You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
- वाचन वेळ: 7 मिनिटे
फ्रान्सिस बुकानन यांनी आपल्या 'अॅन अकाउंट ऑफ द डिस्ट्रिक्ट्स ऑफ बिहार अँड पाटणा' या पुस्तकात लिहिले होते की, सन 1812 मध्ये आरा शहरात एकूण 2,775 घरे होती आणि सरासरी एका घरात आठ लोक राहत होते.
"त्या हिशेबाने शहराची एकूण लोकसंख्या सुमारे 22 हजार च्या आसपास होती. तेव्हा शहरात दोन चांगले रस्ते असायचे. कलेक्टरचे हवेलीसारखे होते आणि डॉक्टरांचा एक बंगला होता. शहराच्या मध्यभागी एक जामा मशीद होती."
फ्रान्सिस बुकानन हे ब्रिटिश राजवटीत डॉक्टर म्हणून कार्यरत होते.
25 जुलै 1857 रोजी दानापूरमध्ये शिपायांनी बंड पुकारले होते. त्या दिवसापर्यंत आरा शहर शांत होते. रविवारची रात्र म्हणजेच 26 जुलैच्या रात्रीही शहरात कोणतीही हालचाल नव्हती, अगदी सोमवारच्या सकाळपर्यंत.
प्रसन्न कुमार चौधरी आपल्या '1857, बिहार में महायुद्ध' या पुस्तकात लिहितात, "अचानक बंडखोर शिपायांनी आरा शहराच्या पूर्व कोपऱ्यातून शहरात प्रवेश केला. सैनिकांसोबत शहराच्या कष्टकरी वर्गातील लोकही सामील झाले. शिपायांनी तुरुंगापर्यंत संचलन केले आणि तुरुंगाचे गेट उघडून दिले."
"पापणी लवते न लवते तोच पाचशे कैदी तुरुंगातून मुक्त झाले. त्यानंतर बंडखोरांनी खजिन्यातून सुमारे 85 हजार रुपये लुटले. 29 जुलै रोजी त्यांनी अहमद अली नावाच्या फौजदाराची हत्या केली. शहाबादच्या मॅजिस्ट्रेटपर्यंत ही खबर पोहोचली की, रेल्वे इंजिनिअर बाईलच्या घराला वेढा घालणारे शिपाई ओरडून सांगत होते की ते कुंवर सिंह यांच्या आज्ञेचे पालन करत आहेत."
"बंडखोर शिपायांनी आरा येथे पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवशी दवंडी पेटवली, की 'खल्के खुदा, मुल्क देनदारों का, हुकूम बाबू कुंवर सिंह का.' पुढे हेही सांगितले की 'प्रजेने आपले कामकाज सुरू ठेवावे. भांडण फक्त बादशहा म्हणजेच इंग्रजांशी आहे.'
27 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत म्हणजेच एक आठवडा आरा शहरावर बंडखोरांचा ताबा होता. यानंतर मेजर आयरच्या सैन्याने आरा शहरावर पुन्हा कब्जा मिळवला.
शहरातील सर्व रहिवाशांना आपली शस्त्रं जमा करण्याचे आदेश देण्यात आले आणि काही भारतीय सैनिकांना फाशी देण्यात आली. कुंवर सिंह यांची हवेली आणि मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले.
जे. बी. मेलसन आणि जे. डब्ल्यू. के यांसारख्या इतिहासकारांचे असे मत आहे की, स्वातंत्र्ययुद्धात कुंवर सिंह सहभागी होण्याचे कारण त्यांची ढासळलेली आर्थिक स्थिती होती, ज्यामध्ये ब्रिटिश सरकार मदत करत नव्हते. परंतु काही इतिहासकारांचे मानणे आहे की, यामागे भारतीय सैनिक आणि स्थानिक लोकांचा दबाव होता.
कुंवर सिंह यांचा जन्म सन 1782 मध्ये जगदीशपूर येथे झाला होता. आपले वडील साहबजादा सिंह यांच्या मृत्यूनंतर सन 1826 मध्ये कुंवर सिंह गादीवर बसले. ते मुळातच स्वतंत्र विचारांचे होते, इतके की आपल्या वडिलांशी, साहबजादा सिंह यांच्याशीही त्यांचे विचार जुळत नसत.
कुंवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
बिहारमध्ये डुमरांव संस्थानानंतर सर्वात मोठी जहागीरदारी कुंवर सिंह यांची होती, ज्यामध्ये पीरो, नोनौर, बिहिया, भोजपूर आणि सासाराम यांचा समावेश होता. कुंवर सिंह यांची मालमत्ता भरपूर मोठी होती.
प्रजेमध्ये लोकप्रिय
कुंवर सिंह यांची आर्थिक स्थिती बिकट होती, परंतु जनतेच्या हितासाठीच्या कामांना पैसे देण्यात त्यांनी कधीही हात आखडता घेतला नाही.
