You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रफुल हिंगे : मंदिरात जाऊन पाहिलं होतं IPL ऑक्शन; नागपूर ते IPL ड्रीम डेब्यूचा असा आहे प्रवास
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
प्रफुल हिंगे या आणखी एका मराठमोळ्या नावाचा सोमवारी (13 एप्रिल) रात्री देश-विदेशातील सगळ्याच क्रिकेट चाहत्यांना परिचय झाला.
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात खेळताना पहिल्याच ओव्हरमध्ये तीन विकेट घेत प्रफुलनं 'ड्रीम डेब्यू' केला आहे.
विदर्भाच्या प्रफुल हिंगेनं स्पर्धेत आतापर्यंत अजय राहिलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाला खिंडार पाडलं आणि त्यांचा विजयरथ रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली.
राजस्थानच्या वैभव, जुरैल आणि प्रिटोरियस या तिघांना शून्यावर बाद करत प्रफुलनं त्याच्या नावाचा डंका वाजवत ऑरेंज आर्मीला विजयाचा मार्ग दाखवला. त्यानं या सामन्यात एकूण चार विकेट घेतल्या.
प्रफुलचा ऑरेंज सिटी ते ऑरेंज आर्मी पर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. लहानपणापासून अत्यंत परिश्रमानं क्रिकेटमध्ये काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीनं त्यानं इथपर्यंतचा प्रवास केला आहे.
भारताचा विदर्भ एक्सप्रेस उमेश यादवकडून प्रेरणा आणि पॅट कमिन्सचा आदर्श असलेल्या प्रफुलनं आयपीएलसारख्या स्पर्धेत अविस्मरणीय कामगिरी करत सगळ्यांची वाहवा मिळवली आहे.
प्रफुलच्या इथपर्यंतच्या प्रवासावर एक नजर टाकूया.
कशी झाली क्रिकेटची सुरुवात?
नागपुरात जन्मलेल्या प्रफुलनं 13 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
प्रफुलची क्रिकेटची सुरुवात ही आपल्या देशातील इतर मुलांप्रमाणेच झाली होती. लहानपणीच्या खेळण्यातून सुरू झालेला हा प्रवास इथपर्यंत पोहोचला.
प्रकाश हिंगे असं प्रफुलच्या वडिलांचं नाव आहे.
प्रफुलनं सातवीत असताना त्यानं क्रिकेट खेळायचं असल्याचं वडिलांना सांगितलं होतं. पण प्रफुलच्या वडिलांनी लगेचच त्याचा फार गांभीर्यानं विचार केला नाही.
पण त्यांनी याकडं दुर्लक्ष केलं होतं असंही नाही. काही दिवसांनी प्रफुलचे वडील अचानक एक दिवस त्याला समर कॅम्पसाठी घेऊन गेले आणि तीच खऱ्या अर्थानं त्याच्या क्रिकेटच्या खेळाची सुरुवात ठरली.
खरं तर सुरुवातीला क्रिकेटमध्ये फार आवड नव्हती असं प्रफुलनं त्याच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. पण हळू हळू खेळताना त्याला याची आवड निर्माण झाली आणि तो क्रिकेटमध्येच रमला.
वडिलांनी प्रफुलला क्लबमध्ये पाठवलं पण ते स्वतः कधी तिथं गेले नाही. जे काही करायचं ते तुला आवड असेल तर कर, असं त्यांनी स्पष्टपणे प्रफुलला सांगितलं होतं.
प्रफुलला प्रोफेशनल क्रिकेटबाबत समजायला दोन तीन वर्ष लागली. हळूहळू क्लब क्रिकेट, प्रादेशिक आणि नंतर इतर गोष्टींबाबत त्याला समजू लागलं, असं तो सांगतो.
बहिणीकडून प्रेरणा
काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा बहिणीकडून मिळाल्याचं प्रफुल सांगतो.
"माझी बहीण सीएसाठी तयारी करताना रात्र-रात्रभर अभ्यास करायची. तिची मेहनत पाहून मला तिच्याकडून खूप प्रेरणा मिळाली.
