व्हॅलेंटाईन डे : तुम्ही 'सोलमेट'ची वाट पाहताय का? खरंच कुणीतरी असं 'खास' असतं? विज्ञान काय सांगतं?

सोलमेट म्हणजे काय? तुमच्यासाठी एकदम योग्य व्यक्ती खरंच अस्तित्वात आहे का, विज्ञान काय सांगतं?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, पल्लब घोष
    • Role, विज्ञान प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 11 मिनिटे

'व्हॅलेंटाईन डे' आला की अनेकांच्या मनात अशी भावना येते की, कुठेतरी जगात आपल्यासाठी एक खास व्यक्ती नक्कीच आहे. ती व्यक्ती आपल्याला अगदी योग्य समजून घेणारी, जिच्यासोबत सगळं आपोआप जुळून येतं आणि जिच्यासोबतच आपलं नातं असावं, असं आपल्याला वाटतं.

इतिहासात माणसाला असं वाटत आलं आहे की, प्रेम हे योगायोगाने होत नाही. प्राचीन ग्रीसमध्ये प्लेटोने एक कल्पना मांडली होती, एकेकाळी माणसं पूर्ण होती म्हणजे त्यांना चार हात, चार पाय आणि दोन चेहरे होते. पण त्यांच्या तेजामुळे झ्यूस देवाने त्यांना दोन भागांत विभागलं.

तेव्हापासून प्रत्येक अर्धा भाग पृथ्वीवर फिरत आपला हरवलेला दुसरा भाग शोधत आहे, अशी ही कथा आहे. याच कल्पनेतून आजच्या 'सोलमेट' संकल्पनेला काव्यात्मक अर्थ मिळतो. कुठेतरी एक व्यक्ती आहे, जी आपल्याला पूर्णत्वाची जाणीव करून देईल, असा विश्वास.

मध्ययुगात कवी (ट्रोबाडॉर्स) आणि आर्थर राजाच्या कथांमध्ये या ओढीला 'कोर्टली लव्ह' (दरबारी प्रेम) असं रूप दिलं गेलं. हे प्रेम तीव्र असायचं, पण अनेकदा गुप्त किंवा निषिद्धही.

जसं लान्सलॉटचं ग्विनिव्हिअरसाठीचं प्रेम, ज्यात एखादा योद्धा आपल्या प्रेमाची उघड कबुली देऊ शकत नसला, तरीही त्यासाठी त्याग करून, स्वतःला झोकून देऊन आपली निष्ठा सिद्ध करत असत.

रेनेसान्स (प्रबोधनयुगात) काळात विल्यम शेक्सपियरसारख्या लेखकांनी 'स्टार-क्रॉस्ड लव्हर्स' अशी संकल्पना मांडली. याचा अर्थ असा, दोन लोक एकमेकांशी खूप घट्ट जोडलेले असतात, पण कुटुंब, परिस्थिती किंवा नशिबामुळे ते वेगळे होतात.

जणू विश्वानेच त्यांची प्रेमकथा लिहिलेली असते, पण त्यांना आनंदी शेवट (हॅपी एन्डिंग) मिळू देत नाही, अशी भावना यात दिसते.

अलीकडच्या काळात हॉलिवूड चित्रपट आणि रोमान्स (प्रणय) कादंबऱ्यांनी आपल्याला परीकथेसारख्या प्रेमकथा दाखवल्या.

परंतु, सोलमेटबद्दल आधुनिक विज्ञान नेमकं काय सांगतं? खरंच आपल्या प्रत्येकासाठी कुठेतरी एकच खास व्यक्ती ठरलेली असते का?

'आपण त्या खास व्यक्तीच्या प्रेमात कसं पडतो?'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

केम्ब्रिजमधील अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी (एआरयू) मध्ये सामाजिक मानसशास्त्राचे प्राध्यापक असलेले वीरेन स्वामी सांगतात की, आज युरोपमध्ये आपण ज्याला प्रेम म्हणतो, त्याची मुळं मध्ययुगीन युरोपमध्ये आहेत.

त्या काळातील कॅमेलॉट, लान्सलॉट, ग्विनिव्हिअर आणि राउंड टेबलचे शूर योद्धे यांच्या कथा संपूर्ण युरोपभर पसरल्या. याच कथांनी शौर्य, त्याग आणि आदर्श प्रेमाची कल्पना लोकांच्या मनात खोलवर रुजवली, असं ते सांगतात.

