ॲपवर ओळख, 'ड्रीम डेट'ची सफर आणि शेवटी हजारो रुपयांचं बिल; मुंबईत उघड झालेल्या 'डेट स्कॅम'चा फंडा काय?

सायबर क्राइम

फोटो स्रोत, Alpesh Karkare

फोटो कॅप्शन, डेटिंग अ‍ॅपवर ओळख करुन फसवणूक करणाऱ्यांचे रॅकेट मुंबई पोलिसांनी उघड केले आहे.
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"एका डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या मुलीने मला कॅफेत भेटायला बोलावलं. आम्ही बोलत बसलो असताना सतत ड्रिंक्स आणि फूडच्या ऑर्डर्स येत राहिल्या. पण थोड्या वेळात ती अचानक टॉयलेटला उठून गेली आणि परत आलीच नाही. शेवटी 18 हजार रुपयांचं बिल झालं आणि ते भरण्यासाठी कॅफेतील बाऊन्सर्सनी माझ्यावर दबाव टाकला."

मुंबईतील एका तरुणाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितलेला हा अनुभव आहे.

ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाही. डेटिंग ॲपवरून ओळख करून लोकांना जाळ्यात ओढून हजारो रुपयांची बिलं लावणाऱ्या कथित 'डेट स्कॅम'चा मुंबई पोलिसांनी उलगडा केला आहे.

पोलीस तपासानुसार हा प्रकार फक्त दोन व्यक्तींमधील डेट नसून एक संघटित रॅकेट असल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणात तीन महिलांसह 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून हे सिंडिकेट किती मोठं आहे आणि यात आणखी कोण कोण सहभागी आहे याचा अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत.

मात्र आरोपींची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी आणि त्यांच्या वकिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, पण संपर्क होऊ शकला नाही.

डेटिंग ॲपपासून सुरू होणारी फसवणूक

फसवणूक झालेल्या एका तरुणाच्या माहितीनुसार, त्याची ओळख एका महिलेशी डेटिंग ॲपवर झाली. काही दिवस दोघांमध्ये साधं चॅटिंग सुरू राहिलं. संभाषण मैत्रीपूर्ण होत गेलं आणि आठवड्याभरातच भेटण्याचा प्रस्ताव आला.

महिलेनं मुंबईतील साकीनाका परिसरातील एका क्लब कॅफेत भेटण्यास सांगितलं. त्यानुसार तरुण ठरलेल्या दिवशी तिला भेटण्यासाठी गेला. कॅफेच्या परिसरात त्यांची भेट झाली आणि मुलीने इथे चांगलं जेवण मिळतं असं सांगत त्याला एका क्लब कॅफेमध्ये नेलं.

तिथे गेल्यावर दोघांमध्ये काय खायचं आणि पिण्याबद्दल चर्चा झाली. थोड्याच वेळात वेटरने मुलीच्या हातात मेन्यू कार्ड दिलं. तिने काही ड्रिंक्स आणि महागडे खाद्यपदार्थ ऑर्डर केले. सगळं येईपर्यंत दोघांमध्ये संवाद सुरू होता.

यानंतर ड्रिंक्स घेणं आणि खाणं सुरू झालं. मात्र सतत नवीन ड्रिंक्सची ऑर्डर दिली जात होती.

सायबर क्राइम

फोटो स्रोत, Alpesh Karkare

काही वेळानंतर मुलीने टॉयलेटला जाते असं सांगितलं. तेवढ्यात टेबलवर 15 हजार रुपयांचं बिल आलं.

इतकं मोठं बिल पाहून मी थक्क झालो. मुलगी अजून का परत आली नाही यासाठी मी तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क झाला नाही.

मी ती घेत असलेल्या ड्रिंक्सचा वास घेतला तेव्हा लक्षात आलं की ते अल्कोहोल नसून साधं सॉफ्ट ड्रिंक आहे. त्यानंतर मी काउंटरवरील मॅनेजरला ही बाब सांगितली. मात्र त्यांनी ते ऐकून घेतलं नाही आणि बाऊन्सर्स व वेटर यांच्या दबावाखाली बिल भरण्यास सांगितलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही फसवणूक आहे.

पोलीस आणि तरुणांच्या मदतीने स्कॅम उघड

अनेक तरुणांच्या अशा अनुभवांनंतर त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने हे प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास आणण्यात आलं. त्यानंतर काही तरुण आणि पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करून हा स्कॅम उघड करण्याचा प्रयत्न केला.

काही तरुणांनी डेटिंग ॲपवर खोटी लॉगिन आयडी तयार केली आणि सबस्क्रिप्शन घेऊन काही मुलींशी संवाद साधला. त्यातील एका तरुणाची एका मुलीशी ओळख झाली. काही दिवस संवाद झाल्यानंतर मुलीने साकीनाका परिसरात भेटण्याचा प्रस्ताव दिला.

तरुणाने वांद्रे परिसरात भेटू असं सुचवलं. मात्र मुलीने साकीनाका परिसरात चांगलं जेवण मिळतं असं सांगत तिथेच बोलावलं.

