मासिक पाळीच्या वेदना 'सामान्य' समजून दुर्लक्ष करताय? त्यामागे असू शकतात 'ही' गंभीर कारणं

भारतातील लाखो महिलांना महिन्याला होणाऱ्या वेदना हा 'नॉर्मल' मासिक पाळीचा भाग आहे असा समज आजही पक्का आहे.

पण काही महिलांसाठी ही वेदना केवळ अस्वस्थता नसते, ती रोजचा दिनक्रम थांबवणारी, कामाचं वेळापत्रक बिघडवणारी आणि अनेकदा मानसिक थकवा आणणारी ठरते.

एंडोमेट्रिओसिस या आजाराचे हे सर्वात ठळक लक्षण आहे. हा आजार बाहेरुन असा दिसत नाही, परंतु आतून शरीरात प्रचंड दाह, वेदना आणि पुढील अनेक गुंतागुंतीची स्थिती निर्माण करत राहतो.

अंदाजे 10–12% महिलांना एंडोमेट्रिओसिस असू शकतो, आणि यात मोठा भाग तरुण मुलींचाही आहे.

त्यामुळे हा आजार फक्त प्रजननक्षम वयातील किंवा आई होण्याच्या टप्प्यातील महिलांपुरता मर्यादित नाही, तर पहिल्याच पाळीपासून सुरू होऊ शकणारी एक दीर्घकालीन स्थिती आहे.

जास्त वेदना म्हणजे काहीतरी बिनसलंय, हा साधा नियम आपण पाळत नाही आणि त्यामुळे एंडोमेट्रिओसिसचे निदान अनेक वर्ष उशिरा होते.

योग्य माहितीचा अभाव, सामान्य पाळीच्या वेदनांशी तुलना करण्यात होणारी गफलत आणि तपासण्यांमध्ये दिसून न येणारे सूक्ष्म बदल या सगळ्यामुळे हा आजार 'सायलेंट' राहतो.

पण वेळेत ओळखल्यास उपचार उपलब्ध आहेत, आणि जीवनशैलीतील बदलांपासून ते शस्त्रक्रियेपर्यंत अनेक पर्याय प्रभावी ठरू शकतात.

एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय?

एंडोमेट्रिओसिस हा महिलांच्या प्रजननसंस्थेला होणारा एक दीर्घकालीन दाहजन्य (inflammatory) विकार आहे. गर्भाशयाच्या आतील अस्तराला एंडोमेट्रियम म्हणतात.

एंडोमेट्रिओसिसमध्ये या अस्तरासारख्या ऊती गर्भाशयाबाहेर वाढायला लागतात.

या ऊती अंडाशयांवर, फलोपियन ट्यूब्सवर, पेल्व्हिक पेरिटोनियमवर किंवा मूत्राशय व आतड्यांसारख्या इतर अवयवांवरही वाढू शकतात.

काही दुर्मिळ प्रकरणांत या ऊती डायफ्रॅम, फुफ्फुसे किंवा सांध्यांपर्यंत आढळतात.

या ऊतींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या हार्मोनल बदलांना प्रतिसाद देतात, म्हणजेच दर महिन्याला पाळीच्या चक्रानुसार त्या सूजतात, रक्तस्त्राव करतात आणि नंतर शरीरात दाह निर्माण करतात. परंतु गर्भाशयाबाहेर असलेला हा रक्तस्त्राव शरीरातून बाहेर पडू शकत नाही.

त्यामुळे त्या जागी सूज, वेदना, नसांना दाह होणं (irritated nerves), तंतुमय ऊती (फायब्रॉसिस) आणि अवयवांमध्ये 'अ‍ॅडहिझन्स' तयार होऊ शकतात. (अ‍ॅडहिझन्स म्हणजे शरीराच्या आतल्या दोन स्वतंत्र ऊतींना किंवा अवयवांना दाहामुळे तयार झालेल्या तंतुमय ऊतींनी एकमेकांना अनैसर्गिकरीत्या चिकटवणाऱ्या पट्ट्या.)

