मध्य पूर्वेत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्याबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?

वाचन वेळ: 18 मिनिटे

मध्य पूर्वेकडील देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्याचे सर्व प्रयत्न सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

विधानपरिषदेत त्यांनी सांगितलं की, "हे युद्ध सुरू झाल्यानंतर एअरस्पेस बंद झाल्याबरोबर भारतीय पर्यटक, लोकांचे मेसेजेस यायला लागले. केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी आम्ही संपर्क केलेला आहे. सर्वांना आपल्या दूतावासाला संपर्क साधायला सांगितला आहे. गिरीश महाजन यांना जबाबदारी दिली. वॉट्स अपचा नंबर सर्वांना दिलेला आहे. आम्ही अडचणी दूर करायचा प्रयत्न करत आहोत. त्यांना परत आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केैले आहेत."

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "एअर इंडियाची विमानं अडकलेल्यांना परत आणत आहेत. काही एअरस्पेस अजूनही बंद आहे. कुवैतमध्ये ट्रांजीटच्या प्रवाशांजवळ व्हिजा नाही. त्यांनाही तिथे एकाच ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या त्या ठिकाणची मराठी मंडळं आहेत त्यांनाही सतर्क केलेलं आहे. चीफ ऑफ प्रोटोकॉल यांनाही जबाबदारी दिली होती. आपल्या दुतावसाची बैठक घेऊन एसओपी तिथल्या नागरिकांना दिलेल्या आहे. लोकांना काय करावं आणि काय करू नये या गोष्टी देखील सांगितलेल्या आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्यावतीने सोय केली होती. हा स्तुत्य उपक्रम आहे. केंद्र सरकारला आम्ही विनंती केली होती की राज्य सरकार मदत करू इच्छित आहे परंतु केंद्राचं म्हणणं होतं की प्रत्येक राज्यांना स्वतंत्र सोय केली तर गोंधळ होईल."

इराण-इस्रायल संघर्ष : तेल-गॅस तुटवड्याची भीती नाही, युरोपियन युनियनचा दिलासा

युरोपमध्ये जगाच्या इतर भागांसारखंच ऊर्जेच्या किमतींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. मंगळवारी (3 मार्च) बाजारात व्यवहार सुरू असताना, युरोपमधील नैसर्गिक वायूचा (युरोपियन बेंचमार्क, टीटीएफ) दर वाढला. हा दर काही काळासाठी, इराणवरील हल्ल्याच्या पूर्वीपेक्षा, दुपटीने वाढला होता.

परंतु, ईयूच्या ऊर्जा बाजारावर याचा सध्या तरी थेट परिणाम झालेला नाही, असं युरोपियन आयोगाने स्पष्ट केलं आहे.

सध्या तेल-गॅसच्या पुरवठ्याबाबत कोणतीही तातडीची चिंता नाही, असं ईयूच्या प्रवक्त्या ॲना-कैसा इटकोनन यांनी बीबीसीला सांगितलं.

युरोपियन आयोगाच्या मते, गेल्या काही वर्षांत ईयूने तेल आणि गॅसचे स्रोत वेगवेगळ्या देशांतून घेतले आहेत, त्यामुळेच ही परिस्थिती नियंत्रणात आहे. रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केल्यानंतर ईयूने हा बदल अधिक वेगाने केला. गरज पडली तर, ईयू देशांकडे साठवलेला तेल-गॅसचा राखीव साठा वापरता येऊ शकतो.

ईयू इराणकडून तेल किंवा गॅस आयात करत नाही. ईयूला सर्वाधिक तेल अमेरिका, नॉर्वे आणि कझाकस्तानकडून मिळते. तरीही सौदी अरेबिया ईयूचा महत्त्वाचा भागीदार आहे. मागील वर्षी ईयूच्या एकूण तेल आयातीपैकी 6.8 टक्के तेल सौदी अरेबियाकडून आले होते.

ईयूला गॅसचा सर्वात मोठा पुरवठा नॉर्वे आणि एलएनजीचा (लिक्विफाइड नॅचरल गॅस) पुरवठा अमेरिकेकडून होतो. कतारने मात्र सध्या एलएनजीचे उत्पादन थांबवले आहे. तरीही, मागील वर्षी ईयूच्या एकूण गॅस आयातीपैकी 4 टक्के गॅस कतारकडून आला होता.

सीआयए स्टेशनवर 'हल्ला' झाल्यानंतर सौदी अरेबियाने इराणला उद्देशून काय म्हटलं?

स्वतःची आणि आपल्या देशात राहणाऱ्या लोकांची सुरक्षा करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील, असं सौदी अरेबियानं म्हटलं आहे.

सौदी मंत्रिमंडळाचा हवाला देत सौदी प्रेस एजन्सीने एका निवेदनात म्हटलं आहे की, सौदी कॅबिनेटच्या म्हणण्यानुसार इराणकडून हल्ल्याची शक्यता असेल तर सौदी अरेबिया आपल्या मित्र राष्ट्रांसोबत उभा राहील आणि गरज पडल्यास त्यांना मदत करण्यासाठी आपल्या सर्व ताकदीचा वापर करायलाही तयार आहे.

सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील अमेरिकन दूतावासात असलेल्या सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सीच्या (सीआयए) एका ठाण्याला सोमवारी (2 मार्च) ड्रोन हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले, अशा वेळी हे वक्तव्य समोर आलं आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, अमेरिका आणि सौदी अरेबिया दोघांनीही दूतावासाच्या परिसरात दोन ड्रोन आदळल्याची पुष्टी केली आहे. मात्र, त्यांचं लक्ष्य सीआयएच होतं की नाही, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात दूतावासाच्या छताचा काही भाग कोसळला आणि आतील भागात धूर पसरला, त्यामुळे संपूर्ण परिसरावर परिणाम झाला होता.

दुतावासातील कर्मचाऱ्यांना सध्या सुरक्षित ठिकाणीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हिजबुल्लाहच्या 60 ठिकाणांना लक्ष्य केल्याचा इस्रायलचा दावा

इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) सांगितलं की, त्यांनी इराणचं समर्थन करणारा गट हिज्बुल्लाहच्या जवळपास 60 ठिकाणांना लक्ष्य केले आहे.

आयडीएफने एका निवेदनात म्हटलं आहे, "ज्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं त्यामध्ये शस्त्रसाठा ठेवण्याच्या सुविधा, कमांड सेंटर, क्षेपणास्त्र प्रक्षेपक आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश होता."

गेल्या काही काळापासून हिज्बुल्लाह आणि इस्रायल यांच्यात हल्ल्यांची मालिका सुरू आहे.

दरम्यान, हिज्बुल्लाहने दावा केला की स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता त्यांनी उत्तर इस्रायलमधील हायफा नौदल तळाला लक्ष्य केलं. इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती, त्यापैकी बहुतेक हवेतच पाडण्यात आली.

एएफपी या वृत्तसंस्थेच्या एका पत्रकाराच्या मते या घटनांनंतर काही तासांनी लेबनॉनची राजधानी बैरूत येथे स्फोटाचा जोरदार आवाज ऐकू आला.

शनिवारी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला होता. त्यानंतर संपूर्ण मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे.

अयातुल्ला अली खामेनींच्या मुलाबद्दल इराणी माध्यमांनी काय माहिती दिली?

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मुलगा मोजतबा खामेनी सुखरूप असल्याचा दावा इराणच्या मीडियाने दावा केला आहे.

बीबीसी फारसीने मेहर या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने म्हटलं आहे की, "मोजतबा खामेनी सध्या कुटुंबातील 'शहीद' झालेल्या लोकांशी संबंधित गोष्टी पाहत आहेत. ते कामकाज सांभाळत आहेत, सल्लामसलत करत आहेत आणि देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेत आहेत."

गेल्या काही वर्षांपासून मोजतबा यांच्याकडे त्यांचे वडील अयातुल्ला अली खामेनी यांचे भावी उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते.

दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा इस्रायल-अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांमध्ये त्यांच्या कुटुंबातील आणखी काही सदस्यांचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये मोजतबा खामेनी यांच्या पत्नीचाही समावेश आहे.

सोमवारी (2 मार्च) इराणी मीडियाने खामेनी यांच्या पत्नी मन्सूरेह खोजस्तेह बगरझादेह यांच्या मृत्यूच्या वृत्तालाही दुजोरा दिला. इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये जखमी झाल्यानंतर त्या कोमामध्ये होत्या.

पश्चिम आशियातील लष्करी संघर्षात तीन भारतीयांचा मृत्यू, ओमानमध्ये काय घडलं?

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान दोन तेल टँकरवर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये तीन भारतीय नागरिक ठार झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये जहाजावरील 15-20 खलाशी जखमी झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, "एक व्यक्ती ठार झाला आणि दोन जण बेपत्ता झाले. मात्र, त्या दोघांचा शोध लागलेला नाही, त्यामुळे ते मृत असल्याचं मानलं जात आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे."

या घटनेत मृत्युमुखी पडलेले आणि जखमी झालेले भारतीय नागरिक नेमके कोणत्या राज्याचे आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

मार्शल आयलंडचा ध्वज असलेल्या 'एमकेडी व्योम' नावाच्या ध्वजांकित तेल टँकरवर हा हल्ला झाला होता. हा टँकर सौदी अरेबियाला जात असताना मस्कतजवळ ड्रोन बोटीने हल्ला करण्यात आला.

दुसरा हल्ला एमव्ही स्कायलाईट या व्यापारी जहाजावर झाला, ज्यामध्ये जहाजावरील 20 सदस्य जखमी झाले. जखमींमध्ये 15 भारतीय आणि 5 इराणी नागरिकांचा समावेश आहे.

ओमानमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर लिहिलं आहे की, "भारतीय नागरिकांना सुरक्षित आणि जलद मायदेशी परत आणण्यासाठी दूतावास ओमानच्या अधिकाऱ्यांसोबत जवळून काम करत आहे."