त्या तरुणाने याबाबत पोलिसांशी संपर्क साधून सर्व माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पथक तैनात करून सापळा रचला आणि संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं.

सायबर क्राइम

फोटो स्रोत, Alpesh Karkare

मुलीने तरुणाला क्लब कॅफे नावाच्या एका हॉटेलमध्ये नेलं. गप्पा सुरू असतानाच वेटरने मुलीच्या हातात मेन्यू कार्ड दिलं. त्यानंतर मुलीने ड्रिंक्स आणि महागडे खाद्यपदार्थ मागवले.

नेहमीप्रमाणे काही वेळाने मुलगी टॉयलेटला जाते असं सांगून निघून गेली आणि परत आली नाही. बिल आल्यानंतर तरुणाने मॅनेजरकडे काही प्रश्न उपस्थित केले. मात्र त्याच्यावर बिल भरण्यासाठी दबाव आणण्यात आला.

यानंतर पोलिसांनी पंच आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत कॅफेवर छापा टाकला आणि संबंधितांना ताब्यात घेतलं.

या प्रकरणात तीन महिलांसह 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये रेस्टॉरंट मॅनेजर, ऑपरेटर, बाऊन्सर यांचा समावेश आहे.

पोलिसांनी आरोपींवर कलम 308 (खंडणी) आणि 318 (फसवणूक) तसेच BNS आणि आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

कॅफेमध्ये काय आढळलं?

छाप्यात पोलिसांना कॅफेमध्ये वेगवेगळ्या केबिनमध्ये अनेक पुरुष आणि महिलांची जोडपी बसलेली दिसली.

तपासादरम्यान काही महिलांच्या मोबाईलमध्ये डेटिंग ॲपवर झालेल्या संभाषणांचे पुरावे आढळले. तपासात हेही समोर आलं की काही महिला ग्राहकांशी डेटिंग ॲपवर संपर्क साधून त्यांना त्या कॅफेत बोलावत होत्या.

पोलिसांच्या मते या रॅकेटमध्ये महिलांचा गट, कॅफे कर्मचारी, व्यवस्थापक आणि बाऊन्सर यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. ग्राहकांकडून वसूल केलेल्या पैशांचा वाटा या सर्वांमध्ये केला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

सायबर क्राइम

फोटो स्रोत, Alpesh Karkare

फोटो कॅप्शन, काही प्रकरणांमध्ये ग्राहकांकडून 15 हजार ते 40 हजार रुपयेपर्यंत बिल आकारल्याचे आरोप आहेत.

काही महिलांनी वेगवेगळ्या नावांनी प्रोफाइल तयार केल्याचंही समोर आलं. अशा प्रकारच्या फसवणुकीत अनेक लोक बळी पडले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

काही प्रकरणांमध्ये ग्राहकांकडून 15 हजार ते 40 हजार रुपयेपर्यंत बिल आकारल्याचे आरोप आहेत. तपासादरम्यान बिलांची मशीन आणि अनेक बिलं ताब्यात घेण्यात आली.

मुंबईत गेल्या काही महिन्यांत अनेक प्रकरणं

डेटिंग ॲपद्वारे फसवणुकीची गेल्या काही महिन्यांत मुंबईत अनेक प्रकरणं समोर आली आहेत. बोरिवली येथे जुलै महिन्यात असेच एक प्रकरण उघड झालं होतं. त्यामध्ये 22 जणांना अटक करण्यात आली होती.

विविध डेटिंग ॲपच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रकार घडत असल्याने पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सायबर क्राइम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

यासंदर्भात बोलताना पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे म्हणाले की, आम्हाला याप्रकरणी तक्रार आली होती. त्यानुसार सापळा रचून मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हे सिंडिकेट किती मोठं आहे याचा तपास सुरू आहे. आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून त्यांची सर्व बाजूने चौकशी सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपी आणि त्यांच्या वकिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. संपर्क झाल्यास ही माहिती अपडेट करण्यात येईल.

डेटिंग ॲप वापरताना कोणती काळजी घ्यावी?

सायबर गुन्हे तज्ज्ञ प्रशांत माळी यांच्या मते, एआयच्या युगात डेटिंग अ‍ॅप्स वापरताना अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अनेकदा समोरचे प्रोफाइल खोटे, बॉटवर आधारित किंवा डीपफेक तंत्रज्ञानाने तयार केलेले असू शकते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती, फोटो-व्हिडिओ किंवा आर्थिक तपशील शेअर करू नयेत.

कोणी अचानक पैसे, ओटीपी किंवा गुंतवणुकीची ऑफर मागितल्यास त्वरित सतर्क व्हावे आणि शक्य असल्यास व्हिडिओ कॉलद्वारे व्यक्तीची खात्री करून घ्यावी.

तसेच डेटिंग अ‍ॅपवर ओळख झाल्यानंतर लगेच भेटण्याचा आग्रह केला किंवा ठराविक कॅफे-बारमध्येच भेटण्यावर जोर दिला तर संशय घ्यावा. ऑर्डर आणि बिल नीट तपासल्याशिवाय पैसे देऊ नयेत. परिस्थिती संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देणे हेच सुरक्षिततेचे महत्त्वाचे पाऊल आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.