इराणने इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रं डागल्याची आयडीएफची माहिती

वाचन वेळ: 5 मिनिटे

इराणने गुरुवारी (5 मार्च) पहाटे इस्रायलच्या दिशेने अनेक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती इस्रायली सैन्य दलाने (इस्रायली डिफेन्स फोर्सेस- आयडीएफ) दिली आहे.

मात्र, एजन्सी फ्रान्स प्रेसच्या (एएफपी) बातमीनुसार कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

दोन तासांच्या आत तीन वेगवेगळे अलर्ट जारी करण्यात आले.

एएफपीच्या वार्ताहरांनी जेरुसलेम इथं स्फोटांचे आवाज ऐकल्याचं सांगितलं. मात्र, नंतर लष्कराने नागरिकांना सुरक्षित ठिकाणांमधून (शेल्टरमधून) बाहेर पडण्याची परवानगी दिली.

इराणच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी आखाती देशांना मदत करण्याची युक्रेनची तयारी

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आखाती देशांना मदतीची तयारी दर्शवली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, युक्रेन आखाती देशांमध्ये तज्ज्ञ पाठवण्याची योजना आखत आहे, जेणेकरून त्यांना इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांपासून संरक्षण मिळवण्यास मदत होऊ शकेल.

झेलेन्स्की यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत त्यांनी संयुक्त अरब अमिरात, कतार, जॉर्डन आणि बहरीन या देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे.

झेलेन्स्की म्हणाले की, मध्यपूर्वेतील संघर्षाबाबत आपल्या मंत्र्यांशी आणि लष्करी अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांनी युक्रेनच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता आखाती देशांना मदत करण्यासाठी पर्याय विकसित करण्याच्या सूचना केल्या आहेत.

सोशल मीडिया एक्सवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी म्हटलं की, सतत होणारे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले काय असतात आणि त्यांचा सामना कसा करायचा हे आम्हाला चांगले माहीत आहे. या प्रदेशात आपण कशाप्रकारे सहकार्य करू शकतो याबद्दल आम्ही चर्चा केली आणि आमच्या टीम्स संपर्कात राहतील यावर सहमती झाली."

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणही प्रत्युत्तरात्मक कारवाई करत आहे. या दरम्यान इराणने आखाती देशांतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली आहेत.

पेंटागॉनने पटवली कुवेतमध्ये मृत्यू झालेल्या आपल्या सहाव्या सैनिकाची ओळख

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने कुवेतमध्ये मृत्यू झालेल्या आपल्या सहाव्या सैनिकाची ओळख पटवली आहे. पेंटागॉनने यासंदर्भात माहिती दिली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुवेतवरील हल्ल्यात मृत्यू झालेला सहावा सैनिक 54 वर्षांचे चीफ वॉरंट ऑफिसर-3 रॉबर्ट एम. मार्जान असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ते कॅलिफोर्नियातल्या सँक्रामेंटो इथले रहिवासी आहेत.

पेंटागॉनने एका निवेदनात म्हटलं आहे, की "मार्जान 1 मार्च 2026 रोजी कुवेतच्या पोर्ट शुआइबा इथं घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला असावा, असं मानलं जात आहे. वैद्यकीय पथक त्यांची अधिकृत ओळख पटवेल."

पेंटागॉनने अद्याप मार्जान यांचा फोटो प्रसिद्ध केलेला नाही.

याआधी अमेरिकन सैन्याने कुवेतमधील हल्ल्यात मृत्यू झालेल्या पाचव्या सैनिकाची ओळख जाहीर केली होती. ते आयोवा राज्यातील मेजर जेफरी ओ'ब्रायन होते.

रविवारी कुवेतमधील पोर्ट शुआइबा इथल्या एका कमांड सेंटरवर एका ड्रोनने हवाई संरक्षणाला चकवा देत हल्ला केल्यामुळे सहा अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला.

अमेरिकन सेंट्रल कमांडने सुरुवातीला या हल्ल्यात तीन सैनिक मारले गेल्याचं सांगितलं होतं, पण नंतर अधिकाऱ्यांनी मृतांची संख्या सहा असल्याचं स्पष्ट केलं.

तेहरानमध्ये नव्याने हल्ले करण्यात आल्याचा इस्रायली सैन्याचा दावा

इस्रायली लष्कराने इराणची राजधानी तेहरानमध्ये नव्याने हल्ले केल्याचा दावा केला आहे.

इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) एका निवेदनात म्हटलं आहे, "आयडीएफने तेहरानमध्ये इराणी सरकारच्या लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत हल्ल्यांची आणखी एक मालिका सुरू केली आहे."

या निवेदनात नेमक्या कोणत्या ठिकाणी हल्ला करण्यात आला याबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, पुढील माहिती नंतर दिली जाईल असं सांगण्यात आलं आहे.