के.के. दत्त आपल्या 'बायोग्राफी ऑफ कुंवर सिंह अँड अमर सिंह' या पुस्तकात लिहितात, "कुंवर सिंह यांच्या पत्नींपैकी एक धरमन बीबी होत्या. धरमन बीबी यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्याही कुंवर सिंह यांच्यासोबत त्यांच्या मोहिमेत सामील होत्या. त्यांचा मृत्यूही या प्रदीर्घ प्रवासादरम्यान बांदा येथे झाला होता. धरमन बीबी यांच्या नावावर कुंवर सिंह यांनी आरा आणि जगदीशपूरमध्ये दोन मशिदी बांधल्या होत्या."
पाटण्याचे कमिश्नर राहिलेल्या विल्यम टेलरने आपल्या आत्मचरित्रात लिहिले होते, "कुंवर सिंह हे एका उच्च कुलीन, उदार आणि लोकप्रिय जमीनदार होते आणि त्यांची प्रजा त्यांच्यावर खूप प्रेम करत असे."
नऊ महिन्यांचा प्रदीर्घ प्रवास
कुंवर सिंह यांनी 13 ऑगस्ट 1857 ते 22 एप्रिल 1858 पर्यंत सुमारे 9 महिन्यांचा प्रदीर्घ प्रवास केला होता.
इंग्रजांविरुद्ध बिहारमध्ये जेव्हा जनविद्रोहाचे रणशिंग फुंकले गेले, तेव्हा 75 वर्षांच्या या वृद्धाने विलक्षण ऊर्जा दाखवली.
या काळात ब्रिटिश फौज कुंवर सिंह यांच्या मागे लागली होती, परंतु इंग्रज त्यांना अटक करण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. यादरम्यान कुंवर सिंह यांच्या बंडखोरांनी मिलमॅन, ली ग्रँड, लुगार्ड आणि ब्रिगेडियर डग्लस यांचा दारूण पराभव केला.
के. अँड मॅलेसन आपल्या 'हिस्ट्री ऑफ द इंडियन म्युटिनी' या पुस्तकात लिहितात, 'कुंवर सिंह युद्धकलेत पारंगत होते. जर ते रणनीतीकारही असते, तर अंतिम परिणती काही वेगळीच असती.'
रीवा येथे पोहोचले कुंवर सिंह
जगदीशपूरमध्ये सतत होत असलेल्या हल्ल्यांच्या दरम्यान कुंवर सिंह यांनी सासारामच्या दिशेने कूच केले. ते आधी सासारामपासून दहा मैल उत्तरेला असलेल्या नोखा येथे पोहोचले. 20 ऑगस्टला ते रोहतास येथे पोहोचले. पाटण्याच्या कमिश्नरने त्यांना रोखण्यासाठी 150 सैनिकांना रोहतास येथे पाठवले. कुँवर सिंह यांच्यासोबत तेव्हा एक हजार सैनिक, चार हत्ती, 14 उंट आणि अनेक घोडे होते, परंतु त्यांच्याकडे दारूगोळा नव्हता.
2 सप्टेंबर रोजी कुंवर सिंह रीवाच्या दिशेने निघाले. तेथील राजा रघुराज सिंह हे त्यांचे नातेवाईक होते, परंतु ते इंग्रजांचे समर्थक होते. जेव्हा कुंवर सिंह रीवापासून आठ मैल अंतरावर राहिले, तेव्हा रघुराज सिंह यांनी त्यांना पत्र लिहिले की त्यांनी राज्याच्या सीमेत प्रवेश करू नये. पण कुंवर सिंह यांनी त्यांचे ऐकले नाही. रघुराज महाल सोडून निघून गेले. 9 सप्टेंबरला नागपूरच्या डेप्युटी कमिश्नरने लिहिले, "रीवाचा राजा असहाय स्थितीत झाला आणि जेव्हा बंडखोर पोहोचले तेव्हा तो त्यांचा प्रतिकार करू शकला नाही."
कानपूरमार्गे लखनौला पोहोचले
30 सप्टेंबरला कुंवर सिंह बांदा येथे पोहोचले. 20 ऑक्टोबरला ते कालपीसाठी रवाना झाले. तिथे सुमारे एक महिना थांबून त्यांनी ग्वाल्हेरच्या बंडखोरांची वाट पाहिली. त्यानंतर त्यांना ऑक्टोबरच्या मध्यात कानपूरपासून 50 मैल लांब आणि नंतर 23 ऑक्टोबरला कानपूरपासून 36 मैल लांब जालौन-कालपी मार्गावर पाहिले गेले. कानपूरमध्ये बंडखोर सैन्याला पराभवाचा सामना करावा लागला.
कानपूरच्या पराभवानंतर कुंवर सिंह लखनौला गेले, जिथे ते मार्टिनियर कॉलेजच्या एका इमारतीत सुमारे दीड महिना राहिले. लखनौच्या बेगम हजरत महल यांनी कुँवर सिंह यांच्याकडे मौल्यवान भेटवस्तू पाठवल्या. यात दोन तोफा, अनेक हत्ती, पोशाख आणि दहा हजार रुपये रोख रक्कम होती.
