You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा राजीनामा; मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेल्या पत्रात नेमकं काय म्हणाल्या?
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 9 मिनिटे
स्वतःला 'कॉस्मोलॉजी' तज्ज्ञ आणि भविष्यवेत्ता म्हणवून घेणाऱ्या 'कॅप्टन' अशोक खरात याला नाशिकच्या सरकारवाडा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 17 मार्चला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे.
अशोक खरातचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर ते अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावे पत्र लिहित राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी हे पत्र राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केले.
या प्रकरणामुळे केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
त्याआधी रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.
मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन अशोक खरात प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
सध्या एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत खरात याची सर्व बाजूंनी अधिक चौकशी आणि तपास सुरू असल्याचं नाशिक पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
या प्रकरणामध्ये एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाने खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, संबंधित आरोपांबद्दल बीबीसी मराठीने आरोपी अशोक खरात यांच्या कुटुंबीयांची आणि वकिलांची बाजू मिळवण्याचा प्रयत्न केला. ती अद्याप मिळाली नाही.
राजीनाम्याच्या पत्रात चाकणकरांनी काय म्हटलं?
रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या म्हटलं आहे की, "मी रुपाली निलेश चाकणकर विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे."
"आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही मला आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकार करावा अशी आपणांस नम्र विनंती आहे," असं रुपाली चाकणकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
रुपाली चाकणकर यांना त्यांची चूक आहे असं वाटत नाही - विजय वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर टीका केली आहे.
एक्सवर पोस्ट करून विजय वडेट्टीवार म्हणाले, "राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वेछेने वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख पत्रात केला आहे. म्हणजे खरात प्रकरणात त्यांनी महिलांवर,पत्रकारांवर टाकलेला दबाव ,या प्रकरणी पोलिस तक्रार होऊ नये म्हणून केलेले उद्योग याचा कुठलाही खेद,चूक झाली अस त्यांना वाटत नाही."
"राजीनामा देताना पण उपकार असल्यागत चाकणकर यांचे वागणे निषेधार्ह आहे. /रूपाली चाकणकर हा छोटा मासा आहे यात अजून किती मंत्री होते कोणी या बलात्कारी बाबाला राजाश्रय दिला,वाचवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे हे प्रकरण दाबण्यासाठी कोणत्या नेत्यांनी,मंत्र्यांनी फोन केले याचीही चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे," असं वडेट्टीवार म्हणाले.
नक्की तक्रार काय आणि का अटक झाली?
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्यासोबत घडलेला प्रकार हा 2019 ते 2025 या कालावधीत घडला. 2019 मध्ये कॅनडा कॉर्नर येथे अशोक खरातशी महिलेची ओळख झाली होती.
अशोक खरातने आपल्या जवळ दैवी शक्ती असल्याचा दावा करत विश्वास महिलेचा विश्वास संपादन केला. पुढील काळात तिच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याचे आश्वासन त्याने दिले.
त्यानुसार आपलं चांगलं होईल या दृष्टीने विधी करण्यासाठी खरात वारंवार त्या महिलेला कार्यालयात आणि काही ठिकाणी बोलावू लागला.
महिलेच्या आयुष्यात थोडाफार बदल झाला तर ते याचं फलित आहे असं तो सांगायचा. या सगळ्या प्रकरणादरम्यान महिलेचा 2021 ला ठरलेला साखरपुडा मोडला. त्यावेळी हे सगळं सुरळीत करण्यासाठी धीर देत 50 हजार रुपये घेतले गेले आणि 'पुष्कराज' खडा देत कल्याण करण्याचे आश्वासन दिले. असे तक्रारीत म्हटले आहे.
यानंतर नोव्हेंबर 2022 ला अशोक खरातने त्या महिलेला कार्यालयात बोलावले. प्रसाद म्हणून पेढा व पाणी दिल्यानंतर महिलेला गुंगी आली. भीती दाखवत तिच्यावर तिथे अत्याचार केला असं महिलेने फिर्यादीत म्हटलं आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
फिर्यादी महिलेचं लग्न व्हावं यासाठी ती आणि कुटुंबीय प्रयत्न करत होते. काही महिन्यांनंतर सगळं पुढे सुरळीत जमून आलं आणि त्या महिलेचं लग्न झालं. हे देखील माझ्यामुळे झाल्याचा दावा खरातने त्या वेळी केला.
