अमेरिका-इराणमधील शांतता चर्चा फिस्कटली; जेडी व्हेन्स पाकिस्तानमधून अमेरिकेकडे रवाना, नेमकं काय म्हणाले?

वाचन वेळ: 13 मिनिटे

अमेरिका-इराण यांच्यातील चर्चा फिस्कटली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता करारावर सहमती न झाल्यामुळे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स आणि त्यांचे पथक पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथून माघारी निघाले आहेत.

व्हेन्स त्यांच्या 'एअर फोर्स टू' विमानाने अमेरिकेकडे रवाना झाले आहेत.

बीबीसी उर्दूचे वार्ताहर शहजाद मलिक यांना पाकिस्तानच्या गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने अमेरिकी शिष्टमंडळाच्या रवाना होण्याची पुष्टी केली आहे.

इस्लामाबादमधून उड्डाण करण्यापूर्वी जेडी व्हेन्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, सुमारे 21 तास चाललेल्या चर्चेनंतरही अमेरिका आणि इराण कोणत्याही करारावर पोहोचू शकले नाहीत.

दरम्यान, इराणकडूनही या चर्चेबाबत निवेदन जारी करण्यात आलं आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी अमेरिकेने अवाजवी मागण्या करणे टाळावे, असे म्हटले.

21 तासांच्या अमेरिका-इराण शांतता चर्चेत नेमकं काय घडलं?

"अमेरिका आणि इराण यांच्यात कोणताही करार झालेला नाही", अशी माहिती अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी दिली.

रविवारी (12 एप्रिल) इस्लामाबादमधील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, "करार होऊ शकेल यासाठी वाटाघाटी सुरळीतपणे पार पाडण्याचे काम पाकिस्तानने चांगले केले."

"गेले 21 तास झाले आम्ही यावर काम करत आहोत, पण वाईट बातमी ही आहे की आम्ही कोणत्याही करारावर पोहोचलेलो नाही."

ते म्हणाले, "आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आमच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे. वाटाघाटींमध्ये ज्या काही त्रुटी होत्या, त्या पाकिस्तानमुळे नव्हत्या, त्यांनी उत्कृष्ट काम केले."

यापूर्वी इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिकन शिष्टमंडळादरम्यान शनिवारी (11 एप्रिल) सुरू झालेली चर्चा उशिरापर्यंत चालली. पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावत आहे.

बीबीसीच्या प्रतिनिधी क्रिस्टल हेज यांच्या मते, इस्लामाबाद वेळेनुसार पहाटे 4 वाजून 50 मिनिटांपर्यंत चर्चा सुरू होती.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील सेरेना हॉटेलमध्ये ही चर्चा आयोजित करण्यात आली होती.

याआधी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकेई यांनी एक्सवर याबाबत माहिती देताना सांगितलं होतं की, पाकिस्तानच्या सदिच्छा प्रयत्नांनी आणि मध्यस्थीने शनिवारी (11 एप्रिल) सकाळी सुरू झालेली कठीण चर्चा आतापर्यंत कोणत्याही अडथळ्याविना सुरू आहे.

या दरम्यान दोन्ही बाजूंमध्ये अनेक संदेश आणि लिखित मसुद्यांची देवाणघेवाण झाली होती.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की या चर्चेमध्ये होर्मुझची सामुद्रधुनी, अणू प्रश्न, युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई, निर्बंध हटवणे आणि प्रदेशातील युद्धाची पूर्ण समाप्ती यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

'अवाजवी आणि बेकायदेशीर मागण्या टाळा'; इराणने अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेवर नेमकं काय म्हटलं?

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी अमेरिकेसोबत सुरू असलेल्या शांतता चर्चेच्या स्थितीवर एक निवेदन जारी केले आहे.

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये बकाई यांनी ही चर्चा सखोल होत असल्याचे वर्णन केले. मात्र सुरू असलेल्या वाटाघाटींचे यश "विरोधी पक्षाच्या गांभीर्यावर आणि चांगल्या हेतूंवर अवलंबून आहे", असंही ते म्हणाले.

