लेसिक शस्त्रक्रिया करून चष्मा काढायचा विचार करताय? मग 'या' 8 गोष्टी लक्षात ठेवा

'एका दिवसात चष्मामुक्त व्हा'

लेसिक शस्त्रक्रियेविषयी असा दावा तुम्हीही ऐकला असेल. पण लेसिक खरंच सगळ्यांसाठी सुरक्षित आणि योग्य उपाय आहे का?

डोळ्यांची रचना, कॉर्नियाची जाडी आणि दृष्टीचं स्थैर्य या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर पुढे अडचणी येऊ शकतात.

जाहिरातींपलीकडचं वैद्यकीय वास्तव नेत्रतज्ज्ञ काय सांगतं?

लेसिकचा निर्णय घेण्याआधी हे महत्त्वाचे मुद्दे नक्की समजून घ्या.

चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरणं अनेक लोकांच्या आयुष्यात डोकेदुखी ठरतं. रोजचा प्रवास, ऑफिसचं काम, खेळ, पोहणं किंवा साध्या सामाजिक प्रसंगांमध्येही चष्म्यामुळे अडचणी येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत लेसिक (LASIK) शस्त्रक्रियेबाबत लोकांचा उत्साह झपाट्याने वाढलेला पाहायला मिळतो.

'एका दिवसात चष्मामुक्त व्हा' असा दावा करणाऱ्या जाहिराती, सोशल मीडियावर दिसणारे अनुभव आणि ओळखीच्या लोकांचे सकारात्मक किस्से यामुळे लेसिक ही सोपी आणि खात्रीची प्रक्रिया असल्याचा समज अनेकांमध्ये तयार होतो.

मात्र, वैद्यकीय वास्तव हे या प्रतिमेपेक्षा अधिक गुंतागुंतीचं आहे. लेसिक ही अत्याधुनिक आणि परिणामकारक शस्त्रक्रिया असली तरी ती प्रत्येकासाठी योग्य ठरेलच असं नाही.

अयोग्य वेळ, अपुरी तपासणी किंवा रुग्णाच्या डोळ्यांच्या रचनेचा नीट विचार न करता केलेली लेसिक भविष्यात गंभीर अडचणी निर्माण करू शकते. म्हणूनच जगभरातील नेत्रतज्ज्ञ 'लेसिक कोणासाठी करायची, आणि कोणासाठी टाळायची' याबाबत ठाम भूमिका घेतात.

लेसिकचा विचार करताना केवळ चष्मा जाणार की नाही, एवढाच प्रश्न नाही; तर तो निर्णय दृष्टीच्या भविष्यासाठी योग्य आहे का, हा खरा मुद्दा आहे.

लेसिक म्हणजे काय?

लेसिक म्हणजे Laser‑Assisted In Situ Keratomileusis. ही दृष्टीदोष सुधारण्यासाठी केली जाणारी लेझर‑आधारित शस्त्रक्रिया आहे. सध्याच्या चष्म्याच्या नंबरनुसार डोळ्याच्या पुढील पारदर्शक भागाला कॉर्नियाला अतिशय नियंत्रित पद्धतीने आकार दिला जातो, जेणेकरून प्रकाशकिरण थेट रेटिनावर अचूकपणे केंद्रित होतील.

मायोपिया, हायपरोपिया आणि ॲस्टिग्मॅटिझम हे प्रामुख्याने दुरुस्त केले जाणारे दृष्टीदोष असले, तरी प्रत्यक्षात लेसिक ही 'एक‑साच्यात बसणारी' प्रक्रिया नाही.

आज उपलब्ध असलेल्या फेमटोसेकंद लेझर, टोपोग्राफी‑गाईडेड पद्धती किंवा SMILE व SILKसारख्या फ्लॅपशिवायच्या शस्त्रक्रिया या सगळ्यांचा फायदा हा रुग्णाची निवड आणि तपासणी तितकीच काटेकोर असते तेव्हाच होतो

त्यामुळेच या शस्त्रक्रियेसंदर्भात पडणाऱ्या 8 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून घेणार आहोत.

1. वैद्यकीय दृष्टिकोनातून लेसिकसाठी योग्य उमेदवार कोण?

