खरंच झोप उडण्याला फोनमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश कारणीभूत नाही? संशोधन काय सांगतं?

    • Author, थॉमस जर्मेन
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

झोप न येण्याला आपण सर्रास मोबाईलच्या स्क्रीनला दोष देतो. 'ब्लू लाइट'चा चष्मा लावल्याने किंवा फोनच्या स्क्रीनचा उजेड कमी केल्याने झोप सुधारेल, असा आपला समज असतो.

पण खरंच झोप उडण्याला फोनमधून बाहेर पडणारा तो निळा उजेड कारणीभूत आहे की गोष्ट काही वेगळीच आहे?

गेल्या काही आठवड्यांपासून मी झोपण्यापूर्वी 3 तास आधी एक खास ऑरेंज सेफ्टी गॉगल लावत आहे. जाड आणि टोचणाऱ्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या या चष्म्यातून सारं जग फिकट केशरी रंगाचं दिसतं. त्यामुळे निळा रंग ओळखणं अशक्य होतं. पण मी एवढ्यावरच थांबत नाही.

मी खिडक्यांना पूर्णपणे काळे पडदे लावले आणि घरातील सर्व दिवे एकेक करून बंद केले. त्याऐवजी मी माझ्या संपूर्ण अपार्टमेंटमध्ये फक्त मेणबत्त्यांचा उजेड केला.

माझी ही झोपण्यापूर्वीची दिनचर्या वेडेपणाची वाटू शकते, पण हे सर्व मी एका प्रयोगासाठी करत आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातून 'ब्लू लाईट' पूर्णपणे काढून टाकता तेव्हा नेमकं काय होतं हे मला शोधायचं होतं.

गेल्या 10 वर्षांत 'ब्लू लाईट' (निळा प्रकाश) या विषयाबाबत जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण वापरत असलेले स्मार्टफोन, टीव्ही आणि LED बल्ब यांच्या माध्यमातून आपण सतत निळ्या प्रकाशाच्या संपर्कात येत असतो.

दिवसाच्या नैसर्गिक प्रकाशामुळे चालणारे आपल्या शरीराचे जैविक घड्याळ या प्रकाशामुळे विस्कळीत होते आणि त्यामुळे झोपेवर परिणाम होतो असा एक सर्वसाधारण समज आहे.

काही वैज्ञानिक पुरावे या दाव्याचे समर्थन करत असले, तरी अलीकडील अभ्यास आणि विश्लेषण असे सुचवतात की, हे प्रकरण वाटते तितके साधे नाही. किंबहुना या विषयाशी संबंधित अनेक चुकीच्या धारणांना आपण बळी पडलो असण्याची शक्यता अधिक आहे.

तज्ज्ञांच्या मते, केवळ तुमच्या फोनमधून निघणारा प्रकाश तुमची झोप खराब करत असेल याची शक्यता फार कमी आहे.

या विषयावरील संशोधन संमिश्र आहे. उदाहरणार्थ, झोपण्याच्या वेळी तुमच्या फोनमधील निळा प्रकाश कमी करण्यासाठी दिलेले फीचर्स तुमची झोप सुधारण्यासाठी फारशी प्रभावी ठरत नाहीत. परंतु आपल्या आधुनिक जीवनशैलीतील प्रकाशाचा झोपेवर नक्कीच मोठा परिणाम होतो. मग यात बदल घडवण्यासाठी काय करावे लागेल?

मला सत्य जाणून घ्यायचे होते. म्हणून मी तज्ज्ञांशी संपर्क साधला आणि या विज्ञानाचा सखोल अभ्यास केला.

यातील फरक प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी मी एक प्रयोग करायचे ठरवले. मी माझ्या संध्याकाळच्या वेळेतून 'ब्लू लाईट' पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न केला.

या प्रयोगातून मला काही असे व्यावहारिक उपाय सापडले आहेत जे तुम्हीही वापरू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही विचित्र रंगीत चष्म्यांची गरज भासणार नाही. कदाचित हीच तुमच्या गाढ झोपेची गुरुकिल्ली ठरू शकते.

झोप उडवणारा निळा प्रकाश?

