भारतामध्ये महिला क्रिकेटपटूंची संख्या 2020 नंतर दुप्पट; बीबीसीच्या अभ्यासातून माहिती समोर

भारतीय महिला संघाच्या विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करताना हरमनप्रीत कौर (डावीकडे) आणि स्मृती मानधना (फोटो : 2 नोव्हेंबर 2025)

फोटो स्रोत, Alex Davidson-ICC/ICC via Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीय महिला संघाच्या विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करताना हरमनप्रीत कौर (डावीकडे) आणि स्मृती मानधना (फोटो : 2 नोव्हेंबर 2025)
वाचन वेळ: 5 मिनिटे

2020 पासून भारतीय महिलांचा क्रिकेटमधील सहभाग दुप्पट झाला आहे.

आता देशातील प्रत्येक 10 महिलांपैकी 1 महिला क्रिकेट खेळते, असं 14 राज्यांमध्ये केलेल्या मोठ्या अभ्यासातून समोर आलं आहे.

बीबीसी आणि कलेक्टिव्ह न्यूज रूमने केलेल्या या अभ्यासात असं समोर आलं आहे की, गेल्या 6 महिन्यांत सुमारे निम्म्या लोकांनी (51 टक्के) महिला खेळांच्या बातम्या किंवा सामने पाहिले आहेत.

ही संख्या पुरुषांच्या खेळांचे कव्हरेज पाहणाऱ्या लोकांच्या (63 टक्के) प्रमाणापेक्षा फार कमी नाही.

महिलांचा खेळांमधील वाढता सहभाग आणि प्रेक्षकसंख्येतील बदलाला 15 ते 24 वयोगटातील तरुणी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत आहेत.

आता 4 पैकी 1 तरुणी (26 टक्के) क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करते. 2020 मध्ये हे प्रमाण फक्त 16 टक्के होते.

चार्ट

बीबीसी आणि कलेक्टिव्ह न्यूज रूमच्या अभ्यासासाठी 'कँटर' या जागतिक संशोधन संस्थेने भारतातील 14 राज्यांमधील 10 हजार 304 लोकांची मुलाखत घेतली. हा अभ्यास बीबीसीच्या 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' उपक्रमाचा भाग होता.

या अभ्यासातील माहितीची 2020 मध्ये झालेल्या अशाच एका अभ्यासाशी तुलना करण्यात आली. यामुळे भारतीय महिलांचा खेळात सहभाग किती वाढला आहे आणि समाजात महिला खेळाडूंविषयीची मानसिकता कशी बदलत आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावर्षीच्या अभ्यासाचे निष्कर्ष अशा वेळी समोर आले आहेत, जेव्हा भारतीय महिला खेळाडूंनी अलीकडच्या काळात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

मनू भाकरला 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2024' म्हणून निवडण्यात आले होते.
फोटो कॅप्शन, मनू भाकरला 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2024' म्हणून निवडण्यात आले होते.

2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरने 2 पदके जिंकून इतिहास घडवला, तसेच पॅरालिम्पिकमध्ये भारतीय महिला पॅरा खेळाडूंनी 10 पदके जिंकली.

याशिवाय 2025 मध्ये भारतात झालेला 50 षटकांचा महिला क्रिकेट विश्वचषक भारतीय महिला संघाने जिंकला. त्यामुळे गेल्या काही वर्षांत महिला क्रीडा क्षेत्र सतत चर्चेत राहिले आहे.

या यशामुळे महिलांच्या खेळांकडे लोकांचे लक्ष वेधले जात आहे. अभ्यासानुसार 43 टक्के लोकांनी महिला खेळांचे सामने लाइव्ह (थेट प्रक्षेपण) पाहिले, तर पुरुषांच्या खेळांचे सामने 54 टक्के लोकांनी पाहिले.

प्रत्यक्ष मैदानात जाऊन सामने पाहण्याबाबत हा फरक आणखी कमी दिसतो. 29 टक्के लोकांनी महिला खेळांचे सामने मैदानात जाऊन पाहिले, तर पुरुषांच्या सामन्यांसाठी हे प्रमाण 37 टक्के इतके आहे.

यशातून प्रेरणा; महिलांचा क्रिकेट आणि बॅडमिंटन कल वाढला

अभ्यासानुसार क्रिकेट हा आता पुरुष आणि महिलांमध्ये सर्वाधिक खेळला जाणारा खेळ झाला आहे. मागील अभ्यासानंतर क्रिकेटमध्ये पुरुष-महिलांच्या सहभागातील फरक (लैंगिक भेद) कमी झाला आहे.

कारण क्रिकेट खेळणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2020 मध्ये क्रिकेट खेळणाऱ्या पुरुषांची संख्या महिलांपेक्षा पाचपट जास्त होती. पण 2026 मध्ये हा फरक कमी होऊन पुरुषांची संख्या महिलांपेक्षा तीनपट जास्त राहिली आहे.

 चार्ट
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

क्रिकेटसोबतच बॅडमिंटनही महिलांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे. 2020 मध्ये सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 4 टक्के महिला बॅडमिंटन खेळत होत्या, तर आता हे प्रमाण 6 टक्के झाले आहे.

विशेषतः आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पंजाब या राज्यांतील महिलांमध्ये बॅडमिंटन खेळण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.

विशेष म्हणजे पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि तन्वी शर्मा यांसारख्या प्रसिद्ध भारतीय महिला शटलर्स या भागातूनच पुढे आल्या आहेत.