न्यूज एजन्सी एएफपीच्या वृत्तानुसार, त्यांच्या पत्रकारांनी बुधवारी (4 मार्च) रात्री राजधानी तेहरानमध्ये एक मोठा स्फोट पाहिल्याचं सांगितलं.

यापूर्वी इस्रायली सैन्याने जाहीर केलं होतं की, त्यांच्या हवाई दलाने पूर्व तेहरानमधील कमांड सेंटर आणि अंतर्गत सुरक्षा विभागाचे कर्मचारी असलेल्या एका भागावर 'मोठ्या प्रमाणात हल्ला' केला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये फेटाळले

अमेरिकेच्या सिनेटमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या युद्धाशी संबंधित अधिकारांवर मर्यादा आणण्यासाठी मांडलेलं विधेयक मंजूर होऊ शकलेलं नाही.

या विधेयकाच्या समर्थनात 47 सिनेटरने मतदान केलं, तर या विधेयकाच्या विरोधात 53 मतं पडली. म्हणजे ट्रम्प यांच्या विरोधात आणलेल्या या विधेयकाला समर्थन देणारी मतं कमी मिळाली.

हे विधेयक मंजूर झालं असतं तर युद्धाशी संबंधित आदेश देण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे असलेल्या अधिकारांमध्ये कपात झाली असती.

या विधेयकानुसार युद्धाशी संबंधित कोणताही आदेश देण्यापूर्वी ट्रम्प यांना अमेरिकन काँग्रेस म्हणजेच संसदेकडून मंजुरी घ्यावी लागली असती.

28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून इराणवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही अमेरिकन लष्करी तळांवर, इस्रायलवर आणि इतर ठिकाणी हल्ले केले आहेत.

या संघर्षानंतर अमेरिकन सिनेटमध्ये मांडण्यात आलेलं हे असं पहिलंच विधेयक होतं आणि ते ट्रम्प यांना रोखण्यात अपयशी ठरलं आहे.

इराणच्या हल्ल्यांनंतर आखाती देश मोठा निर्णय घेण्याची शक्यता

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इराणने पश्चिम आशियात हल्ले सुरू केले. त्यामुळे जागतिक तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

जगभरात तेलाच्या किमती ठरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रेंट क्रूडच्या दरात सोमवारी (2 मार्च) 10 टक्क्यांनी वाढ झाली आणि ते प्रति बॅरल 82 डॉलरच्या (सुमारे 7 हजार 516 रुपये) पुढे गेले.

आठवड्याच्या अखेरीस होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ किमान 3 जहाजांवर हल्ले झाल्यानंतर ही वाढ झाली. याचबरोबर नैसर्गिक वायूचे दरही तब्बल 25 टक्क्यांनी वाढले आहेत.

इराणने आपल्या देशाच्या दक्षिणेकडील अतिशय महत्त्वाच्या जलमार्गातून जहाजांनी जाऊ नये, असा इशारा दिला आहे. या मार्गावरून जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि वायूची वाहतूक केली जाते.

दरम्यान, इराणच्या हल्ल्यांमुळे आखाती प्रदेशात तणाव वाढला आहे. आखाती देश आता एकजूट दाखवत आहेत आणि आपल्या नागरिकांवर, भूमीवर आणि संसाधनांवर होणाऱ्या हल्ल्यांना उत्तर देण्याची तयारी करत आहेत.

इच्छा नसतानाही हे देश आता युद्धाच्या अग्रभागी आले आहेत.

इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून शेकडो क्षेपणास्त्रं आणि ड्रोन आपल्या अरब शेजाऱ्यांवर डागले. त्यांनी त्या देशातील अमेरिकन सैन्य तळांसोबतच नागरी आणि ऊर्जा केंद्रांनाही लक्ष्य केलं.

सुरक्षित प्रवास, पर्यटन आणि महत्त्वाचे आर्थिक केंद्र अशी आखाती देशांची प्रतिमा आहे. त्या प्रतिमेलाच इराणकडून लक्ष्य केलं जात आहे. त्याचबरोबर त्या देशातील तेल आणि गॅस उद्योगातही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे.

हे युद्ध अरब राष्ट्रांना नको होतं आणि त्यांनी याला रोखण्याचा प्रयत्नही केला. परंतु, प्रश्न असा आहे की, इराणच्या 'धोकादायक' हल्ल्यांमुळे ते या युद्धात ओढले जातील का?

"सर्व मर्यादा आधीच ओलांडल्या गेल्या आहेत," असं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल अन्सारी यांनी मंगळवारी (3 मार्च) पत्रकार परिषदेत म्हटलं.

"आमच्या सार्वभौमत्वावर सातत्याने हल्ले होत आहेत," असं त्यांनी पत्रकारांना सांगितले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.