गॅस सिलिंडर संपल्यावर काय? स्वयंपाकाचे हे 12 पर्याय आजच माहित करुन घ्या

    • Author, पृथ्वीराज
    • Role, बीबीसी तेलुगूसाठी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

युद्ध कुठेही होत असलं तरीदेखील त्याचा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात जगावर परिणाम होतो. युद्ध असंच असतं.

पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध इराणचं युद्ध सुरू आहे. मात्र त्याचा परिणाम भारतातदेखील होत असून तो सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे.

अनेक शहरांमध्ये गॅस सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटवर गॅसच्या तुटवड्याचा परिणाम झाला आहे.

डिझेल, पेट्रोल आणि गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ होऊ शकते, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. जर हे युद्ध जास्त दिवस सुरू राहिलं तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.

गॅसच्या किमतीत वाढ होण्याबरोबरच गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या बातम्यादेखील समोर येत आहेत. सद्यपरिस्थितीत, गॅस उपलब्ध असल्यावरच अनेक घरं आणि हॉटेलांमध्ये अन्न शिजवणं शक्य आहे.

माणूस अनेक गरजा काही दिवस बाजूला ठेवू शकतो, त्याशिवाय राहू शकतो. मात्र अन्न ही रोजच लागणारी महत्त्वाची गोष्ट आहे. जर गॅस नसेल तर अन्न शिजवण्यासाठी इतर पर्यायांची व्यवस्था करणं आवश्यक आहे.

आज भारताच्या शहरी भागातून लाकडी चुली, रॉकेलच्या चुली किंवा स्टोव्ह आणि कोळशाच्या चुली जवळपास गायब झाल्या आहेत. तरुण पिढीतील अनेकांनी तर या पाहिल्यादेखील नसतील.

अर्थात ग्रामीण भागांमध्ये त्या अजूनही दिसतात. तर शहरांमध्ये मायक्रोवेव्ह ओव्हन आणि इंडक्शन स्टोव्हसारखे आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत.

सद्यपरिस्थितीत न घाबरता कोणत्या पर्यायी चुलींचा वापर केला जाऊ शकतो आणि त्यासाठी कोणत्या प्रकारच्या इंधनाची आवश्यकता असते, हे या लेखातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

1. इंडक्शन कुकटॉप

शहरी भागांमध्ये गॅस स्टोव्हला प्रमुख पर्याय म्हणून इंडक्शन कुकटॉप लोकप्रिय होत आहेत. हे इलेक्ट्रिक स्टोव्ह भांड्यांना आगीच्या आचेऐवजी चुंबकीय ऊर्जेद्वारे थेट गरम करतात.

यामुळे भांडी लगेच गरम होतात. तसंच विजेचा अपव्ययदेखील कमी होतो. दूध उकळण्यापासून ते डाळ, भाजी इत्याही बनवण्यासाठी हे खूपच उपयुक्त असतात.

फायदा: यावर अन्न लवकर शिजतं. हे फ्लेमलेस असतं, यामुळे ते सुरक्षितदेखील आहे. याला स्वच्छ करणंदेखील सोपं असतं.

तोटा: या स्टोव्हचा वापर करण्यासाठी विशेषरित्या डिझाईन करण्यात आलेल्या इंडक्शन बेस असणाऱ्या भांड्यांची आवश्यकता असते. त्याचबरोबर, याचा वापर करण्यासाठी विजेची आवश्यकता असते.

कुठे मिळेल: इलेक्ट्रिक वस्तूंच्या दुकानांमध्ये, किचनसाठी लागणाऱ्या वस्तू मिळतात अशा दुकानांमध्ये आणि ऑनलाइन स्वरुपात ते सर्वसामान्यपणे सहजपणे उपलब्ध होतं.

2. इन्फ्रारेड इलेक्ट्रिक स्टोव्ह

बाहेरून इन्फ्रारेड स्टोव्ह, इंडक्शन स्टोव्हसारखाच दिसतो. मात्र त्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते. यात खाली लावण्यात आलेल्या इन्फ्रारेड काईल्समुळे उष्णता निर्माण होते. त्यातून मग भांडी गरम होतात.

यावर तुम्ही सर्वप्रकारच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवू शकता.

फायदा: हा विजेवर चालतो. यावर स्टील, ॲल्युमिनियम आणि काच यासारख्या सर्व प्रकारच्या भांड्यांचा वापर केला जाऊ शकतो.

तोटा: हा स्टोव्ह टॉप खूप गरम होतो. यात इंडक्शन कुकटॉपच्या तुलनेत विजेचा थोडा अधिक खप होतो.

कुठे मिळेल: ऑनलाइन शॉपिंग साईट्स, इलेक्ट्रिक वस्तूंची दुकानं, किचनमधील वस्तू मिळणाऱ्या दुकांनामध्ये.

3. कॉईल स्टोव्ह

इलेक्ट्रिक हॉट प्लेट. याला कॉईल स्टोव्हदेखील म्हणतात. हे अन्न शिजवण्यासाठीचं खूपच किफायतशीर उपकरण आहे. हे विजेवर चालतं. याच्या आत असलेली कॉईल विजेद्वारे गरम होते आणि ती भांडं गरम करते.