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या लष्करी संघर्षावर भारताने काय म्हटलं?

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत चिंता व्यक्त केली आहे. आणि या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षा ही सर्वोच्च 'प्राधान्य' असल्याचं देखील म्हटलं आहे.

मंगळवारी (3 मार्च) परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, "भारत पुन्हा एकदा संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या वापरावर भर देतो. आम्ही संघर्ष लवकर संपवण्याच्या बाजूने आहोत. अनेक जीव आधीच गेले आहेत आणि आम्ही याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो."

"दुर्दैवाने, पवित्र रमजान महिन्यात ही परिस्थिती सातत्याने आणि गंभीरपणे बिघडत चालली आहे. अलिकडच्या काळात संघर्ष तीव्र झाला आहे आणि तो इतर देशांमध्ये पसरला आहे. विनाश आणि मृत्यू वाढत आहेत, तर सामान्य जीवन आणि आर्थिक चक्र ठप्प झालं आहे." असे ते म्हणाले.

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, "जवळपास 1 कोटी भारतीय नागरिक आखाती देशांमध्ये राहतात. त्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या घडामोडींकडे भारत दुर्लक्ष करू शकत नाही. भारताचा व्यापार आणि ऊर्जा पुरवठा देखील या प्रदेशाशी जोडलेला आहे. कोणत्याही मोठ्या व्यत्ययाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो."

"भारत व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचाही तीव्र निषेध करतो. गेल्या काही दिवसांत अशा हल्ल्यांमध्ये काही भारतीयांचा मृत्यू झाला आहे किंवा ते बेपत्ता आहेत. आम्ही या प्रदेशातील देश आणि सरकारांशी संपर्कात आहोत. पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री त्यांच्या समकक्षांशी बोलले आहेत," असं या निवेदनात सांगण्यात आलं आहे.

इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांना दूतावासाने कोणत्या सूचना दिल्या?

इराणमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तेहरानमधील भारतीय दूतावासाने एक निवेदन जारी केलं आहे.

तेहरानमधील बहुतेक भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती दूतावासाने दिली आहे.

भारतीय दूतावासाने जारी केलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे की, "सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वाहतूक, जेवण आणि निवास व्यवस्था करण्यात आली आहे."

इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना दूतावासाने काही मार्गदर्शक तत्त्वे देखील दिली आहेत: "घरात राहा आणि खिडक्यांपासून दूर राहा, नेहमीच सावधगिरी बाळगा, निदर्शने किंवा निदर्शने होणारी ठिकाणे टाळा आणि भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात रहा."

इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत: +989128109115, +989128109102, +989128109109 और +989932179359

ईमेल: cons.tehran@mea.gov.in

'मी कधीच कल्पना केली नव्हती की हे घडेल'; ब्रिटनच्या भूमिकेवर ट्रम्प काय म्हणाले?

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांप्रकरणी ब्रिटनच्या भूमिकेबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली.

'द सन'शी बोलताना ट्रम्प म्हणाले, "पंतप्रधान मदत करत नाहियेत. मी कधीच कल्पना केली नव्हती की हे घडेल. ब्रिटनकडून असे होईल अशी मला कधीच अपेक्षा नव्हती."

टेलिफोनवर दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, "संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत हे पाहून खूप दुःख झाले."

सोमवारी (2 मार्च) स्टार्मर यांनी ब्रिटनच्या संसदेत सांगितले की, त्यांचे सरकार "हवाई हल्ल्यांद्वारे कोणत्याही देशात सत्ता बदल" करण्यावर विश्वास ठेवत नाही.

सुरुवातीला, ब्रिटनने अमेरिकेला इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांचे लष्करी तळ वापरण्याची परवानगी दिली नाही, परंतु नंतर हे तळ 'बचावात्मक' हल्ल्यांसाठी खुले केले.

ट्रम्प म्हणाले, "फ्रान्स उत्तम आहे. इतर सर्वजण देखील चांगले आहेत. परंतु ब्रिटनची भूमिका इतरांपेक्षा खूप वेगळी आहे."

'चीन इराणशी असलेल्या मैत्रीला महत्त्व देतो'; दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये काय चर्चा झाली?

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

2 मार्चला झालेल्या या संभाषणादरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणच्या संघर्षाबाबत परिस्थिती जाणून घेतली.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अराघची म्हणाले, "चर्चेदरम्यान अमेरिकेने दुसऱ्यांदा इराणवर हल्ला केला. अमेरिकेच्या कारवाया आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध आहेत. इराणकडे आता स्वतःचा बचाव करण्याशिवाय पर्याय नाही."

वांग यी म्हणाले, "चीन इराणशी असलेल्या दीर्घकालीन मैत्रीला महत्त्व देतो आणि इराणचे सार्वभौमत्व, सुरक्षा, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय सन्मानाच्या रक्षणासाठी त्यांचे समर्थन करतो. चीन इराणच्या वैध आणि कायदेशीर अधिकारांना देखील समर्थन देतो."

