You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराण : शाळेवरील हल्ल्यात मुलींच्या मृत्यूवर प्रचंड संताप, अंत्यसंस्कारासाठी हजारोंचा जनसमुदाय
- Author, गॅब्रिएला पोमेरॉय
- Role, बीबीसी न्यूज
- वाचन वेळ: 3 मिनिटे
इराणमधील एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात विद्यार्थिनी आणि कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. त्यांच्यावर मंगळवारी (3 मार्च) अंत्यसंस्कार करण्यात आले.
या लोकांचा अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे इराणी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
परंतु, अमेरिकेने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. हल्ला नेमका कोणी केला, याची चौकशी सुरू असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.
इराणी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी दक्षिण इराणमधील मिनाब शहरात मुलींच्या एका शाळेवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात 160 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विद्यार्थिनींसह शाळेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील लष्करी तळ आणि नेतृत्वाला लक्ष्य करत मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू केले होते, त्याच काळात शाळेवर हा हल्ला झाला.
बीबीसीला इराणी अधिकाऱ्यांनी सांगितलेली मृतांची संख्या स्वतंत्रपणे पडताळून पाहता आलेली नाही.
ही शाळा इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (आयआरजीसी) एका तळाजवळ होती.
या घटनेशी संबंधित वृत्तांची चौकशी सुरू आहे, असं अमेरिकन लष्कराने सांगितलं. इस्रायली लष्करानं त्या भागात कोणत्याही कारवाईची माहिती नसल्याचं म्हटलं आहे.
शोक व्यक्त करण्यासाठी मोठी उपस्थिती
इराणच्या सरकारी वाहिनीवर अंत्यसंस्काराचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. या प्रसारणात रस्त्यांवर शेकडो शोकाकुल लोक दिसत होते आणि त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.
इस्लामिक रिपब्लिकच्या ध्वजात गुंडाळलेल्या शवपेट्या गर्दीतून नेण्यात आल्या. आजूबाजूला ऐकू येणाऱ्या आवाजातून आपल्या मुली गमावलेल्या आई-वडिलांचं दुःख स्पष्ट जाणवत होतं.
इराणी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शनिवारी सकाळी त्या शाळेवर तीन क्षेपणास्त्रं डागण्यात आली. ही शाळा आयआरजीसीच्या एका तळापासून सुमारे 600 मीटर अंतरावर होती.
इराणमध्ये आठवड्यातून सहा दिवस कामकाज असतं. तिथे आठवडा शनिवारी सुरू होतो आणि गुरुवारी संपतो. तर शुक्रवार हा एकमेव अधिकृत सुट्टीचा दिवस असतो.
याचा अर्थ असा होतो की, हल्ल्याच्या वेळी शाळेत लोक उपस्थित असण्याची शक्यता आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काय म्हटलं?
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या घटनेला 'अमानुष कृत्य' असं म्हटलं आहे. तसंच, "हल्लेखोरांनी केलेल्या अगणित गुन्ह्यांच्या इतिहासातील हा आणखी एक काळा अध्याय आहे," असंही ते म्हणाले.
देशाचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी सोशल मीडियावर 160 लोकांच्या कबरी खोदल्या जात असल्याचा एक फोटो शेअर केला. त्यासोबत त्यांनी लिहिलं की, "ट्रम्प यांनी सांगितलेली 'संरक्षण योजना' प्रत्यक्षात अशीच दिसते."
बीबीसीने स्फोटानंतरचे काही व्हीडिओ क्लिप्स पडताळून पाहिल्या आहेत. त्यात एका इमारतीतून धूर निघताना दिसतो आणि आजूबाजूला लोकांची गर्दी जमलेली आहे. काही लोक घाबरून ओरडताना देखील ऐकू येतात.
इराणमध्ये आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांना अनेकदा व्हिसा नाकारला जातो. त्यामुळे तिथे प्रत्यक्ष माहिती गोळा करण्याची त्यांची क्षमता खूपच मर्यादित राहते.
अमेरिकन अधिकारी शाळेवरील हल्ल्याबाबत काय म्हणाले?
सोमवारी बीबीसीचे पत्रकार टॉम बेटमन यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांना शाळेच्या इमारतीवर अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला झाला होता का? असा प्रश्न विचारला.
रुबियो म्हणाले, "अमेरिका जाणूनबुजून कोणत्याही शाळेवर हल्ला करणार नाही. नागरिकांच्या पायाभूत सुविधा आणि रचना लक्षात घेऊन हल्ला करण्याची आमची कोणतीही इच्छा नाही आणि तसे करण्याचं कोणतं कारणही नाही."
ते म्हणाले,"माझ्याकडे याबाबतची माहिती नाही की, हे कसं झाले, पण हे स्पष्ट आहे की अमेरिका कोणत्याही शाळेवर हल्ला करणार नाही."
"आम्ही या बातम्यांकडे गंभीरपणे पाहत आहोत," असं अमेरिकन सेंट्रल कमांडचे (सेंटकॉम) प्रवक्ते टिम हॉकिन्स यांनी अमेरिकन प्रसारमाध्यमांत दिलेल्या एका निवेदनात म्हटलं.
"नागरिकांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे आणि अनवधानाने होऊ शकणाऱ्या नुकसानाचा धोका कमी करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व खबरदारीचे उपाय घेत राहू," असं त्यांनी सांगितलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.