ब्लू लाईटबद्दलच्या (निळा प्रकाश) चर्चेला खऱ्या अर्थाने 2014 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासामुळे सुरुवात झाली.

या संशोधनात 12 जण सहभागी झाले होते. त्यातील निम्म्या लोकांनी झोपण्यापूर्वी iPad वर वाचन केले तर उर्वरित निम्म्या लोकांनी प्रत्यक्ष पुस्तके वाचली. यातून असे दिसून आले की, iPad वापरणाऱ्यांना झोप लागण्यासाठी अधिक वेळ लागला.

दुसऱ्या दिवशी त्यांना थकवा जाणवत होता आणि त्यांच्या शरीरातील 'मेलाटोनिन'ची (झोपेचे संप्रेरक) पातळी खालावली होती.

संशोधकांनी याला iPad च्या LED स्क्रीनमधून बाहेर पडणारा प्रकाश कारणीभूत असल्याचे म्हटले. या स्क्रीनमधून निळ्या रंगाचा प्रकाश मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतो.

काही विशिष्ट परिस्थितीत हा प्रकाश शरीराच्या नैसर्गिक चक्राला विस्कळीत करतो. हे चक्र म्हणजे आपल्या शरीराचे एक प्रकारचे 'पेसमेकर' असते जे दिवसाच्या प्रकाशाच्या आधारे आपल्याला कधी थकवा जाणवावा हे ठरवत असते.

त्यानंतर झालेल्या अनेक संशोधनांमधूनही या निष्कर्षांना दुजोरा मिळाला. हे सर्व साधे वाटत असले तरी वास्तव त्यापेक्षा वेगळे आहे.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील मानसोपचार आणि वर्तणूक विज्ञान विभागाचे प्राध्यापक जेमी झिट्झर म्हणतात, "हे संशोधन दिशाभूल करणारे होते."

झिट्झर हे मानवी शरीराच्या नैसर्गिक चक्रावर प्रकाशाचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करतात.

त्यांच्या मते, त्या संशोधनातील विज्ञान चुकीचे नव्हते, तर त्यातून लोकांनी चुकीचे निष्कर्ष काढले, ही समस्या होती.

आपल्या स्क्रीनमधून अधिक प्रमाणात निळा प्रकाश बाहेर पडतो हे वास्तव आहे. आधुनिक स्क्रीन्स आणि लाइट बल्बमध्ये एलईडी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

हे एलईडी पूर्णपणे पांढरा प्रकाश निर्माण करू शकत नाहीत. त्याऐवजी यामध्ये निळ्या रंगाचे एलईडी वापरले जातात आणि त्यातील काहींवर पिवळ्या फॉस्फर रसायनाचा थर लावला जातो.

जेव्हा हा निळा आणि पिवळा रंग एकमेकांत मिसळतो तेव्हा आपल्याला पांढरा प्रकाश दिसत असल्याचा भास होतो. मात्र या प्रक्रियेत अतिरिक्त निळा प्रकाश नेहमीच बाहेर पडतो.

निळा प्रकाश तुमच्या झोपेवर खरोखरच परिणाम करू शकतो. प्राध्यापक झिट्झर यांच्या मते, याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या डोळ्यांमध्ये 'मेलानोप्सिन' नावाचं एक प्रकाश-संवेदनशील प्रथिन असतं. ते आपल्या झोपेच्या चक्रात महत्त्वाची भूमिका बजावतं.

ते म्हणतात, "मेलानोप्सिन हे निळ्या प्रकाशाप्रति अत्यंत संवेदनशील प्रथिन आहे. याचा अर्थ असा की, ते निळ्या प्रकाशाला सर्वाधिक प्रतिसाद देतं."

मेलानोप्सिन प्रकाशाच्या इतर रंगांवरही प्रतिक्रिया देतं, मात्र निळ्या रंगाचा प्रभाव इतर रंगांच्या तुलनेत थोडा जास्त असतो.

झिट्झर पुढे म्हणतात, "आपल्या स्क्रीनमधून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण खरं तर नगण्य आहे." आपल्या दैनंदिन जीवनातील परिस्थिती आणि 'ब्लू लाईट'वर झालेली अनेक संशोधने यात मोठी तफावत आहे.