ते म्हणतात, "या कथांनी पहिल्यांदा अशी कल्पना दिली की, आयुष्यात एकाच व्यक्तीची निवड करावी आणि तीच व्यक्ती आयुष्यभराची सोबती असावी."

"याआधी युरोपमधील अनेक भागांत माणसं एकापेक्षा जास्त लोकांवर प्रेम करू शकत होती. प्रेम हे तरल होतं, आणि ते नेहमीच लैंगिक नात्याशी जोडलेलं असेल असंही नव्हतं."

ते सांगतात, हळूहळू औद्योगिकीकरणामुळे लोक आपल्या शेतीप्रधान गावांपासून आणि ओळखीच्या समाजापासून दूर गेले. त्यामुळे माणसं एकटी आणि दुरावली गेली.

अशा वेळी लोकांना असं वाटू लागलं की, एखादी एक खास व्यक्तीच आपल्याला वाचवू शकते, आयुष्यातील दु:खातून, एकटेपणातून बाहेर काढू शकते.

प्लेटोच्या (डावीकडे) मते, मानव एकेकाळी पूर्ण होता. त्यांना चार हात, चार पाय आणि दोन चेहरे होते. पण झ्यूसने (उजवीकडे) त्यांना दोन भागांत विभागलं. तेव्हापासून प्रत्येक अर्धा भाग आपला दुसरा हरवलेला भाग शोधत फिरतो, अशी ही कल्पना आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्लेटोच्या (डावीकडे) मते, मानव एकेकाळी पूर्ण होता. त्यांना चार हात, चार पाय आणि दोन चेहरे होते. पण झ्यूसने (उजवीकडे) त्यांना दोन भागांत विभागलं. तेव्हापासून प्रत्येक अर्धा भाग आपला दुसरा हरवलेला भाग शोधत फिरतो, अशी ही कल्पना आहे.

आजच्या डेटिंग अ‍ॅप्सनी ही प्रेमकथा थेट अल्गोरिदममध्ये बदलली आहे. वीरेन स्वामी याला 'रिलेशन-शॉपिंग' असं म्हणतात. सोलमेट शोधण्याची ही प्रक्रिया अनेकदा उलटी ठरते. म्हणूनच अनेकांसाठी हा अनुभव भावनाशून्य आणि रिकामा वाटतो, असं ते सांगतात.

ते म्हणतात, "डेटिंग अ‍ॅपवर आपण जोडीदार शोधत नाही, तर जणू खरेदीच करत असतो. एकामागोमाग अनेक प्रोफाइल पाहत राहतो, आणि शेवटी एक क्षण असा येतो की वाटतं, आता थांबायला हवं."

'एकच खास व्यक्ती'

अमेरिकेतील उटाह राज्यातील प्रोव्हो येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीमधील विवाह आणि कुटुंब अभ्यासाचे प्राध्यापक असलेले जेसन कॅरोल लोकांना 'तो किंवा ती एकच खास व्यक्ती' (द वन) शोधण्याची जी ओढ वाटते, ती भावना समजून घेतात आणि तिच्याबद्दल सहानुभूती बाळगतात.

ते म्हणतात, "माणूस नात्यांवर जगणारा म्हणजेच आसक्ती आधारित प्राणी आहे. आपल्याला कोणाशी तरी घट्ट जोडलेपण हवं असतं." पण आपल्या व्याख्यानांमध्ये ते विद्यार्थ्यांना सांगतात की, "सोलमेटची ठरलेली कल्पना सोडून द्यावी, मात्र 'तो किंवा ती एकच खास व्यक्ती' मिळावी, ही इच्छा सोडू नये."

वीरेन स्वामी यांचा असा विश्वास आहे की, आज आपण जसं रोमँटिक प्रेम समजतो, त्याची मुळं मध्ययुगीन युरोपातील लान्सलॉट आणि ग्विनिव्हिअरसारख्या कथांमध्ये सापडतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वीरेन स्वामी यांचा असा विश्वास आहे की, आज आपण जसं रोमँटिक प्रेम समजतो, त्याची मुळं मध्ययुगीन युरोपातील लान्सलॉट आणि ग्विनिव्हिअरसारख्या कथांमध्ये सापडतात.

