महिलेने पहिल्यांदा दिग्दर्शनासाठी ऑस्कर मिळवून इतिहास घडवला, पण म्हटलं गेलं 'जेम्स कॅमेरुनच्या माजी पत्नीला पुरस्कार'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 9 मिनिटे
2010 साली ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदा एका महिलेला बेस्ट डिरेक्टरचा (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) पुरस्कार प्राप्त झाला.
कॅथरिन बिगलो या अमेरिकन महिला दिग्दर्शकाला त्यांच्या 'द हर्ट लॉकर' या चित्रपटासाठी हा मानाचा पुरस्कार मिळाला.
दुसऱ्या दिवशी चर्चा काय झाली असेल? बाईने इतिहास घडवला, ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदा महिलेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला हे सगळं नंतर.
चर्चेची सुरूवात काय, "11 ऑस्कर मिळवणाऱ्या टायटानिकचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांच्या माजी पत्नीला यंदाचा बेस्ट डिरेक्टरचा ऑस्कर."

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेत, 15 मार्च, रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास (अमेरिकन इस्टर्न टाईम) यंदाचा ऑस्कर वितरण सोहळा सुरू होईल. भारतात त्यावेळी सोमवारची पहाट असेल.
यंदा कोणाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री/अभिनेता यांची नामांकनं मिळाली तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेलच. ऑस्कर सोहळ्याचे आयोजक त्याची काळजी घेतातच की जगभरात त्या पुरस्काराची आधी आणि नंतर चर्चा व्हावी.
अमेरिकेतल्या (आताशा त्यात जगभरातल्या मोजक्या) सर्वोत्कृष्ट चित्रपट, कलाकारांना गौरवणं हा या पुरस्काराचा मुख्य हेतू आणि थोडके अपवाद वगळता, ज्या चित्रपटांची निवड होते ते खरंच उत्तम असतात.
पण यात अभिनेत्री आणि सहायक अभिनेत्री ही कॅटेगरी वगळता, सगळीकडे पुरूष कलाकारांना झुकतं माप दिलं जातं का?
ऑस्कर पुरस्कारांच्या जवळपास 100 वर्षांच्या इतिहासात आजवर फक्त 3 महिलांना बेस्ट डिरेक्टर हा पुरस्कार मिळाला आहे आणि आणि 9 महिलांना 11 वेळा बेस्ट पिक्चरसाठी नॉमिनेशन मिळालं आहे पण ऑस्करच्या इतिहासात बेस्ट डिरेक्टर या कॅटेगरीमध्ये 476 नामांकनं दिली गेली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
जेन कॅम्पन आणि क्लोई झाओ या दोन महिला दिग्दर्शकांना प्रत्येकी दोन वेळा नामांकन मिळालं आहे. या अकरा नामांकनांपैकी 3 वेळा महिला दिग्दर्शकांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या तिघी वगळता बाकी सगळे विजते पुरूषच ठरले आहेत.
असं का? काय कारणं असतील?
त्यांचे चित्रपट खरंच चांगले नसतात का? की त्यांनी दाखवलेलं जग पुरुष ज्युरींच्या स्वतःच्या अनुभवाशी मेळ खात नसल्याने महिला डिरेक्टरचे चित्रपट कमी लेखले जातात आणि 'हे काय भलतंच'! अशी प्रतिक्रिया येते? तेच शोधण्याचा या लेखात प्रयत्न केला आहे.
क्लोई झाओ यांना यावर्षी त्यांच्या 'हॅमनेट' या चित्रपटासाठी ऑस्कर नामांकन आहे. याआधी त्यांनी आपल्या 'नोमॅडलँड' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला आहे.
हॉलिवूड चित्रपट इंडस्ट्रीतल्या भेदभावाबद्दल बोलताना त्या म्हणतात, "ही इंडस्ट्री लिंगसमानातेला प्रोत्साहन देणारी नाही."

फोटो स्रोत, Getty Images
क्लोई म्हणतात, "हॅमनेट बनवताना मला एक लक्षात आलं की स्त्रीत्वाचं नेतृत्व (feminine leadership), आणि यात फक्त बायकांची गोष्ट करत नाहीये मी - त्या स्त्रीत्वाच्या नेतृत्व जाणीवेबद्दल बोलतेय – ती जाणीव जिला माहितेय की एकमेकांच्या सहकार्यातून खरी ताकद येते, दमनातून नाही. ही जाणीव तुमचं आत्मभान, नातेसंबंध, समाज आणि एकमेकांवर अवलंबून असणं यातून आपली ताकद विकसित करते. पण ही जाणीव आपण ज्या समाजात राहातो, जे आदर्श आहे असं आपल्याला दाखवलं जातं त्यात अस्तित्वात नाही. मी सुदैवी आहे की माझ्या या प्रकारच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास दाखवला."
