You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कमावत नसलेल्या जोडीदाराच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करून इन्कम टॅक्स वाचवता येतो?
आपण सगळेच इन्कम टॅक्स कसा वाचवता येईल याचे मार्ग शोधत असतो. त्यासाठी कर सल्लागारांची मदतही घेतो. कोणत्या गुंतवणुकी केल्याने इन्कम टॅक्स वाचू शकतो, त्यासाठीच्या योजना याची माहिती घेतो.
इन्कम टॅक्सबद्दल आपल्याला अनेक प्रश्न पडतात. त्यापैकी एक प्रश्न जो बहुतेक वेळा विचारला जातो, तो म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या नॉन-अर्निंग (कमावत नसलेल्या) पार्टनर म्हणजे पती किंवा पत्नी यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करून कर वाचवू शकते का?
कोणत्या पद्धतीने पैसे ट्रान्सफर केले असता इन्कम टॅक्स वाचू शकतो? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा मार्ग नियमांच्या चौकटीत बसतो का?
चार्टर्ड अकांउंटन्ट दीपा बन्सल यांच्याकडून याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसीने केला.
अर्निंग पार्टनर आपल्या नॉन अर्निंग पार्टनरच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून इन्कम टॅक्स वाचवू शकतो का, या प्रश्नाचं उत्तर देताना दीपा यांनी म्हटलं की, टॅक्स वाचवण्याच्या दृष्टीने तुम्ही जर तुमच्या पती किंवा पत्नीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करत असाल तर त्याचा फारसा उपयोग होत नाही.
याचं कारण देताना त्या सांगतात की, हेतूपूर्वक ही रक्कम ट्रान्सफर केली जाते. जर भेट किंवा कर्ज म्हणून एखाद्याच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर केली तरच ती टॅक्स फ्री असते, पण त्याव्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्या पती किंवा पत्नीच्या खात्यात उत्पन्नाचा काही भाग जमा करत असाल तर ते जो पैसे ट्रान्सफर करत आहे, त्या व्यक्तीचंच उत्पन्न मानलं जाईल. त्यामुळे त्याचा टॅक्स वाचवण्याच्या दृष्टीने काहीच फायदा होणार नाही.
समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीला त्याची कमाईतली काही रक्कम ट्रान्सफर केली. तिने ती एफडी किंवा इतर कुठे गुंतवली तर येणारं जे व्याज असेल ते त्या व्यक्तीच्या उत्पन्नात ग्राह्य धरलं जाईल आणि त्यावर त्याला टॅक्स भरावा लागेल.
भेट म्हणून दिलेल्या रकमेवर टॅक्स लागतो?
समजा पती किंवा पत्नीपैकी जो कमावता असेल, त्याने आपल्या जोडीदाराला भेट म्हणून काही रक्कम दिली किंवा घरखर्चासाठी आपल्या उत्पन्नातली काही रक्कम दिली तर त्यावर टॅक्स लागू शकतो का?
दीपा बन्सल यांनी सांगितलं की, जर तुम्ही ही रक्कम भेट म्हणून दाखवली आणि ही रक्कम कुठे दुसरीकडे गुंतवली आणि त्यातून तुम्हाला अजून काही रक्कम मिळाली तर त्यावरही टॅक्स लागतो.
पती किंवा पत्नी ज्या कोणी रक्कम ट्रान्सफर केली असेल त्यालाच टॅक्स भरावा लागेल. ज्याला रक्कम मिळाली आहे, त्याला टॅक्स भरावा लागणार नाही.
पण जर त्या रिसिपिएंटने (ज्याला रक्कम ट्रान्सफर केली आहे) मूळ रकमेवर मिळालेली रक्कम पुन्हा कुठे गुंतवली (रिइन्व्हेस्ट) केली, तर मात्र रिसिपिएंटला टॅक्स भरावा लागतो.
जॉइंट बँक अकाउंट पर्याय असू शकतो का?
इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी जॉइंट बँक अकाउंट हा पर्याय असू शकतो का, तुम्ही नॉन अर्निंग पार्टनरसोबत जॉइंट अकाउंट काढलं तर आपलं उत्पन्न विभागून दाखवून टॅक्स वाचवता येऊ शकतो का, हा प्रश्न दीपा बन्सल यांना विचारला.
त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की, जॉइंट अकाउंटचा उद्देश हा तुमची सोय आहे, टॅक्सची बचत नाही. पती किंवा पत्नी कोणाचंही उत्पन्न जॉइंट अकाउंटमध्ये जमा केलं तरी ते त्या कमावणाऱ्या व्यक्तीचंच उत्पन्न म्हणून गृहीत धरलं जाईल. त्यामुळे त्या व्यक्तीला त्यावर इन्कम टॅक्स लागू होणारच.
इन्कम टॅक्समध्ये एक सेक्शन आहे तो म्हणजे क्लबिंग ऑफ इन्कम. सेक्शन 64 मध्ये याबद्दलची माहिती दिली आहे. त्या अंतर्गतच जॉइंट अकाउंटमधे जो व्यक्ती रक्कम ट्रान्सफर करतो, त्याच्यासाठी ती करपात्रच असते.
जोडीदाराला कर्ज म्हणून दिलेली रक्कम टॅक्स फ्री?
मग असं असेल तर टॅक्स वाचवण्यासाठी जोडीदाराला लोनच्या रूपात रक्कम देता येऊ शकते का?
याबद्दल बोलताना दीपा बन्सल सांगतात की, इथे क्लबिंग ऑफ इन्कमचा नियम लागू होत नाही.
कारण कर्ज म्हणजे काय तर ठराविक काळासाठी उधार दिलेली रक्कमच. ती रक्कम तुमचा पार्टनर कुठेतरी खर्च करत असेल किंवा गुंतवून स्वतःसाठी उत्पन्न घेत असेल. पण ती रक्कम करपात्र नसेल.
पिन मनी म्हणजे काय?
पिन मनी म्हणजे काय, त्याच्या माध्यमातून महिला टॅक्सची बचत कशी करू शकतात, याबद्दल बोलताना दीपा यांनी सांगितलं की, पती आपल्या पत्नीला घरखर्च किंवा वैयक्तिक खर्च अशा कारणांसाठी जी रक्कम देतो, त्याला पिन मनी म्हणतात. त्याकडे उत्पन्न म्हणून पाहिलं जात नाही.
ती रक्कम खर्चासाठीचीच असते. या रकमेतून जर पत्नी काही बचत करत असेल तर ते पतीचं उत्पन्न मानलं जात नाही.
( हा लेख केवळ गुंतवणुकीचे कोणते पर्याय उपलब्ध असतात याची माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञाशी किंवा तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करावी.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)