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी पुढे म्हणाले, "तणाव वाढू नये आणि संघर्ष संपूर्ण पश्चिम आशियात पसरू नये यासाठी चीन अमेरिका आणि इस्रायलला लष्करी कारवाई त्वरित थांबवण्याचे आवाहन करतो."

मोदींची सौदी अरेबिया, बहरीन आणि जॉर्डनशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (3 मार्च) बहरीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली.

नुकत्याच झालेल्या हल्ल्यांचा त्यांनी तीव्र निषेध केला. हे हल्ले देशाच्या सार्वभौमत्वावर आणि प्रादेशिक अखंडतेवर घाला घालणारे असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या कठीण काळात भारत त्यांच्या जनतेसोबत ठामपणे उभा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

याशिवाय पंतप्रधानांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशीही चर्चा केली. वेगाने बदलत असलेल्या परिस्थितीबद्दल त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.

बहरीन आणि सौदी अरेबिच्या नेत्यांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या प्रदेशात शक्य तितक्या लवकर शांतता आणि स्थैर्य परतणं खूप महत्त्वाचं आहे.

इस्रायलच्या तीन लष्करी ठिकाणांवर हल्ला केल्याचा हिजबुल्लाहचा दावा

इराण समर्थित हिज्बुल्लाह या गटाने तीन इस्रायली लष्करी तळांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.

इस्रायलने लेबनॉनच्या काही शहरांवर आणि गावांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचं हिजबुल्लाहने म्हटलं आहे.

हिजबुल्लाहने टेलिग्रामवर तीन वेगवेगळ्या पोस्ट करून म्हटलं आहे की त्यांनी इराणच्या गोलन हाइट्समधील नाफाह तळावर 'क्षेपणास्त्रांचा वर्षाव' केला आहे.

त्यांनी उत्तर इस्रायलमधील मेरोन आणि रमत डेव्हिड हवाई तळांवर ड्रोन हल्ला केल्याचंही म्हटलं आहे. मात्र, इस्रायली लष्कराने अद्याप या हल्ल्यांवर भाष्य केलेलं नाही.

सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासावर हल्ला

सौदी अरेबियातील रियाद या ठिकाणी असलेल्या अमेरिकन दूतावासावर दोन ड्रोनने हल्ला करण्यात आल्याची माहिती सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिलेल्या निवेदनात म्हटले की या हल्ल्यामुळे सौम्य आग लागली आणि इमारतीचे थोडे नुकसान झाले.

सौदी अरेबियातील अमेरिकन मिशनने जेदाह, रियाद आणि धहरान या ठिकाणी राहत असलेल्या लोकांना आपल्याच घरात सुरक्षित राहावे अशा सूचना दिल्या आहेत.

याआधी, सोमवारी कुवैतमध्ये अमेरिकन दूतावास किंवा त्याच्या जवळून धूर निघताना दिसला. त्यानंतर दूतावासाने सांगितले की बाहेर पडू नका, दूतावासात येऊ नका आणि आपल्याच घरात सुरक्षित राहा.

इस्रायल आणि अमेरिकेनी शनिवारी इराणवर हल्ला केला. त्यानंतर इराण आणि इस्रायल एकमेकांवर हल्ले करत आहेत.

पश्चिम आशियात अमेरिकेचे जे तळ आहेत त्यांना इराणकडून लक्ष्य बनवलं जात आहे.

ड्रोन हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू, ओमानमधील तेल टँकरवर काय घडलं?

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या लष्करी संघर्षात एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. ही घटना ओमानमध्ये घडली.

ओमानमधील भारतीय दूतावासाने या मृत्यूची पुष्टी केली आहे.

भारतीय दूतावासाच्या एक्स वर लिहिलं आहे की, 'एमकेडी व्योम या जहाजावरील भारतीय नागरिकाच्या दुःखद निधनाबद्दल भारतीय दूतावास त्यांच्या तीव्र शोकसंवेदना व्यक्त करतो.

जहाजावरील आमच्या नागरिकांना सुरक्षित आणि लवकर मायदेशी परत आणण्यासाठी दूतावास ओमानमधील स्थानिक अधिकाऱ्यांशी जवळून समन्वय साधत आहे.या प्रकरणात सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.'

ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "मार्शल आयलंडचा ध्वज असलेल्या 'एमकेडी व्योम' या तेल टँकरवर ड्रोनने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात इंजिन रूममध्ये आग लागली आणि स्फोट झाला. एका भारतीय क्रू मेंबरचा मृत्यू झाला."

निवेदनात म्हटले आहे की, "टँकरमधील 21 क्रू मेंबर्सना बाहेर काढण्यात आले. यामध्ये 16 भारतीय, 4 बांगलादेशी आणि एका युक्रेनियन नागरिकाचा समावेश आहे."

'अमेरिका-इराण संघर्ष आणखीन किती दिवस सुरु राहील?' अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं उत्तर

अमेरिकेचे संरक्षण मंत्री म्हणाले आहेत की अमेरिकेने इराणशी युद्ध सुरू तर केलं नाही, पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात आम्ही याचा शेवट नक्कीच करू.