हे ऐकायला विरोधाभासासारखं वाटतं, पण जेसन कॅरोल यांच्यासाठी हा फरक म्हणजे, नशिबावर सोडून देणं (डेस्टिनी) आणि नात्यासाठी मेहनत करणं (ग्राफ्ट).

ते म्हणतात, "सोलमेट म्हणजे जणू आधीच तयार असलेली व्यक्ती. ती फक्त सापडायची असते. पण 'तो किंवा ती एकच खास' ही गोष्ट दोन माणसं एकत्र येऊन घडवतात."

"वर्षानुवर्षे एकमेकांशी जुळवून घेत, चुका मान्य करत, माफी मागत आणि कधी कधी दात ओठात धरूनही नातं पुढे नेतात."

'सोलमेट ट्रॅप'

जेसन कॅरोल यांचा हा युक्तिवाद अनेक दशकांच्या संशोधनावर आधारित आहे. हे सगळं त्यांनी 'द सोलमेट ट्रॅप' या अहवालात मांडलं आहे. या संशोधनात मानसशास्त्रात सांगितल्या जाणाऱ्या दोन वेगळ्या कल्पनांमधला फरक स्पष्ट केला आहे.

पहिली म्हणजे 'डेस्टिनी बिलीफ' ज्यानुसार योग्य नातं आपोआप, कोणतीही मेहनत न करता सहज जुळून यायला हवं.

दुसरी म्हणजे 'ग्रोथ बिलीफ' ज्यात नातं टिकवण्यासाठी आणि चालवण्यासाठी दोन्ही जोडीदारांनी काय प्रयत्न करायला हवेत, यावर भर दिला जातो.

1990 च्या दशकाच्या शेवटी आणि 2000च्या सुरुवातीला सी रेमंड नी यांच्या नेतृत्वाखाली, अमेरिकेतील ह्यूस्टन विद्यापीठ येथे काही महत्त्वाचे अभ्यास झाले.

या अभ्यासांत असं आढळून आलं की, ज्या लोकांना नातं 'आपोआप ठरलेलं असतं' असं वाटतं, ते भांडण किंवा मतभेद झाल्यावर आपल्या नात्याबद्दल जास्त शंका घेऊ लागतात.

तर जे लोक नात्याकडे एकत्र वाढण्याच्या प्रक्रियेप्रमाणे पाहतात, ते भांडण झालेल्या दिवशीसुद्धा नात्याशी जास्त ठामपणे जोडलेले राहतात.

जेसन कॅरोल म्हणतात की, वाढीवर आधारित विचार असणाऱ्या लोकांनाही नात्यात काहीतरी खास हवं असतं, पण त्यांना हेही माहीत असतं की नात्यात चढउतार येणारच. म्हणून ते असा विचार करतात. आपलं नातं अधिक चांगलं कसं करता येईल? त्यात सुधारणा आणि वाढ कशी साधता येईल?

त्यांच्या मते, सोलमेटची कल्पना हा एक सापळा किंवा ट्रॅप आहे. प्रेम चुकीचं म्हणून नाही, तर प्रेम कधीच कठीण नसावं अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे.

संशोधन असं सांगतं की, नात्यांकडे वाढीच्या दृष्टीने पाहणाऱ्या लोकांनाही नात्यात काहीतरी खास हवं असतं, पण त्या प्रवासात अडचणी आणि चढउतार येणार, या आव्हानांची त्यांना जाणीव असते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संशोधन असं सांगतं की, नात्यांकडे वाढीच्या दृष्टीने पाहणाऱ्या लोकांनाही नात्यात काहीतरी खास हवं असतं, पण त्या प्रवासात अडचणी आणि चढउतार येणार, या आव्हानांची त्यांना जाणीव असते.

ते सांगतात की, दीर्घ नात्यातील खरी 'खोल भावना' चित्रपटात दाखवतात तशी अचानक येणारी रोमँटिक झिंग नसते. तर "एकमेकांच्या चांगल्या गुणांसोबतच त्यांच्या अडचणी, कमतरता आणि कमजोरी जवळून पाहणं, आणि तरीही एकत्र राहणं- हेच खरं, अर्थपूर्ण नातं आहे."

ते म्हणतात, "ती खूप पवित्र आणि खास जागा असते. आपण हे सगळं पाहू शकतो, कारण समोरच्या व्यक्तीने आपल्याला तिथे राहू दिलेलं असतं."