लेसिकसाठी योग्य उमेदवार ठरवताना 'नंबर आहे की नाही' एवढाच विचार केला जात नाही. रुग्णाचं वय, गेल्या किमान एका वर्षात दृष्टी स्थिर आहे का, कॉर्नियाची जाडी आणि मजबुती किती आहे, तसेच कॉर्नियल टोपोग्राफीमध्ये कोणतेही संशयास्पद बदल दिसतात का? या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात.

लेसिक ही निव्वळ तांत्रिक प्रक्रिया नसून डोळ्यांच्या दीर्घकालीन आरोग्याशी संबंधित निर्णय असल्यामुळे, योग्य उमेदवार निवडणं हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

एखाद्या व्यक्तीसाठी वय आणि चष्म्याचा नंबर योग्य असला, तरी कॉर्नियाची रचना लेसिकसाठी सुरक्षित नसेल, तर ही शस्त्रक्रिया टाळली जाते. त्यामुळे 'माझ्या ओळखीच्या व्यक्तीने केली' हा निकष वैद्यकीय निर्णयासाठी पुरेसा ठरत नाही.

डॉ. हेमंत कांबळे हे एएसजी आय हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे इथं मेडिकल डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी याबद्दल आपल्याला विस्तृत माहिती दिली.

डॉ. कांबळे सांगतात, "लेसिकसाठी योग्य उमेदवार ठरवणं म्हणजे एकाच मुद्द्यावर निर्णय घेणं नाही, तर अनेक वैद्यकीय घटक एकत्र विचारात घेणं आहे. आता इथं वय महत्त्वाचं असतंच, पण त्याहून जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांची जैविक स्थिरता. रुग्णाचा चष्म्याचा नंबर गेल्या किमान एका वर्षात पूर्णपणे स्थिर आहे का, हे आम्ही पहिल्यांदा तपासतो. त्यानंतर कॉर्नियाची जाडी, त्याची वक्रता, आणि टोपोग्राफीमध्ये कुठेही केराटोकोनसचे अगदी प्राथमिक संकेत तरी दिसतात का, हे पाहिलं जातं."

डॉ. कांबळे आपल्या आजवरच्या अनुभवावर आधारित माहिती सांगताना पुढे म्हणाले, "अनेक वेळा रुग्णाला कोणतीही तक्रार नसते, दृष्टी चांगली वाटत असते; पण तपासणीत आढळणारे सूक्ष्म बदल भविष्यात मोठा धोका ठरू शकतात. म्हणूनच लेसिकचा निर्णय घेताना 'आज चष्मा काढला जाईल का?' हा प्रश्न दुय्यम ठरतो. आमच्यासाठी खरा प्रश्न असतो तो म्हणजे 'हा डोळा पुढील 15-20 वर्षे सुरक्षित राहील का?' लेसिक ही केवळ तत्काळ सुविधा नसून दीर्घकालीन दृष्टीआरोग्याचा निर्णय आहे आणि तो तसा गांभीर्यानेच घ्यावा लागतो."

पिंपरी चिंचवड इथल्या डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. सोनल एरोळे सांगतात, "फक्त चष्म्याचा नंबर योग्य आहे म्हणजे लेसिकसाठी योग्य उमेदवार असं नसतं, तर ज्याच्या डोळ्यांची रचना आणि एकूण नेत्रतपासणीतून मिळणारे निष्कर्ष लेसिकसाठी सुरक्षित आहेत हे दर्शवतात त्याची शस्त्रक्रीया होते. तसेच रुग्णाच्या अपेक्षाही वास्तववादी असणं अतिशय महत्त्वाचं आहे."

2. कोणत्या परिस्थितींमध्ये लेसिक अयोग्य ठरते?

काही वैद्यकीय कारणांमुळे लेसिक करणं धोकादायक ठरू शकतं. पातळ कॉर्निया, केराटोकोनस, अनियंत्रित मधुमेह, ऑटोइम्यून आजार, तीव्र ड्राय आय किंवा सक्रिय डोळ्यांचे संसर्ग असताना लेसिक टाळली जाते. गर्भधारणा व स्तनपान काळात हार्मोनल बदलांमुळेही लेसिक न करण्याचा सल्ला दिला जातो.

याबद्दल आपल्याला अधिक माहिती ठाण्याच्या KIMS हॉस्पिटल्समध्ये कार्यरत असलेल्या सल्लागार नेत्रतज्ज्ञ डॉ. रश्मी बर्वे यांनी दिली.

