शनिवारी आखाती प्रदेशात कोणत्या घटना घडल्या ज्यामुळे जगाची चिंता वाढली?

    • Author, बीबीसी न्यूज मुंडो
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

इराणविरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर 1 महिन्यानं शनिवारी (28 मार्च) यात एक नवी आघाडी उघडली आहे.

शनिवारी (28 मार्च) येमेनमधून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर इराणनं फक्त इस्रायलवरच नाही, तर अमेरिकेच्या मित्र आखाती देशांवर देखील प्रत्युत्तरादाखल हल्ले केले आहेत.

तर इस्रायलनं लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहवरील हल्ले वाढवले आहेत.

येमेनमधून झालेल्या हल्ल्याची माहिती शनिवारी (28 मार्च) सकाळी इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं (आयडीएफ) त्यांच्या टेलीग्राम चॅनलवर दिली आहे. आयडीएफनं म्हटलं आहे की, त्यांची हवाई संरक्षण प्रणाली 'धोका रोखण्यासाठी सतत काम करते आहे.'

त्याच चॅनलद्वारे, 15 मिनिटांनी लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ती क्षेपणास्त्रं पाडण्यात आली होती. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

येमेनच्या काही भागावर नियंत्रण असलेल्या हुती बंडखोर या इस्लामी गटानं काही तासांनी पुष्टी केली की त्यांनी इराण, लेबनॉन, इराक आणि पॅलेस्टाईनच्या प्रदेशावरील इस्लायलनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 'इस्रायलच्या व्यूहरचनात्मक लष्करी तळां'वर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.

'जोपर्यंत प्रतिकार करणाऱ्या सर्व आघाड्यांवरील आक्रमण थांबत नाही', तोपर्यंत हे हल्ले सुरू राहतील, असा इशारादेखील त्यांनी दिला.

या हल्ल्यांद्वारे, हुती बंडखोर गटाचे प्रवक्ते याह्या सरी यांनी काही तास आधी दिलेल्या इशाऱ्याची पुष्टी होत असल्याचं दिसून येतं.

याह्या सरी म्हणाले होते, "आम्ही थेट लष्करी हस्तक्षेपासाठी तयार आहोत."

बीबीसीचे मध्य-पूर्व ब्युरोचे प्रमुख जो फ्लोटो यांनी म्हटलं, "हुती बंडखोर या युद्धात सहभागी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात युद्ध होण्याची शक्यता वाढली आहे. यामध्ये अरबी द्वीपकल्पावर एक नवीन युद्ध आघाडी सुरू होऊ शकते."

आर्थिक आघाडीवरील परिणाम

या भीतीमुळे, गेल्या जवळपास 1 महिन्यापासून शेअर मार्केटमध्ये सुरू असलेले चढ-उतार आणखी जास्त प्रमाणात वाढू शकतात.

यामागचं कारण काय आहे? या इस्लामी गटाचं 2014 पासूनच वायव्य येमेनवर नियंत्रण आहे. याच कारणामुळे, लाल समुद्रातून जाणाऱ्या जगातील या आणखी एका प्रमुख व्यापारी मार्गावर देखील या गटाचं नियंत्रण आहे.

इस्रायलवर 7 ऑक्टोबर 2023 ला झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या काळात हुती बंडखोरांनी हमासला पाठिंबा दिला होता. हुती बंडखोरांना इराणचादेखील पाठिंबा आहे.

पॅलेस्टिनी लोकांना पाठिंबा देत त्यांनी लाल समुद्रातून सुवेझ कालव्याकडे जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर हल्ल्यांची एक मालिकाच सुरू केली होती.

हुती गटानं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करत अनेक जहाजांना लक्ष्य केलं. यातील काही जहाजं बुडालीदेखील होती.

त्यामुळे शिपिंग म्हणजे मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना अधिक सुरक्षित, मात्र त्याचबरोबर जास्त लांबीच्या आणि महागड्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागला.

त्यांना दक्षिण आफ्रिकेतील 'केप ऑफ गुड होप'मार्गे प्रवास करावा लागला. याच कारणामुळे पुरवठा साखळी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठा अडथळा निर्माण झाला.

या हल्ल्यांमुळे अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांनी या गटाच्या तळांवर बॉम्बहल्ले करण्याची मोहीम सुरू केली. लाल समुद्रातील जलमार्ग पुन्हा खुला करण्यासाठी त्यांनी युद्धनौका पाठवल्या.

अमेरिकेनं 2025 मध्ये येमेनमधील या गटाच्या तळांवर पुन्हा हल्ला केला. जेणेकेरून जागतिक व्यापारावर परिणाम करणाऱ्या अशा आणखी घटना रोखता याव्यात.