जेसन कॅरोल असं म्हणतात की, जर प्रेम सगळं नशिबावरच अवलंबून आहे असं मानलं, तर नातं टिकवण्यासाठी लागणारे रोजचे छोटे प्रयत्न लोक करत नाहीत. त्यामुळेच, नात्यात पहिली मोठी अडचण आली की सोलमेटची कल्पना ते नातं सांभाळणं अधिक अवघड करून टाकते.

ते म्हणतात, "नात्यात पहिल्यांदा अडचण आली की लगेच असा विचार येतो, 'तू माझा किंवा माझी सोलमेट आहेस असं मला वाटलं होतं. पण कदाचित तू नाहीस, कारण सोलमेटला अशा अडचणी यायला नकोत.' पण नातं दीर्घकाळ टिकायचं असेल, तर तो प्रवास कधीच सरळ आणि सोपा नसतो- त्यात चढउतार येणारच."

'स्पार्क किंवा आघात?'

लंडनमध्ये कार्यरत असलेल्या लव्ह कोच (प्रेम-सल्लागार) विकी पॅविट अनेकदा अशा लोकांना मदत करतात, ज्यांना वाटत असतं की त्यांनी आपला सोलमेट शोधला आहे.

पण नंतर लक्षात येतं की ती परीकथेसारखी प्रेमकहाणी प्रत्यक्षात भावनिक खेळी, बेभरवशाचं वागणं आणि सततची अस्वस्थता व चिंता घेऊन आलेली असते.

त्या म्हणतात, "जेव्हा खूप केमिस्ट्री आणि अचानक आकर्षण जाणवतं, ते कधी कधी जुन्या, अपायकारक सवयी किंवा जुन्या जखमा पुन्हा उद्भवण्याशी संबंधित असू शकतं."

त्या म्हणतात, "एखादी व्यक्ती कधी खूप जवळची तर कधी दूर केल्यासारखं वागली, तर आपल्याला सतत त्यांची आठवण येते. पण हे प्रेम नसून, त्या वागणुकीमुळे मनात निर्माण झालेली अस्वस्थता असते."

लव्ह कोच विकी पॅविट अनेकदा अशा लोकांसोबत काम करतात, ज्यांना वाटतं की त्यांनी आपला सोलमेट शोधला आहे, पण प्रत्यक्षात त्या नात्यामुळे त्यांना अस्वस्थता आणि चिंता जाणवू लागते.

फोटो स्रोत, Vicki Pavitt

फोटो कॅप्शन, लव्ह कोच विकी पॅविट अनेकदा अशा लोकांसोबत काम करतात, ज्यांना वाटतं की त्यांनी आपला सोलमेट शोधला आहे, पण प्रत्यक्षात त्या नात्यामुळे त्यांना अस्वस्थता आणि चिंता जाणवू लागते.

विकी पॅविट सांगतात की, आपल्याला जे नशिबाचं आकर्षण वाटतं, ते कधी कधी आपल्या मज्जासंस्थेची प्रतिक्रिया असू शकते. मनाला ओळखीची अशी एखादी जुनी वेदना जाणवते आणि ती पुन्हा दुरुस्त करण्याचा प्रयत्न चालू असतो. उपचारतज्ज्ञ यालाच 'ट्रॉमा बाँड' असं म्हणतात.

त्या म्हणतात की, हे बंध प्रेमासारखं वाटू शकतं. पण लोक अशा नात्याकडे ओढले जातात, कारण ते ओळखीचं वाटतं. ते खरंच योग्य आहे म्हणून नव्हे, तर आधीपासून सवयीचं आणि ओळखीचं आहे म्हणून.

या विषयावर नेहमी उल्लेख केला जाणारा एक अभ्यास कॅनडातील मानसशास्त्रज्ञ डोनाल्ड डटन आणि सुसान पेंटर यांनी केला होता. 1993 मध्ये, ते ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात असताना प्रकाशित झालेल्या या संशोधनात, हिंसक नात्यांतून बाहेर पडलेल्या 75 महिलांचा त्यांनी अभ्यास केला होता.

संशोधकांच्या टीमने हे पाहिलं की, त्या महिलांना आपल्या माजी जोडीदारांची (एक्स) अजूनही किती ओढ लागलेली होती, आणि ही भावना त्यांच्या जुन्या नात्यातील अनुभवांशी कशी जोडलेली होती, याची तुलना केली.