महिला खेळाडूंशी लोकांना आपलेपणा वाटू लागल्यामुळे खेळात त्यांचा सहभाग आणि सामने पाहणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसते.

अभ्यासात सहभागी झालेल्या 33 टक्के लोकांनी महिलांच्या खेळांचे सामने पाहण्याचे कारण म्हणजे एखाद्या महिला खेळाडूला पाठिंबा देणं, असं सांगितलं. 2020 मध्ये हे प्रमाण 21 टक्के होतं, आता त्यात वाढ झाली आहे.

पुरुषांच्या क्रीडा स्पर्धांबाबत मात्र फक्त 17 टक्के लोकांनी एखाद्या खेळाडूला पाठिंबा देण्यासाठी सामने पाहतो, असं सांगितलं.

या वर्षी अर्ध्या महिलांना (51 टक्के) 'तुमच्या सभोवतालच्या लोकांना सर्वाधिक आवडणारी भारतीय महिला खेळाडू कोण?' या प्रश्नाचे उत्तर देता आलं. 2020 च्या तुलनेत हे प्रमाण 7 टक्क्यांनी वाढलं आहे.

 चार्ट

अभ्यासानुसार, ज्या महिला खेळ खेळत नाहीत त्यापैकी 13 टक्क्यांनी सुरक्षेच्या चिंतेमुळे खेळ न खेळण्याचं कारण सांगितलं. याचा अर्थ सर्वेक्षण केलेल्या राज्यांतील सुमारे 3.27 कोटी महिलांवर याचा परिणाम होत आहे. ही समस्या त्या राज्यांमध्ये जास्त आहे, जिथे गेल्या दशकात लैंगिक हिंसाचाराच्या घटना वाढल्याचे महिला सांगतात.

महिला खेळाडू यशस्वी झाल्या तरीही, लोकांच्या मनात महिलांच्या खेळाबद्दल पूर्वग्रह आणि जुने चुकीचे विचार (रूढीवादी) अजूनही टिकून आहेत.

अभ्यासात दिसून आलं की, महिला खेळात सहभाग आणि प्रेक्षकसंख्या वाढली असली तरी, 2020 पासून महिला खेळाबद्दल काही 'नकारात्मक विचार' आणि 'चुकीचे पूर्वग्रह' (स्टिरियोटाइप) अधिक दृढ झाले आहेत.

अभ्यासात दिसून आलं की, सुमारे 43 टक्के लोकांना वाटतं की, महिला खेळ पुरुषांच्या खेळापेक्षा कमी रंजक आहेत (2020 मध्ये हे प्रमाण 38 टक्के होते). त्याचबरोबर, 43 टक्के लोकांना असंही वाटतं की महिला खेळाडू पुरेशा स्त्रीसुलभ (वर्तन किंवा गुणधर्मामध्ये स्त्रीच्या नैसर्गिक, नाजूक स्वभावाला अनुरूप नसणं) नाहीत (2020 मध्ये हे प्रमाण 37 टक्के होते).

विशेष म्हणजे, हे मत फक्त पुरुषांपुरतं मर्यादित नाही. अभ्यासात दिसून आलं की, सुमारे अर्ध्यांपेक्षा जास्त लोक (46 टक्के) यावर सहमत होते की, महिला खेळाडूंनी आकर्षक दिसायला हवं आणि महिला पुरुषांपेक्षा या मताशी जास्त सहमत होत्या.

चार्ट

पुरुष आणि महिलांमध्ये खेळ सोडण्यामागे वेळेची कमतरता हे मोठं कारण आहे.

क्रिकेटमध्ये सहभाग वाढला असला तरी, एकूणच सर्व खेळात खेळणाऱ्या भारतीयांची संख्या फारशी वाढलेली नाही. लोक वेळ नसल्यामुळे खेळ सोडत आहेत.

74 टक्के भारतीयांनी (2020 मध्ये हे प्रमाण 69 टक्के होतं.) सांगितलं की, ते लहानपणी खेळत होते, पण त्यापैकी फक्त निम्मे लोक प्रौढ झाल्यावरही खेळत आहेत.

अभ्यासात दिसून आलं की, सुमारे 64 टक्के लोकांनी वेळ नसल्याने खेळ सोडल्याचे कारण सांगितले. यातून काम आणि वैयक्तिक आयुष्य यामधील संतुलन नीट नसल्याचं दाखवतं.

अभ्यासात म्हटलं आहे की, महिलांसाठी काम आणि वैयक्तिक आयुष्य यामधील संतुलन सुधारल्यास जास्त फायदा होईल, कारण आजकाल त्यांना कामाबरोबर घरकाम आणि कुटुंबाची देखभाल करावी लागते.

अभ्यास कसा केला गेला?

हा अभ्यास कँटर इंडियाने केला आहे. त्यांनीच 2020 चा अभ्यासही केला होता. 14 राज्यांमधील 15 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 10 हजार 304 लोकांची मुलाखत घेऊन माहिती गोळा केली. या लोकांचे वय, लिंग, आर्थिक स्तर आणि शहर/गाव यानुसार 14 राज्यांचे योग्य प्रतिनिधित्व व्हावे, असा प्रयत्न केला गेला.

प्रश्नावली जवळपास 2020 च्या अभ्यासाप्रमाणेच ठेवली, फक्त काही नवीन प्रश्न जोडले. नमुना निवडण्याची (सॅम्पलिंग) पद्धतही तशीच ठेवली, जेणेकरून दोन्ही अभ्यासांची तुलना करता येईल.

या अभ्यासाबद्दल आणि अभ्यास पद्धतीबद्दल येथे क्लिक करा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)