बकाई यांनी अमेरिकेला "अवाजवी मागण्या आणि बेकायदेशीर विनंत्या" टाळण्याचे तसेच इराणचे "कायदेशीर हक्क व हितसंबंध" मान्य करण्याचे आवाहनही केले.

त्यांनी चर्चेदरम्यान होर्मुझ सामुद्रधुनी, इराणचा अणु कार्यक्रम आणि "इराणमध्ये पूर्ण युद्धविराम" यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा उल्लेख केला.

इराणच्या या निवेदनानंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स यांनी पत्रकार परिषदेत बोलताना "अमेरिका आणि इराण यांच्यात कोणताही करार झालेला नाही", असं म्हटलं.

'इराणचा अणु कार्यक्रम थांबवणे हा मुख्य मुद्दा'

व्हेन्स यांनी इराणच्या अणु कार्यक्रमाबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले, "सरळ सांगायचं तर, आम्हाला इराणकडून स्पष्ट आणि ठोस आश्वासन हवं आहे की ते अण्वस्त्रे तयार करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा ते विकसित करण्याची साधनेही मिळवणार नाही."

व्हेन्स यांनी याला डोनाल्ड ट्रम्प यांचे 'मुख्य उद्दिष्ट' असे म्हटले.

व्हेन्स यांनी असंही म्हटलं की, इराणचा अणु कार्यक्रम "उद्ध्वस्त करण्यात आला आहे. परंतु भविष्यात इराणला अण्वस्त्रे विकसित करण्यापासून रोखण्यासाठी "प्रबळ आणि मूलभूत राजकीय इच्छाशक्ती"ची गरज आहे यावर त्यांनी जोर दिला.

"आतापर्यंत आम्हाला अशी बांधिलकी दिसलेली नाही. पंरतु, ती मिळेल अशी आम्हाला आशा आहे."

या चर्चेदरम्यान इराणच्या गोठवलेल्या अनेक मालमत्तांबाबतही चर्चा झाली, असंही व्हेन्स यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "आम्ही त्या सर्व मुद्द्यांवर आणि त्यापलीकडच्या इतर अनेक मुद्द्यांवरही चर्चा केली. मात्र आम्ही अजून अशा स्थितीपर्यंत पोहोचू शकलो नाही, जिथे इराण आमचे प्रस्ताव स्वीकारण्यास तयार असेल. माझ्या मते आम्ही खूप लवचिक भूमिका घेतली आणि बर्‍याच गोष्टी जुळवून घेण्याचा दृष्टिकोन ठेवला", असं व्हेन्स यांनी पत्रकारांना संभाषणादरम्यान सांगितलं.

इराणसोबत करार होतो की नाही याने फरक पडत नाही - ट्रम्प

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं की, इराणसोबत करार होणार की नाही, याने त्यांना 'काही फरक पडत नाही.'

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांना या संधीचा फायदा घेऊन तणाव कायमस्वरूपी कमी करण्याचा मार्ग शोधण्याचे आवाहन केले होते.

मॅक्रॉन यांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले होते की, त्यांनी मसूद पेजेश्कियन यांच्याशी चर्चा केली आणि सर्व देशांचा समावेश असलेल्या प्रादेशिक सुरक्षा हमीसह करारावर भर दिला.

तसेच होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करणे व लेबनॉनसह युद्धविरामाच्या महत्त्वावरही भर दिला.

दरम्यान, इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचा दुसरा टप्पा सुरू झाला होता. ही त्रिपक्षीय चर्चा असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले होते.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने, इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिकेदरम्यानच्या 'तज्ज्ञ स्तरावरील' चर्चेला सुरुवात झाली असल्याची माहिती बीबीसी उर्दूला दिली होती.