सोमवारी एका ब्रीफिंग दरम्यान, अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ म्हणाले की मध्य पूर्व देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात अमेरिकेने आतापर्यंत चार सैनिक गमावले आहेत. ते म्हणाले, "जो कुणी अमेरिकेच्या सैनिकांना धमक्या देईल त्याला आम्ही माफ तर करणार नाहीच पण त्याला शोधून काढून कठोर शिक्षा करू."

हेगसेथ म्हणाले, "इराणसारख्या देशांकडे अण्वस्त्रं असू नयेत अशी सर्वसाधारण धारणा आहे. ट्रम्प या रणनीतीवर काम करण्याची हिंमत बाळगून आहेत."

ते पुढे म्हणाले, "इराणविरुद्ध सुरु असलेली ही कारवाई ही 'कधीही न संपणाऱ्या युद्धामध्ये' परिवर्तित होणार नाही. अमेरिकेला केवळ इराणची क्षेपणास्त्रं आणि आंतरिक सुरक्षा पायाभूत सुविधा नष्ट करायच्या आहेत."

हेगसेथचा आरोप, "शांतता चर्चेदरम्यान, इराण आपले क्षेपणास्त्र शस्त्रागार पुन्हा तयार करण्यासाठी आणि शस्त्रास्त्र कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी वेळ मिळवत होता पण डोनाल्ड ट्रम्प हा खेळ खेळत नाहीत."

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणच्या आण्विक ठिकाणांचं काय झालं?

बेथनी बेल

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणच्या कोणत्याही आण्विक ठिकाणाचं नुकसान झालेलं नाही. संयुक्त राष्ट्रांच्या अणुनियंत्रण संस्थेचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी याची पुष्टी केली आहे.

राफेल ग्रोसी म्हणाले, "अलीकडील अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे बुशहर अणुप्रकल्प, तेहरान संशोधन अणुभट्टी किंवा इतर अणुइंधन-संबंधित सुविधांसारख्या इराणच्या कोणत्याही आण्विक केंद्राचं कसलंही नुकसान झालेलं नाही."

ग्रोसी यांनी त्यांच्या संस्थेच्या, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (IAEA) मंडळाला सांगितले की, ही संस्था इराणच्या अणुनियामक प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

राफेल ग्रोसी म्हणाले, "इराण, बहरीन, इराक, कुवेत, ओमान, कतार आणि सौदी अरेबियासारख्या इतर देशांमध्ये आण्विक केंद्र आहेत. हे लक्षात घेता, सर्व लष्करी कारवायांमध्ये 'अत्यंत संयम' पाळला पाहिजे."

कुवेतमध्ये तीन अमेरिकन लढाऊ विमाने कुणाच्या चुकीने कोसळली?

कुवेतमध्ये कोसळलेल्या तीन अमेरिकन लढाऊ विमानांबद्दल अमेरिकन सैन्याने अपडेट जारी केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये, सेंट्रल कमांडने म्हटलं आहे की त्यांचे तीन एफ-15 विमान कुवेतमध्ये मैत्रीपूर्ण गोळीबारात पाडले गेले.

अमेरिकन सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, "कुवेत एअर डिफेन्सने चुकून अमेरिकन एअर फोर्सची लढाऊ विमाने पाडली."

निवेदनात पुढे म्हटले आहे की सर्व वैमानिक सुरक्षित आहेत. "कुवेतने घटनेची पुष्टी केली आहे आणि कुवेतच्या एअर डिफेन्स फोर्सच्या प्रयत्नांबद्दल आणि चालू ऑपरेशनमध्ये त्यांच्या पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत."

"कोणतीही नवीन माहिती उपलब्ध होताच ती शेअर केली जाईल."

'ट्रम्प यांचं अमेरिका फर्स्टऐवजी इस्रायल फर्स्टचं धोरण'

इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करत म्हटलं की, ट्रम्प यांनी त्यांचे 'अमेरिका फर्स्ट' धोरण सोडले आहे. ट्रम्प यांच्या मनमानी विचारसरणीमुळे संपूर्ण प्रदेश निरर्थक युद्धात ढकलला गेला, असा आरोप इराणने केला.

इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांनी 'एक्स'वर लिहिलं, "ट्रम्प यांनी 'अमेरिका फर्स्ट'ऐवजी आता 'इस्रायल फर्स्ट'चं धोरण आखलं आहे."

दुसऱ्या एका पोस्टमध्ये अली लारीजानी यांनी लिहिलं, "ट्रम्प यांच्या मनमानी धोरणामुळे संपूर्ण प्रदेश एका निरर्थक युद्धात अडकला आहे. आता ते अमेरिकी नागरिकांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त करत आहेत."

"नेतन्याहू यांच्या बेकायदेशीर विस्तारवादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते अमेरिकन पैसा आणि अमेरिकन लोकांचे जीव धोक्यात घालत आहेत हे खरोखरच दुर्दैवी आहे."