संशोधनातून हे समोर आलं की, ज्या महिलांवर नेहमीच अत्याचार होत होते, त्यांचं नातं सर्वात घट्ट नव्हतं.

तर ज्या जोडीदारांचा स्वभाव कधी गोड तर कधी वाईट असा बदलत असे, त्यांच्याशी महिलांचे बंध जास्त मजबूत होते.

विकी पॅविट सांगतात की, आपल्याला जे नशिबासारखं वाटतं, ते कधी कधी ट्रॉमा बाँड असू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विकी पॅविट सांगतात की, आपल्याला जे नशिबासारखं वाटतं, ते कधी कधी ट्रॉमा बाँड असू शकतं.

डोनाल्ड डट्टन आणि सुसान पेंटर यांचा असा युक्तिवाद आहे की, हा ट्रॉमा बाँड सांगतो की लोक वाईट नात्यांकडे का परत जातात. कारण अशा नात्यांमध्ये धोका आणि प्रेम दोन्ही असलेलं ओळखीचं वातावरण असतं, पण ते खरंच चांगलं किंवा सुरक्षित नातं नाही.

विकी पॅविट कोचिंगमध्ये लोकांना असं शिकवतात की, "तुम्हाला जे आकर्षण जाणवतंय, ते खरंच या व्यक्तीसोबत तुमचं नातं जुळतंय असं दाखवत आहे का, किंवा ते फक्त ओळखीच्या अस्वस्थतेमुळे वाटत आहे?"

त्या म्हणतात, "मी कधीच सोलमेट्सबद्दल बोलत नाही. मी स्वतः असा विश्वास ठेवत नाही की प्रत्येकासाठी एकच व्यक्ती आहे. पण मला असं नक्की वाटतं की आपण कुणासाठी तरी 'तो किंवा ती एकच खास' बनतो."

'आकर्षणाचा खरा अनुभव'

जर तुम्हाला वाटतं की सोलमेट नाही असं म्हणणं रोमँटिक नाही, तर शरीर आणि मेंदूही तसंच सांगतं.

संशोधनानुसार, हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या जोडीदारांबद्दलच्या भावना थोड्याशा बदलू शकतात. या गोळ्या स्त्रीच्या नैसर्गिक प्रजनन चक्रातील बदल कमी करतात, ज्यामुळे मनुष्यांमध्ये ओढ आणि आकर्षणातील नैसर्गिक बदल कमी होते, आणि कधी कधी सुरुवातीच्या जोडीदार निवडीवरही प्रभाव पडू शकतो.

काही संशोधनानुसार, हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या जोडीदारांबद्दलच्या आकर्षणावर थोडासा परिणाम करू शकतात.

फोटो स्रोत, PA Wire

फोटो कॅप्शन, काही संशोधनानुसार, हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या जोडीदारांबद्दलच्या आकर्षणावर थोडासा परिणाम करू शकतात.

एका मोठ्या अभ्यासात 365 विषमलिंगी जोडप्यांचा अभ्यास केला गेला. त्यात असं आढळलं की, महिलांना जास्त आनंद मिळाला जेव्हा त्यांची सध्याची गर्भनिरोधक पद्धत तीच होती जी त्यांनी जोडीदार निवडताना वापरली होती.

म्हणजे, गोळ्या बदलल्यास जोडीदाराविषयी भावना आणि आकर्षण बदलू शकतात. हे बदल फार मोठे नसतात, पण कधी कधी जोडप्यांमध्ये आकर्षण बदलण्याचे कारण यामुळे समजू शकते.

जर हार्मोन्स आणि गोळ्या ठरवू शकतात की, कोणाला 'तो किंवा ती एकच खास' वाटेल, तर प्रत्येकासाठी एकच आधी ठरलेला जोडीदार असतो असं म्हणणं अवघड होतं. याच ठिकाणी गणितज्ञांचा अभ्यास मदत करतो.

'तो किंवा ती एकच पण एकमेव नाही'

मानसशास्त्र आणि जीवशास्त्र आपल्याला 'तो किंवा ती एकच खास' याचा एक दृष्टिकोन देतात, तर गणित त्याबद्दल दुसरी कल्पना सुचवते.