या अधिकाऱ्याच्या मते, चर्चेच्या या टप्प्यात दोन्ही बाजूंनी मांडलेल्या मागण्यांच्या 'तांत्रिक बाबींची तपासणी' केली जाणार होती.

व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही याला दुजोरा दिला होता. त्यांच्यानुसार, पाकिस्तानच्या उपस्थितीत अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधी मंडळांमध्ये समोरासमोर त्रिपक्षीय चर्चा सुरू होती. यापूर्वी पाकिस्तान सरकारच्या सूत्रांनीही बीबीसीला हीच माहिती दिली होती.

याआधी दोन सरकारी अधिकाऱ्यांनी बीबीसी उर्दूला, प्राथमिक चर्चा 'सकारात्मक' झाली असल्याचं सांगितलं होतं.

अमेरिकेकडून चर्चेत कोण-कोण सहभागी?

आधी प्राप्त माहितीनुसार अमेरिकेच्या मुख्य शिष्टमंडळात उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स, विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर यांचा समावेश आहे, असं व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

व्हाइट हाऊस अधिकाऱ्याच्या मते, विस्तारित अमेरिकी शिष्टमंडळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अँड्र्यू बेकर आणि आशियाई घडामोडींचे सल्लागार मायकेल व्हेन्स यांचाही समावेश आहे.

व्हाइट हाऊस अधिकाऱ्यानी हेही सांगितलं की, विविध विषयांतील अमेरिकी तज्ज्ञही इस्लामाबादमध्ये उपस्थित आहेत, तर इतर तज्ज्ञ वॉशिंग्टन डीसीमधून सहाय्य करत आहेत.

तत्पूर्वी सायंकाळी चार वाजता सुरू झालेला चर्चेचा पहिला टप्पा सुमारे अडीच तासांच्या चर्चेनंतर संपला.

अमेरिका आणि इराणमधील चर्चा इस्लामाबादमधील सेरेना हॉटेलमध्ये होत असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी बीबीसी उर्दूला दिली होती.

तसेच, पहिल्या टप्प्यातील चर्चा मध्यस्थांमार्फत झाली असंही पाकिस्तान सरकारच्या सूत्रांनी बीबीसी उर्दूला सांगितलं. म्हणजेच पाकिस्तानचे अधिकारी दोन्ही देशांदरम्यान संदेशांची देवाणघेवाण करत होते.

दरम्यान, चर्चेसाठी इराणी शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री (10 एप्रिल) इस्लामाबादमध्ये दाखल झाले, तर अमेरिकी शिष्टमंडळ शनिवारी (11 एप्रिल) सकाळी इस्लामाबादमध्ये पोहोचले.

इराणच्या अटी मान्य झाल्या नाहीत तर आम्ही चर्चेतून बाहेर पडू शकतो; इराणची सरकारी वृत्तवाहिनी काय म्हणतेय?

इराणसोबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हेन्स यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकी शिष्टमंडळ पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे पोहोचले आहे.

जेडी व्हेन्स यांचे 'एअर फोर्स टू' विमान इस्लामाबादमध्ये उतरले अशी माहिती बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी उमर दराज नांगियाना यांना पाकिस्तानी हवाई वाहतूक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

गेल्या 21 वर्षांच्या दीर्घ अंतरानंतर एखाद्या अमेरिकन उपराष्ट्रपतींचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा आहे. यापूर्वी तत्कालीन उपराष्ट्रपती डिक चेनी यांनी 2005 मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती.

इस्लामाबादमध्ये होणाऱ्या चर्चेसाठी जेडी व्हेन्स यांच्यासोबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि राष्ट्राध्यक्षांचे जावई जॅरेड कुशनर हेदेखील आले आहेत.

दुसरीकडे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांच्या नेतृत्वाखालील इराणी शिष्टमंडळही इस्लामाबादमध्ये पोहोचले आहे.

