'माझ्या नवऱ्यानं सेक्स आणि पुरातन वस्तूंसाठी साडेसात कोटी रुपये चोरले', एका औषधाचा चमत्कारिक परिणाम

    • Author, नोएल टिथरेज
    • Role, तपास प्रतिनिधी
    • Author, ल्युसी बर्न्स
    • Role, बीबीसी न्यूज
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

फ्रान्सिस यांना एक फोन आला. त्यावेळेस त्या नुकत्याच कामावर आलेल्या होत्या. या फोनमुळे त्यांच्या आयुष्यात उलथापालथ झाली.

पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पतीला अटक केली. त्यांचा पती अँड्र्यू सॉलिसिटर होता. क्लायंटची फसवणूक केल्याचा आरोपाखाली अँड्र्यू याला अटक करण्यात आली होती. हे जोडपं त्यांच्या दोन मुलांसह ज्या घरात राहत होतं, त्या घराची पोलीस झडती घेत होते.

अँड्र्यूचं कार्यालय मँचेस्टरच्या दक्षिणेस असलेल्या एका हिरव्यागार गावात होतं. तिथलं दृश्यदेखील टीव्हीवरील एखाद्या मालिकेतील नाट्यमय दृश्यासारखं दिसत होतं. कार्यालयाभोवती गुन्ह्याच्या ठिकाणी वापरतात तशा पिवळ्या टेप होत्या, तिथल्या कर्मचाऱ्यांना धक्का बसलेला होता आणि रेकॉर्ड्स खोक्यांमध्ये भरले जात होते.

डिमेंशिया असलेल्या अनेक वृद्ध लोकांसाठी निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार (पॉवर ऑफ ॲटर्नी) अँड्र्यू किंवा त्याच्या फर्मला होता. मात्र पोलिसांना आढळलं की अँड्र्यूच्या क्लायंटचे कोट्यवधी रुपये गायब होते. अधिकाऱ्यांना नंतर आढळलं की अँड्र्यूनं ॲडल्ट वेबकॅम वेबसाईट्स, सेक्स वर्कर्स आणि पुरातन वस्तूंवर ते पैसे खर्च केले होते.

हे सर्व 12 वर्षांपूर्वी झालं होतं.

अँड्र्यूवर क्लायंटचे लाखो पौंड चोरल्याचा खटला

यानंतर जो खटला दाखल झाला, त्यात न्यायालयात सांगण्यात आलं की अँड्र्यूचं जे आवेगपूर्ण वागणं होतं, ते त्याला पार्किन्सनच्या आजारासाठी दिल्या गेलेल्या औषधांमुळे झालं होतं.

अँड्र्यूनं त्याच्या 13 ग्राहकांचे पैसे चोरले होते. यातील दोनजण वगळता, सर्वांचं वय 80 वर्षांपेक्षा जास्त होतं. त्यातील काहीजण आजारी होते. या सर्वांच्या खात्यातून एकूण 6,00,000 पौंड (अंदाजे 7 कोटी 40 लाख 58 हजार रुपये) काढण्यात आले होते.

वृद्धाश्रमात (केअर होम) राहणाऱ्या एका 87 वर्षांच्या वृद्ध महिलेचा या चोरीनंतर लवकरच मृत्यू झाला. ती मागं सोडून गेलेलं पैसे किंवा मालमत्ता तिच्या अंत्यंसंस्काराचा खर्च करण्यासाठी पुरेसे नव्हते.

"लोक आम्हाला ओळख दाखवू इच्छित नव्हते आणि मी ते पूर्णपणे समजू शकते," असं फ्रान्सिस म्हणतात. अँड्र्यूनं जे केलं त्याचा विचार त्या असं म्हणतात. तर त्यांची मुलगी ॲलिस म्हणते की तिच्या वडिलांना 'नेहमीच अपराधीपणाचं वाटतं.'

अँड्र्यूच्या कृतीचे नंतर दु:खद, दुर्दैवी परिणाम झाले.

