केवळ ट्रम्पच नव्हे, बिल गेट्स ते दीपक चोप्रा; 'एपस्टिन फाईल्स'मध्ये कुणा-कुणाची नावं?

    • Author, ब्रँडन ड्रेनॉन
  • वाचन वेळ: 12 मिनिटे

अमेरिका सरकारने जेफ्री एपस्टिन प्रकरणातील तपासाशी संबंधित लाखो नवीन कागदपत्रं जाहीर केली आहेत. या नवीन कागदपत्रांमुळे जगातील ज्या काही गर्भश्रीमंत आणि प्रभावशाली लोकांचे एपस्टिनशी संबंध होते, अशा नावांची यादी आणखी मोठी झाली आहे.

जेफ्री एपस्टिन हा लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांप्रकरणी दोषी ठरलेला फायनान्सर होता.

या कागदपत्रांमध्ये एखाद्याचं नाव असणं म्हणजे त्याने काही गैरकृत्य केलं, असं म्हणता येणार नाही. याआधी ज्या लोकांची नावं समोर आली होती, त्यांनीही एपस्टिनशी संबंधित कोणताही गैरप्रकार केला नसल्याचं स्पष्टपणे म्हटले आहे.

नवीन जाहीर करण्यात आलेल्या कागदपत्रांत उल्लेख झालेल्या काही व्यक्तींची ही यादी आहे.

इलॉन मस्क

या कागदपत्रांत जेफ्री एपस्टिन आणि टेक क्षेत्रातील अब्जाधीश इलॉन मस्क यांच्यातील ई-मेल संवादाचाही समावेश आहे. या ई-मेलमध्ये एपस्टिन काही प्रवासाची व्यवस्था करत असल्याचं दिसून येतं.

मात्र इलॉन मस्क यांनी आपण कधीही एपस्टिनच्या खासगी बेटावर गेलो नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

नोव्हेंबर 2012 मध्ये पाठवलेल्या एका ई-मेलमध्ये मस्क यांनी लिहिलं होतं की, "तुमच्या बेटावर सर्वात धमाल पार्टी कोणत्या दिवशी किंवा रात्री होणार आहे?"

त्याच वर्षी डिसेंबरमध्ये पाठवलेल्या आणखी एका ई-मेलमध्ये मस्क यांनी लिहिलं होतं की, "मला सेंट बार्ट्स किंवा इतर ठिकाणी पार्टीचा अनुभव घ्यायचा आहे आणि मोकळेपणाने मजा करायची आहे." तसंच, "शांत बेटावरचा अनुभव मला नको आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

प्रतिसादः यावर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी जानेवारीत 'एक्स'वर एक पोस्ट केली. या ई-मेलचा वापर करून आपली बदनामी केली जाऊ शकते, असं त्यांनी मान्य केलं.

मात्र त्याच वेळी त्यांनी सांगितलं की, एपस्टिनसोबत गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई होणं हेच आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.

बिल गेट्स

18 जुलै 2013 रोजीचे दोन ई-मेल एपस्टिननेच लिहिल्यासारखे वाटतात. पण हे ई-मेल खरे आहेत की नाहीत, किंवा ते मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना प्रत्यक्ष पाठवले गेले होते की नाही, हे स्पष्ट नाही.

या पैकी एका ई-मेलमध्ये बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनमधून राजीनामा दिल्यासारखं लिहिलं आहे.

त्या ई-मेलमध्ये बिल गेट्स यांना "रशियन मुलींशी संबंधांनंतर उद्भवलेल्या परिणामांवर उपचार करण्यासाठी औषधं मिळवावी लागली," अशी तक्रार केल्याचा उल्लेख आहे.

एनपीआर सोबतच्या एका मुलाखतीत, बिल गेट्स यांच्या माजी पत्नी मेलिंडा यांनी ही कागदपत्रं जाहीर केल्याने त्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील संघर्ष आठवल्याचे म्हटलं.

त्या म्हणाल्या, "मी माझं दुःख मनात धरून त्या लहान मुलींकडे पाहू शकते आणि विचार करते, 'त्या मुलींबरोबर हे असं कसं घडलं?'"