पुन्हा संबंधित महिलेला लग्नानंतर आशीर्वादासाठी कार्यालयात बोलावले. त्याच पद्धतीने पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.
पुढे अशोक खरातने महिलेला धमकी दिली. "प्रेयसी झाली नाही तर परमेश्वराचा कोप, नवऱ्याचा मृत्यू" अशी भीती दाखवली.
अखेर महिलेनी सरकारवाडा पोलिसांत धाव घेतली आणि फिर्याद दिली आणि हे प्रकरण पोलिसांसमोर आलं.
त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत 17 मार्चला मध्यरात्री नाशिकमध्ये अटक केली.
अनेक आक्षेपार्ह पुरावे; अधिक तपास सुरू आहे
पोलिसांनी खरातच्या कार्यालयावर छापा टाकला असता, तिथे अनेक आक्षेपार्ह पुरावे हाती लागले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीसांनी एक पेन ड्राईव्ह जप्त केला असून त्यात 56 ते 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज सापडले आहेत. तर इतर कागदपत्रे आणि पुरावे देखील पोलीसांनी गोळा केल्याचं सांगितलं आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, खरातवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(1), 74, 352, 351(1) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आता या प्रकरणातील तांत्रिक पुरावे इतर गोष्टींचा तपास करत आहेत.
पोलिसांच्या विविध टीम्स या प्रकरणात सर्व बाजूंनी तपास करत आहेत. तसेच 'कॅप्टन' अशोक खरातच्या मालमत्तेची झाडाझडती सुरू आहे.
नाशिक पोलिसांकडून सिन्नरमधील मिरगाव येथील फार्म हाऊसची रात्री तपासणी करण्यात आली. याशिवाय मिरगावमधील ईशान्येश्वर मंदिर आणि कुटीची तपासणी करण्यात आली. मिरगावातील फार्म हाऊसवर अनेक नेते आणि कलाकारांची वर्दळ असायची, त्या अनुषंगाने देखील पोलीस तपास करत आहेत.
यासंदर्भात अंचल मुदगल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट एक, नाशिक म्हणाले की, फिर्यादी महिलेच्या शारीरिक शोषणाच्या तक्रारीवरून आम्ही अशोक खरातला अटक केली. सध्या एका महिलेची तक्रार आहे, त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.
अशोक खरात प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा - रुपाली चाकणकर
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना भेटून पत्र दिल्याची माहिती दिली आहे.
तसेच चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन अशोक खरात प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात रुपाली चाकणकर यांनी प्रमुख सहा मागण्या केल्या आहेत.
या प्रकरणाची स्थापन झालेल्या एसआयटीमार्फत सखोल चौकशी व्हावी, कठोर कायदेशीर कलमे लावावी, 58 व्हीडिओंमध्ये दिसणाऱ्या महिलांची पूर्ण गोपनीयता पळून त्यांना संरक्षण देण्यात यावं तसेच या व्हीडिओंचं फॉरेन्सिक विश्लेषण करण्यात यावं, अंधश्रद्धा व जादूटोण्याच्या विरोधात राज्यव्यापी मोहीम राबवावी, पीडित महिलांचं पुनर्वसन व समुपदेशन व्हावं, या प्रकरणाचा हस्तक्षेपमुक्त तपास व्हावा अशा मागण्या करण्यात आणलेल्या आहेत.
पोलीस महासंचालकांना दिलेल्या पत्राबाबत एक्सवर पोस्ट करून रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत की, "आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले.या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले."
या पत्रामध्ये चाकणकर यांनी म्हटलं आहे की, "महाराष्ट्र राज्य महिला आयोग या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेत आहे. हे प्रकरण केवळ एका महिलेपुरते मर्यादित नसून, आरोपीने श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, राज्य सरकारने या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले आहे."
या पत्रामध्ये काही प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये आरोपीचे समाजातील विविध स्तरातील लोकांशी असणारे संबंध पाहता तपासावर कुठलाही राजकीय किंवा बाह्य दबाव येणार नाही याची दक्षता घेऊन एसआयटीने निपक्षपातीपणाने तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
त्यासोबतच, 'या प्रकरणात सापडलेल्या 58 व्हीडिओंमधील महिलांची ओळख गुप्त ठेवून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वासात घ्यावे आणि महिलांना पोलीस संरक्षण पुरवावे' अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.