क्लोई प्रामुख्याने पुरूष दिग्दर्शकांची चित्रपट दिग्दर्शित करण्याची पद्धत, त्यात हाताळले जाणारे विषय, आणि त्या विषयांची ट्रीटमेंट आणि त्याला समांतर महिला दिग्दर्शक, त्यांना दिसणारं जगं, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह, आणि त्या कशाप्रकारे विषय हाताळतात यावर भाष्य करत होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरण द्यायचं म्हटलं तर क्लोई यांच्या 'हॅमनेट' चित्रपटात, शेक्सपिअरच्या बायकोचा पर्स्पेक्टिव्ह दाखवला आहे. शेक्सपिअरवर आजवर अनेक चित्रपट येऊन गेले, नाटकं, सीरियल येऊन गेल्या, पण मुलगा गेल्यानंतर शेक्सपिअरच्या बायकोचं दुःख, तिचं तिच्या लेखक नवऱ्यावर असलेलं प्रेम आणि त्यातून निर्माण होणारी जगण्यातली गुंतागुंत यावर एका महिलेनेच चित्रपट काढला.
कारण अॅग्नेस (शेक्सपिअरची बायको) स्वतःचीही ओळख असेल, जग असेल, भावविश्व असेल, आणि शेक्सपिअरशी संसार करताना तिला काय वाटलं असेल हे प्रश्न एका बाईला पडले पुरूषाला नाही.
कदाचित हाच मुद्दा महिला दिग्दर्शकाना पुरस्कार किंवा नामांकनं मिळत नाहीत यापाठीमागे असावा. कारण महिला एक वेगळा (पुरूषांपेक्षा) वेगळा पर्सेपेक्टिव्ह मांडतात.
ऑस्कर अकॅडमीचे दहा हजार सभासद आहेत. हे सभासद चित्रपट उद्योगाशीच संबंधित असतात, कोणी दिग्दर्शक असतात, कोणी अभिनेत्री/अभिनेते, लेखक, संकलक.
जो तो मेंबर आपल्या कामाशी संबंधित असलेल्या कॅटेगरीमध्ये मत देऊ शकतो. हे सभासद नामांकनं मिळालेले चित्रपट पाहातात आणि त्यांना मतं देतात. सर्वाधिक पसंती असलेले चित्रपट ऑस्कर पुरस्कारात बाजी मारतात.
आता यात गंमत अशी आहे की ऑस्कर पुरस्कारांसाठी मत देणारे सहसा पुरूष आणि प्रामुख्याने श्वेतवर्णीय असतात.
2012 साली अमेरिकेच्या LA टाईम्स या वर्तमानपत्राने एक अभ्यास केला होता ज्यात समोर आलं की मत देणाऱ्या ऑस्कर अकॅडमीच्या सभासदांपैकी 94 टक्के सभासद श्वेतवर्णीय होते आणि 74 टक्के पुरूष होते.

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर ऑस्कर अकॅडमीच्या सभासदांमध्ये विविधता आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
2022 च्या आकडेवारीनुसार या मत देऊ शकणाऱ्या सभासदांपैकी 81 टक्के सभासद स्वतःला श्वेतवर्णीय म्हणवतात, आणि त्यातले 67 टक्के सभासद पुरूष आहेत.
याच पुरूष मतदारांच्या बायस्ड असण्याचा परिणाम महिला दिग्दर्शकांना पुरस्कार न मिळण्यात किंवा त्यांच्या चित्रपटांना पुरस्कार न मिळण्यात होतो असं अनेकींना वाटतं.
2019 साली दिग्दर्शक ग्रेटा गर्विग या दिग्दर्शिकेच्या 'लिटल विमेन' या चित्रपटाला बेस्ट पिक्चरसकट सहा नामांकनं होती, पण बेस्ट डिरेक्टरचं नामांकन मात्र मिळालं नव्हतं. अनेकांना हा ग्रेटावर अन्याय वाटला होता. या चित्रपटाचं कौतुक होऊनही या चित्रपटाला फक्त बेस्ट कॉस्चुम डिझानचं ऑस्कर मिळालं होतं.
या चित्रपटाच्या प्रोड्युसर एमी पास्कल यांनी त्यावेळी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं होतं, "अकॅडमीच्या मतदारांच्या मनात अनकॉन्शिअस बायस होता. मला नाही वाटत या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला तरी पुरूष (मतदार) मोठ्या संख्येने आले असतील किंवा त्यांना डिव्हीडी मिळाली असेल तर त्यांनी ती काढून तो चित्रपट पाहिला असेल."
