बहिणीच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी भाऊ बँकेत घेऊन आला तिचा सापळा, प्रकरण काय?

फोटो स्रोत, RAKHI GHOSE
- Author, राखी घोष
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Reporting from, क्योंझर
- वाचन वेळ: 3 मिनिटे
एका बँकेत 52 वर्षीय जितू मुंडा नावाची व्यक्ती बहिणीचा सापळा खांद्यावर घेऊन आले आणि बँक कर्मचाऱ्यासह तेथे उपस्थित नागरिक आश्चर्यचकित झाले.
ही घटना सोमवारी (27 एप्रिल) दुपारी ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यात पाटणा ब्लॉकच्या मल्लिपोशी गावात 'ओडिशा ग्रामीण बँके'च्या शाखेत घडली.
पाटणा ब्लॉकमधील दियानाली गावातील रहिवासी असलेल्या जितू मुंडा यांना त्यांच्या बहिणीच्या ग्रामीण बँक खात्यातून 19 हजार 300 रुपये काढायचे होते.
काही वर्षांपूर्वी त्यांची बहीण कलरा मुंडा (56 वर्षे) यांचे लग्न शेजारच्या जाजपूर जिल्ह्यातील सुक्रू मुंडा यांच्याशी झाले.
कलरा मुंडा आणि सुक्रू मुंडा यांना 1 मुलगा होता. मात्र, पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर कलरा मुंडा दियानाली येथील आपल्या माहेरी परत आल्या आणि उदरनिर्वाहासाठी रोजंदारीवर काम करू लागल्या.
काही महिन्यांपूर्वी कलरा यांनी आपल्या एका वासराची विक्री केली आणि त्यातून मिळालेले 19 हजार 300 रुपये आपल्या खात्यात जमा केले होते.
जितू मुंडा बहिणीचा सापळा घेऊन बँकेत का गेले?
कलरा मुंडा यांचं 2 महिन्यांपूर्वी निधन झालं. यानंतर त्यांचा भाऊ जितू पैसे काढण्यासाठी बँकेत गेले होते.
"माझ्या बहिणीचं 2 महिन्यांपूर्वी निधन झालं आहे हे बँक मॅनेजरला समजावून सांगण्यासाठी मी अनेक वेळा आलो. पण मॅनेजरनं ऐकण्यास नकार देत खातेदाराला आणा किंवा कायदेशीर वारसा हक्काची कागदपत्रं आणि मृत्यूचा पुरावा देण्याचा आग्रह धरला. त्यामुळं मी वैतागलो आणि पुरावा दाखवण्यासाठी सापळा घेऊन आलो," असं जितू यांनी सांगितलं.
जितू 3 किलोमीटर चालत गावात स्मशानभूमीत गेले. त्यानी बहिणीच्या मृतदेहाचे अवशेष (सापळा) बाहेर काढले, ते पोत्यात भरले आणि रखरखत्या उन्हात तसेच बँकेत आणले.

फोटो स्रोत, RAKHI GHOSE
बँकेच्या आवारातील कर्मचारी आणि ग्राहक हे पाहून थक्क झाले. बँकेनं तत्काळ पोलीस आणि बीडीओंना बोलावलं.
पोलीस आणि बीडीओ यांनी जितू यांना त्यांचं म्हणणं ऐकण्याचं आश्वासन दिलं आणि सापळा स्मशानभूमीत परत नेण्यास सांगितला. जितू पुन्हा तो घेऊन 3 किलोमीटर चालत स्मशानभूमीत गेले.
"जितू पैसे काढायला आले, तेव्हा मी त्यांना सांगितलं की, संबंधित व्यक्तीला इथं उपस्थित राहावं लागेल. सुरुवातीला ते म्हणाले त्यांची बहीण अर्धांगवायूनंग्रस्त आहे येऊ शकत नाही. मी म्हणालो बँकेचे कर्मचारी तुमच्या घरी जातील, तेव्हा ते म्हणाले त्यांचा मृत्यू झाला आहे," असं ओडिशा ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक सुशांत कुमार सेठी यांनी सांगितलं.
जितू गेल्या 2 महिन्यांत पैसे काढण्यासाठी कधीही बँकेत आले नव्हते. तसंच कलरा यांना आणखी 2 कायदेशीर वारस आहेत. तेही पैसे काढण्यासाठी बँकेत आले होते. त्यामुळं बँकेने जितू यांना कायदेशीर कागदपत्रं सादर करण्यास सांगितलं, असंही व्यवस्थापकांनी सांगितलं.
तपासानंतर 28 एप्रिलला खात्यातील 19 हजार 410 रुपये जितू आणि कलरा यांच्या इतर 2 कायदेशीर वारसांना (त्यांचे भाऊ आणि बहीण) सुपूर्द करण्यात आले.
"आम्ही त्यांना पैसे आपसांत वाटून घेण्यास सांगितलं," असंही पोलीस म्हणाले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ओडिशाचे महसूल मंत्री सुरेश पुजारी यांनी दाना मांझी प्रकरणानंतर ओडिशामधील ही दुसरी घटना असल्याचं सांगितलं.
जिल्हाधिकारी या प्रकरणाची चौकशी करत असून बँक व्यवस्थापकावर त्याच्या वर्तनाबद्दल कठोर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