"ती एवढी मेहनत करतीये तर मीही मेहनत करायला हवी, असं मला वाटलं आणि त्यामुळं मी जीव तोडून परिश्रम केले," असं प्रफुल सांगतो.
"माझी बहीण अभ्यासासाठी रात्रभर जागायची त्यामुळं मीही सकाळी लवकर उठून प्रॅक्टिसला जायचो. त्यामुळं शिस्त लागली आणि त्याचा फायदा झाला. माझ्या फिल्डमध्ये मीही बहिणीसारखं काहीतरी मोठं करावं हेच वाटत होतं," असं प्रफुल सांगतो.
बहीण हुशार होती म्हणून शाळेतले शिक्षक प्रफुललाही अभ्यासासाठी दबाव आणायचे. पण घरच्यांनी मात्र कधीही तसा दबाव आणला नाही, असं तो सांगतो.
वडीलही फास्ट बॉलर?
आपल्या करिअरमध्ये वडिलांचा मोठा हात असल्याचं प्रफुल म्हणाला.
त्याचे वडीलही क्रिकेट खेळायचे. पण व्यावसायिक स्तरावर ते क्रिकेट खेळू शकले नाही. त्यामुळं आपल्या मुलानं खेळावं असं त्यांचं स्वप्न होतं.
"वडिलांचे मित्र आम्हाला सांगायचे की ते वडिलांना क्रिकेट खेळायला कसं घेऊन जायचे. तेही फास्ट बॉलर होते. त्यामुळं बॉलरची गरज असली मित्र त्यांना घेऊन जायचे. पण त्यांना अभ्यासही करायचा होता, त्यामुळं ते क्रिकेटकडे फार वळले नाहीत.
वडील प्रफुलचे फार सामने पाहायलाही आले नाही, असं तो सांगतो. तो विदर्भाकडून खेळला तेव्हाही ते सामने पाहायला गेले नाही. फक्त तो कसा खेळला? काय केलं? अशी विचारणा ते प्रफुलकडे करायचे.
छोटंसं करिअर मोठा प्रभाव
प्रफुल हिंगेच्या करिअरचा विचार करता त्यानं फार सामने खेळले आहेत, असं नाही.
रणजी चषकात प्रफुलला गेल्यावर्षी संधी मिळाली. तो दिवस अविस्मरणीय होता असं तो सांगतो. रणजीच्या पहिल्या सामन्यातही चार विकेट मिळाल्या होत्या, असं तो म्हणाला.
प्रफुलचा हा सीझन चांगला सुरू असतानाच, त्याला दुखापत झाली. पाठीच्या दुखापतीमुळं तो फायनल खेळू शकला नाही. पण नंतर त्यातून सावरत त्यानं पुनरागमन केलं.
टी-ट्वेंटीचा विचार करता त्यानं फक्त एकच सामना आधी खेळला होता. त्यातही त्याला फार काही चांगली कामगिरी करता आलेली नव्हती.
पण हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या वरून अॅरॉनची प्रफुलवर नजर होती. त्यानं प्रफुलचं गोलंदाजी कौशल्य हेरलं होतं आणि त्यामुळंच हैदराबादनं आयपीएलच्या लिलावात त्याच्यावर बोली लावली होती.
मंदिरात जाऊन पाहिलं ऑक्शन
आयपीएलच्या ऑक्शदरम्यान खूप नर्व्हस असल्याचं प्रफुलनं सांगितलं आहे.
ऑक्शन सुरू झालं तेव्हा प्रफुल फोन घेऊन घराच्या बाजूला असलेल्या मंदिरात गेला होता. तिथं बसूनच त्यानं ऑक्शन पाहिलं. तो सांगतो, "माझं नाव आलं आणि हैदराबादनं बोली लावली. तेव्हा तर थेट देवाला लोटांगण घातलं होतं."
"देवाचे खूप आभार मानले. घरी गेलो तर आई वडिलही खूप भावनिक झाले होते. त्यानंतर सेलिब्रेशन झालं. तो आजवरचा सर्वात अविस्मरणीय क्षण होता," असं तो म्हणतो.