एंडोमेट्रिओसिस कशामुळे होतो हे अजूनही स्पष्ट नाही. परंतु तीन प्रमुख सिद्धांत मान्य आहेत

  • कोएलोमिक मेटाप्लेशिया: पेल्व्हिक पेरिटोनियममधील पेशी इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली एंडोमेट्रियमसारखे रूप धारण करतात.
  • रेट्रोग्रेड मेन्स्ट्रुएशन: पाळीचे रक्त फलोपियन ट्यूब्समार्फत पेल्व्हिसमध्ये परत जाते आणि तेथील ऊतकांवर चिकटते.
  • इम्युनॉलॉजिकल कारणे: काही महिलांमध्ये नैसर्गिक किलर (NK) पेशींची क्रिया कमी असल्याने हे ऊतक नष्ट होत नाही; उलट प्रतिकारशक्तीच्या अतिसक्रियतेमुळे दाह वाढत जातो.

या प्रक्रियेचा एकत्रित परिणाम म्हणजे तीव्र पेल्व्हिक वेदना, लैंगिक संबंधांवेळेस वेदना, मल-मूत्र विसर्जनात त्रास, जड पाळी, सतत थकवा आणि अनेक वेळा वंध्यत्व.

हा आजार 'दिसत' नसला तरी शरीराच्या आत मोठा गोंधळ घालत असतो आणि वेळेत ओळख व उपचार हेच पुढील गुंतागुंत रोखण्याचे मार्ग आहेत.

तरुण मुलींमध्ये एंडोमेट्रिओसिस किती सामान्य?

एंडोमेट्रिओसिसला अजूनही 'दुर्मिळ' किंवा 'विशेष' आजार समजलं जातं, पण प्रत्यक्षात तो खूप व्यापक आहे.

विशेष म्हणजे यात तरुण मुलींनाही त्रास होत असतो. याच्या लक्षणांची सुरुवात पहिल्या पाळीपासूनही होऊ शकते.

याबद्दल बीबीसी मराठीच्या प्रश्नांना डॉ. अंशुमाला शुक्ला-कुलकर्णी यांनी उत्तरं दिली. त्या मुंबईच्या कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात मिनिमली इन्व्हेजिव्ह गायनॅकॉलॉजी विभागाच्या प्रमुख आहेत तसेच त्या गायनॅकॉलॉजी लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीतज्ज्ञ आहेत.

डॉ. अंशुमाला शुक्ला-कुलकर्णी म्हणतात, "10-12% महिलांना एंडोमेट्रिओसिस असतो आणि यात 25-35 वर्षे वयोगट सर्वाधिक दिसतो.

परंतु यातील सुमारे 25% रुग्ण या 20 वर्षांखालील असतात. काहींमध्ये लक्षणांची सुरुवात पहिल्या पाळीपासून म्हणजेच 10–12 वयापासून होऊ शकते."

निदान उशिरा का? मुख्य कारणे कोणती?

हा आजार 'इनव्हिजिबल' असल्यामुळे त्याची सुरुवात शरीरात खोलवर होते, पण बाहेरून दिसत नाही. सामान्य पाळीच्या वेदनांशी तुलना करत राहण्याची सवय आणि तपासण्यांत lesions (जखमा, चट्टे) न दिसण्याची शक्यताही दोन्ही कारणे निदान वर्षानुवर्षे पुढे ढकलू शकतात.

डॉ. अंशुमाला शुक्ला-कुलकर्णी सांगतात, "एंडोमेट्रिओसिससाठी एकही विशिष्ट रक्त चाचणी उपलब्ध नाही. अल्ट्रासोनोग्राफीतून सुमारे 40% प्रकरणं निसटू शकतात.

याशिवाय ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन, फूड इंटॉलरन्स, सायटिकाच्या वेदना, वारंवार लघवी लागणे यांसारखी लक्षणे इतर रोगांसारखीच दिसतात, त्यामुळे निदान चुकण्याची शक्यता असते.