त्या म्हणाल्या, "मी स्वतः माझ्या जीवनात आता पुढे सरकलेय आणि मला आशा आहे की आता मोठ्या झालेल्या त्या मुलींना न्याय मिळेल."

प्रतिसादः गेट्स यांच्या प्रवक्त्याने बीबीसीला सांगितलं, "हे आरोप एका खोटारड्या आणि नाराज व्यक्तीकडून करण्यात आलेले आहेत. हे पूर्णपणे हास्यास्पद आणि खोटे आरोप आहेत."

डोनाल्ड ट्रम्प

नवीन जाहीर झालेल्या कागदपत्रांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा शेकडो वेळा उल्लेख केला गेला आहे. यात मागील वर्षी एफबीआयने तयार केलेली एक यादीही आहे, ज्यात त्यांच्या नॅशनल थ्रेट ऑपरेशन सेंटरकडे आलेल्या कॉलर्सच्या तक्रारींचा समावेश आहे.

यातील अनेक गोष्टी फक्त मिळालेल्या खोट्या किंवा असत्यापित माहितीवर आधारित आहेत आणि त्यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही.

या यादीत ट्रम्प, एपस्टिन आणि इतर अनेक प्रसिद्ध व्यक्तींविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप आहेत.

प्रतिसादः ट्रम्प नेहमीच एपस्टिनशी संबंधित कोणत्याही गैरकृत्याचा आरोप नाकारत आले आहेत. त्यांनी सांगितलं की, एपस्टिनशी त्यांचा संबंध अनेक दशकांपूर्वीच तुटला होता आणि एपस्टिनच्या पीडितांनी त्यांच्यावर कोणताही आरोप केलेला नाही.

अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर

नवीन जाहीर झालेल्या एपस्टिन फाइल्समध्ये अशा छायाचित्रांचाही समावेश आहे, ज्यात अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर झोपलेल्या महिलेवर गुडघ्यावर बसलेले दिसत आहे.

या दोन फोटोंमध्ये माजी राजकुमार अँड्र्यू अनोळखी आणि पूर्ण कपड्यांमध्ये असलेल्या व्यक्तीच्या पोटाला स्पर्श करताना दिसतात. दुसऱ्या एका फोटोमध्ये ते थेट कॅमेराकडे पाहताना दिसतात.

या फोटोंबाबत कोणतीही माहिती नाही आणि हे फोटो कधी व कुठे काढले गेले हेही स्पष्ट नाही.

प्रतिसादः बीबीसी न्यूजने माऊंटबॅटन विंडसर यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला. त्यांनी वारंवार कोणतेही गैरकृत्य केलेलं नाही, असं सांगितलं आहे.

रिचर्ड ब्रॅन्सन

रिचर्ड ब्रॅन्सन यांचं फाइल्समध्ये शेकडो वेळा नाव आलं आहे.

2013 मधील एका ई-मेलमध्ये, एपस्टिनने ब्रॅन्सनचे अलीकडील आदरतिथ्य आणि जनसंपर्कासाठी दिलेल्या सल्ल्यासाठी धन्यवाद मानले. त्यावर ब्रॅन्सनने उत्तर दिले की, "तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. जेव्हा कधी या भागात याल, तेव्हा मला तुम्हाला भेटायला आवडेल. फक्त तुमचं हारिम (harem) सोबत आणावं!"

व्हर्जिन ग्रुपने स्पष्ट केलं की, 'हारिम' म्हणून एपस्टिनच्या टीममधील तीन प्रौढ सदस्यांचा उल्लेख केला होता.

प्रतिसादः बीबीसीला दिलेल्या निवेदनात व्हर्जिन ग्रुपने सांगितलं की, ब्रॅन्सन आणि एपस्टिन यांचा संपर्क 12 वर्षांपूर्वी फक्त काही प्रसंगी झाला आणि तो फक्त समूह किंवा व्यवसायाच्या सेटिंगसाठीच होता, जसं की चॅरिटी टेनिस इव्हेंट.

निवेदनात पुढे म्हटलं आहे: जेव्हा एपस्टिनने चॅरिटीसाठी देणगी देण्याची ऑफर दिली, तेव्हा ब्रॅन्सन्सनी आपल्या टीमला ती देणगी स्वीकारण्यापूर्वी तपासणी करण्यास सांगितली, ज्यातून गंभीर आरोप समोर आले.