इराणच्या सरकारी वृत्तवाहिनी आयआरआयएनएन (IRINN) वरील एका रिपोर्टरने म्हटले आहे की, अमेरिकेसोबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये इराणच्या अटी पूर्ण झाल्या नाहीत, तर इराण या चर्चांमधून माघार घेऊ शकतो.

आयआरआयएनएन वाहिनीवर इस्लामाबादहून थेट (लाइव्ह) रिपोर्टिंग करत असलेल्या एका वार्ताहराने इशारा दिला की, इराणने आधीच ठरवलेल्या अटी पूर्ण झाल्या नाहीत, तर ही चर्चा अजूनही रद्द होऊ शकते.

या संवाददात्याने असेही सांगितले की, इराणच्या'"हितसंबंधांचा, मागण्यांचा आणि मर्यादांचा' आदर न ठेवणाऱ्या चर्चांमधून माघार घेणेही यश मानलं जाऊ शकतलं. यालाच इराणी अधिकारी 'ठाम (कडक) कूटनीती' असे संबोधतात.

सरकारी टीव्हीवरील रिपोर्ट्समध्ये अमेरिकेबाबत असलेल्या अविश्वासावर भर दिला जात आहे. या चर्चांमध्ये इराणची भूमिका मजबूत आहे आणि जर त्याच्या शर्ता पूर्ण झाल्या नाहीत, तर कोणतीही चर्चा न करता देखील इराण त्यातून बाहेर पडू शकतो, असं म्हटलं जात आहे.

इराण-अमेरिका चर्चेत लेबनॉनचाही समावेश झाला पाहिजे- पाकिस्तानच्या मंत्र्यांची अपेक्षा

इराण आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या संघर्षविराम चर्चेत लेबनॉनलाही समाविष्ट केले पाहिजे, असं पाकिस्तान सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याने बीबीसीला सांगितले.

योजना आणि विकास मंत्री अहसान इक़बाल यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या वीकएन्ड कार्यक्रमात सांगितले की पाकिस्तानचा असा विश्वास आहे की हा संघर्षविराम संपूर्ण प्रदेशासाठी असला पाहिजे आणि या 'ऐतिहासिक संधीमध्ये' इस्रायल अडथळा ठरणार नाही, अशी त्यांना अपेक्षा आहे.

ते म्हणाले, "प्रदेशाच्या एका भागात रक्तपात सुरू असताना आणि दुसऱ्या भागात वाटाघाटी चालू असतील, तर हे आम्हाला चालणार नाही. माझ्या मते इस्रायलने अधिक जबाबदार भूमिका घ्यायला हवी आणि ही चर्चा पुढे जाण्यापूर्वी कोणताही फायदा उचलण्याचा प्रयत्न करू नये."

इक़बाल यांनी सांगितले की पाकिस्तान दोन्ही बाजूंना एकत्र आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, जेणेकरून त्या 'कोणत्यातरी करारावर पोहोचू शकतील.'

ते पुढे म्हणाले की, जर दोन्हीकडचे नेते "संघर्षविराम पुढे सुरू ठेवण्यावर आणि आणखी एका फेरीच्या चर्चेवर" सहमत झाले, तर ते याला 'यश' मानतील.

मध्यपूर्वेतील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका आणि इराण दोन आठवड्यांच्या संघर्षविरामावर सहमत झाले आहेत, मात्र लेबनॉनमध्ये इस्रायल आणि हिज़्बुल्लाह यांच्यातील लढाई सुरूच आहे.

लेबनॉन हा या कराराचा भाग नाही असे संकेत अमेरिका आणि इस्रायल यांनी दिले आहेत. तर इराण आणि चर्चांतील प्रमुख मध्यस्थ असलेला पाकिस्तान मात्र लेबनॉन लाही या प्रक्रियेत समाविष्ट केले पाहिजे, असा आग्रह धरत आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री काय म्हणाले?

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री मोहम्मद इसहाक डार यांनी राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स यांचे स्वागत केले.

