You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'क्षितिज'च्या मृत्यूचे पुरावे गोळा करण्यासाठी आई 3 महिने रस्त्यावर फिरली ; 'पोलिसांचं काम मी केलं' असं का म्हटलं?
- Author, आसिफ अली
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Reporting from, डेहराडूनहून
- वाचन वेळ: 5 मिनिटे
डेहराडूनमध्ये झालेल्या एका अपघाताने क्षितिज चौधरीचे आयुष्य संपवलं. परंतु, त्यानंतर सुरू झालेला त्याच्या आईचा प्रवास अजूनही थांबलेला नाही.
गेल्या दोन वर्षांपासून ललिता चौधरी न्यायाच्या शोधात रस्त्यावरून पोलीस ठाण्यांपर्यंत फिरत आहेत.
डेहराडूनच्या प्रेमनगर भागात राहणाऱ्या 18 वर्षीय क्षितिज चौधरीचा सुमारे दोन वर्षांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झाला.
अजूनही पोलीस आरोपी चालकापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
एकुलता एक मुलगा गमावलेल्या आई ललिता चौधरी या गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पोलीस ठाणे आणि अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहेत.
त्यांचा आरोप आहे की, तपासाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी गांभीर्य दाखवलं नाही. समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी स्वतःच पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.
अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी पुन्हा अधिकाऱ्यांकडे आपलं म्हणणं मांडलं. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा तपास करण्याचे आश्वासन दिलं आहे.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
क्षितिज चौधरी 16 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री सुमारे 2.45 वाजता आपल्या एका मित्रासोबत डेहराडूनच्या प्रेमनगर भागातून पायी जात होता.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्याचवेळी भरधाव आलेल्या डंपरने त्याला धडक दिली आणि चालक घटनास्थळावरून पळून गेला.
क्षितिजची आई ललिता चौधरी सांगतात की, अपघातानंतर त्याच्या मित्रांनी अॅम्ब्युलन्ससाठी फोन केला, परंतु जवळपास 45 मिनिटे कोणतीही मदत पोहोचली नाही.
पोलिसही घटनास्थळी वेळेवर आले नाहीत, असा त्यांचा आरोप आहे.
नंतर त्याला अॅम्ब्युलन्सने डून रुग्णालयात नेण्यात आलं. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात रेफर केलं.
तिथे उपचारादरम्यान 17 फेब्रुवारीच्या सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.
अपघातानंतर दोन दिवसांनी म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी ललिता चौधरी यांनी प्रेमनगर पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली.
त्याआधी पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित लोकांची तक्रार नोंदवून घेतली नव्हती, असा त्यांचा आरोप आहे.
'मला सांगितलं- पुरावे असतील तर घेऊन या'
ललिता चौधरी आपल्या मुलाची आठवत सांगताना म्हणाल्या की,"माझा मुलगा माझ्या डोळ्यातील अश्रू पाहू शकत नव्हता. आमचं नातं आई-मुलाचं कमी आणि मित्रांसारखं जास्त होतं."
त्या सांगतात की, अपघाताच्या रात्री त्यांना सुमारे तीन वाजता फोन आला.
"जेव्हा मी त्याच्याशी बोलले तेव्हा मला त्याचा आवाजही ओळखता आला नाही. त्याला खूप वेदना होत होत्या. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा तो मला 'मम्मी, तू आलीस का?' असं म्हणाला."
ललिता यांचं म्हणणं आहे की, जर वेळेवर मदत मिळाली असती तर कदाचित त्यांच्या मुलाचा जीव वाचला असता.
त्या सांगतात, "जर 100 आणि 108 नंबरवर कॉल वेळेवर घेतला गेला असता, तर आज माझा मुलगा माझ्यासोबत असता."
पण त्यांच्या मते, खरा संघर्ष त्यानंतर सुरू झाला.
"मी जेव्हा पोलिसांना केसच्या प्रगतीबद्दल विचारलं, तेव्हा मला 'तुमच्याकडे काही पुरावे असतील तर आणा, आमच्याकडे काही जादूची कांडी नाही', असं सांगितलं गेलं."
