सीआयडी क्राइममध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
शेअर्सच्या किमतीत भलीमोठी वाढ
या घोटाळ्यात ज्या कंपन्यांच्या शेअर्सची नावं आहेत, त्यापैकी मुरे ऑर्गनायझर लिमिटेडच्या शेअर्सच्या किंमतीत जबरदस्त वाढ होत ती एका वर्षात 67 पैसे प्रति शेअर वरून 10.90 रुपये प्रति शेअर वर पोहोचली.
त्यानंतर, या शेअर्सची विक्री करून मिळालेले पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले.
अशाच प्रकारे, प्रधीन लिमिटेड या कंपनीच्या शेअरची किंमत एका वर्षात 37 पैसे प्रति शेअरवरून 2.38 रुपये प्रति शेअरवर पोहोचली.
तर कॅक्राफ्टन डेव्हलपरच्या शेअरच्या किंमतीतदेखील वाढ होत ती एका वर्षात 122.45 रुपये प्रति शेअर वरून 1,702.90 रुपये प्रति शेअरवर पोहोचली.

फोटो स्रोत, Bhargav Parikh
याप्रकारे, कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कृत्रिमरित्या वाढ करून जवळपास 550 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. मात्र ज्या प्रदीप ओडेच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जात होते, त्याला याची माहिती नव्हती.
ईडीच्या तपासानुसार, किरण परमार हा या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे. त्याचा महादेव नावाचा साथीदार सर्व बँक खात्यांचे चेकबूक सांभाळत होता आणि भाड्यानं घेतलेल्या ऑफिसचं भाडं देत होता.
रवी नावाचा व्यक्ती, बँक खातं भाड्यानं देणाऱ्या व्यक्तीच्या नावानं सिम कार्ड्स बनवत होता, तर जुगल आणि जिवराज नावाची माणसं शेअर्सच्या किंमतीत वाढ करण्याच्या कामावर देखरेख करत होती.
असंही उघडकीस आलं आहे की आदित्य झुला या गांधीधाममधील एका व्यावसायिकाच्या लग्नासाठी या बँक खात्यांमधील पैसे वापरण्यात आले होते.
शेअर बाजारातील तज्ज्ञ काय म्हणतात?
यासंदर्भात बीबीसीनं अहमदाबाद स्टॉक एक्सचेंजचे माजी अध्यक्ष हेमंत सिंह झाला यांच्याशी संवाद साधला. हेमंत सिंह हे डब्बा ट्रेडिंग आणि पेनी स्टॉक्समधील घोटाळे थांबवण्यासाठी मोहीम चालवत आहेत.
हेमंत म्हणाले, "शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी बऱ्याच काळापासून घोटाळेबाज सोशल मीडियावरून टिप्स देत आहेत. ते कृत्रिमरित्या शेअर्सच्या किमती वाढवतात आणि त्यातून मिळालेले पैसे जमा करण्यासाठी बँक खाती भाड्यानं घेतात."

फोटो स्रोत, Getty Images
"जे लोक अशाप्रकारे बँख खाती भाड्यानं देतात, त्यांचं महिन्याचं उत्पन्न 10 हजार ते 15 हजार रुपये असतं. त्यामुळं अशा लोकांच्या बँक खात्यांचा वापर केला जातो आणि त्याबदल्यात त्यांना दरमहा 20 हजार ते 25 हजार रुपये दिले जातात."
हेमंत झाला पुढे म्हणाले, "सोशल मीडियावर जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअरची चर्चा होते आणि त्याची किंमत वाढते, तेव्हा हे लोक ते शेअर्स विकतात. तसंच भाड्यानं घेतलेल्या बँक खात्यात पैसे जमा होताच, ते लगेच काढले जातात."
"आपण जर सेबीला अशा लोकांबद्दल माहिती दिली, तर बँक खाती गोठवली जाऊ शकतात. मात्र तोपर्यंत असे लोक खात्यातून पैसे काढून निघून जातात.
तर अशा प्रकरणांचा तपास बँक खात्याचा मालकापर्यंत पोहोचतो. दरम्यान आरोपींनी दिलेल्या फोन नंबर्सचे सिम कार्डदेखील बनावट असतात."
पोलिसांनी काय सांगितलं?
अहमदाबाद क्राइम ब्रँचचे अधीक्षक (एसपी) अजित राजियन यांनी कृत्रिमरित्या शेअर बाजारात शेअर्सच्या किंमतीत वाढ करण्याच्या या कथित घोटाळ्याबद्दल बीबीसीला सांगितलं की, "ईडीकडून पत्र मिळाल्यानंतर, आम्ही या प्रकरणात आरोपींविरोधात फसवणूक करणं, इतर लोकांची कागदपत्रं वापरून गुन्हेगारी कट करणं यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
ईडीनं दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे आणि पुराव्यांच्या आधारे आम्ही आणखी पुरावे गोळा करत आहोत."

फोटो स्रोत, Getty Images
"तांत्रिक विश्लेषण आणि मानवी संसाधनांच्या आधारे, आम्ही लवकरच बंगळुरू, मुंबई आणि गांधीनगर सीआयडीबरोबर समन्वय साधत किरण परमार, रवी, जुगल, महादेव आणि जिवराज या 5 आरोपांना अटक करू."
ईडीचे सहाय्यक संचालक हृदयेश कुमार यांनी बीबीसीशी टेलिफोनवर बोलताना सांगितलं की, "या प्रकरणात तपास सुरू आहे. आम्ही गुजरात पोलिसांना गुन्हा नोंदवण्यात आणि कारवाई करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाच्या तपासात ईडीदेखील सहकार्य करेल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