संशोधनावेळी आम्ही एखाद्या व्यक्तीला प्रयोगशाळेत आणतो आणि दिवसभर त्या व्यक्तीला अत्यंत मंद प्रकाशात ठेवले जाते. त्यानंतर अचानक त्यांच्यासमोर प्रखर प्रकाश आणला जातो.

अशा विशिष्ट परिस्थितीत निळा प्रकाश मानवी शरीराच्या चक्रावर परिणाम करू शकतो. मात्र हे मानवी जीवनातील सामान्य अनुभवाशी सुसंगत नाही."

गेल्या अनेक वर्षांपासून मिळणारे इशारे आणि कोट्यवधी लोकांनी आपल्या फोनमध्ये 'ब्लू लाईट फिल्टर' सुरू केल्यानंतर आता समोर आलेले नवीन विज्ञान काहीतरी वेगळेच सांगत आहे.

या विज्ञानानुसार झोप न येण्यामागे स्क्रीन हे मुख्य कारण नाही.

उदाहरणार्थ, 11 वेगवेगळ्या अभ्यासांच्या अलीकडील पडताळणीतून असे दिसून आले की, स्क्रीनमधून येणाऱ्या प्रकाशामुळे झोप येण्यास जास्तीत जास्त केवळ 9 मिनिटांचा उशीर झाला. हा बदल नगण्य असला तरी त्याने दैनंदिन जीवनावर कोणताही मोठा परिणाम होत नाही.

स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि टॅब्लेट्सच्या स्क्रीनमधून उत्सर्जित होणाऱ्या निळ्या प्रकाशाचे प्रमाण हे सूर्यापासून मिळणाऱ्या निळ्या प्रकाशाच्या तुलनेत अत्यंत अल्प असल्याचे दिसून आले आहे.

एका अभ्यासानुसार डिजिटल उपकरणांमधून 24 तास मिळणारा निळा प्रकाश आणि घराबाहेर सूर्यप्रकाशात घालवलेला अवघा 1 मिनिट हे दोन्ही समान आहेत.

इतर काही संशोधनांतून असेही समोर आले आहे की हा प्रकाश आपल्या झोपेवर नियंत्रण ठेवणाऱ्या संप्रेरकांच्या पातळीवर परिणाम करण्यासाठी पुरेसा नाही.

मग मला नेहमी इतका थकवा का जाणवतो? झिट्झर आणि इतर तज्ज्ञांच्या मते, निळा किंवा इतर कोणत्याही प्रकारचा प्रकाश तुमची झोप विस्कळीत करण्यास अनेक प्रकारे कारणीभूत ठरू शकतो.

जर मला खरोखरच या ब्लू मॉन्स्टरचा म्हणजे जणू काही निळ्या प्रकाशरुपी 'राक्षसा'शी मुकाबला करायचा असेल, तर त्यासाठी माझ्या जीवनशैलीत मोठा बदल करणे आवश्यक होते.

प्रयोगाची सुरुवात

माझ्या या अनोख्या प्रयोगाचा पहिलाच दिवस होता. रात्रीचे 8:30 वाजले असतील. मी मित्रांसोबत बाहेर जेवायला गेलो होतो. पण अचानक मला घड्याळाची आठवण झाली आणि मी तिथून काढता पाय घेतला. आता वेळ झाली होती प्रकाशापासून स्वतःला लपवून घेण्याची.

झोप तज्ज्ञांनी मला एक मोलाचा सल्ला दिला होता. जर गाढ झोप हवी असेल, तर त्याची तयारी बेडवर जाण्यापूर्वी खूप आधीच सुरू करावी लागते. मग काय, मी देखील एखाद्या मोहिमेवर असल्यासारखा तयारीला लागलो.

चांगल्या दर्जाचे 'ब्लू-ब्लॉकिंग' चष्मे हे गडद नारिंगी किंवा लाल रंगाचे असतात. हे चष्मे डोळ्यांच्या कडेनेही पूर्णपणे फिट असतात. त्यामुळे आजूबाजूने थोडाही प्रकाश डोळ्यात शिरत नाही.

