You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'तमाशाला सरकारने पद्मश्री दिला, पण लोकांनी आजवर आम्हाला तमासगीर म्हणूनच हिणवलं' - रघुवीर खेडकर
महाराष्ट्राची लोकसंस्कृती समृद्ध करणाऱ्या परंपरांमध्ये तमाशा या लोककलेचं महत्त्वाचं स्थान आहे. तमाशा म्हटलं की गावरान बोली, ठसकेबाज लावणी, विनोदी डायलॉग या गोष्टी आल्या. तसंच वगनाट्याच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर भाष्यही केल जातं. या सगळ्यांच्या संगमातून तमाशा लोकांचं मनोरंजन तर करतोच, पण त्याचबरोबर समाजप्रबोधनाचंही काम करतो.
नुकतंच ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. अनेक दशकांपासून ते तमाशामध्ये सोंगाड्याच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांना ही कला घरातूनच वारशाने मिळाली. त्यांच्या आई कांताबाई सातारकर या प्रसिद्ध लावणी कलाकार होत्या. 'तमाशा' हा शब्द फारसी भाषेतून आल्याचं मानलं जातं.
मुघलांच्या काळात या लोककलेचा उदय झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे शत्रूच्या सैन्याला नाचगाण्यात गुंग ठेवून गनिमीकाव्याने हल्ला करण्यासाठीही तमाशाचे फड भरवले जात असत, असं सांगितलं जातं.
काळाच्या ओघात मात्र तमाशा लोकांच्या मनोरंजनाबरोबरच सामाजिक जागृतीचं प्रभावी माध्यम बनला. तमाशाचा कोणताही फड यशस्वी होण्यासाठी महिला कलावंतांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. लावणीच्या माध्यमातून त्या तमाशाला रंगत आणतात. मात्र सततची फिरस्ती, अनिश्चित आयुष्य आणि सामाजिक पूर्वग्रह यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसमोर अनेक आव्हानं उभी राहतात.
याशिवाय या कलेत आयुष्य झोकून देणाऱ्या कलावंतांना समाजाकडून खऱ्या अर्थाने सन्मान आणि योग्य वागणूक मिळत नसल्याची खंत तमाशा कलावंत व्यक्त करतात.
याशिवाय, गेल्या काही दशकांत लोकांच्या बदलत्या आवडीनिवडीनुसार तमाशा मंडळांना आपल्या सादरीकरणात बदल करावे लागले आहेत. तरीही त्यांनी या लोककलेची परंपरा जपण्याचा प्रयत्न कायम ठेवला आहे.
याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहा बीबीसी मराठीचा खास ग्राऊंड रिपोर्ट.
रिपोर्ट, शूट, एडिट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)