याआधीही अली लारीजानी यांनी एक्सवरील पोस्टद्वारे म्हटलं होतं, "आम्ही अमेरिकेसोबत कोणतीही तडजोड करणार नाही."

दरम्यान, अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलमधील एका वृत्तात असा दावा करण्यात आला होता की, इराण 'ओमानच्या मदतीने अमेरिकेसोबत चर्चा करू इच्छितो.'

एमिरेट्स एअरलाइन्स आणि कतार एअरवेजकडून फ्लाईट्सबाबत काय सांगण्यात आलंय?

इराण हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर एमिरेट्स एअरलाईन आणि कतार एअरवेजने त्यांच्या उड्डाणांबाबत नवीन माहिती दिली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जारी केलेल्या निवेदनात एमिरेट्स एअरलाईनने म्हटलं, "अनेक भागांतील हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे, एमिरेट्स एअरलाईनची दुबईला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. ही स्थगिती 3 मार्चला (UAE वेळेनुसार) दुपारी 3 वाजेपर्यंत लागू राहील."

निवेदनात पुढे म्हटलं आहे, "स्थिती सातत्याने बदलत असून त्यानुसार त्याचा आढावा घेतला जात आहे.

दुसरीकडे कतार एअरवेजने एक्सवर पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली, "कतारचे हवाई क्षेत्र बंद असल्याने कतार एअरवेजच्या उड्डाणांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे."

"कतार नागरी विमान प्राधिकरणाकडून हवाई क्षेत्र सुरक्षितपणे पुन्हा उघडण्याची घोषणा झाल्यानंतर कतार एअरवेज आपली उड्डाणे पुन्हा सुरू करेल."

अनेक अमेरिकन लष्करी विमाने कुवेतमध्ये 'क्रॅश'; संरक्षण मंत्रालयानं नेमकं काय सांगितलं?

अनेक अमेरिकन लढाऊ विमाने रविवारी (1 मार्च) सकाळी कोसळल्याची माहिती कुवेतच्या संरक्षण मंत्रालयानं दिली आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, विमानातील सर्व क्रू सदस्य सुरक्षित असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मंत्रालयानं दिली.

कुवेतने सांगितलं की ते या घटनेच्या परिस्थितीबाबत त्यांच्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्राशी चर्चा करत आहेत आणि घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.

शनिवारी (28 फेब्रुवारी) अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. रविवारी (1 मार्च) इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला.

इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला; 31 जणांचा मृत्यू, 149 जण जखमी

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलने बैरुत आणि दक्षिण लेबनॉनवर हल्ला केला आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार या हल्ल्यांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला असून 149 जण जखमी झाले आहेत.

मृतांचा हा आकडा प्राथमिक असून तो वाढू शकतो.

यापूर्वी इस्रायलने लेबनॉनमधील 50 हून अधिक शहरं आणि गावांतील रहिवाशांना इशारा दिला होता की हल्ल्यांपासून बचावासाठी त्यांनी तात्काळ आपली घरे रिकामी करावीत.

दरम्यान, इस्रायली लष्कराने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, हिज्बुल्लाहकडून झालेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात लेबनॉनमधील लक्ष्यांवर हल्ले केले जात आहेत.

त्यांनी लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागल्याच्या वृत्ताला हिज्बुल्लाहनेही दुजोरा दिला आहे.

ही कारवाई इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येच्या प्रत्युत्तरादाखल करण्यात आल्याचं हिज्बुल्लाने म्हटलं होतं.

इराण-इस्रायल संघर्षानंतर पंतप्रधान मोदींनी बोलावली कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक

इराण आणि अमेरिका-इस्रायलच्या संघर्षानंतर भारताने रविवारी (1 मार्च) उशीरा संध्याकाळी कॅबिनेट सुरक्षा समिती (सीसीएस)ची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले.

बैठकीत पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच या प्रदेशात मोठ्या संख्येनं असलेल्या भारतीय प्रवासी समुदायाच्या सुरक्षेबाबत समितीने चिंता व्यक्त केली.

सीसीएसने भारतीय प्रवासी आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचाही आढावा घेतला.

सीसीएसने सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या की या भागातील भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आवश्यक आणि शक्य ती पावले उचलावीत.

बैठकीत संघर्ष लवकरात लवकर थांबवण्याची आणि संवाद व कूटनीती पुन्हा सुरू करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

मुस्लिम देशांचे इराणला हल्ले थांबवण्याचे आवाहन, दिला 'हा' इशारा

गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल (GCC)च्या सदस्य देशांची रविवारी (1 मार्च) बैठक झाली. या बैठकीत इराणच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा करण्यात आली.

जीसीसीच्या मते, नागरी ठिकाणे आणि निवासी भागांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

जीसीसीमध्ये संयुक्त अरब अमिरात (UAE), बहरिन, सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि कुवेत यांचा समावेश आहे.