"तपासणीत जे काही समोर आले त्यानुसार, व्हर्जिन युनाइटने ही देणगी स्वीकारली नाही आणि रिचर्ड व जोआन यांनी एपस्टिनशी पुन्हा कधीही भेटू किंवा बोलू नये, असं ठरवलं.

जर त्यांना पूर्ण माहिती आधीच मिळाली असती, तर त्यांचा कोणताही संपर्क झाला नसता. एपस्टिनच्या कृती चुकीच्या होत्या आणि त्याच्या अनेक पीडितांना न्याय मिळण्याचा अधिकार आहे, असा रिचर्ड यांना विश्वास आहे."

सारा फर्ग्युसन

अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांची माजी पत्नी सारा फर्ग्युसन. त्यांना फर्गी नावाने ओळखलं जातं. त्यांचाही अनेक ई-मेलमध्ये उल्लेख आढळतो. एपस्टिन नजरकैदेत असतानाही ई-मेल करण्यात आले आहेत.

एपस्टिनच्या अकाऊंटवरून पाठवलेल्या एका ई-मेलमध्ये लिहिलं आहे: "माझा असा विश्वास आहे की, फर्गी आता मी पेडो नाही असं म्हणू शकते."

एप्रिल 2009 मधील आणखी एका ई-मेलमध्ये एपस्टिनला चहा प्यायला भेटण्याची विनंती केली आहे. त्यात असंही लिहिलं आहे की, "माझा प्रिय खास मित्र जेफ्री. तू एक लिजेंड आहेस आणि मला तुझा अभिमान आहे."

प्रतिसादः या ई-मेलमध्ये कोणतंही गैरकृत्य केल्याचं दिसत नाही. बीबीसीने फर्ग्युसन यांच्याकडे प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला आहे.

लॉर्ड मँडेलसन

एपस्टिन फाइल्समधील बँक स्टेटमेंटनुसार, एपस्टिनने लॉर्ड मँडेलसनशी संबंधित खात्यांमध्ये 75 हजार डॉलर्स (सुमारे 67 लाख 93 हजार रुपये) पेमेंट केले, ज्यात त्याचा भागीदार रेनाल्डो अविला दा सिल्वा यालाही पैसे दिले आहेत.

मेट्रोपॉलिटन पोलिसांनी लॉर्ड मँडेलसनविरोधात गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे, कारण त्यांनी मार्केटशी संबंधित संवेदनशील माहिती एपस्टिनला दिल्याचा आरोप आहे.

2009 मध्ये, एपस्टिनने अल्पवयीनला वेश्याव्यवसायास भाग पाडल्याचा गुन्हा कबूल केला होता. त्यानंतर एका वर्षाने, दा सिल्वाने ई-मेल पाठवला. त्यात "तुम्हाला जी काही मदत करता येईल ती मला करा," असं म्हटलं होतं.

"मी तुमच्या कर्जाची रक्कम लगेच पाठवेन," असं एपस्टिनने लगेच उत्तर दिलं होतं.

दुसऱ्या ई-मेलमध्ये असं दिसतं की, एपस्टिन लॉर्ड मँडेलसनला न्यूयॉर्कमधील आपल्या अपार्टमेंटपैकी एका ठिकाणी राहण्यासाठी व्यवस्था करत होता. एपस्टिनने लिहिले: "तुमचं आदरतिथ्य करून खूप आनंद झाला आणि मी तिथे नसल्याने दुःखी आहे."

प्रतिसादः लॉर्ड मँडेलसन म्हणाले आहेत की, ते हाऊस ऑफ लॉर्ड्समधून राजीनामा देतील. रविवारी त्यांनी पुन्हा सांगितलं की, "एपस्टिनच्या दोषसिद्धीनंतरही त्याच्याशी संबंध ठेवल्याबद्दल त्यांना दुःख आहे."

त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "मी कधीही एपस्टिनच्या गुन्ह्यात दोषी किंवा सहभागी झालो नाही. त्याची खरी माहिती मला त्याच्या मृत्यूनंतरच समजली."