फायदा: जवळपास सर्वच प्रकारची भांडी यावर वापरली जाऊ शकतात. याची किंमत खूपच कमी असते.

तोटा: याला गरम होण्यास थोडा वेळ लागतो आणि विजेचा अधिक वापर होतो.

कुठे मिळेल: हार्डवेअरचं दुकान, इलेक्ट्रिक उपकरणांचं दुकान, ऑनलाइन शॉपिंगद्वारे.

4. इलेक्ट्रिक राइस कुकर

इलेक्ट्रिक राइस कुकरचा वापर बऱ्याच काळापासून होतो आहे. हे अनेक घरांमध्ये आढळतात. यांचा वापर करून भात, डाळ, भाजी आणि सूप यासारखे अन्नपदार्थ खूपच सहजपणे शिजवले जाऊ शकतात.

याचा वापर करताना अन्न शिजवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी भांड्यात टाकाव्यात, पाणी टाकावं आणि कुकर सुरू करावा. त्यानंतर कुकरमध्ये अन्न आपोआप शिजतं.

फायदा: हा खूपच सोयीचा असतो. यात विजेचा वापर कमी होतो. याला कमी मेंटेनन्स लागतो.

तोटा: यावर भाज्या किंवा इतर अन्नपदार्थ तळता येत नाहीत. यावर चपाती, पुरी किंवा रोटी देखी बनवता येत नाही.

कुठे मिळेल: इलेक्ट्रिक वस्तूंचं दुकान, सुपरमार्केट, ऑनलाइन शॉपिंग.

5. मायक्रोवेव्ह ओव्हन

मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर मुख्यत: अन्नपदार्थ गरम करण्यासाठी आणि स्टीम (वाफ) चा वापर करून अन्न शिजवण्यासाठी केला जातो. यात पाणी गरम करून अन्न लवकर शिजवलं जातं. मात्र स्टोव्हप्रमाणे हा ओव्हन अन्न शिजवण्यासाठी उपयुक्त नाही.

फायदा: यात अन्न लवकर गरम होतं. वाफेवर भाज्या शिजवण्यासाठी हे खूपच उत्तम आहे.

तोटा: यावर तळलेले अन्नपदार्थ, डोसा, चपाती इत्यादी गोष्टी शिजवणं शक्य नाही.

कुठे मिळेल: इलेक्ट्रिक वस्तूंचं दुकान, ऑनलाइन शॉपिंग.

6. सोलर कुकर

सोलर कुकर अन्न शिजवण्यासाठी सौरऊर्जेच वापर करतात. यातील सोलर रिफ्लेक्टर, भांड्यावर सूर्यप्रकाश केंद्रीत करून उष्णता निर्माण करतात. भांड्यात अन्नपदार्थ टाका आणि ते भांड सोलर कुकरमध्ये ठेवा. त्यानंतर तो सोलर कुकर उन्हात ठेवा.

फायदा: सोलर कुकरमध्ये इतर इंधनांची आवश्यकता नसते. ते पर्यावरणपूरक असतात.

तोटा: यात अन्न शिजवण्यास बराच वेळ लागतो. ढगाळ दिवसांमध्ये किंवा रात्रीच्या वेळेस याचा वापर करता येत नाही.

कुठे मिळेल: ऑनलाइन शॉपिंग आणि बाजारात.

7. केरोसिन स्टोव्ह

गॅस सिलिंडर आणि गॅस स्टोव्ह या आता सामान्य गोष्टी झाल्या आहेत. मात्र एक काळ असाही होता की जवळपास प्रत्येक घरात केरोसिन म्हणजे रॉकेलचा स्टोव्ह असायचा. केरोसिन रेशनच्या दुकानांमध्ये मिळत असे.

या स्टोव्हमध्ये केरोसिन भरून तो पेटवता येतो. यावर गॅस स्टोव्हप्रमाणेच अन्न शिजवलं जाऊ शकतं.

फायदा: या स्टोव्हचा वापर सहजपणे करता येतो. याची फ्लेम खूप तीव्र असते.

तोटा: याचा धूर त्रासदायक असतो. अनेक लोकांना जळणाऱ्या केरोसिनचा वास त्रासदायक वाटतो. यावर अन्न शिजवल्यानंतर भांडी काळी पडतात. अशी भांडी स्वच्छ करणं कठीण असतं.

कुठे मिळेल: हार्डवेअरचं दुकान, बाजारात.

8. बायोगॅस स्टोव्ह

बायोगॅस हा मिथेन गॅस असतो. तो जनावरांचं शेण आणि स्वयंपाकघरातील जैविक किंवा सेंद्रिय पदार्थांसारख्या कचऱ्याचा वापर करून तयार केला जातो. यात ऑरगॅनिक किंवा सेंद्रिय कचरा बायोगॅस प्लांटमध्ये टाकण्यात येतो. नंतर एका निश्चित स्वरुपाच्या प्रक्रियेनंतर निघणाऱ्या गॅसचा वापर चूल किवा स्टोव्हमध्ये केला जातो.