"मतदारांच्या मनात पक्कं असतं, या कथा महत्त्वाच्या आहेत, या नाहीत," त्या पुढे म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
याच चित्रपटात काम करणारे अभिनेते ट्रेसी लेट्स यांनी म्हटलं होतं, "माझा विश्वासच बसत नाही की आपण अजूनही याच गोष्टींवर बोलतोय की पुरूषांनी पुरूषांसाठी बनवलेले पिक्चर्स डिफॉल्ट समजले जातात, म्हणजे चित्रपट असेच असले पाहिजेत असं आणि बायकांनी बनवलेले चित्रपट एका वेगळ्या, असमान कॅटेगरीत ढकलले जातात."
ग्रेटा गर्विग यांना 2023 च्या 'बार्बी' चित्रपटासाठीही बेस्ट डिरेक्टरचं नॉमिनेशन नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images
अवॉर्ड मिळणं का गरजेचं?
आता सगळ्यात कोणी असंही म्हणू शकतं की एखादा अवॉर्ड मिळणं म्हणजेच तुमच्या कामाचं सार्थक झालं असं नसतं. अवॉर्ड मिळालं नाही तरी महिला दिग्दर्शक काम करूच शकतात.
जॉर्जी युकिको डोनव्हन ब्रिटिश-जपानी दिग्दर्शक आहेत. त्यांचा पहिला पिक्चर, 'अॅना' बनवायला फिमेल फोर्स इनिशिएटिव्ह या संस्थेने निधी दिला होता. त्यांना वाटतं की कित्येक वर्षं डावललं गेल्यामुळे महिला चित्रपटकर्त्या, निर्मात्या आणि दिग्दर्शक आता नाराज होऊन आपल्या एन्ट्री पाठवणं बंद करतील.
"जर का ही परिस्थिती खऱ्या अर्थाने बदलली नाही तर अनेक प्रतिभावंत महिला अवॉर्डसाठी आपल्या एन्ट्री पाठवणारच नाहीत. कारण एन्ट्री पाठवायला, ज्युरींपर्यंत न्यायलाही पैसे लागतात. आणि महिलांना अवॉर्ड का हवेत म्हणाल, तर त्याची गरज आहे. तो तुमच्या कामगिरीवरचा शिक्का आहे. ती अशी शिडी आहे ज्यामुळे तुम्हाला वरच्या पातळीपर्यंत पोचता येतं. एखाद्या फिल्म फेस्टिव्हलमध्येही महिला चित्रपटकर्तीला अवॉर्ड मिळाला तर तो अनेक संधीचं दार उघडतो," त्या व्यक्त करतात.
"पण अवॉर्डसाठीही कॅम्पेन लॉन्च करायला पैसा लागतो. हे सगळं लिंग, वंश, आणि वर्गाशी निगडित आहे," असं त्या म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
मेलिसा सिल्वरस्टिन या विमेन अँड हॉलिवूड या संस्थेच्या संस्थापक आहेत. त्यांच्यामते ज्या अवॉर्डच्या शॉर्टलिस्टमध्ये महिला, इतर शोषित वर्गांच्या चित्रपटांना स्थान नसेल, ती अवॉर्ड कॅटेगरीच रद्द करायला हवी.
"काहीतरी कडक उपाययोजना केली पाहिजे. मला वाटतं की हेही बघायला हवं की किती महिला त्यांचे चित्रपट पूर्ण करू शकतात आणि त्यांच्या एन्ट्री अवॉर्डसाठी पाठवतात. आणि जर त्या हे करू शकत नसतीत तर का? याचंही उत्तर शोधायला हवं."
"हे खरं आहे की 'कॅप्टन मार्व्हल' किंवा 'वंडर वूमन' सारख्या चित्रपटांसाठी काम केल्यामुळे महिलाही आता या व्यवसायाच्या आर्थिक गणितातल्या सर्वात वरच्या पातळीवर पोचल्या आहेत, पण तरी यासारख्या चित्रपटांमध्ये महिलांचा दृष्टीकोन, त्यांची समाजाकडे पाहण्याची नजर आणि त्यांचं भावविश्व कितपत उतरलं आहे हेही पाहायला हवं," सिल्वरस्टिन पुढे म्हणतात.
"पुरूष आणि श्वेतवर्णीय हे जगाचे डिफॉल्ट नाहीत. त्यामुळे जेव्हा महिलांचे किंवा इतर वंशीय लोकांचे अनुभव जेव्हा कमी लेखले जातात तेव्हा ते हास्यास्पद वाटतं," त्या उत्तरतात.