कागदपत्रे लीक केल्याच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलेलं नाही, पण ते म्हणतात की त्यांनी कोणताही गुन्हा केला नाही आणि वैयक्तिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. ते म्हणाले की, 2008 च्या जागतिक आर्थिक संकटात देशाच्या हितासाठी त्यांनी एपस्टिनची मदत घेतली.

स्टीव्ह बॅनन

या फाइल्समध्ये एपस्टिन आणि ट्रम्प यांचे माजी वरिष्ठ सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यातही अनेक मेसेजची देवाणघेवाण झाली आहे.

यातील बहुतांश मेसेज हे 2018 आणि 2019 मध्ये पाठवले गेले होते. त्यावेळी बॅनन हे व्हाइट हाऊसमधून बाहेर पडले होते. त्यावेळी ते एपस्टिनवर त्याच्या मृत्यूपूर्वी एक चित्रपट तयार करत होते.

एका मजकूरातून दिसतं की, बॅनन एपस्टिनसोबत त्याच्या भूतकाळातील गुन्ह्यांबाबतची कथा बदलण्याची योजना करत होते. त्यात असा सल्ला होता की, "सर्वात आधी खोट्या गोष्टींना सामोरे जाऊ" आणि नंतर "तुझी प्रतिमा परोपकारी म्हणून पुन्हा तयार करू."

प्रतिसादः बॅनन यांच्यावर कोणताही गैरकृत्याचा आरोप नाही. बीबीसीने प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

मिरोस्लाव लाजॅक

ऑक्टोबर 2018 मध्ये, मिरोस्लाव लाजॅक त्या वेळी स्लोव्हाकियाचे परराष्ट्र मंत्री होते. त्यांच्यात आणि एपस्टीन यांच्यातील एका मजकूरातून ते मुली आणि परराष्ट्र धोरण याबाबत संदेश पाठवत होते, असं दिसतं.

एपस्टिनने एक फोटो पाठवल्यानंतर, जे रेकॉर्डमध्ये दिसत नाही, लाजॅक यांनी उत्तर दिले, "तुम्ही मला या खेळासाठी निमंत्रित का करत नाही? मी 'एमआय' मुलीला घेईन."

"कोणी नाही," एपस्टिन परत मेसेज पाठवतो. "तुम्ही त्या दोघीही घेऊ शकता, मी मालक नाही. आणि हो त्यांच्या बहिणीही घ्या."

प्रतिसादः नवीन एपस्टिन फाइल्स जाहीर झाल्यानंतर, लाजॅक यांनी स्लोव्हाकियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर कोणताही गैरकृत्याचा आरोप नाही.

हॉवर्ड लुटनिक

नवीन एपस्टिन फाइल्समध्ये समाविष्ट ई-मेलनुसार, अब्जाधीश आणि अमेरिकेच्या कॉमर्स विभागाचे सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी त्यांच्या कुटुंबासह जेफ्री एपस्टिनच्या लिटल सेंट जेम्स बेटाला भेट देण्याची योजना आखली होती.

डिसेंबर 2012 मधील एका ई-मेलमध्ये, लुटनिक यांची पत्नी अॅलिसन भेटीच्या आधी एपस्टिनच्या सहाय्यकाला लिहितात, "आम्ही तुम्हाला भेटायला उत्सुक आहोत. आम्हाला तुमच्यासोबत लंच करायला आवडेल."

प्रतिसादः वाणिज्य विभागाने बीबीसीला दिलेल्या निवेदनात सांगितलं की, "सचिव लुटनिक यांचा एपस्टिनशी फक्त त्यांच्या पत्नीच्या उपस्थितीतच मर्यादित संबंध आला होता. त्यांच्यावर कधीही गैरकृत्याचा आरोप करण्यात आलेला नाही."

लॅरी समर्स

लॅरी समर्स, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे माजी ट्रेझरी सेक्रेटरी आणि हार्वर्ड विद्यापीठाचे माजी अध्यक्ष, यांचंही नाव नवीन फाइल्समध्ये आलं आहे. यात समर्स आणि एपस्टिन यांच्यातील भेटी आणि डिनर्सचा उल्लेख आहे.

2017 मधील ई-मेलमध्ये समर्स आणि एपस्टिन ट्रम्प यांच्यावर विनोद करताना आणि आणि त्यांच्या पहिल्या कार्यकाळावर टीका करताना दिसले आहेत.