जे गंभीर उत्पादक आहेत ते तर चष्म्यासोबत एक रिपोर्टही देतात. त्यातून कळतं की, हा चष्मा नक्की किती निळा प्रकाश अडवतो.

नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे निद्रा आणि क्रोनोबायोलॉजी (जैविक घड्याळ) संशोधन गटाचे संचालक हॉवर्ड कॅलेस्टेड म्हणतात," असा चष्मा लावल्यावर तुम्हाला निळा रंग जवळपास दिसायलाच नको तरच त्याचा उपयोग आहे."

माझ्याकडे असलेले हे खास 'ब्लू-लाईट गॉगल्स' खरं तर अशा लोकांसाठी बनवले आहेत जे लेझरसोबत काम करतात. त्यांना डोळ्यांच्या सुरक्षिततेची गरज असते. मी ते चष्मे लावले आणि खिडकीबाहेर नजर टाकली. रस्त्याच्या कडेलाच एका दुकानाचा निळा निऑन साईन बोर्ड चमकत होता. पण चष्मा लावताच त्या बोर्डवरून येणारा निळा प्रकाश जणू गायबच झाला. माझा नेम अगदी बरोबर लागला होता.

मी सोफ्यावर बसलो आणि विचार करू लागलो की, पत्रकारितेसाठी मला काय काय उपद्व्याप करावे लागत आहेत. मी सहज इन्स्टाग्राम स्क्रोल करू लागलो, तर सगळं काही चक्क नारिंगी दिसत होतं. खरं तर, प्रकाश माझ्या झोपेवर नक्की कसा परिणाम करतो हेच मला तपासायचे होते. त्यामुळे मी माझा फोन, टीव्ही किंवा कॉम्प्युटर वापरण्याच्या सवयीत कोणताही बदल केला नाही. पण हे चष्मे तर फक्त एक सुरुवात होती.

मला वाटतं तुला तुझ्या घराची आता एक गुहा करावी लागेल," कॅलेस्टेड मिश्किलपणे म्हणाले.

ते पुढे म्हणतात, "खिडक्यांतून येणारा बाहेरचा प्रकाश पूर्णपणे बंद कर आणि घरात फक्त मेणबत्त्यांचा वापर कर."

आजकालचे LED दिवे मोठ्या प्रमाणात निळा प्रकाश बाहेर टाकतात. जुन्या काळचे पिवळे बल्ब त्यामानाने बरे होते. पण मेणबत्त्यांमध्ये मात्र हा निळा प्रकाश जवळपास नसतोच.

मी न्यूयॉर्कमध्ये राहतो जिथे कधीच पूर्ण अंधार नसतो. त्यामुळे मी माझ्या खिडक्यांना जाड पडदे लावून बाहेरचा प्रकाश रोखला.

आता माझ्या आणि त्या गर्द काळोखाच्या मध्ये फक्त माझा फोन आणि दोन लुकलुकणाऱ्या मेणबत्त्या होत्या. मला अजूनही झोप येत नव्हती. पुढचे 2 आठवडे माझ्यासाठी खूप मोठे आणि आव्हानात्मक असणार होते.

सकाळची 'ब्लू' ट्रीटमेंट

गंमत म्हणजे रात्रीच्या गाढ झोपेचा मार्ग तुमच्या सकाळपासूनच सुरू होतो. माझ्या या प्रयोगादरम्यान दररोज सकाळी मी एका विचित्र दिव्यासमोर बसायचो. हा दिवा एखाद्या 1980 च्या दशकातील सायन्स फिक्शन सिनेमातल्या वस्तूंसारखा दिसत होता.

मी कॉफी पीत असताना हा दिवा थेट माझ्या तोंडावर प्रखर प्रकाश टाकायचा. दिवा आकाराने लहान असल्यामुळे कॅलेस्टेड यांनी मला त्याच्या शक्य तितक्या जवळ बसण्याचा सल्ला दिला होता. खरं सांगायचं तर हे मुळीच आनंददायी नव्हतं.