तोफेच्या गोळ्याने झाले जखमी
त्यानंतर कुंवर सिंह यांचा ताफा फैजाबादमार्गे आझमगडकडे निघाला. 26 मार्च 1858 रोजी आझमगडवर बंडखोरांनी कर्नल मिलमॅनचा पराभव करून ताबा मिळवला. 22 एप्रिल 1858 रोजी कुँवर सिंह एक हजार पायदळ सैनिक आणि काही घोडेस्वारांसह परत जगदीशपूरला पोहोचले.
सी.ई. बकलँड आपल्या 'बंगाल अंडर लेफ्टनंट गव्हर्नर्स' या पुस्तकात लिहितात, "जनरल लुगार्ड आणि डंबरची इंग्रज पलटण त्यांचा पाठलाग करत येत होती. ज्या गावात मध्यरात्रीपर्यंत कुँवर सिंह यांचे सैन्य थांबलेले असे, त्याच गावात सकाळी डंबरचे सैन्य पोहोचायचे. पुढे गंगेचा किनारा होता जिथून कुंवर सिंह पलीकडे जाणार होते. इंग्रजांनी सर्व नौका बुडवून दिल्या होत्या आणि दवंडी पिटवली होती की, जर कोणी कुंवर सिंह यांना गंगा पार करण्यास मदत केली, तर तो इंग्रजी सरकारच्या कोपाचा धनी होईल."
बकलँड पुढे लिहितात, "सकाळ होताच जेव्हा डंबर गंगेच्या काठी पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की कुंवर सिंह आधीच गंगा पार करून गेले आहेत. त्याने नेम धरून कुंवर सिंह यांच्या हत्तीवर तोफेचा गोळा डागला, दोन व्यक्तींसह कुंवर सिंह देखील जखमी झाले. शरीरात विष पसरू नये म्हणून त्यांनी कमरेची तलवार काढली आणि आपला जखमी हात कापून गंगेला अर्पण केला. चार दिवसांनंतर 26 एप्रिल 1858 रोजी कुंवर सिंह यांचे डोळे कायमचे मिटले."
इंग्रजांनी कुंवर सिंह यांच्या लष्करी डावपेचांनी त्रस्त होऊन त्यांना पकडण्यासाठी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, परंतु कोणाचीही त्यांना पकडून देण्याची हिंमत झाली नाही. कारण एक तर ते स्वतः सावध असायचे आणि दुसरे म्हणजे कोणाचेही त्यांच्याशी शत्रुत्व नव्हते.
क्षेत्राबाहेर इंग्रजांना आव्हान
डॉक्टर सुभाष वर्मा आपल्या 'कुंवर सिंह और 1857 की क्रांती' या पुस्तकात लिहितात, "1857 च्या बंडखोर नेत्यांमध्ये कुंवर सिंह हे एकमेव असे व्यक्ती होते ज्यांनी इंग्रजांच्या हल्ल्याची वाट पाहिली नाही. जिथे कुठे त्यांना इंग्रजांची कमकुवत बाजू समजली, तिथे त्यांनी स्वत:हूनच हल्ला चढवला. इतकेच नाही तर कुंवर सिंह यांनी आपल्या संस्थानाच्या हद्दीबाहेरही इंग्रजांना आव्हान दिले, तर बाकी बंडखोर नेते आपल्या संस्थानापुरतेच मर्यादित राहिले."
कुंवर सिंह यांना विनायक दामोदर सावरकरांनी आपल्या 'द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, 1857' या पुस्तकात गनिमी काव्याचे सर्वोत्कृष्ट योद्धा मानले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गनिमी काव्याचे महत्त्व कुंवर सिंह यांनीच सिद्ध केले होते.
राम विलास शर्मा आपल्या 'भारत में अंग्रेजी राज और मार्क्सवाद' या पुस्तकात लिहितात, "शिवाजी महाराजांचे अनुकरण करणाऱ्या कुंवर सिंह यांनी आपल्या सैनिकांना कधीही निराश होऊ दिले नाही. त्यांनी त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह, संयम आणि आत्मविश्वास निर्माण केला. इंग्रजही म्हणायचे की ब्रिटिश सत्तेसाठी हा योगायोग होता की कुंवर सिंह 75 वर्षांचे होते. जर ते 40 वर्षांचे असते तर काय झाले असते."
सुरेश नीरव यांनी 'गगनांचल'च्या 1857 च्या 150 व्या वर्षाच्या विशेषांकात लिहिले आहे, "जगदीशपूरच्या 75 वर्षीय कुंवर सिंह यांनी केवळ बिहारच नव्हे तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशापर्यंत जाऊन पूर्ण एक वर्ष इंग्रज राजवटीला आपल्या तलवारीची धार दाखवली आणि हे सिद्ध केले की शौर्य आणि देशभक्ती वयावर अवलंबून नसते."
ज्या प्रकारे त्यांनी युद्धकला, व्यूहरचना, दूरदृष्टी आणि झुंजारवृत्तीचा परिचय दिला, त्याने त्यांना नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांच्यासारख्या थोर ऐतिहासिक व्यक्तींच्या पंक्तीत आणून बसवले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.