एपस्टिनने समर्सला पाठवलेल्या एका ई-मेलमध्ये ट्रम्प यांच्याबद्दल लिहिले की, "तो खरोखर किती मूर्ख आहे, हे तुमच्या जगाला समजत नाही."

प्रतिसादः नोव्हेंबरमध्ये जाहीर झालेल्या एपस्टिन फाइल्समध्ये समर्स यांचं नाव येताच, त्यांनी सांगितले की, "एपस्टिनशी संपर्क ठेवण्याच्या माझ्या चुकीच्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी मी घेतो" असं सांगत त्यांनी अनेक पदांवरून राजीनामा दिला, ज्यात ओपन एआयच्या सल्लागार मंडळातील पदाचाही समावेश आहे.

स्टीव्ह टिश

न्यूयॉर्क जायंट्सचे सह-मालक स्टीव्ह टिश यांचं नाव एपस्टिन संबंधित फाइल्समध्ये आले आहे. या ई-मेलमध्ये ते एपस्टिनच्या घरात भेटलेल्या एका महिलेबद्दल चौकशी करताना दिसतात.

एका ई-मेलमध्ये, टिश यांनी विचारलं की, ती महिला व्यावसायिक होती की 'सामान्य नागरिक'.

इतर ई-मेल एक्सचेंजमध्ये, एपस्टिन टिश यांना त्यांच्यासाठी 'भेट' असल्याचे सांगतात आणि "ताहितियन बहुतेक फ्रेंच, विदेशी बोलतात" असे म्हणून टिश यांची ओळख करून देणाऱ्या महिलेचं वर्णन केलं.

प्रतिसादः सीएनएनला दिलेल्या निवेदनात, टिश यांनी सांगितलं की, त्यांचा एपस्टिनशी 'मोजका संबंध' आला होता. ते पुढे म्हणाले की, "मी त्याच्या कोणत्याही निमंत्रणाचा स्वीकार केला नाही आणि कधी त्याच्या बेटावरही गेलो नाही."

ब्रेट रॅटनर

फाइल्समध्ये फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्या वरील नवीन डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक ब्रेट रॅटनर हेही दिसतात, ज्यात ते एका तरुण महिलेला मिठी मारताना फोटोमध्ये दिसले.

ब्रेट रॅटनर यांनी रश अवर आणि एक्स-मन: द लास्ट स्टँड या चित्रपटाचेसुद्धा दिग्दर्शन केलं आहे. त्यांना एपस्टिन आणि दोन महिलांच्या बाजूला सोफ्यावर बसलेलं दाखवलं आहे. या महिलांची ओळख लपवलेली आहे.

प्रतिसादः या फाइल्समध्ये ब्रेट रॅटनर यांनी गैरकृत्य केल्याचे कोणतेही संकेत नाहीत. बीबीसीने रॅटनर यांच्या प्रतिनिधीशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला आहे.

पीटर अटिया

नवीन फाइल्सनुसार, अँटी-एजिंग इन्फ्लुएन्सर आणि सीबीएस न्यूजचे कॉन्ट्रिब्यूटर पीटर अटिया यांनी एपस्टिनसोबत शेकडो ई-मेल्सची देवाणघेवाण केली, ज्यात अश्लील टिप्पण्यांचा देखील समावेश होता.

या ई-मेलमध्ये, अटिया यांनी लिहिले की, एपस्टिनसोबतची त्यांची मैत्री ते सार्वजनिकपणे सांगू शकतात. त्यात 2018 मधील मियामी हेराल्डच्या बातमीचा उल्लेख देखील आहे, ज्यात एपस्टिनच्या पीडितांची ओळख पटली होती.

ई-मेल्सनुसार, अटिया यांनी एपस्टिनसोबत महिलांच्या शरीरविज्ञानाबद्दल आणि लैंगिक कृतीबद्दलही विनोद केला होता.