त्याचं प्रकरण अत्यंत टोकाचं आहे - मात्र ते एकमेव प्रकरण नाही.

अनेक रुग्ण आणि त्यांची कुटुंबीय औषधांच्या दुष्परिणामांनी पीडित

गेल्या वर्षभरात, आम्ही अनेक कुटुंबांशी बोललो. या कुटुंबांचं आयुष्य 'डोपामाईन अगोनिस्ट' नावाच्या औषध प्रकारामुळे निर्माण झालेल्या आवेगपूर्ण वर्तनामुळे उदध्वस्त झालं आहे.

या वर्तनात, नवीन लैंगिक इच्छांच्या लालसेचा समावेश आहे. उदाहरणार्थ पॉर्गोग्राफी आणि सेक्स वर्कर्सचं व्यसन. त्याशिवाय शॉपिंगची सवय किंवा वेड आणि जुगार यामुळेदेखील लोकांना लाखो किंवा कोट्यवधी रुपयांची किंमत मोजावी लागली आहे.

ही औषधं, पार्किसन्स, रेस्टलेस लेग सिंड्रोम आणि इतर आजारांवरचे प्रस्थापित किंवा मान्यताप्राप्त उपचार आहेत. गेल्या वर्षी फक्त इंग्लंडमध्येच डॉक्टरांनी 15 लाख वेळा ही औषधं रुग्णांना लिहून दिली आहेत.

नॅशनल हेल्थ सर्व्हिसचा स्पष्ट सल्ला आहे. जर तुम्ही ही औषध घेत असाल आणि तुम्हाला काही काळजी वाटत असेल किंवा समस्या असेल तर, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोललं पाहिजे.

औषधांच्या दुष्परिणामांबद्दल 2010 मध्ये 3,000 हून अधिक लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, औषधं घेणाऱ्या पार्किन्सनच्या 6 पैकी 1 रुग्ण आवेगावर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येणाऱ्या आजारांनी (इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर) ग्रस्त आहे.

आमच्या तपासणीला प्रतिसाद देताना खासदारांच्या आरोग्य निवड समितीच्या अध्यक्षांनी आमच्या निष्कर्षांचं वर्णन 'विनाशकारी' असं केलं आहे. तसंच त्यांनी युकेतील औषध नियामकाला अधिकृत इशाऱ्यांचा आढावा घेण्यासाठी पत्र लिहिलं आहे.

रुग्णांना औषधांच्या दुष्परिणामांचा इशारा दिला न जाणं

आम्ही ज्या लोकांशी बोललो, त्यापैकी अनेकांनी आम्हाला सांगितलं की औषधं घेतल्यानंतर अशा कोणत्याही आवेगपूर्ण वर्तनाचा इतिहास नव्हता. जेव्हा त्यांना याप्रकारचा अनुभव आला, तेव्हा त्यांनी त्यांच्या औषधांशी याचा कोणताही संबंध लावला नाही. म्हणजे त्यांच्या समस्यांचा औषधांशी संबंध असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही.

त्यांचं म्हणणं आहे की याबाबत योग्य तो इशारा देण्यात किंवा औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणांमावर लक्ष ठेवण्यात डॉक्टर अपयशी ठरले.

या प्रकरणात, 2013 च्या उन्हाळ्यात, अँड्र्यूला अटक झाल्यानंतरच्या वीकेंडच्या दिवशी, त्यानं कुटुंबासमोर खंबीरपणे उभं राहण्याचा प्रयत्न केला होता, असं ते म्हणतात. मात्र त्या रविवारी तो घरी कोसळला आणि त्याला ए अँड ईमध्ये (अपघात आणि तात्काळ उपचार विभाग) नेण्यात आलं.