फोटो स्रोत, Getty Images
सेंटर फॉर स्टडी ऑफ विमेन इन टेलिव्हिजन अँड फिल्म्स या संस्थेच्या एका अभ्यासानुसार, महिला दिग्दर्शकांनी बनवलेले चित्रपट अधिकाधिक महिला लेखक, संकलक, सिनेमॅटोग्राफर्स आणि संगीतकारांना संधी देतात.
आता प्रश्न असा आहे की चित्रपट बनवू पाहाणाऱ्या प्रतिभावंत महिलांची संख्या मोठी आहे तर मग आपल्याला त्या प्रमाणात पुरेशा महिला दिग्दर्शक का दिसत नाहीत?
याचं उत्तर डेम हेदर रॅबॅट्स देतात. त्या टाईम्स अप युके या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. ही संस्था 2018 साली हॉलिवूडच्या काही मोठ्या आणि प्रतिष्ठित अभिनेत्रींनी एकत्र येऊन #Metoo चळवळीच्या समर्थनार्थ स्थापन केली होती.

फोटो स्रोत, Times Up/BBC
डेम हेदर रॅबॅट्स दोन मुद्दे मांडतात. एक म्हणजे, "लोक समोरच्याला काम देताना तो आपलीच प्रतिमा असेल असं पाहातात, (म्हणजे पुरूष काम देताना आपल्यासारख्या पुरूषालाच काम देतात) आणि दुसरं म्हणजे दिग्दर्शनात महिलांना इतर महिला रोल मॉडेल म्हणून दिसत नाहीत. म्हणजेच दिग्दर्शन ही फक्त पुरूषांचीच मक्तेदारी राहिलेली आहे.
"कित्येक महिला तर आता जाग्या होत आहेत आणि त्यांना कळतंय की अरे दिग्दर्शन आपणही करूच शकतो. जेवढ्या जास्त महिला दिग्दर्शक पुढे येतील तेवढं इतर महिलांनाही प्रोत्साहन मिळेल की हे आपल्याला जमू शकतं," असं 'बीबीसी कल्चर'शी बोलताना त्यांनी सांगितलं होतं.
स्टुडिओ इन्वेस्ट करत नाहीत
महिला दिग्दर्शकांना ऑस्कर नामांकनं किंवा पुरस्कार कमी मिळतात याचं आणखी एक कारणं आहे आर्थिक गणित. हॉलिवूडची व्यवस्था स्टुडिओजवर चालते. हे अजस्त्र मोठे स्टुडिओ असतात, त्यांच कित्येक अब्ज डॉलर्सचं बजेट असतं.
या सगळ्या स्टुडिओजचे प्रमुख, एक्झेक्युटिव्ह पुरूष असतात, त्यामुळे पुरूष दिग्दर्शकांना त्यांच्या चित्रपटांसाठी भलंमोठं बजेट मिळत, पण महिला दिग्दर्शकांना मात्र पुरेसे पैसे मिळत नाही.
एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की पुरूषांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचं सरासरी बजेट 31.4 मिलियन डॉलर्स इतकं होतं तर महिलांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचं सरासरी बजेट होतं 12.6 मिलियन डॉलर्स, म्हणजे पुरुषांपेक्षा निम्मं.
दुसऱ्या एका अभ्यासात असं दिसून आलं की महिलांची दिग्दर्शित केलेले चित्रपट जास्त रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट देतात, म्हणजे जेवढे पैसे लावले, त्यावर किती फायदा होते यांची टक्केवारी जास्त असते तरीही महिलांच्या चित्रपटांना कमी बजेट मिळतं.
स्टुडिओचे प्रोड्युसर्स किंवा एक्झेक्युटिव्ह महिला दिग्दर्शकांना संधी का देत नाही याच्या मागचं एक कारण म्हणजे त्यांना महिलांच्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवणं 'धोक्याचं' वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
रिसर्चमध्ये दिसून आलंय की, "स्टुडिओ प्रमुखांना वाटतं की पुरूष दिग्दर्शक जास्त प्रेक्षकांना चित्रपटाकडे खेचू शकतात. स्टुडिओजला वाटतं की महिला लहान प्रोजेक्ट्सला प्राधान्य देतात. पुरुष प्रमुख पुरुषांनाच काम देतात."
त्यामुळे महिला दिग्दर्शक सहसा लहान प्रोजेक्ट करतात किंवा स्वतंत्र चित्रपट करून आपलं करियर करतात.
बरं, महिला दिग्दर्शकांना स्टुडिओचे चित्रपट करण्याचा संधी मिळाली तरी त्यांना वितरणासाठी मात्र म्हणावी तितकी मदत केली जात नाही.