प्रतिसादः 2 फेब्रुवारी रोजी अटिया यांनी 'एक्स'वर एक पोस्ट केली, ज्यात त्यांनी ते कोणत्याही गुन्ह्यात सहभागी असल्याचे नाकारले होते. त्यांनी पुढे सांगितलं की, "मी कधीही त्याच्या विमानात गेलो नाही, कधीही त्याच्या बेटावर गेलो नाही, आणि कधीही कोणत्याही लैंगिक पार्टीत (सेक्स पार्टी) उपस्थित नव्हतो."

केसी वासरमन

2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक गेम्सचे अध्यक्ष केसी वासरमन यांनी एपस्टिनची तुरुंगातील सहकारी गिलीन मॅक्सवेलला फ्लर्टी ई-मेल्स पाठवले होते.

2003 मध्ये केसी वासरमन यांनी मॅक्सवेलला पाठवलेल्या मेलमध्ये लिहिलं आहे की, "मी नेहमी तुझा विचार करतो... मला तुला घट्ट लेदर कपड्यांत पाहण्यासाठी काय करावं लागेल?"

एपस्टिनसाठी लैंगिक शोषणाकरिता अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याबद्दल मॅक्सवेल सध्या 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे.

प्रतिसादः वासरमन यांनी आपल्या एका निवेदनात म्हटलं की, "मला गिलीन मॅक्सवेलशी दोन दशकांपूर्वी केलेल्या माझ्या पत्रव्यवहाराबद्दल खूप खेद आहे. हे पत्रव्यवहार तिचे भयंकर गुन्हे उघडकीस येण्यापूर्वी झाले होते."

सर्गे ब्रिन

सर्गे ब्रिन हे गुगलचे सह-संस्थापक आणि जगातील श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. ते एपस्टिनच्या खासगी बेटावर गेले होते आणि न्यूयॉर्क शहरातील एपस्टिनच्या घरात जेवण करण्याची त्यांनी योजना आखली होती, असे शुक्रवारी (6 फेब्रुवारी) जाहीर झालेल्या फाइल्सनुसार दिसते.

त्याने गिलीन मॅक्सवेलशीही पत्रव्यवहार केला. एप्रिल 2003 मध्ये मॅक्सवेलने ब्रिनला लिहिले: "जेफ्रीकडे जेवण नेहमी आनंददायी आणि आरामदायी असते. तुम्हाला भेटण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत."

प्रतिसादः बीबीसीने गुगलशी प्रतिक्रिया विचारण्यासाठी संपर्क केला आहे. ई-मेल्समध्ये कोणताही गैरकृत्य झाल्याचे संकेत नाहीत.

एहुद बराक

इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद बराक यांचं नाव नव्याने जाहीर झालल्या एपस्टिन फाइल्समध्ये आले आहे. 2008 मध्ये फ्लोरिडामधील लैंगिक गुन्ह्यांसाठी एपस्टिन दोषी ठरल्यानंतर त्याने आणि बराक यांनी अनेकदा पत्रव्यवहार केला.

एका ई-मेलमध्ये 2017 मध्ये बराक यांनी एपस्टिनच्या न्यूयॉर्क शहरातील घरात राहण्याची योजना आखली होती, असं दिसून येतं.

प्रतिसादः बराक यांनी एपस्टिनसोबत त्यांचे नियमित संपर्क असल्याची कबुली दिली, पण त्यांनी कधीही, कोणतीही अनुचित वर्तणूक किंवा पार्टी पाहिली नाही किंवा त्यात भागही घेतला नाही, असं सांगितलं.

नोम चॉम्स्की

प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ नोम चॉम्स्की याचं नाव एपस्टिन फाइल्सच्या दोन्ही प्रकाशनांमध्ये दिसून आले आहे. नवीन फाइल्सनुसार, चॉम्स्की यांनी एपस्टिनला त्याच्यावर लावलेल्या लैंगिक व्यापाराच्या आरोपांच्या माध्यमातील कव्हरेजबाबत सल्ला दिला, असं दिसून येतं.

फेब्रुवारी 2019 मधील ई-मेलमध्ये, दोषी ठरलेल्या एपस्टिनने चॉम्स्की यांना त्याने 'स्वतःचा बचाव करावा' की 'या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं', असं विचारलं होतं.

चॉम्स्की यांच्या उत्तरातून दिसतं की, एपस्टिनला देण्यात आलेली वागणूक 'खूप वाईट' होती आणि महिलांवर होणाऱ्या शोषणाबाबत निर्माण झालेल्या गोंधळाची त्यांना काळजी वाटते.