काही वर्षांपूर्वी त्याला पार्किन्सन्स झाल्याचं निदान झालं होतं. जेव्हा त्याला झटके येऊ लागले, तेव्हा डॉक्टरांनी त्याला प्रामिपेक्सोल नावाचं औषध लिहून दिलं होतं. या औषधाचे परिणाम 'चमत्कारिक' होते, असं फ्रान्सिस यांनी सांगितलं.

प्रामिपेक्सोल आणि तत्सम औषधं डोपामाईनची क्रिया वाढवण्याचं काम करतात. डोपामाईन हे रसायन, आपल्या हालचालींचं नियमन करण्यास मदत करतं. मात्र त्याचबरोबर ते समाधान देण्याची किंवा महत्त्वाचं कृत्य केल्याची आणि आनंदाची भावनादेखील वाढवतं.

अँड्र्यूच्या कुटुंबानुसार, अँड्र्यूची पार्किन्सनमुळे होणारी थरथर किंवा कंपनं यामुळे नाट्यमयरित्या कमी झाली होती आणि तो लवकरच पुन्हा टेनिस खेळू लागला होता.

मात्र तो कोसळल्यानंतर ए अँड ईमध्ये डॉक्टरांनी फ्रान्सिस यांना विचारलं की जे लोक प्रामिपेक्सोल घेतात त्यांच्यामध्ये विविध प्रकारची आवेगपूर्ण वर्तन निर्माण होऊ शकतं, हे त्यांना माहित आहे का?

अँड्रूयूच्या वर्तनातील बदल आणि त्यामागचं कारण

फ्रान्सिस म्हणतात की त्यांना हा 'अचानक मोठा धक्का' होता. अँड्र्यूच्या डॉक्टरबरोबरच्या सर्व भेटींना उपस्थित राहूनही त्यांना कधीही याबाबत इशारा का देण्यात आला नाही, हे त्यांना समजत नव्हतं.

त्या म्हणतात, या औषधांच्या संभाव्य दुष्परिणामांमुळे, अखेर अँड्रूयूला शॉपिंगची सवय किंवा वेड का होतं हे स्पष्ट झालं. अर्थात त्यावेळेस त्यांना अँड्र्यूच्या खर्चाच्या खऱ्या प्रमाणाबद्दल काहीच माहित नव्हतं.

निदान होण्याआधी, अँड्र्यू साधारणपणे आठवड्यातून एकदा वेबकॅम आणि सेक्स-चॅट करणाऱ्या वेबसाईट वापरत असे. मात्र त्यानं या गोळ्या घेण्यास सुरुवात केली त्यावर्षी, त्यानं यासाठी जवळपास 500 वेळा पेमेंट्स केले.

अँड्र्यूनं त्याच्या ग्राहकांचे पैसे वापरून फक्त एकाच वेबसाईटवर तब्बल 1,00,000 पौंडांपेक्षा (अंदाजे 1 कोटी 23 लाख 66 हजार रुपये) जास्त रक्कम खर्च केली. तसंच त्यानं फक्त चार महिन्यांमध्ये सेक्स वर्कर्सवर जवळपास 80,000 पौंड (अंदाजे 98 लाख 92 हजार रुपये) देखील खर्च केले.

जेव्हा त्याला अटक करण्यात आली, तेव्हा त्याच्या मोबाईल फोनमध्ये 90 वेगवेगळ्या सेक्स वर्कर्सचे (एस्कॉर्ट्स) नंबर असल्याचं आढळलं होतं.

अँड्र्यूला इतिहासाची प्रचंड आवड होती. त्यानं जुने पेन, मातीची भांडी आणि क्रिकेटशी संबंधित स्मृतिचिन्हं यांचीदेखील खरेदी करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी त्याच्यावर छापा टाकण्यापूर्वीच्या 6 महिन्यांमध्ये त्यानं ईबेवर 85,000 पौंड (अंदाजे 1 कोटी 5 लाख 9 हजार रुपये) खर्च केले होते.