डॉ. ग्रेग लिओ हे नॅशव्हिल टेनेसी येथील वेंडरबिल्ट विद्यापीठात अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एक जुळणीचा म्हणजेच अनुकूलतेचा अल्गोरिदम तयार केला आहे. हा अल्गोरिदम सांगतो की, आपल्याला फक्त एकच 'तो किंवा ती एकच खास' न सापडता, खूप सारे 'एकच खास' व्यक्ती' सापडू शकतात.

डॉ. लिओ यांनी पब्लिक इकॉनॉमिक थिअरी या जर्नलमध्ये लिहिलेल्या मॅचिंग सोलमेट्स पेपरमध्ये असं म्हटलं आहे की, सर्व लोकांना संगणकात तयार केलेल्या डेटिंग पूलमध्ये ठेवलं जातं, जिथे हजारो डिजिटल व्यक्ती एकमेकांना रँक करतात.

त्यांचा अल्गोरिदम 'पहिल्या क्रमाचे सोलमेट्स' शोधतो- जोडी ज्या एकमेकांना स्थिरपणे निवडतात. तिथे जोडप्यांना काढून टाकलं जातं आणि उरलेल्या लोकांसह ही प्रक्रिया पुन्हा चालते. अशाप्रकारे, तुम्हाला दुसऱ्या क्रमाचे सोलमेट्स, तिसऱ्या क्रमाचे सोलमेट्स आणि असे पुढे मिळत जातात.

त्यांच्या संगणक सिम्युलेशन्समध्ये, खूप कमी लोकांना त्यांचा पहिला पसंतीचा जोडीदार मिळाला. पण बर्‍याच लोकांना दुसरा किंवा तिसरा पसंतीचा जोडीदार मिळाला.

या पद्धतीत एखादी जोडी आनंदी मानली जाते. जर दोघेही एकमेकांच्या पसंतीच्या यादीत वरच्या जागी असतील, आणि कोणीही असे दुसरे व्यक्ती शोधू शकत नाही जे दोघांनाही एकत्रित जास्त आवडेल.

हे फक्त संख्या आणि आकडेवारीवर आधारित असलं तरी, हा प्रेमाचा अल्गोरिदम आपल्याला सांगतो की, फक्त एकच 'तो किंवा ती एकच खास' नाही, तर खूप सारे योग्य जोडीदार शक्य आहेत.

'छोट्या गोष्टींवर लक्ष द्या'

तर जोडीदार कसे एकमेकांसाठी 'तो किंवा ती एकच खास' बनवू शकतात?

जॅकी गॅब या द ओपन युनिव्हर्सिटीमध्ये समाजशास्त्र आणि नातेसंबंध अभ्यासाच्या प्राध्यापिका आहेत, त्यांनी एंड्युरिंग लव्ह प्रोजेक्टचं मूल्यांकन केलं आहे. हे 2015 मध्ये सोशोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालं होतं.

या अभ्यासात सुमारे 5 हजार लोकांचे सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर 50 जोडप्यांचा सखोल अभ्यास केला गेला. यात सांख्यिकी, दैनंदिन डायरी, इंटरव्ह्यू आणि घरात घडलेल्या घटनांचे 'भावनिक नकाशे' (इमोशन मॅप्स) यांचा उपयोग करून तपशीलवार माहिती गोळा केली गेली.

जेव्हा त्यांनी लोकांना कुठल्या गोष्टी खास आणि कौतुकास्पद वाटतात, असं विचारलं. तर त्यांना सूर्यास्ताच्या वेळी प्रपोजल किंवा पॅरिसची अचानक दिलेली महागडी सहल महत्त्वाची वाटली नाही.

ते लोक म्हणाले की, त्यांना खरं प्रेम जाणवायला साध्या आणि छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. अचानक भेटवस्तू देणं, एखादी छोटीशी प्रेमळ कृती, बेडवर चहाचं कप आणून देऊन प्रेम व्यक्त करणं, थंड सकाळी कार गरम करणं, रानफुलं तोडून फुलदाणीत ठेवणं.

सांख्यिकीदृष्ट्या, त्यांनी सांगितलेली या 'दररोजच्या लक्ष वेधून घेणाऱ्या छोट्याशा कृती' मोठ्या रोमँटिक हावभावापेक्षा (गेश्चर) खूपच प्रभावी ठरल्या.

त्यांच्या सर्वेक्षणात असं आढळून आलं की, 22 टक्के माता आणि 20 टक्के अपत्य नसलेल्या महिलांनी मोठ्या पार्टी किंवा महागड्या भेटवस्तूंपेक्षा छोटीशी प्रेमळ कृती आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची असल्याचे मानले.