ई-मेलमध्ये लिहिले होतं, "हे सांगणं वेदनादायक आहे, पण मला वाटतं की पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे याकडे दुर्लक्ष करणं."

प्रतिसादः चॉम्स्कीच्या पत्नी आणि प्रवक्त्या व्हॅलेरिया चॉम्स्की यांनी एका निवेदनात सांगितलं की, "एपस्टिनने त्याच्या केसबद्दल एक फसवी कथा तयार केली, ज्यावर नोम चॉम्स्की यांनी सद्भावनेनं विश्वास ठेवला."

त्या म्हणाल्या, "आता हे स्पष्ट झालं आहे की, हे सगळं ठरवून केलं गेलं होतं. किमान एपस्टिनचा एक हेतू असा होता की, नोमसारख्या व्यक्तीच्या नावाचा वापर करून स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करायचा."

"नोम यांनी कधीही महिलांच्या चळवळीवर टीका केली नव्हती; उलट, त्यांनी नेहमी लैंगिक समानता आणि महिलांच्या हक्कांचे समर्थन केले आहे."

ब्रॅड कार्प

ब्रॅड कार्प, प्रसिद्ध लॉ फर्म पॉल व्हीसचे अध्यक्ष. नवीन फाइल्समध्ये कार्प आणि एपस्टिन यांच्यात अनेक ई-मेल्स संभाषण झाल्याचे समोर आल्यानंतर कार्प यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

एका ई-मेलमध्ये कार्प एपस्टिनच्या आधीच्या लैंगिक व्यापाराच्या आरोपांवरील कबुलीच्या करारावर चर्चा करत असल्याचे सांगण्यात येते.

मार्च 2019 मध्ये, एपस्टिनच्या अटकेच्या चार महिने आधी, ब्रॅड कार्प नावाच्या एका व्यक्तीने ई-मेलमध्ये लिहिले: "ड्राफ्ट मोशन खूप चांगल्या स्थितीत आहे."

ब्लूमबर्गने सांगितले की, ही चर्चा एपस्टिनच्या 2008 मधील कबुलीच्या कराराला सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नांबाबत होती, ज्यात त्याने फेडरल आरोप टाळले होते, अन्यथा त्याला आयुष्यभर तुरुंगाची शिक्षा होऊ शकली असती.

ई-मेल्समध्ये सिद्ध करण्यासाठी हे खरंच त्या कराराशी संबंधित होते, याचा कोणताच पुरावा नाही.

प्रतिसादः ब्रॅड कार्प यांनी बुधवारी कंपनीच्या निवेदनाद्वारे राजीनामा जाहीर केला आणि सांगितले: "अलीकडील बातम्यांमुळे लक्ष विचलित झाले आहे आणि माझ्यावर अशा पद्धतीने लक्ष केंद्रित झालं आहे, जे फर्मच्या हिताला योग्य नाही."

निवेदनात एपस्टिन फाइल्सचा उल्लेख नाही, आणि कार्प यांनी त्यानंतर कोणतीही वक्तव्य केलेलं नाही. बीबीसीने पुढील प्रतिक्रिया घेण्यासाठी पॉल व्हीसशी संपर्क साधला आहे.

बिल क्लिंटन

डिसेंबरमध्ये न्याय विभागाने पहिल्यांदा एपस्टिनच्या फाइल्स जाहीर केल्या, ज्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो होते. त्यात एका फोटोत ते स्वीमींग पूलमध्ये पोहताना आणि दुसरा फोटो हॉट टबमध्ये पाठ टेकून हात डोक्याखाली ठेवलेले दिसत आहेत.

एपस्टिनला पहिल्यांदा अटक होण्यापूर्वी क्लिंटन आणि त्याचे 1990 आणि 2000 च्या दशकात अनेकवेळा फोटो काढण्यात आले होते.