फायदा: स्वस्त इंधन, पर्यावरणासाठी चांगला, यात शेवटी उरलेल्या पदार्थांचा वापर खत म्हणून देखील केला जाऊ शकतो.

तोटा: यासाठी जागेची आवश्यकता असते. तसंच जैविक किंवा सेंद्रिय कचऱ्याची आवश्यकता असते.

कुठे मिळेल: या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या अनेक संघटनांकडे.

9. ब्युटेन कार्ट्रिज स्टोव्ह

हा एक पोर्टेबल स्टोव्ह असतो. तो छोट्या गॅस कार्ट्रिजवर चालतो. कार्ट्रिज स्टोव्हमध्ये ठेवून आणि तो पेटवून गॅसच्या फ्लेमवर तुम्ही अन्न शिजवू शकता.

फायदा: हा सर्वसामान्यपणे प्रवासात सोबत घेतला जातो. यावर गॅस स्टोव्हप्रमाणे अन्न शिजवता येतं.

तोटा: ब्युटेन कार्ट्रिज थोडे महाग असतात.

कुठे मिळेल: कॅम्पिंग किंवा तंबूची उपकरणं मिळणाऱ्या दुकानांमध्ये, ऑनलाइन शॉपिंग.

10. बायोमास पॅलेट स्टोव्ह

हा एक असा स्टोव्ह आहे, ज्यात इंधन म्हणून शेतीतील कचऱ्यापासून बनवलेल्या छोट्या पॅलेट किंवा दाण्यांचा वापर केला जातो. हे पॅलेट स्टोव्हमध्ये ठेवून जाळल्यावर त्यातून निघणाऱ्या आग किंवा फ्लेमवर अन्न ठेवून ते शिजवता येतं.

फायदा: पारंपारिक लाकूड किंवा सरपण जाळणाऱ्या चुलींच्या तुलनेत यातून कमी धूर तयार होतो.

तोटा: सर्व ठिकाणी पेलेट्स किंवा दाणे सहजपणे उपलब्ध होत नाहीत.

कुठे मिळेल: कृषी उपकरण पुरवठादार, अपारंपारिक ऊर्जा कंपन्या.

11. रॉकेट स्टोव्ह

हा एक विशिष्ट प्रकारचा स्टोव्ह किंवा चूल आहे. याचं डिझाईन लाकडाच्या छोट्या तुकड्यांचा वापर करून अधिक उष्णता निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. लाकूड चुलीत ठेवलं जातं, ते जाळलं जातं आणि त्यातून निघणारी आग किंवा फ्लेमवर अन्न शिजवलं जातं.

फायदा: यात कमी इंधनातून अधिक उष्णता मिळते. जळाऊ लाकूड किंवा सरपण सहजपणे उपलब्ध आहे.

तोटा: सर्वसाधारणपणे याचा वापर घराबाहेर अन्न शिजवण्यासाठी केला जातो.

कुठे मिळेल: ग्रामीण तंत्रज्ञान कंपन्या किंवा स्वत:च करायच्या पद्धतींद्वारे.

12. कोळशाची चूल

कोळसा किंवा चारकोलचा वापर करून अन्न शिजवण्याची ही पारंपारिक पद्धत आहे. चुलीत कोळसा पेटवला जातो आणि त्याच्यावर भांडं ठेवून त्यात अन्न शिजवलं जातं.

फायदा: कोळसा सहजपणे उपलब्ध आहे. यात उष्णता एकसमान असते.

तोटा: याच्या धुराचा लोकांना त्रास होऊ शकतो. यातून कार्बन मोनॉक्साईड गॅस तयार होतो. त्यामुळे आजार होऊ शकतात.

कुठे मिळेल: ग्रामीण बाजार, हार्डवेअरचं दुकानं.

शहरी भागांमध्ये, सर्वसामान्यपणे विजेवर चालणारी उपकरणं अधिक उपयुक्त असतात. अन्न शिजवण्यासाठी बहुतांशपणे इंडक्शन स्टोव्ह, इलेक्ट्रिक कुकर आणि मायक्रोवेव्ह यासारखी उपकरणं वापरली जाऊ शकतात.

ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारं इंधन सर्वात उपयुक्त असतं. बायोगॅस, पेलेट स्टोव्ह आणि रॉकेट स्टोव्ह यासारख्या उपकरणांचा वापर करणं सोपं असतं.

सद्य परिस्थितीत हायब्रीड किचन असणं, हा सर्वात चांगला पर्याय आहे. म्हणजेच, अन्न शिजवण्यासाठीच्या वेगवेगळ्या उपकरणांचा एकाच वेळी वापर केल्यामुळे गॅस नसल्यावरदेखील कोणत्याही अडचणीशिवाय अन्न शिजवलं जाऊ शकतं.

उदाहरणार्थ, जर तुम्ही गॅस स्टोव्हसोबत इंडक्शन स्टोव्ह किंवा इलेक्ट्रिक कुकरचा वापर केला, तर एका प्रकारचं इंधन उपलब्ध नसल्यावर देखील अन्न शिजवण्यात अडथळा येणार नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)