हॅरीचा दुर्दैवी मृत्यू

"अटक झाल्यापासून वडिलांना अत्यंत लाजिरवाणं वाटत होतं. त्यामुळे ते घरातून बाहेर पडलेच नाहीत," असं ॲलिस म्हणाली.

एक वर्षाहून अधिक काळ या कुटुंबानं वाट पाहिली. शेवटी सरकारी वकिलांनी अँड्र्यूवर फसवणुकीचा आरोप लावला.

फ्रान्सिस म्हणतात की त्यांचा मुलगा हॅरी याचं 'त्याच्या वडिलांवर खूप प्रेम होतं.' हॅरीला दीर्घकाळापासून मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या. त्यामुळे त्याला त्याच्या वडिलांना अटक झाल्यानंतर जे घडलं, त्याला 'तोंड देणं खूपच कठीण गेलं'.

हॅरीचं मानसिक आरोग्य इतकं बिघडलं की त्याला मानसोपचारांसाठीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथून घरी परतल्यानंतर हॅरी गायब झाला. काही आठवड्यांनी त्याचा मृतदेह सापडला. त्यानं आत्महत्या केली होती.

न्यायालयाकडून अँड्र्यू दोषी

न्यायालयानं 2015 मध्ये अँड्र्यूला दोषी ठरवलं. शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी सांगितलं की अँड्र्यूनं, त्याच्या क्लायंटचे पैसे 'सेक्सचं व्यसन' आणि 'अयोग्य उधळपट्टी'साठी विविध प्रकारे वाया घालवले आहेत.

न्यायमुर्ती ओपनशॉ म्हणाले की अँड्र्यूनं केलेलं कृत्य, तो घेत असलेल्या औषधांमुळे केलं आहे असं त्यांना वाटतं. मात्र त्यांचं म्हणणं होतं की तो एक कार्यरत सॉलिसिटर होता. तो अजूनही इतर मार्गांनी सक्षमपणे त्याचा व्यवसाय करू शकत होता.

न्यायाधीश म्हणाले की, कुटुंब, मित्र आणि सल्लागार असलेला माणूस म्हणून अँड्र्र्यूनं त्यांच्या मदत घ्यायला हवी होती आणि औषधांचा त्याच्यावर काय परिणाम होतो आहे, हे लक्षात घ्यायला हवं होतं.

अँड्र्र्यूला मँचेस्टरच्या एचएम तुरुंगात 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा तुरुंग स्ट्रेंजवेज म्हणून ओळखला जातो.

या प्रकरणाचा तपास होत असताना, अँड्र्यूच्या सर्व मालमत्ता गोठवण्यात आल्या. त्यानं त्याच्या क्लायंटचे जे पैसे चोरले होते, त्यातील काही रक्कम परत मिळवता येण्यासाठी त्याची मालमत्ता गोठवण्यात आली.

अँड्र्यूच्या कुटुंबाला त्याच्या डॉक्टरांच्या विरोधात वैद्यकीय निष्काळजीपणाचा खटला सुरू करता आला नाही. कारण गंभीर गुन्ह्याशी संबंधित नुकसान भरपाईचा दावा कायद्यानं रोखला जाऊ शकतो.

अँड्र्यूची तुरुंगातून सुटका आणि आत्महत्या

अँड्र्यू तुरुंगात असतानाच, फ्रान्सिस आणि अँड्र्यूचा घटस्फोट झाला. दोन वर्षे शिक्षा भोगल्यानंतर तो तुरुंगातून सुटला आणि तो वृद्धांसाठी असणाऱ्या राहण्याच्या निवारागृहात गेला.

अँड्र्यूच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की, तुरुंगात राहण्याचा त्याच्यावर परिणाम झाला होता. विशेषकरून कोरोनाच्या काळातील लॉकडाऊन त्याच्यासाठी कठीण होतं. डोपामाईन ॲगोनिस्ट औषधाचा त्याच्यावर परिणाम झाल्याचं आणि त्याचा पार्किन्सन वाढत असल्याचं लक्षात आल्यावर त्यानं लगेचच ते औषध घेणं बंद केलं होतं.