अचूक निदानासाठी विशेष प्रोटोकॉलनुसार केलेली USG (अल्ट्रासोनोग्राफी) आणि MRI आवश्यक असतात."

तीव्र वेदना, जास्त रक्तस्राव आणि वंध्यत्व का वाढते?

एंडोमेट्रिओसिसमध्ये शरीरात सतत दाह निर्माण होतो, आणि हा दाहच वेदनेचा मूळ स्त्रोत असतो.

एंडोमेट्रिओसिसच्या lesions भोवती इंटरल्यूकिन्स आणि TNF सारखे दाहजन्य घटक वाढतात, त्यामुळे पेल्व्हिक भागातील मज्जातंतू त्रासलेले राहतात. त्यामुळे पाळीपूर्वी व पाळीदरम्यान तीव्र पेल्व्हिक वेदना जाणवते.

जर या ऊती गर्भाशयाच्या भिंतीत शिरल्या तर अ‍ॅडेनोमायोसिस निर्माण होते. या स्थितीत गर्भाशय जाड आणि संवेदनशील होतं, त्यामुळे पाळी अधिक जड आणि वेदनादायी वाटते.

एंडोमेट्रिओसिसमुळे अंडाशयांवर सिस्ट तयार होऊ शकतात, तसेच फॅलोपियन ट्यूबमध्ये सूज येऊ शकते. या सर्व बदलांमुळे अंड्यांची गुणवत्ता कमी होते, भ्रूणावर परिणाम होतो आणि नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता घटते.

थोडक्यात, दाह, अवयवांमध्ये तयार होणाऱ्या adhesions आणि रचनात्मक बदल या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे वेदना, जड पाळी आणि वंध्यत्व वाढण्याचा धोका.

कोणत्या तपासण्या अधिक विश्वासार्ह मानल्या जातात?

या आजाराचे निदान कठीण असले तरी काही विशिष्ट तपासण्या अधिक उपयुक्त ठरतात.

रुग्णाचा तंतोतंत इतिहास आणि शारीरिक तपासणी हे पहिले व सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे कारण लक्षणांचा पॅटर्नच रोगाबद्दल सर्वात मजबूत संकेत देतो.

रक्तातील CA-125, इंटरल्यूकिन किंवा TNF सारखे मार्कर्स कधी कधी वाढलेले दिसू शकतात, पण ते एंडोमेट्रिओसिससाठी विशिष्ट नसतात. त्यामुळे फक्त रक्त तपासण्यांवर अवलंबून राहणे अचूक निदानासाठी पुरेसे नसते.

पेल्व्हिक ट्रान्सव्हॅजायनल अल्ट्रासाऊंड जर IDEA प्रोटोकॉलनुसार केले, तर पेल्व्हिसमधील adhesions, cysts आणि संशयास्पद lesions ओळखण्याची त्याची क्षमता जास्त असते. तर MRI पेल्व्हिस खोलवर गेलेला, अवयवांत फैलावलेला किंवा जटिल एंडोमेट्रिओसिस (deep infiltrating endometriosis) स्पष्टपणे दाखवू शकतो.

जीवनशैलीतील बदल किती उपयोगी ठरू शकतात?

एंडोमेट्रिओसिस हा दीर्घकालीन विकार असल्यामुळे केवळ औषधे किंवा शस्त्रक्रिया पुरेसे ठरत नाहीत.

शरीरातील दाह, वेदना आणि थकवा नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीतील बदल महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

याबद्दल डॉ.अभिषेक मंगेशीकर यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली. डॉ. मंगेशीकर जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ॲडव्हान्स्ड एंडोमेट्रिओसिस सर्जरीतज्ज्ञ आहेत.

डॉ. अभिषेक मंगेशीकर म्हणतात,"जीवनशैलीतील बदल लक्षणे कमी करण्यात मदत करू शकतात, पण ते एंडोमेट्रिओसिस बरा करत नाहीत.