"पुरुष दिग्दर्शकांच्या चित्रपटांना अधिक सिनेमा स्क्रीन मिळतात. महिलांच्या वाटेला मात्र कमी डिस्ट्रिब्युशन डिल्स येतात. चित्रपटांच्या प्रमोशनवर जेवढा पैसा खर्च होतो, त्यातही बरीच तफावत असते."
डेबोरा काला अमेरिकेच्या प्रोड्युसर्स गिल्डच्या डायव्हर्सिटी कमिटीच्या अध्यक्ष आहेत. त्या म्हणतात, "समजा एखाद्या महिला दिग्दर्शकाना तिच्या चित्रपटासाठी पैसे मिळालेच, तरी तिच्या वाटेला तेवढंच येतं. तेवढा एकच चित्रपट ती बनवू शकते. अशा कितीतरी आकडेवारी आहेत ज्या सिद्ध करतात की बहुतांश महिला दिग्दर्शक एकच चित्रपट दिग्दर्शित करू शकतात. त्यांना दुसरा किंवा तिसरा चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी मिळत नाही."
अमेरिकेतल्या सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या अॅनबर्ग मीडिया, डायव्हर्सिटी आणि सोशल चेंज इनिशिएटिव्हच्या एका अभ्यासानुसार 2007 ते 2010 या काळात 80 टक्के महिला दिग्दर्शकांनी फक्त एकच चित्रपट दिग्दर्शित केला तर याच काळाच एक चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण होते 54.8.

फोटो स्रोत, Getty Images
पुढे काय?
यासगळ्या पार्श्वभूमीवर सिनेमा क्षेत्रातला भेदभाव कमी करण्यासाठी प्रयत्नही होत आहेत. सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या अॅनबर्ग मीडिया, डायव्हर्सिटी आणि सोशल चेंज इनिशिएटिव्हच्या अभ्यासात काय करता येईल हेही सांगितलं आहे.
यात म्हटलं आहे की स्टुडिओने जाणीवपूर्वक महिलांना काम करण्याची संधी दिली पाहिजे. त्यांना मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी दिली पाहिजे.
सनडान्स हा जगभरातला मोठा फिल्म फेस्टिव्हल आहे. विमेन अॅट सनडान्स प्रोग्रॅम त्याचाच भाग आहे. हा प्रोग्रॅम महिला चित्रपटकर्त्यांना साहाय्य करतो. महिलांना फेलोशिप्स आणि इन्सेटिव्ह दिले जातात ज्यामुळे त्याचं करियर स्थिर होऊ शकेल.
या प्रोग्रम अंतर्गत महिलांना मेंटोरशिप, इंडस्ट्रीतले संपर्क आणि दिग्दर्शनाच्या संधी दिल्या जातात.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे 2016 साली झालेल्या #OscarSoWhite या चळवळीनंतर ऑस्कर देणाऱ्या अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर अँड सायन्सेस या संस्थेने आपल्या सभासदांची संख्या वाढवून, त्यात विविध पार्श्वभूमीचे सभासद, जसं की महिला, इतर वर्णीय, इतर वंशीय लोक असतील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर अँड सायन्सेस या संस्थेने बेस्ट पिक्चरसाठी नॉमिनेशन देताना आता खालील गोष्टींचा विचार करायला सुरूवात केली आहे. बेस्ट पिक्चरसाठी नॉमिनेशन देताता हे निकष लावले जातात.
- पडद्यावर (वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांचं) किती प्रतिनिधित्व आहे?
- चित्रपटाच्या क्रूमध्ये (वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांचं) किती प्रतिनिधित्व आहे?
- प्रशिक्षणाच्या संधी
- स्टुडिओच्या नेतृत्वात वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे किती लोक आहेत?
महिला चित्रपटकर्त्या, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांना सहकार्य करण्यासाठी अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत, ज्यात रिफ्रेम प्रोजेक्ट, अलायन्स ऑफ विमेन डिरेक्टर, विमेन इन फिल्म अशा संस्थांचा समावेश होतो. एलए फेमे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा फक्त महिलांच्या चित्रपटांचा फिल्म फेस्टिव्हल आहे. महिला दिग्दर्शकांना वितरणातही या फेस्टिव्हल तर्फे मदत केली जाते.
पण अजूनही स्टुडिओ लेव्हलवर महिलांना मोठ्या बजेटच्या चित्रपटांसाठी समान संधी तसंच स्टुडिओच्या वरिष्ठ व्यवस्थापनात महिलांचा समावेश याची आवश्यकता आहे असं तज्ज्ञांना वाटतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