हा दिवा प्रामुख्याने 'सिझनल डिप्रेशन' (हवामानानुसार येणारे नैराश्य) दूर करण्यासाठी बनवण्यात आला आहे. या दिव्याचा प्रकाश विशेषतः निळा असतो. त्यामुळे सकाळी लवकर उठल्यावर तुम्हाला अधिक तरतरी येते.

पण त्याच वेळी रात्रीच्या वेळी निळ्या प्रकाशाचा माझ्यावर जास्त परिणाम होऊ नये अशा प्रकारे हा प्रकाश माझ्या डोळ्यांना तयार करत होता.

झिट्झर सांगतात, "दिवसा तुम्हाला जेवढा जास्त प्रकाश मिळेल, तेवढाच रात्रीच्या प्रकाशाचा तुमच्यावर होणारा परिणाम कमी होतो."

कोरोना महामारीच्या आधी जेव्हा आपण रोज बाहेर पडायचो तेव्हा आपल्याला नकळतपणे पुरेसा नैसर्गिक प्रकाश मिळत होता. मग तो ऑफिसला जाताना मिळणारा सूर्यप्रकाश असो, ऑफिसमधील प्रखर ट्यूबलाईट्स असोत किंवा दुपारच्या जेवणासाठी बाहेर पडताना मिळणारा उजेड असो.

मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आपल्यापैकी अनेक जण सकाळी अंथरुणातून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एकाच प्रकारच्या प्रकाशात बसून राहतात. परिणामी आपल्या शरीराला दिवस आणि रात्र यातील फरकच कळेनासा झाला आहे.

कोणत्याही दिव्यापेक्षा घराबाहेर पडणं हा यावरचा सर्वात सोपा आणि वेगवान उपाय आहे. झिट्झर सांगतात की, आकाश ढगाळलेलं असलं, तरी बाहेर तुम्हाला साधारण 10 हजार लक्स (प्रकाश मोजण्याचं एकक) इतका प्रकाश मिळतो. कडक ऊन असेल तर हेच प्रमाण 1 लाख लक्सपर्यंत जातं.

याउलट, आपल्या घराच्या हॉलमधील प्रकाशाचं प्रमाण जेमतेम 100 लक्स असतं आणि तुमच्या फोनबद्दल विचाराल तर? झिट्झर यांच्या मते, फोनच्या प्रकाशाची क्षमता फक्त 50 ते 80 लक्स इतकीच असते. त्यातही तुम्ही स्क्रीनचा ब्राइटनेस म्हणजेच प्रकाशाची तीव्रता कमी केली, तर हे प्रमाण त्याहूनही खाली जातं."

कॅलेस्टेड सल्ला देतात, "शक्य असेल तर घराबाहेर पडा आणि अगदीच पर्याय नसेल, तरच दिव्याचा वापर करा."

सकाळी फक्त 30 मिनिटं चालण्यानंही तुमच्या झोपेच्या गुणवत्तेत मोठा फरक पडू शकतो (फक्त उन्हापासून बचावासाठी 'सनस्क्रीन' लावायला विसरू नका).

झिट्झर यांच्या मते, दुपारी 3:00 नंतर पुन्हा एकदा घराबाहेर पडणं हे फायदेशीर ठरतं. यामुळे तुमच्या शरीरातील 'जैविक घड्याळ' अधिक अचूक होतं आणि रात्रीच्या वेळी प्रकाशाचा तुमच्यावर होणारा परिणाम आपोआप कमी होतो.

जर तुम्ही 'वर्क फ्रॉम होम' करत असाल, तर एक खास टीप तुमच्या कामी येईल. ही टीप ऐकायला थोडी विचित्र वाटू शकते. ती म्हणजे दिवसा तुमच्या घरातील दिवे जास्तीत जास्त प्रखर ठेवा आणि संध्याकाळ होताच ते एक-एक करून बंद करायला सुरुवात करा.

झिट्झर सांगतात, "प्रकाशाच्या बाबतीत खरी जादू ही 'कॉन्ट्रास्ट'मध्ये (दिवस आणि रात्रीच्या प्रकाशातील तफावतीत) असते."