ललिता सांगतात की, त्यानंतर त्यांनी स्वतःच तपास सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या, "मला वाटलं की, मी हे नाही केलं तर कोणीच करणार नाही."
त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या अनेक महिने त्या रस्त्यावर जाऊन लोकांशी बोलल्या, दुकानं आणि हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे शोधले आणि शक्य ती सर्व माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला.
त्या सांगतात, "मी तीन महिने रोज रस्त्यावर फिरत होते."
ललिता सांगतात की, त्यांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळालं, त्याच्या आधारे त्या आरटीओ कार्यालयात गेल्या. तिथून त्यांनी संशयावरून अनेक गाड्यांचे नंबर मिळवले.
त्या सांगतात, "मी सुमारे 10 वाहनांचे नंबर काढले आणि पोलिसांना दिले."
तपासात काही विशेष प्रगती झाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्या म्हणाल्या, "मला सांगण्यात आलं की तपास झाला आहे, पण काहीच सापडलेलं नाही."
सुमारे दीड वर्षानंतर त्यांना समजलं की, प्रकरणात अंतिम अहवाल (फायनल रिपोर्ट) दाखल करण्यात आला आहे. ललिता सांगतात, "त्या दिवशी मला वाटलं की माझी सर्व मेहनत वाया गेली आहे."
प्रकरण किसान यूनियनपर्यंत गेलं
सुमारे दोन वर्षांनंतर, ललिता चौधरी एका सार्वजनिक कार्यक्रमात गेल्या तेव्हा हा मुद्दा पुन्हा समोर आला. डेहराडूनमध्ये झालेल्या एका आंदोलनात त्यांनी आपल्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली.
या वेळी त्यांनी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांची भेट घेतली. त्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
भारतीय किसान युनियन वेल्फेअर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सोमदत्त शर्मा सांगतात, "आम्ही ललिता चौधरी यांना भेटलो. त्यांची कहाणी ऐकून आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहिलो. आम्ही त्यांना घेऊन एसएसपींना भेटलो आणि त्यांना सर्व पुरावे दाखवले."
सोमदत्त शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्यांना सांगण्यात आलं की, या प्रकरणात अंतिम अहवाल दाखल झाला आहे. पण जेव्हा पुरावे समोर ठेवले गेले, तेव्हा पुन्हा तपास करण्याबाबत चर्चा झाली.
ते म्हणतात, "एका आईला स्वतः पुरावे गोळा करावे लागणे ही दुर्दैवी गोष्ट आहे."
त्यांनी इशाराही दिला आहे की, यावेळीही कारवाई झाली नाही तर आंदोलन केलं जाईल.
ते म्हणाले, "आता सुद्धा कारवाई झाली नाही तर आम्ही रस्ते अडवू आणि भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेतही आमच्यासोबत उभे राहतील."
पोलीस काय म्हणतात?
डेहराडूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोवाल म्हणतात की, या प्रकरणाचा आधी तपास झाला आहे. पण आता नवीन पुराव्यांच्या आधारे पुन्हा तपासणी केला जात आहे.
ते बीबीसीला म्हणाले की, "जेवढे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होते त्यांची तपासणी केली होती. आता दिलेल्या पुराव्यांच्या आधारे संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पुन्हा तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."
एसएसपींच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे आणि पुढील तपासासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली जात आहे.
तपासात कुठेही निष्काळजीपणा दिसून आला तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ललिता चौधरी मूळच्या उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरच्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या एकट्याच काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांची मुलगी दिल्लीत इंटर्नशिप करत आहे.
आपल्या मुलासाठी जे केलं, ते आईचं कर्तव्य होतं, असं ललिता चौधरी सांगतात.
"जे काम पोलिसांनी करायचं होत, ते मी केलं," असं त्या म्हणतात.
त्यांच्या आवाजात आजही त्या वेदना स्पष्टपणे जाणवत होत्या. त्या म्हणाल्या, "माझा मुलगा 'मम्मी मला वाचव', असं म्हणत होता."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.