त्या सांगतात, "लेसिकपूर्व तपासणीत अनेकदा असे धोके समोर येतात जे रुग्णाला जाणवतही नाहीत. कॉर्निया पातळ असणं किंवा आत लपलेले विकार लेसिकनंतर गंभीर स्वरूप धारण करू शकतात. त्यामुळे काही वेळा लेसिक न करणं हाच सर्वात सुरक्षित आणि वैद्यकीयदृष्ट्या योग्य निर्णय असतो."

3. शस्त्रक्रियेपूर्वी वय आणि दृष्टीचं स्थैर्य इतकं महत्त्वाचं का आहे?

लेसिक ही शस्त्रक्रिया डोळ्याच्या सध्याच्या दृष्टीदोषावर आधारित असते. म्हणजेच, लेझर ही चष्म्याच्या सध्याच्या पॉवरनुसार कॉर्नियाचा आकार बदलते.

जर एखाद्या रुग्णाचा नंबर अजून बदलत असेल, तर लेसिकनंतरही दृष्टीदोष पुन्हा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळेच बहुतांश नेत्रतज्ज्ञ किमान एक वर्ष तरी पॉवर स्थिर असणं आवश्यक मानतात.

तसंच वयाच्या चाळिशीनंतर नैसर्गिकरीत्या येणारी प्रेसबायोपिया म्हणजे जवळच्या गोष्टी पाहाण्यासाठी दृष्टी कमी होणं ही प्रक्रिया लेसिकने थांबवता येत नाही. त्यामुळे लेसिकनंतरही काही रुग्णांना वाचनासाठी चष्म्याची गरज भासू शकते, याची कल्पना आधीच दिली जाते.

डॉ. सोनल एरोळे सांगतात, "लेसिक करण्याआधी दृष्टी स्थिर असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण लेसिक लेझर सध्याच्या नंबरनुसार काम करतो. जर नंबर अजून बदलत असेल, तर लेसिकनंतरही तो वाढू शकतो आणि रुग्ण निराश होतो. त्याचप्रमाणे वयाच्या चाळिशीनंतर जवळची दृष्टी कमी होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. लेसिक घेताना या बदलांची स्पष्ट कल्पना रुग्णाला दिली, तर नंतर अपेक्षा आणि वास्तव यामध्ये तफावत राहत नाही. योग्य वयात आणि योग्य वेळी केलेली लेसिक दीर्घकालीन समाधान देऊ शकते."

4. लेसिकच्या पात्रतेबाबत रुग्णांमध्ये कोणते सामान्य गैरसमज आढळतात?

लेसिकबाबत अनेक गैरसमज अजूनही रूढ आहेत. 'लेसिक म्हणजे हमखास 20/20 दृष्टी', 'एकदा लेसिक केल्यावर आयुष्यभर चष्मा लागत नाही', किंवा 'एका ठराविक वयानंतर लेसिक करता येत नाही' अशा समजुतींमुळे अनेक रुग्ण चुकीच्या अपेक्षा घेऊन डॉक्टरांकडे येतात.

सोशल मीडिया, जाहिराती आणि ऐकीव अनुभव यामुळे हा भ्रम अधिक वाढतो. प्रत्यक्षात, लेसिक ही वैयक्तिक नेत्रतपासणीवर आधारित वैद्यकीय प्रक्रिया आहे आणि तिच्या मर्यादा रुग्णाला सुरुवातीलाच समजून घेणं आवश्यक असतं.

डॉ. हेमंत कांबळे या गैरसमजांबद्दल सांगतात, "लेसिकबाबतचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ही शस्त्रक्रिया म्हणजे 'परिपूर्ण दृष्टीची हमी' हा आहे. प्रत्यक्षात लेसिक ही सध्याचा दृष्टीदोष दुरुस्त करणारी प्रक्रिया आहे; ती वयाशी संबंधित नैसर्गिक बदल थांबवत नाही. उदाहरणार्थ, प्रेसबायोपिया हा बदल लेसिकने टाळता येत नाही, त्यामुळे चाळिशीनंतर रुग्णाला वाचनासाठी चष्म्याची गरज लागू शकते."