विदर्भाचाच गोलंदाज उमेश यादव हा प्रफुलची प्रेरणा आहे, असं तो सांगतो. कधीही काहीही विचारलं तरी उमेशदादा अगदी प्रेमाने समजावतात, असं तो म्हणतो.
आयपीएलमध्ये केकेआर फेव्हरेट टीम होती तरी हैदराबादमध्ये त्याचा फेव्हरेट बॉलर पॅट कमिन्स होता. त्यामुळं हैदराबादच्या टीममध्ये असण्याचा आनंद असल्याचं त्यानं सांगितलं.
पहिल्या सामन्यातील कामगिरी
सनरायझर्स हैदराबादनं 30 लाखांची बोली लावून संघात समाविष्ट केलेल्या प्रफुल हिंगेला या सामन्यात संधी दिली आणि तेही सामन्यात पहिली ओव्हर त्याला दिली.
प्रफुलनं पहिलाच बॅक ऑफ लेंथ चेंडू टाकला अन् यशस्वी जैस्वालनं एक धाव घेतली.
त्यानंतर दुसऱ्या चेंडूसाठी समोर होता यंदाच्या सीझनमध्ये भल्याभल्यांना घाम फोडणारा वैभव सूर्यवंशी.
प्रफुलनं आखूड टप्प्याचा पण अगदी योग्य लाईनवर चेंडू टाकला. बाऊन्सरवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वैभवनं केला, पण तो चुकला. चेंडू बॅटच्या मधोमध लागला नाही त्यामुळं तो फक्त उंचावर गेला आणि विकेट किपरनं त्याचा सहज झेल घेतला. दुसऱ्याच चेंडूवर विकेट.
त्यानंतर मैदानावर आलेल्या जुरैलनं प्रफुलचा चेंडू शांतपणे खेळला. पण पुढच्या चेंडूवर त्यानं जुरैलला अडकवलं. प्रफुलचा आणखी एक बॅक ऑफ लेंथ चेंडू ध्रुवला समजलाच नाही आणि तो सरळ स्टम्पवर जाऊन आदळला.
त्यानंतर प्रिटोरियस मैदानावर आला. प्रफुलनं त्याचा पाचवा चेंडू पुन्हा अगदी अचूक टप्प्यावर फेकला आणि त्याला बीट केलं.
प्रिटोरियसच्या पायावर टाकलेला चेंडू त्यानं ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण नितिश कुमार रेड्डीच्या हातात त्यानं सोपा झेल सोपवला.
अशाप्रकारे पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त एक रन देत त्यानं तीन विकेट घेतल्या.
त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये त्यानं रियान परागलाही बाद केलं आणि राजस्थानला मोठा धक्का दिला. पहिल्याच सामन्यात 4 ओव्हरमध्ये 34 धावा देत त्यानं 4 विकेट घेतल्या.
'चार-पाच विकेट घेणार हे लिहून ठेवलं होतं'
आयपीएलमध्ये पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात केलेल्या कामगिरीसाठी प्रफुलला 'प्लेयर ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला.
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी पहिल्याच ओव्हरमध्ये तीन विकेट घेतल्या. अशी स्वप्नवत कामगिरी करण्याचा कधी विचार केला होता का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.
त्यावर प्रफुलनं हो हा विचार केला होता, असं सांगितलं.
"मी पहिल्या मॅचमध्ये चार किंवा पाच विकेट घेणार असं खूप दिवसांपूर्वी लिहून ठेवलं होतं," असं त्यानं सांगितलं.
तेराव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. कुटुंबानं माझ्यासाठी आजवर खूप काही केलं, त्यामुळं हा पुरस्कार कुटुंबाला पुरस्कार समर्पित असल्याचं प्रफुल म्हणाला.
"तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर कोण तुम्हाला कुठे पाहील, आणि कधी ट्रायलला बोलावतील हे माहिती नसतं. त्यामुळं स्थानिक पातळीवरही प्रत्येकवेळी तुमचं 100 टक्के योगदान द्या. कारण तुम्हाला नेहमीच कोणी तरी पाहत असतो," असं प्रफुल म्हणतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)