ॲलिस म्हणाली, मला वाटतं, "त्यांचं आयुष्य पूर्णपणे उदध्वस्त झालं. ते पार्किन्सनमुळे झालं होतं, खरंतर ते औषधांमुळे झालं होतं."

अखेर ऑक्टोबर 2020 मध्ये अँड्र्यूनं आत्महत्या केली.

त्याच्या मृत्यूची नोंद युकेतील यलो कार्ड पब्लिक रेकॉर्डमध्ये झाली नाही. ही एमएचआरए (मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी)ची व्यवस्था आहे. त्यात औषधांच्या दुष्परिणामांचा माहिती गोळा केली जाते. यात अँड्र्यूचा समावेश नाही तसंच त्याचा मुलगा हॅरीचाही समावेश नाही.

कायदेशीर आव्हानं आणि नियामकांची भूमिका

डोपामाईन ॲगोनिस्ट औषधामुळे कुटुंबांच्या नातेवाईकांना झालेल्या दुष्परिणामाचीदेखील नोंद केली जाणार नाही. काहीजणांनी आम्हाला सांगितलं की जुगार खेळण्याची सवय, शॉपिंगची सवय किंवा व्यसन आणि इतर वर्तनांमुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यभराची बचत किंवा अगदी घरंदेखील गमावली आहेत.

अनेकांनी असंही सांगितलं की युकेमध्ये यासंदर्भातील नुकसान भरपाईच्या दाव्यांबाबतच्या कायदेशीर आव्हानांमुळे आणि वैद्यकीय निष्काळजीपणासंदर्भातील आवश्यकता पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे त्यांना त्यांच्या नुकसानाबद्दल न्याय मिळण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही. या प्रकारच्या दाव्यांमध्ये त्यांना हे सिद्ध करावं लागेल की त्यांना या औषधांच्या दुष्परिणामांबद्दल इशारा देण्यात आला नव्हता.

या डोपामाईन ॲगोनिस्ट औषधांमुळे आवेगपूर्ण वर्तन घडत असल्याचं आढळून आल्यापासून 20 वर्षांहून अधिक काळ झाला आहे.

गेल्या वर्षी, बीबीसीनं उघड केलं की कशाप्रकारे जीएसके या कंपनीनं 2003 मध्ये त्यांचं औषध आणि 'विचलित' लैंगिक वर्तन यामधील संबंध शोधला होता. जीएसके या ब्रिटिश औषधनिर्मिती कंपनीला पार्किन्सनवरील औषधासाठी युकेमध्ये सर्वात आधी परवाना देण्यात आला होता.

तीन वर्षांनंतर इशारे समोर येऊ लागले. मात्र त्यात फक्त 'वाढलेली कामवासना', 'हानिकारक वर्तन' आणि 'बदललेली लैंगिक आवड' या संभाव्य बाबींची यादी होती. रुग्णांसाठीच्या या माहितीपत्रकांमध्ये अजूनही सामान्य आवेग नियंत्रण विकार कसे असू शकतात हे सांगण्यात आलेलं नाही.

लायला मोरन खासदारांच्या आरोग्य निवड समितीच्या अध्यक्ष आहेत. त्या संपूर्ण आवेग नियंत्रण विकार कसे सामान्य आहेत आणि कधीकधी विकसित होणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या वर्तनांची यादी करण्यासाठी इशारे देण्याची मागणी करत आहेत. उदाहरणार्थ पॉर्नच्या व्यसनाचं वर्तन.

"हा फक्त एका व्यक्तीवर परिणाम करणारा औषधांचा दुष्परिणाम नाही. तो त्या व्यक्तीच्या कुटुंबावर, समुदायांवर परिणाम करतो आणि नवे पीडित तयार करतो," असं त्यांनी आम्हाला सांगितलं.