या सर्व देशांनी इराणच्या हल्ल्यांचा निषेध केला आणि इराणवर आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

जीसीसीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात इराणला हल्ले थांबवण्याचे आवाहन करण्यात आले.

आपल्या सुरक्षेच्या रक्षणासाठी आपण 'सर्व आवश्यक पावले' उचलू, असा इशाराही या गटाने दिला.

इराणची राजधानी तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज, इंटरनेटवरही निर्बंध

इराणची राजधानी तेहरानमधील एका रहिवाशाने बीबीसीला सांगितले की, त्यांना स्फोटांचे आवाज ऐकू येत होते.

त्यांनी सांगितले की, अमेरिका सध्याच्या इराणी नेतृत्वासोबत कोणती तडजोड करेल का? हीच आम्हाला वाटणारी 'सर्वांत मोठी भीती' आहे.

"खामेनी यांचा मृत्यू पुरेसा नाही, त्यांना सर्वांनाही (अधिकाऱ्यांना) जावे लागेल."

त्यांनी पुढे म्हटलं की, तेहरानच्या रस्त्यांवर सुरक्षा दलांची उपस्थिती दिसून येत आहे. पण बहुतेक ठिकाणी रस्ते ओस पडलेले आहेत.

इंटरनेटवरील निर्बंधांमुळे सध्या देशात नेमकं काय घडत आहे, याचं स्पष्ट चित्र मिळणे अत्यंत कठीण झाले आहे.

ट्रम्प म्हणाले, ' उद्दिष्टं पूर्ण होईपर्यंत इराणवर कारवाई सुरू राहणार'

इराणविरुद्धची लष्करी कारवाई पूर्ण ताकदीने सुरू आहे आणि आमची सर्व उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत त्या सुरूच राहतील, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ट्रम्प यांनी इराणविरोधातल्या लष्करी कारवाईविषयी एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ट्रम्प यांनी म्हटलं की, "दुर्दैवाने अमेरिकन जीवितहानीचा आकडा वाढू शकतो. त्यांनी पुढे म्हटलं: "हे असंच असतं."

ट्रम्प यांनी म्हटलं की, "ज्यांनी मुळातच एखाद्या संस्कृतीविरोधात युद्ध छेडलं आहे, अशा कट्टरवाद्यांवर अमेरिका सर्वांत कठोर प्रहार करेल आणि मृत्यूंचा बदला घेईल."

ट्रम्प यांनी या व्हीडिओत म्हटलं आहे, की "मी पुन्हा एकदा रेव्होल्यूशनरी गार्ड्स आणि इराणी लष्करी पोलिसांना आवाहन करतो की, शस्त्रे खाली ठेवा आणि पूर्ण शरणागती स्वीकारा, अन्यथा मृत्यूला सामोरे जा. आणि तो सुखद नसेल."

अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला आहे.

त्यानंतर इराणकडूनही प्रतिकार करत प्रतिहल्ले करण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदींची नेतन्याहू यांच्याशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (1 मार्च) रात्री उशीरा इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याशी बोलतानाअलीकडील घडामोडींविषयी भारताला काय काळजी वाटते हे व्यक्त केले असून नागरिकांची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य असली पाहिजे, हेही स्पष्ट केलं.

पंतप्रधान मोदी यांनी लवकरात लवकर हा संघर्ष थांबवणे आवश्यक असल्याचेही पुन्हा एकदा अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी रविवारी (1 मार्च) रात्री संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायेद अल नाहयान यांच्याशीही चर्चा केली.

यूएईवर झालेल्या हल्ल्यांचा पंतप्रधान मोदी यांनी निषेध केला असून यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल शेख मोहम्मद बिन जायेद अल नाहयान यांचे आभार मानले आहेत.

अमेरिका आणि इस्रायल यांनी शनिवारी (27 फेब्रुवारी) इराणवर मोठे हल्ले केले होते, ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला.

आखाती राष्ट्रांच्या गटाचा इराणला इशारा

गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलच्या सदस्यांनी रविवारी GCC च्या सदस्य देशांवर इराणी हल्ल्यांमुळे झालेल्या हानीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. त्यात नागरी सुविधा आणि नागरी क्षेत्रांना लक्ष्य करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

संयुक्त अरब अमिराती, बहरीन, सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि कुवैत यांचा समावेश असलेल्या जीसीसीने या हल्ल्यांचा निषेध केला आणि इराणवर त्यांच्या सार्वभौमत्वाचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

जीसीसीने निवेदनाद्वारे इराणला हल्ले थांबवण्याचं आवाहन केलं. तसंच स्वसंरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

लॉस एंजेलिसमधील इराणींनी साजरा केला आनंद

इराणबाहेर इराणी लोकांचा सर्वात मोठा समूह असलेल्या लॉस एंजेलिसमध्ये पोलिसांनी इराणी अमेरिकन्सना रस्त्यावर उतरून आनंद साजरा करता यावा, नाचता यावं म्हणून रस्ते बंद केले.