यावेळी त्यांनी प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर स्थायी शांतता प्रस्थापित करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात डार यांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, इराण आणि अमेरिका यांच्यात "अर्थपूर्ण चर्चा" होईल.

मध्यपूर्वेतील संघर्षावर चिरस्थायी आणि टिकाऊ तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये सहकार्य सुरू राहावे, अशी पाकिस्तानची इच्छा आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

दरम्यान, अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधीमंडळ चर्चेसाठी इस्लामाबादला पोहोचले आहेत.

अमेरिकन प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स करत आहेत, तर इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ करत आहेत.

इराणी शिष्टमंडळ ज्या विमानाने इस्लामाबादला पोहोचले, त्याला 'मिनाब 168' नाव का देण्यात आलं?

अमेरिकेसोबत चर्चेसाठी इराणी शिष्टमंडळ ज्या विमानाने पाकिस्तानच्या इस्लामाबादला पोहोचले, त्या विमानाला 'मिनाब 168' हे नाव देण्यात आलं आहे, अशी माहिती इराण सरकारकडून देण्यात आली आहे.

हे नाव अलीकडेच इराणमधील मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्याच्या स्मरणार्थ देण्यात आलं आहे. या हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांमध्ये बहुतेक लहान मुली होत्या.

इराणी अधिकाऱ्यांच्या मते, 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात या मुलींचा मृत्यू झाला. या हल्ल्यात इराणमधील मिनाब शहरातील मुलींची प्राथमिक शाळा उद्ध्वस्त झाली होती.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकन तपासकर्त्यांना असा संशय आहे की कदाचित अमेरिकन सैन्याने चुकून या शाळेला लक्ष्य केले असावे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचंही सांगितलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये उतरल्यावर, इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी एक्सवर एक फोटो पोस्ट केलाय. 'या फ्लाईटमधील माझे सोबती' असं कॅप्शन त्यांनी या फोटोसोबत दिलंय.

या फोटोमध्ये विमानाच्या सीटवर चार मुलांचे फोटो ठेवलेले दिसतात. यातील प्रत्येक फोटोसोबत एक शालेय बॅग आणि एक फूलदेखील ठेवलेलं आहे.

'आमचे हेतू चांगले, पण अमेरिकेवर विश्वास नाही'; इस्लामाबादमधील चर्चेआधी इराणचे नेते काय म्हणाले?

अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी इराणी शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी "अमेरिकेवर विश्वास नाही", असं मत व्यक्त केलं आहे.

बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, इस्लामाबादमध्ये आगमन झाल्यावर इराणी शिष्टमंडळासोबत आलेल्या इराणी पत्रकारांशी बोलताना गालिबाफ म्हणाले, "एका वर्षापेक्षा कमी कालावधीत झालेल्या 2 चर्चांमध्ये, आमचे हेतू चांगले असूनही आमच्यावर हल्ले झाले आणि अनेक युद्ध गुन्हे घडले."

"आमचे हेतू चांगले आहेत, पण आम्हाला अमेरिकेवर विश्वास नाही," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी (आयआरजीसी) संलग्न असलेल्या इराणची सरकारी वृत्तसंस्था तस्निमच्या वृत्तानुसार, गालिबाफ म्हणाले, "जर अमेरिका खऱ्या करारासाठी तयार असेल आणि इराणी लोकांच्या कायदेशीर हक्कांना मान्यता देत असेल, तर इराणदेखील करारासाठी पूर्ण तयारी दर्शवेल."

"जर अमेरिकेला या चर्चांचा वापर केवळ शक्तीप्रदर्शन किंवा फसवणुकीचे डावपेच म्हणून करायचा असेल, तर इराण आपल्या लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या क्षमतेवर अवलंबून राहण्यास तयार आहे," असा इशाराही गालिबाफ यांनी दिला.

गालिबाफ यांनी इराणवरील अलीकडील हल्ल्यांदरम्यान आपल्या देशाने केलेल्या बचावात्मक आणि प्रत्युत्तरात्मक कारवाईचाही उल्लेख केला.