डॉ. कांबळे पुढं म्हणाले, "ॲस्टिग्मॅटिझम किंवा जास्त नंबर असलेले रुग्ण लेसिकसाठी अपात्र असतात, असा एक गैरसमज असतो. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक वेळा हे दोष दुरुस्त करता येतात, पण ते सगळं तपासणीवर अवलंबून असतं. तसेच काही रुग्ण गरोदरपणाच्या काळात 'मोकळा वेळ' असल्यामुळे लेसिक करून घेण्याचा विचार करतात; पण हार्मोनल बदलांमुळे त्या काळात कॉर्नियाचा आकार बदलू शकतो. म्हणूनच लेसिकचा निर्णय हा जाहिरातींवर नव्हे, तर वैद्यकीय सल्ल्यावर आधारित असावा."

5. लेसिकपूर्व तपासण्या कोणत्या आणि त्या का आवश्यक असतात?

लेसिकपूर्व तपासणी हा संपूर्ण प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो.

यामध्ये कॉर्नियल टोपोग्राफीद्वारे कॉर्नियाचा आकार आणि मजबुती तपासली जाते, जाडी मोजली जाते, ड्राय आय असल्याची शक्यता पडताळली जाते आणि डायलेटेड रिफ्रॅक्शनद्वारे अचूक नंबर निश्चित केला जातो. याशिवाय रेटिनाची सखोल तपासणी करून कोणतेही कमकुवत भाग आहेत का, हे पाहिलं जातं. मायोपिक रुग्णांमध्ये ही तपासणी विशेष महत्त्वाची असते.

डॉ. हेमंत कांबळे याबद्दल अधिक माहिती देताना म्हणाले, "लेसिकपूर्व तपासण्या म्हणजे केवळ रुग्णाची पात्रता ठरवणं नाही, तर भविष्यातील धोका ओळखणं आणि टाळणं हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. कॉर्नियल टोपोग्राफीमधून आम्हाला कॉर्नियाचा नेमका आकार, वक्रता आणि बायोमेकॅनिकल स्ट्रेंग्थ समजते. अनेक वेळा केराटोकोनसचे सुरुवातीचे संकेत केवळ या चाचण्यांतूनच दिसून येतात."

याबद्दल डॉ. रश्मी बर्वे सांगतात, "रुग्ण अनेकदा या तपासण्यांकडे वेळखाऊ प्रक्रिया म्हणून पाहतात, पण प्रत्यक्षात ह्याच तपासण्या संभाव्य गुंतागुंत आधी ओळखण्यात मदत करतात. भविष्यातील दृष्टी समस्या टाळण्यासाठी या चाचण्या अत्यावश्यक असतात."

6. लेसिक योग्य नसेल तर रुग्णांसाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

लेसिकसाठी पात्र न ठरणं म्हणजे रुग्णासाठी दृष्टी सुधारणेचे सगळे पर्याय संपले, असा अर्थ होत नाही. काही रुग्णांसाठी PRK किंवा सरफेस अब्लेशन हा सुरक्षित पर्याय ठरू शकतो. नंबर फार जास्त असल्यास फॅकीक इंट्राओक्युलर लेन्स (ICL) हा प्रभावी पर्याय आहे. काही प्रकरणांत रिफ्रॅक्टिव्ह लेन्स एक्सचेंज ही दीर्घकालीन उपाययोजना योग्य ठरते.

डॉ. सोनल एरोळे सांगतात, "लेसिक नाकारली गेली तरी रुग्णाने निराश होऊ नये. आज उपलब्ध असलेले पर्यायी उपचार सुरक्षित आणि वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले आहेत. निर्णय हा रुग्णाच्या गरजेनुसार घ्यावा लागतो."

तर डॉ. हेमंत कांबळे सांगतात, "लेसिकसाठी अपात्र ठरलेला रुग्ण म्हणजे सर्वच उपचारांसाठी अपात्र असे नाही. प्रत्येक रुग्णासाठी योग्य प्रक्रिया वेगवेगळी असते. कॉर्निया पातळ असल्यास PRK अधिक सुरक्षित ठरते कारण त्यात फ्लॅप तयार केला जात नाही. नंबर अत्यंत जास्त असल्यास फॅकीक इंट्राओक्युलर लेन्स हा उत्कृष्ट पर्याय ठरतो, कारण त्यात कॉर्नियावर परिणाम होत नाही."

"काही रुग्णांमध्ये वय, भविष्यातील गरजा आणि नंबर लक्षात घेता रिफ्रॅक्टिव्ह लेन्स एक्सचेंज हा अधिक व्यवहार्य पर्याय ठरतो. यात नैसर्गिक भिंग काढून कृत्रिम लेन्स बसवली जाते आणि भविष्यात मोतीबिंदूचा प्रश्नही टाळता येतो. 'एक रुग्ण,एक प्रक्रिया' असा विचार न करता, 'योग्य रुग्णासाठी योग्य प्रक्रिया' हा दृष्टिकोन ठेवावा लागतो."