अनेक इराणी याठिकाणी जमले आणि त्यांनी आनंद साजरा केला.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या आभाराचे फलक दाखवत इराणी अमेरिकन लोकांनी त्यांना इराणच्या भविष्याबद्दल आशा आहे, असं म्हटलं.

तेलाच्या किमती वाढल्या

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर जागतिक तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

सोमवारी (2 मार्च) सकाळी आशियातील ऊर्जा बाजार सुरू झाले तेव्हा ब्रेंट क्रूड आणि नायमेक्स लाईट स्वीट ऑईल या दोन्हींच्या किमती 10% पेक्षा जास्त वाढल्या, परंतु काही प्रमाणात तेजी कमी झाली.

हे वृत्त लिहिताना क्रूड तेल जवळजवळ 9% वाढून 79.30 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते, तर नायमेक्स सुमारे 8.5% वाढून 72.70 डॉलर वर पोहोचले होते.

ट्रम्प यांचे अधिकारी मंगळवारी काँग्रेसला माहिती देणार

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि उच्च संरक्षण अधिकारी मंगळवारी अमेरिकन काँग्रेसला इराणबद्दल माहिती देणार आहेत, असं वृत्त सीबीएस न्यूजने एका सूत्राचा हवाला देत दिलं आहे.

सीबीएस या अमेरिकेतील बीबीसीच्या सहयोगी संस्थेनं म्हटलं आहे की, संरक्षण सचिव पीट हेगसेथ, जॉइंट चीफ्सचे अध्यक्ष डॅन केन आणि सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ देखील काँग्रेसला माहिती देतील.

अधिकारी सिनेट आणि हाऊसशी वेगवेगळ्या सत्रांमध्ये बोलतील, असं सांगण्यात आलं आहे.

युरोपियन युनियनची प्रतिक्रिया

युरोपियन युनियनच्या सर्वोच्च राजदूत काजा कल्लास यांनी मध्य पूर्वेतील घटनांमुळं युरोप आणि त्यापलिकडेही धोका निर्माण होईल आणि त्याचे काही अनपेक्षित परिणाम असतील, अशा प्रकारचा तणाव आणखी वाढायला नको असं म्हटलं आहे.

हल्ले झालेल्या भागातील युरोपियन नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

इराणनं अण्वस्त्रं मिळवू नये आणि तणाव कमी व्हावा यासाठी एक कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठीच्या सर्व राजनैतिक प्रयत्नांमध्ये आम्ही सहकार्य करत राहू असंही त्यांनी म्हटलं.

'काहीही कसर सोडणार नाही', इस्रायलच्या लष्कराचा इशारा

इस्रायलच्या लष्कराचे प्रमुख लेफ्टनंट जनरल इयाल झमीर यांनी हे युद्ध आणखी बरेच दिवस सुरू राहील, असं म्हटलं.

आयडीएफनं रविवारी टेलिग्रामच्या माध्यमातून ही घोषणा केली. जनरल स्टाफ फोरमबरोबर संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला असल्याचं त्यांनी त्यात म्हटलं.

"आयडीएफ आमच्या कारवाईला गती देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल," असंही झमीर म्हणाले.

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायल शस्त्रसाठा संपण्याच्या चिंतेमुळं शक्य तेवढ्या लवकर उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं, लष्करी तज्ज्ञांनी वॉल स्ट्रीट जर्नलशी बोलताना म्हटलं.

दुसरीकडं झमीर यांनी बेत शमेशमध्ये झालेल्या मृत्यूंच्या वृत्तालाही टेलिग्राम पोस्टद्वारे दुजोरा दिला.

सुरुवात कशी झाली?

इस्रायलने इराणवर 'प्री-एम्प्टीव्ह अटॅक' अर्थात 'प्रतिबंधात्मक हल्ला' केला आहे, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली होती.

'प्री-एम्प्टीव्ह अटॅक' म्हणजे असा हल्ला ज्यामध्ये हल्ला करणाऱ्या देशाला असं वाटतं की, दुसरा देश त्याच्यावर हल्ला करणार आहे.

त्यासाठी आधीच समोरच्या देशावर हल्ला केला जातो.

इस्रायलने इराणविरुद्ध असाच 'प्री-एम्प्टीव्ह अटॅक' सुरू केला.

रविवारी (1 मार्च) सकाळी एका निवेदनात, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी संपूर्ण इस्रायलमध्ये 'विशेष आणि कायमस्वरूपी आणीबाणीची परिस्थिती' जाहीर केली.

तर दुसरीकडे, या हल्ल्यासाठी आपण इस्रायलला सहकार्य केलं असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच ट्रुथ सोशलवर आठ मिनिटांचा व्हीडिओ पोस्ट केला. या व्हीडिओमध्ये त्यांनी इराणवरील हल्ल्यात अमेरिका सहभागी असल्याचं स्पष्ट केलं.

इस्रायली लष्कराने देशभरातील अनेक भागात हवाई हल्ल्याचे सायरन वाजवले आहेत, जेणेकरून लोक इराणकडून प्रतिहल्ला म्हणून होणाऱ्या कारवाईसाठी तयार राहतील.

ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)