या प्रकरणावर राज्य महिला आयोगाचं लक्ष असून, नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी वेळोवेळी आयोगाला तपासाचा प्रगती अहवाल सादर करावा अशी विनंती देखील या पत्रात करण्यात आलेली आहे.
'अशोक खरात प्रकरणाशी संबंधित लोकांवर पक्ष म्हणून कारवाई करणार'
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे अशोक खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या घटनेनंतर राज्यातील विविध नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरत आहे.
यावरील प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, "भोंदु बाबाचे जे काही प्रकार आहेत ते अतिशय वाईट आणि घाणेरडे आहेत. त्याच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे आणि जे लोक त्यांच्यासोबत आहेत त्यांच्यावर सुद्धा सक्तीने कारवाई केली पाहिजे. त्याच प्रमाणे काही राजकीय नेत्यांचे नाव जोडले गेले आहेत त्यावर आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून योग्य कारवाई करणार आहोत. येणाऱ्या काळात ही कारवाई दिसून येईल."
कोण आहे हा 'कॅप्टन' अशोक खरात?
अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असल्याचे सांगतो. 22 वर्षांच्या नोकरीनंतर त्याने 'कॉस्मोलॉजी' (विश्वशास्त्र) आणि ज्योतिषशास्त्रात रस घेतला.
तो 'शिवनिका ट्रस्ट'चा प्रमुख असून नाशिकमधील ईशानेश्वर मंदिराचे व्यवस्थापन पाहतो. बड्या राजकीय नेत्यांना भविष्य सांगण्यामुळे तो अल्पकाळात चर्चेत आला होता.
2022 दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईशानेश्वर मंदिराला भेट दिली होती. त्यादरम्यान अशोक खरात भविष्य पाहत असल्यामुळे या घटनेची खूप चर्चा झाली होती.
राजकीय वादळ आणि चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी
अशोक खरातचे अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
अशोक खरातचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर, निलेश लंके आणि रूपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो आणि व्हीडिओ समोर आले आहेत. त्यामुळे राजकीय नेतेमंडळींवर विरोधक आणि सर्वसामान्य नेटकरी टीका करू लागले आहेत.
विशेषतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.
काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "महिला आयोगाच्या अध्यक्षाच जर भोंदू बाबाचे पाय धुताना दिसत असतील, तर राज्यातील महिलांनी कोणाकडून न्यायाची अपेक्षा ठेवायची? खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 56 व्हीडिओ सापडले आहेत, हे धक्कादायक आहे."
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, "खरात स्थापन केलेल्या संस्थेवर चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरातसाठी त्या छत्री धरून उभ्या असल्याचे फोटो आहेत. अशा माणसाला मदत करण्यासाठी पदाचा दुरुपयोग झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?"
सत्ताधारी पक्षातील भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. "श्रद्धेच्या नावाखाली महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्या भोंदू बाबाला बेड्या ठोकणे हे आमच्या सरकारचे यश आहे. कायद्यापुढे कोणीही मोठे नाही. वैयक्तिक श्रद्धा प्रत्येकाची असू शकते, पण संवैधानिक पदावर असताना त्या श्रद्धेची मर्यादा पाळली पाहिजे. जबाबदारीच्या पदावर असणाऱ्यांनी विवेक आणि संवेदनशीलता दाखवणं अपेक्षित आहे," असं म्हणत प्रत्यक्षपणे चाकणकर यांना टोला लगावला आहे.
चाकणकर काय म्हणाल्या?
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करत त्यांनी म्हटलं आहे की, "शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात. त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेलो होतो. यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत, त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे."
तर या संदर्भात खासदार निलेश लंके यांनी पुढारी या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, "हा व्हीडिओ सात ते आठ वर्षांपूर्वीचा आहे. आम्ही दिवसभरात अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहतो, त्यामुळे अशा कार्यक्रमांतील प्रत्येक व्यक्तीबद्दल माहिती असतेच असं नाही. अशोक खरात हा व्यक्ती नाही, प्रवृत्ती आहे. दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून योग्य न्याय देतील."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)