जर तुम्ही दिवसभर फोन किंवा लॅपटॉपला चिकटून बसला असाल आणि त्यामुळे नैसर्गिक सूर्यप्रकाशापासून दूर राहत असाल, तर ती धोक्याची घंटा आहे. पण तुमच्या बिघडलेल्या जीवनशैलीतील बदलांसाठी केवळ या प्रकाशालाच दोष देता येणार नाही.

झिट्झर यांच्या मते, खरी समस्या स्क्रीनमधून कोणता प्रकाश येतोय ही नाहीये, तर झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवर नक्की काय बघत आहात, ही समस्या आहे.

झिट्झर सांगतात, "लोकांना झोप न येण्यामागे या उपकरणांमधून बाहेर पडणारा प्रकाश नाही, तर त्यातील आशय जास्त कारणीभूत आहे."

याचा अर्थ असा की, तुम्ही फोनवर नक्की काय पाहत आहात यावर सगळं अवलंबून असतं. त्यासोबतच हे तुमच्या डोळ्यांच्या संवेदनशीलतेवरही अवलंबून असू शकतं.

कदाचित प्रकाशाचा माझ्यावर होणारा परिणाम तुमच्यापेक्षा कमी किंवा जास्त असू शकतो.

प्रयोगाचा शेवट काय झाला?

माझ्या झोपेवर लक्ष ठेवण्यासाठी मी एका 'स्लीप ट्रॅकर'चा वापर करत होतो. अर्थात, संशोधनाच्या दृष्टीने हे उपकरण अगदी 100 टक्के अचूक नसलं तरी त्यातून एक अंदाज नक्कीच येत होता.

प्रयोगादरम्यान माझ्या झोपेच्या दर्जात तसा फार मोठा बदल झाला नाही, पण काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या.

दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी, मला वेळेवर झोपायला जाण्यासाठी एक वेगळीच प्रेरणा मिळू लागली आणि पूर्वीपेक्षा झोपही लवकर लागू लागली.

मी किती तास झोपलो या प्रमाणात फारसा बदल झाला नसला, तरी माझ्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेत मात्र एक प्रकारचा नियमितपणा आला होता.

हे सगळं 'ब्लू लाईट' रोखल्यामुळे झालं का? हे ठामपणे सांगणं कठीण आहे. पण माझ्यासाठी मात्र हा एक मोठा विजय होता.

मी तुम्हाला खात्रीने एक गोष्ट सांगू शकतो. ती म्हणजे मेणबत्त्यांच्या प्रकाशात घालवलेल्या त्या संध्याकाळची मी आतुरतेने वाट पाहू लागलो होतो.

कदाचित या मानसिकतेमुळेच माझ्या झोपेवर सकारात्मक परिणाम झाला असावा.

झिट्झर यांच्या मते, "जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या झोपण्यापूर्वीच्या दिनचर्येचा भाग बनते, तेव्हा ती तुमच्या मेंदूला एक प्रबळ संकेत देते. हे संकेत तुमच्या शरीराला आता झोपण्याची वेळ झाली आहे याची जाणीव करून देतात."

फोनमधील 'ऑटो-डिम्मिंग' किंवा 'नाईट मोड'सारख्या फीचर्सचंही अगदी तसंच आहे. ते थोड्या प्रमाणात निळा प्रकाश कमी करतात.

झिट्झर म्हणतात, "या फीचर्सचा विज्ञानाच्या दृष्टीने फारसा मोठा उपयोग होत नाही. पण, याचा एक फायदा नक्की होतो. जेव्हा तुमच्या स्क्रीनचा रंग बदलतो किंवा तुम्ही रात्री तो चष्मा लावता तेव्हा तुमच्या मेंदूला एक आपोआप सिग्नल मिळतो. मेंदूला आता झोपायची वेळ झाली आहे हे समजायला लागतं."

आता तुम्ही जर माझ्या घरी राहायला आलात, तर मी तो 'ब्लू-ब्लॉकिंग' चष्मा लावलेला तुम्हाला नक्कीच दिसणार नाही. पण हो, मेणबत्त्या लावण्याची माझी सवय मात्र मी यापुढेही सुरू ठेवणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)