मात्र तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, सद्यपरिस्थितीत लाल समुद्रात पुन्हा असे हल्ले झाल्यास, जागतिक आर्थिक स्थितीवर आणखी जास्त नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

कारण इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी जवळपास बंद केली आहे. तिथून जगातील जवळपास 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होते.

'चॅथम हाऊस' या ब्रिटनमधील प्रसिद्ध थिंक टँकचे संशोधक फारेआ अल मुस्लिमी यांनी बीबीसीला सांगितलं, "आपण आधीच एका वाईट परिस्थितीतून जात आहोत. यामुळे परिस्थिती आणखी वाईट होईल."

आखातातील 5 देशांवर हल्ले

हल्ले फक्त हुतींकडून केले जात नाहियेत. शनिवारी (28 मार्च) पर्शियन गल्फमधील 5 देशांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, इराणकडून त्यांच्या सीमेच्या दिशेनं डागण्यात आलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना हवेतच रोखण्यात आलं.

रियाधच्या दिशेनं मारा करण्यात आलेले 3 ड्रोन आणि क्षेपणास्त्रं पाडण्यात आली, असंही सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

यादरम्यान, कुवेतच्या सिव्हिल एव्हिएशन एजन्सीनं सांगितलं, "अनेक ड्रोननं अमिरातीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला. यामुळे रडार व्यवस्थेचं मोठं नुकसान झालं."

मात्र, केयूएनए या कुवेतमधील वृत्तसंस्थेनुसार, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यादरम्यान संयुक्त अरब अमिरातीची राजधानी असलेल्या अबु धाबीमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, इराणचं एक रॉकेट पाडण्यात आल्यानंतर, त्याचे अवशेष जमिनीवर पडल्यानं 5 जण जखमी झाले. हे पाचही लोक भारतीय नागरिक होते.

ओमानच्या सरकारी एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या दक्षिण भागातील एका बंदराजवळ 2 ड्रोन क्रॅश झाल्यामुळे एक परदेशी कर्मचारी जखमी झाला.

इराणनं त्यांच्या हल्ल्यांबाबत पुष्टी केली. तसंच त्यांनी दावा केला की, त्यांनी ओमानच्या दक्षिण भागातील सलालाह बंदरापासून 'बऱ्याच अंतरा'वर असलेल्या अमेरिकेच्या एका मदत करणाऱ्या जहाजाचं (सपोर्ट व्हेसस) नुकसान केलं आहे. ही माहिती तस्नीम या वृत्तसंस्थेनं दिली आहे. या वृत्तसंस्थेचा संबंध इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सशी आहे.

आतापर्यंत अमेरिकेनं या घटनेची पुष्टी केलेली नाही.

ट्रम्प यांनी काय दावा केला होता?

इराणच्या लष्करानं असाही दावा केला की त्यांनी शस्त्रास्त्रांचा एक साठा नष्ट केला आहे. हा साठा युक्रेननं कथितरित्या संयुक्त अरब अमिरातीला इराणच्या ड्रोन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी पाठवला होता. युक्रेन सरकारनं ही बाब नाकारली आहे.

यादरम्यान, इस्रायलच्या सैन्यानं पुष्टी केली आहे की, त्यांनी इराण आणि दक्षिण लेबनॉनमध्ये बॉम्बहल्ले सुरू ठेवले आहेत.

त्यांनी म्हटलं, "रात्रीच्या वेळेस, इस्रायलच्या आयडीएफनं दक्षिण लेबनॉनच्या अनेक भागांमधील असंख्य ठिकाणी हवाई आणि सागरी हल्ले केले."

"आयडीएफनं संपूर्ण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवादी तळांवर हल्ले सुरू ठेवले आहेत," असंही त्यांनी नमूद केलं.

तर शिया गटानं (हिजबुल्लाह) देखील इस्रायलच्या उत्तर भागात इस्रायलच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे.

इराणमधील सूत्रांनी पुष्टी केली की शनिवारी (28 मार्च) पहाटे तेहरानच्या विविध भागांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले.

या सर्व घडामोडींमुळे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या काही जवळच्या सहकाऱ्यांच्या वक्तव्यांबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यांनी गेल्या काही तासांमध्येच युद्ध संपुष्टात येत असल्याचं आश्वासन दिलं होतं.

तर ट्रम्प शुक्रवारी (27 मार्च) म्हणाले, "इराण उद्ध्वस्त होतो आहे. आम्ही सध्या त्यांच्याशी चर्चा करत आहोत. त्यांना वाटाघाटी करायच्या आहेत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)