ते म्हणाले, "हा या गोष्टीचा पुरावा आहे की, इराण आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आणि आपले सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी पूर्णपणे तयार आणि दृढनिश्चयी आहे."

'जर त्यांनी आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तर'; इराणसोबतच्या शांतता चर्चेआधी अमेरिकेनं काय इशारा दिला?

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स हे इराणसोबतच्या शांतता चर्चेत अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी पाकिस्तानला जात आहेत.

त्यांचं 'एअर फोर्स टू' हे विमान पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार इंधन भरण्यासाठी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे थांबलं.

रवाना होण्यापूर्वी व्हेन्स यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, "जर इराण सकारात्मक भूमिकेतून चर्चेसाठी तयार असेल, तर आम्हीही खुल्या मनाने पुढे जाण्यास तयार आहोत."

मात्र, उपराष्ट्रपतींनी एक इशाराही दिला. ते म्हणाले, "जर त्यांनी आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना कळून येईल की चर्चा करणारी (अमेरिकन) टीम इतकी साधी नाही."

त्यांनी सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन चर्चापथकाला 'काही स्पष्ट मार्गदर्शक सूचना' केल्या आहेत.

अमेरिकन शिष्टमंडळात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचाही समावेश आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात सल्लागार म्हणून काम पाहिले होते.

याशिवाय अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांचाही या शिष्टमंडळात समावेश आहे.

या दोघांनी यापूर्वी अमेरिकेच्या वतीने इस्रायल-गाझा युद्ध संपवण्यासाठीच्या शस्त्रसंधी चर्चेत तसेच रशिया व युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबवण्याच्या प्रयत्नांमध्ये सहभाग घेतला आहे.

अमेरिका आणि इराणमध्ये पाकिस्तानात होणार चर्चा; 'चांगल्या हेतूने काम केल्यास मदत'- जेडी व्हेन्स

पाकिस्तानमध्ये अमेरिकन आणि इराणी प्रतिनिधिमंडळांची चर्चा होणार आहे. त्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स रवाना झाले आहेत.

"या चर्चेबाबत आम्ही उत्सुक आहोत" असं त्यांनी यावेळेस सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, इराणने 'चांगल्या हेतूने' काम केले तर अमेरिका 'मदतीचा हात पुढे करण्यास' तयार आहे.

मात्र, इराणने 'आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला' तर अमेरिका सकारात्मक भूमिका घेणार नाही, असेही वेंस यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीच आपल्याला या चर्चेसंदर्भात दिशानिर्देश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

याआधी व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलाइन लेविट यांनी ही चर्चा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होणार असून ती शनिवारपासून सुरू होण्याची अपेक्षा असल्याचं जाहीर केलं होतं.

पाकिस्तानमधील बीबीसीच्या प्रतिनिधीच्या माहितीनुसार, जेडी व्हेन्स यांच्यासोबत विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हेही या दौऱ्यावर असतील.

'अमेरिकेची जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे जाऊ शकतात पण, त्यांनी कोणतीही शत्रुत्वाची पावले उचलू नयेत,' असं इराणचे उप परराष्ट्र मंत्री सईद खतीबजादेह यांनी म्हटलं आहे.

बीबीसी पर्शियनने दिलेल्या बातमीनुसार, खतीबजादेह यांनी इराणी माध्यमांना सांगितलं, "होर्मुझचा मार्ग आता खुला झाला आहे. पण तांत्रिक कारणांमुळे इथून प्रवास करणाऱ्या जहाजांनी इराणच्या सैन्याशी संपर्क ठेवूनच पुढे गेलं पाहिजे."

इराणच्या मंत्र्यांनी सांगितलं की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आमच्या सुरक्षित मार्गांनी आम्ही या जहाजांचा प्रवास सुखरूप करू.