नियमित व्यायाम, चांगली झोप, ताण कमी करणाऱ्या पद्धती आणि पेल्व्हिक फ्लोअर फिजिओथेरपी हे उपाय काही महिलांमध्ये वेदना नियंत्रित करण्यात मदत करतात."

ते पुढं सांगतात, "काही महिलांना दाह कमी करणारा किंवा पचन सुधारवणारा आहारही फायदेशीर ठरतो.

तितकंच महत्त्वाचं म्हणजे मानसिक आधार. दीर्घकालीन वेदना आणि वारंवार वैद्यकीय दुर्लक्ष यामुळे मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.

जीवनशैलीतील बदल नेहमी वैद्यकीय उपचारांसोबतच वापरावेत. त्या उपचारांना पर्याय म्हणून वापरू नयेत."

एंडोमेट्रिओसिस आणि प्रजननक्षमता

एंडोमेट्रिओसिसमुळे काही महिलांमध्ये नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता कमी होऊ शकते. दाह, पेल्व्हिक अवयवांची रचना बदलणे, अंडाशयांचे नुकसान किंवा ट्यूबची कार्यक्षमता कमी होणे हे सर्व घटक एकत्रित परिणाम करतात.

डॉ. मंगेशीकर स्पष्ट करतात," मध्यम ते गंभीर एंडोमेट्रिओसिसमध्ये प्रजननक्षमता कमी होऊ शकते.

हा विकार पेल्व्हिक रचनेत बदल करतो, काही प्रकरणात अंडाशयांची साठवण क्षमता कमी करतो, ट्यूब्सची हालचाल बिघडवू शकतो आणि दाहामुळे गर्भधारणा किंवा इम्प्लांटेशनला अडथळा निर्माण होऊ शकतो. तरीही, अनेक महिलांना एंडोमेट्रिओसिस असूनही नैसर्गिक गर्भधारणा होते."

ते म्हणतात, "गर्भधारणेनं एंडोमेट्रिओसिस 'बरा' होत नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पाळी थांबल्यामुळे लक्षणे तात्पुरती कमी होऊ शकतात, पण आजार स्वतः नाहीसा होत नाही."

एंडोमेट्रिओसिसविषयी प्रचलित गैरसमज

एंडोमेट्रिओसिसबद्दल असलेले गैरसमज आजाराचे निदान उशिरा होण्याची प्रमुख कारणे आहेत. अनेक महिलांना त्यांच्या वेदना अतिशयोक्ती समजली जाते आणि हीच मानसिक व वैद्यकीय हानी सर्वाधिक ठरते.

डॉ. मंगेशीकर म्हणतात, "सर्वात मोठा गैरसमज म्हणजे पाळीच्या वेदना तीव्र असणं हे 'सामान्य' असतं हे पूर्णपणे चुकीचं आहे. दुसरा गैरसमज म्हणजे एंडोमेट्रिओसिस फक्त तेव्हाच महत्त्वाचा असतो जेव्हा महिलेला गर्भधारणा हवी असते. प्रत्यक्षात, बहुतेक रुग्ण तीव्र वेदना आणि जीवनमान खालावल्यामुळे उपचार घेतात."

ते पुढं म्हणाले, "अल्ट्रासाऊंड सामान्य आला म्हणून एंडोमेट्रिओसिस नाही असे म्हणणे चुकीचे आहे. अनुभव नसलेल्या व्यक्तीकडून केलेल्या तपासणीत आजार सहज चुकू शकतो.

तसेच 'गर्भधारणा एंडोमेट्रिओसिस बरी करते' हा विश्वासही चुकीचा आहे. कदाचित सर्वात हानिकारक मिथक म्हणजे महिलांनी त्यांच्या वेदना वाढवून सांगितल्या आहेत.

एंडोमेट्रिओसिस दिसत नाही, पण अनेक रुग्णांसाठी तो अत्यंत अपंगत्व आणणारा विकार ठरतो. उपचार सुधारण्याचा पहिला टप्पा म्हणजे महिलांच्या वेदनांकडे गांभीर्यानं पाहणे."

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.