डेटामध्ये नात्यातील आनंद मुख्यतः पैशांवर किंवा रोमान्सवर नव्हता; तर तो 'जोडप्यांमधील एकमेकांची चांगली समज' आणि ती दररोजच्या आयुष्यात दाखवण्यावर किंवा अभिव्यक्त करण्यावर आधारित होता.

जॅकी गॅब या द ओपन युनिव्हर्सिटीमध्ये समाजशास्त्र आणि नातेसंबंध अभ्यासाच्या प्राध्यापिका आहेत, त्यांनी एंड्युरिंग लव्ह प्रोजेक्टचं मूल्यांकन केलं आहे. हे 2015 मध्ये सोशोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जॅकी गॅब या द ओपन युनिव्हर्सिटीमध्ये समाजशास्त्र आणि नातेसंबंध अभ्यासाच्या प्राध्यापिका आहेत, त्यांनी एंड्युरिंग लव्ह प्रोजेक्टचं मूल्यांकन केलं आहे. हे 2015 मध्ये सोशोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालं होतं.

या प्रोजेक्टमधील एका तरुण जोडप्याच्या डायरीत, सुमैरा लिहिते की, तिचा जोडीदार घरी येतो, ती त्याच्यासाठी जेवण बनवते, तो हॉलमध्ये तिला मिठी मारतो, दोघे एकत्र टेबलवर जेवतात. हे साधे आणि छोटे क्षणही त्यांच्या नात्यासाठी खास आहेत.

ती आपल्या डायरीत लिहिते, "हे अगदी परिपूर्ण आहे. फक्त आम्ही आणि जेवण. आणखी काय हवं आहे?"

मग लिव्हिंग रूममध्ये अचानक डान्स, ज्या अंधाराची तिला भिती वाटत असते तिथे जाऊन लांब गवतावर वॉकिंग करणं, तिच्या जोडीदाराला आवडणारा एक फोटो जो तिने आपल्या फोनच्या बॅकग्राऊंडला ठेवला आहे. हे साधे आणि छोटे क्षण त्यांच्या नात्याला आणखी खास बनवतात.

हे वाचताना असं वाटतं की, ही दररोजची गोड गोष्ट आहे, परीकथा नाही: काचेच्या चपला नाहीत, पण रबरी बूट्स आहेत.

तरीही जॅकी गॅब सांगतात की, या गोड क्षणांमध्येही पैशांची चिंता, कुटुंबाची जबाबदारी, उदासीनता आहे. पण या सर्व गोष्टी दोघेही एकत्र समजून घेऊन हाताळत आहेत.

त्या म्हणतात, "इथे सोलमेटची भावना अचानक येत नाही; ती हळूहळू तयार होते, जसं जोडपं एकत्र येऊन जीवनातील अडचणींना सामोरे जातं."

'व्हॅलेंटाईन्स डिनरचा आनंद'

कॅरोल यांच्या मते, विज्ञान रोमान्स चोरत नाही; तर ते चांगल्या आणि वाईट या दोन्ही काळात त्याला फुलवण्यासाठी मदत करतं.

ते म्हणतात, "मला खास नातं हवं असण्याची इच्छा ठीक आहे, पण हे लक्षात ठेवा की ते नातं आपल्यालाच तयार करावं लागेल."

पॅविट यांच्या मते, "ठीक आहे असं मानणं की तुमचा जोडीदार कुठेतरी आहे, पण लक्षात ठेवा की अनेक लोक आहेत ज्यांच्याशी तुम्ही चांगलं नातं बनवू शकता, आणि महत्त्वाचं म्हणजे कुणालाही परिपूर्ण समजण्याची अपेक्षा ठेवू नका."

सोलमेट्सबद्दल विज्ञान सांगतं की, हा एक विरोधाभास आहे. जे लोक खरंच 'आपल्यासाठीच ठरलेलं' नातं अनुभवतात, ते लोक नशिबाची वाट पाहणं सोडतात, समोरच्या अपूर्ण जोडीदाराकडे लक्ष देऊन म्हणतात: 'चला, आपण हे नातं एकत्र घडवूया.'

(फ्लॉरेन्स फ्रीमन यांच अतिरिक्त वार्तांकन)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)