प्रतिसादः क्लिंटन यांचे प्रवक्ते, एंजेल उरेना यांनी, डिसेंबरमध्ये सोशल मीडियावर सांगितलं की, न्याय विभागाने जारी केलेले फोटो अनेक दशके जुने आहेत. त्यांनी म्हटलं की, "ते हवं तसं 20 वर्षांहून जुने अस्पष्ट फोटो जाहीर करू शकतात, पण ही बिल क्लिंटन यांच्याबद्दलची गोष्ट नाही. कधीच नव्हती आणि कधीही होणार नाही."

ते म्हणाले , "इथे दोन प्रकारचे लोक आहेत. पहिले लोक ज्यांना काहीही माहीत नव्हतं आणि एपस्टिनचे गुन्हे उघड होण्यापूर्वी त्यांनी संबंध तोडले. दुसरे लोक ज्यांनी एपस्टिनशी त्याच्या गुन्ह्यांनंतरही संबंध ठेवले. आम्ही पहिल्या प्रकारात आहोत."

क्लिंटन यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, त्यांना माहीत असलेली सर्व माहिती त्यांनी काँग्रेसला सांगितली आहे.

त्यांनी सांगितलं की, "मी एपस्टिनच्या फाइल्स पूर्णपणे जाहीर करण्याची मागणी केली आहे. मला जे काही माहिती आहे, त्याचे शपथपत्र दिले आहे. आणि या आठवड्यातच, मी समितीसमोर प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचं मान्य केलं आहे."

क्लिंटन या महिन्याच्या शेवटी हाऊस ओव्हरसाइट कमिटीसमोर साक्ष देणार आहेत, आणि त्यांनी ही सुनावणी सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

दीपक चोप्रा

फाइल्समध्ये असं दिसून येतं की, एपस्टिनला 2008 मध्ये अल्पवयीनांकडून लैंगिक सेवेसाठी पैशांची मागणी केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतरही सेल्फ-हेल्प लेखक दीपक चोप्रा आणि एपस्टिन संपर्कात होते.

फेब्रुवारी 2017 मधील ई-मेलमध्ये चोप्रा एपस्टिनला त्याच्यासोबत आणि काही लोकांसोबत इस्रायलला येण्याबाबत विचारत आहेत.

चोप्रा म्हणतात, "आमच्यासोबत इस्रायलला ये. आराम कर आणि मनोरंजक लोकांसोबत मजा करा. हवं असेल तर खोटं नाव वापर. तुमच्या मुलींना आण. तुमच्यासोबत मजा येईल. लव्ह."

एका महिन्यानंतर दुसऱ्या ई-मेलमध्ये, त्यांनी देव आणि मानवाच्या शरीरातील पेशींबाबत चर्चा केली.

चोप्रा म्हणतात, "पेशी या मानवाने तयार केलेल्या आहेत. असं काही नाही! विश्व ही मानव निर्मित गोष्ट आहे, असं काही नाही. सुंदर, गोंडस मुलींना त्यांच्या आवाजाचा परिणाम माहीत असतो."

नंतरच्या चर्चेत, चोप्रा म्हणतात: "देव ही एक संकल्पना आहे. गोंडस मुली खऱ्या आहेत."

एपस्टिनने चोप्रांना विचारले: "तुला माझ्यासाठी एक गोंडस इस्रायली सापडली का?"

प्रतिसादः हे ई-मेल्स जाहीर झाल्यानंतर, चोप्रा यांनी ऑनलाइन निवेदन पोस्ट केलं. ते म्हणाले की, या प्रकरणातील पीडितांचे दुःख पाहून मला मला खूप खेद वाटतो. मी त्याच्या कोणत्याही गुन्हेगारी किंवा शोषणाशी संबंधित प्रकरणात सामील नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

"माझा संपर्क खूप मर्यादित होता आणि कुठल्याही शोषणाशी संबंधित नव्हता. काही जुने ई-मेल्स समोर आले आहेत, ज्यांचा टोन चुकीचा दिसतो. त्याबद्दल मला खेद आहे आणि ते आजच्या दृष्टिकोनातून कसे वाचल्या जातात हे मला समजतं. माझं लक्ष अजूनही जबाबदारी, प्रतिबंध, आणि पीडितांचे संरक्षण व मदत करण्यावर आहे."

एपस्टिनसोबत संबंध असताना त्याच्या गैरकृत्याची त्यांना माहिती होती का असा प्रश्न बीबीसीने चोप्रा यांना विचारला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)