एलपीजीचा तुटवडा, जनता 'गॅस'वर आणि स्वयंपाक चुलीवर; देशातील परिस्थिती पाहा या फोटोंमध्ये

फोटो स्रोत, Praful Gangurde/Hindustan Times via Getty Images
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा,1955 लागू केला आहे.
या संघर्षामुळे जगभरात पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. इराणजवळील होर्मुझची सामुद्रधुनी तणावाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी बंद आहे.
भारत सरकारने देशात इंधन आणि गॅसचा तुटवडा नसल्याचे जाहीर करत चिंता करण्याचे कारण नसल्याचे म्हटले होतं. परंतु, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने देशात जीवनाश्यक वस्तू कायदा, 1955 ॲक्ट 1955) लागू केला आहे.

फोटो स्रोत, ANI
रेस्टॉरंटला व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा कमी होत नसल्यानं ते अडचणीत सापडले आहेत, तर काही छोट्या व्यावसायिकांनी लाकडांचा पर्याय निवडला आहे.
गॅस सिलिंडरसाठी देशभरात लोकांच्या रांगा लागल्या आहेत. गुजरातच्या अहमदाबाद लोक गॅस एजन्सीबाहेर त्यांचे रिकामे एलपीजी सिलिंडर भरण्यासाठी लांब रांगेत उभे आहेत.
काही ठिकाणी एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे घरगुती खाणावळी, मेस असे छोटे व्यवसाय संकटात सापडले आहेत.
पण, फक्त रेस्टॉरंट किंवा फूड इंडस्ट्रीवर एलपीजी तुटवड्याचा परिणाम झाला असे नाही, तर अनेक उद्योग आहेत ज्यावर परिणाम पाहायला मिळतो आहे.

फोटो स्रोत, Satish Bate/Hindustan Times via Getty Images
इंजिनिअरिंग, फूड प्रोसेसिंग, पावडर कोटिंग, फार्मास्युटिकल्स, फॅब्रिकेशन आणि पॅकेजिंग, प्लास्टीक यांसारख्या अनेक उद्योगांमध्ये एलपीजीचा वापर केला जातो.
एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे बेकरीवर देखील परिणाम होतोय का याबद्दल द बॉम्बे बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष नासिर अन्सारी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "एलपीजी गॅस शॉर्टेजमुळे आमच्या बेकरींवर देखील याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. पूर्वी आमच्या बेकऱ्या लाकूड भट्टीवर चालायच्या. मात्र आता पूर्णपणे गॅसवर कन्व्हर्ट झाल्या आहेत. व्यावसायिक गॅस कालपासून मिळणे अडचणीचे होत असल्याने बेकरी चालकांना बेकरी चालवताना समस्यांना सामोरे जावं लागत आहे."

फोटो स्रोत, Amarjeet kumar Singh/SOPA Images/LightRocket via Getty Images
सध्या लग्नाचा सीजन सुरू झाला आहे. तसेच अनेक लहान लहान कार्यक्रम सुरूच असतात. कार्यक्रमाचे सगळं नियोजन ठरलेलं असतं. पण, आता व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे हे कार्यक्रम कसे होणार? असा प्रश्न केटरींग व्यवसाय करणाऱ्यांना पडला आहे.

फोटो स्रोत, R. Satish BABU / AFP via Getty Images
आज उद्या कार्यक्रम होऊ शकतील असे सिलिंडर काही केटरींगवाल्यांजवळ उपलब्ध आहेत. पण, पुढे सिलिंडरशिवाय कार्यक्रम कसे होणार? असा सवाल पिंपरी चिंचवडचे केटरींग असोसिएशनचे अध्यक्ष अण्णा कुदळे उपस्थित करतात.
ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "आम्हाला सिलिंडरचा साठा ठेवता येत नाही. अचानक पुरवठा बंद झाला. कसंतरी एखादं सिलिंडर मिळालं तर उद्याचे कार्यक्रम होतील. त्यानंतर काहीच पर्याय नाही. डिझेलच्या भट्ट्या लावायचा विचार सुरू आहे. पण, डिझेल बंद झालं तर काय करायचं? त्यामुळे कार्यक्रम पुढे ढकलता येतील का? किंवा कमी पाहुण्यांमध्ये कार्यक्रम करता येतील का? यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना विनंती करत आहोत. सिलिंडर सुरळीत झाल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम न घेणं हा एकमेव पर्याय आहे."

फोटो स्रोत, Sunil Ghosh/Hindustan Times via Getty Images
पिंपरी चिंचवडचे केटरींग असोसिएशनचेअध्यक्ष अण्णा कुदळे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "आम्हाला सिलिंडरचा साठा ठेवता येत नाही. अचानक पुरवठा बंद झाला. कसंतरी एखादं सिलिंडर मिळालं तर उद्याचे कार्यक्रम होतील. त्यानंतर काहीच पर्याय नाही. डिझेलच्या भट्ट्या लावायचा विचार सुरू आहे. पण, डिझेल बंद झालं तर काय करायचं? त्यामुळे कार्यक्रम पुढे ढकलता येतील का? किंवा कमी पाहुण्यांमध्ये कार्यक्रम करता येतील का? यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना विनंती करत आहोत. सिलिंडर सुरळीत झाल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम न घेणं हा एकमेव पर्याय आहे."
एलपीजी गॅस सिलिंडरची झालेली दरवाढ आणि देशभरातील इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलनं केली आहेत.

फोटो स्रोत, Sanchit Khanna/Hindustan Times via Getty Images
घरगुती गॅस सिलिंडर महागल्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये गॅस साठी लोकांनी रांगा लावल्या आहेत.

फोटो स्रोत, ANI
देशभरात पाटणा, अहमदाबाद, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी लोकांना कसरत करावी लागत आहे. एरवी घरपोच मिळणार जीवनावश्यक गॅस सिलिंडर आता रांगा लावून देखील मिळण्याची शाश्वती नसल्याने लोक हवालदिल झाले आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