7. लेसिक शस्त्रक्रियेचे धोके आणि संभाव्य गुंतागुंत कोणती?

लेसिक ही तुलनेने सुरक्षित शस्त्रक्रिया असली, तरी त्यात जोखीमच नाही असं नाही. लेसिकनंतर काही काळ डोळ्यांचा कोरडेपणा, उजेडाभोवती वलय दिसणे किंवा प्रकाशास जास्त संवेदनशीलता जाणवू शकते. क्वचित फ्लॅपशी संबंधित समस्या किंवा नंबर पुन्हा वाढण्याची शक्यता असते. योग्य तपासणी आणि काळजी घेतल्यास बहुतांश धोके टाळता येतात.

याबाबतीत डॉ. रश्मी बर्वे स्पष्टपणे सांगतात, "रुग्णानं स्वतःच्या सगळ्या वैद्यकीय समस्या डॉक्टरांना स्पष्ट सांगितल्या तर संभाव्य धोके बर्‍याच अंशी टाळता येतात."

डॉ. हेमंत कांबळे सांगतात, "आज लेसिक तंत्रज्ञान प्रगत असलं, तरी ती शेवटी शस्त्रक्रियाच आहे, हे रुग्णांनी समजून घेतलं पाहिजे. ड्राय आय ही सर्वात सामान्य समस्या आहे, परंतु ती बहुतांश वेळा तात्पुरती असते. फ्लॅपशी संबंधित गुंतागुंत किंवा रिग्रेशन फारच क्वचित दिसते."

"मुख्य मुद्दा म्हणजे योग्य रुग्णनिवड. अयोग्य रुग्णावर सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरलं तरी धोका वाढतो. अनुभवी सर्जन, अचूक स्क्रीनिंग आणि शस्त्रक्रियेनंतर दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन केल्यास गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता अत्यंत कमी राहते."

8. अलीकडच्या काळात लेसिक तंत्रज्ञानात काय बदल झाले आहेत?

गेल्या दशकात लेसिक तंत्रज्ञानात मोठे बदल झाले आहेत. फेमटोसेकंद लेझरमुळे फ्लॅप अधिक अचूक झाले आहेत. टोपोग्राफी‑गाईडेड लेसिकमुळे कॉर्नियाच्या सूक्ष्म आकारानुसार उपचार होतो. SMILE व SILKसारख्या फ्लॅपलेस पद्धतींमुळे कॉर्नियाची मजबुती टिकून राहते आणि ड्राय आयचे प्रमाण कमी झाले आहे.

डॉ. हेमंत कांबळे सांगतात, "आधुनिक लेसिकमधील सर्वात मोठा बदल म्हणजे अचूकता. फेमटो लेसिकमुळे फ्लॅपमध्ये मानवी त्रुटी जवळजवळ नाहीशा झाल्या आहेत. टोपोग्राफी‑गाईडेड प्रणालीमुळे प्रत्येक डोळ्यासाठी सानुकूल उपचार करता येतो. SMILEसारख्या फ्लॅपलेस तंत्रांमुळे कॉर्नियाच्या नर्व्हज कमी प्रभावित होतात, ज्यामुळे ड्राय आय कमी दिसतो आणि रिकव्हरी जलद होते."

"याशिवाय आय‑ट्रॅकिंग सिस्टीम्समुळे लेझर डोळ्यांच्या सूक्ष्म हालचालींनुसार समायोजित होतो. त्यामुळे आज लेसिक ही फक्त जलद शस्त्रक्रिया न राहता अत्यंत प्रिसिजन‑आधारित वैद्यकीय प्रक्रिया बनली आहे, अर्थात, योग्य रुग्णनिवडीसह."

डॉ. रश्मी बर्वे यासुद्धा बदलत्या तंत्रज्ञानाची मदत घेताना तपासणीचं महत्त्व पुन्हा अधोरेखित करतात. त्या सांगतात, "तंत्रज्ञान प्रगत झालं असलं, तरी लेसिकचा निर्णय आजही तपासणीवर आणि वैद्यकीय सल्ल्यावरच आधारित असायला हवा."

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल, औषधं घ्यायची असतील तर डॉक्टरांची आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)