याआधी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावरून इराणवर टीका केली होती. इथून प्रवास करणाऱ्या जहाजांची इराण 'खूप खराब' व्यवस्था करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते, "आम्ही जो केला होता तो करार हा नाही."

ट्रम्प काय म्हणाले?

"होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलवाहू जहाजांना जाण्याची परवानगी देण्याचे काम इराण 'अत्यंत वाईट' पद्धतीने करत आहे," असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

हे अमेरिका आणि इराण यांच्यातील 'करारानुसार नाही', असंही ट्रम्प यांनी म्हटलं.

ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वरील एका पोस्टमध्ये म्हटले, "होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाला जाण्याची परवानगी देण्याचे काम इराण अत्यंत वाईट पद्धतीने करत आहे. काही जण हे सन्मानजनक नाही असंही म्हणतील. आमच्यात जो करार झाला होता, तो हा नाही."

यापूर्वी दुसऱ्या एका पोस्टमध्ये, ट्रम्प यांनी काही रिपोर्ट्सचा हवाला देत म्हटले होते की, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांकडून 'शुल्क आकारू नये'.

ते म्हणाले, "इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांकडून शुल्क आकारत आहे, असे रिपोर्ट्स आहेत. त्यांनी असे करू नये आणि जर ते करत असतील, तर त्यांनी ते तात्काळ थांबवावे."

लेबनॉनमधील नागरिकांच्या जीवितहानीनंतर भारताची प्रतिक्रिया

लेबनॉनमधील नागरिकांच्या जीवितहानीच्या बातम्यानंतर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी सांगितलं, "लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या जीवितहानीच्या बातम्यांमुळे आम्ही अत्यंत चिंतित आहोत."

ते म्हणाले, "भारताने नेहमीच नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भर दिला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करणे आणि देशांच्या सार्वभौमत्वाचा व प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे अत्यावश्यक आहे."

"लेबनॉनमधील आमचा दूतावास तेथील भारतीय समुदायाच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी त्यांच्याशी सतत संपर्कात आहे."

इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. दरम्यान, हिजबुल्लाहनेही इस्रायलवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले आहेत.

बेंजामिन नेतन्याहू काय म्हणाले?

इस्रायल आणि लेबनॉनमध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रसंधी लागू झाला नसल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी त्यांनी एका निवेदनात म्हटलं होतं की, त्यांनी आपल्या कॅबिनेटला लेबनॉनसोबत चर्चेच्या सूचना दिल्या आहेत.

इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने नेतन्याहू यांचा एक व्हीडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. या व्हीडिओत नेतन्याहू उत्तर इस्रायलमधील नागरिकांना संबोधित करताना दिसत आहेत.

ते म्हणतात, "मी तुम्हाला सांगू इच्छितो की लेबनॉनमध्ये कोणतीही शस्त्रसंधी झालेली नाही. आम्ही हिज्बुल्लावर पूर्ण ताकदीने हल्ले सुरू ठेवले आहेत. तुमची सुरक्षा पुन्हा निश्चित होईपर्यंत आम्ही थांबणार नाही."

यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाने नेतन्याहू यांचे आणखी एक निवेदन प्रसिद्ध केले होते.

त्यात नेतन्याहू यांनी म्हटलं होतं, "लेबनॉनकडून इस्रायलसोबत थेट चर्चा सुरू करण्याच्या वारंवार केलेल्या विनंत्यांचा विचार करून मी काल सरकारच्या बैठकीत लेबनानसोबत शक्य तितक्या लवकर थेट चर्चा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत."

त्यांनी लेबनानच्या पंतप्रधानांनी केलेल्या 'बेरूतचे निरस्त्रीकरण' करण्याच्या आवाहनाचे कौतुक करत असेही म्हटले की, "ही चर्चा हिज्बुल्लाने शस्त्रं त्यागल्यावर आणि इस्रायल-लेबनॉन यांच्यात शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यावर केंद्रित असेल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)