"'आवेगपूर्ण वर्तन' म्हणजे काय आणि रुग्णांमध्ये तसं होण्याची किती शक्यता आहे? सध्या, रुग्णांकडे ती माहिती नाही आणि त्याशिवाय, ते हे परिणाम कसं काय कमी करू शकतात?"

मोरन म्हणाल्या की एमएचआरएची यलो कार्ड स्कीम, लोकांना जे दुष्परिणाम लज्जास्पद वाटतात, त्यांची तक्रार करण्यासाठीच्या 'उद्देशासाठी योग्य नाही'.

आमचे निष्कर्ष 'अत्यंत चिंताजनक' असल्याचं देखील सरकारनं म्हटलं आहे.

रुग्णांना सावध करण्याची आवश्यकता आणि त्यातील अडचणी

एमएचआरएनं आम्हाला सांगितलं की इशाऱ्यांमध्ये बदल करण्याची कोणतीही योजना नाही. लैंगिक वर्तन हे 'वैयक्तिक स्वरुपाचं' असतं. त्यामुळे औषधांबरोबरच्या माहितीपत्रकांमध्ये 'संपूर्ण यादी'चा समावेश करणं शक्य नाही.

त्यांनी बीबीसीला आधी सांगितलं होतं की ते आवेग नियंत्रण विकारांच्या वारंवारितेची (फ्रिक्वेन्सी) यादी करत नाहीत, कारण अनेकजण त्याबद्दल तक्रार करत नाहीत.

जीएसकेनं सांगितलं की या औषधाची मोठ्या प्रमाणात चाचणी करण्यात आली आहे. जगभरातील नियामकांनी या औषधाला वारंवार मंजूरी दिली आहे. तसंच 1.7 कोटींहून अधिक वेळा ते उपचारांसाठी लिहून देण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं की, सुरक्षिततेच्या विषयीच्या चिंतांबद्दलचा अहवाल त्यांनी नियामकांना दिला आहे.

सॉलिसिटर अँड्र्यूला लिहून देण्यात आलेलं, प्रामिपेक्सोल औषधाची निर्मिती बोहरिंगर इंगेलहाईम या कंपनीनं केली आहे. या कंपनीनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

जर तुमच्याकडे या कथेबद्दल अधिक माहिती असेल, तर तुम्ही नोएलशी, सिग्नल या एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲपवर, noel.titheradge@bbc.co.uk या ईमेलवर, सेक्युअरड्रॉपवर थेट किंवा सुरक्षितपणे संपर्क साधू शकतो.

नाईस, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्सच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 2017 मध्ये डॉक्टरांना, पार्किन्सनच्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबांना आवेशपूर्ण वर्तनाच्या धोक्याबद्दल तोंडी आणि लेखी माहिती देणं आणि त्यासंदर्भात त्यांच्यावर नियमितपणे लक्ष ठेवणं आवश्यक होतं.

मात्र, बीबीसीनं ही मार्गदर्शक तत्व लागू झाल्यापासून पार्किन्सनच्या अनेक रुग्णांना ही औषधं लिहून दिल्याचं ऐकलं आहे. या रुग्णांचं म्हणणं आहे की त्यांना या धोक्यांबद्दल योग्य इशारा देण्यात आला नव्हता. काही रुग्ण म्हणतात की ते आता आवेगपूर्ण वर्तनाला तोंड देत आहेत.

ॲलिस आणि फ्रान्सिस ज्या गावात राहत होते, तिथून ते शेकडो मैल दूर राहावयास गेले आहेत. गाव सोडलं असलं तरीदेखील त्यांचं दु:ख मात्र त्यांच्यासोबतच आहे.

फ्रान्सिस म्हणतात, "माझं आयुष्य माझ्यापासून हिरावून घेण्यात आलं आहे. माझं घर, मी राहत होते तो समुदाय, या सर्वांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझा मुलगा, सर्व हिरावलं गेलं आहे."

"हे सर्व किती उदध्वस्त करून टाकणारं आहे, हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)