'एपस्टिनला आमच्या डोळ्यातली भीती आवडायची', त्याचं बेट, रँचच्या 'भीतीदायक' क्षणांबाबत पीडिता काय म्हणाल्या?

    • Author, ॲना फॅगुई
    • Reporting from, वॉशिंग्टन
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

(इशारा : या बातमीत लैंगिक वर्तनाचे तपशील आहेत.)

लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टिनने दिलेल्या त्रासाबद्दल जोआन्ना हॅरिसनला कधीच बोलायचं नव्हतं.

अनेक पीडितांप्रमाणे, एपस्टिनच्या छळामुळे तिला लाज आणि त्रासही वाटायचा, असं ती म्हणते.

परंतु, जेव्हा अनावधानाने तिचं नाव अमेरिकेच्या सरकारने प्रकाशित केलेल्या लाखो फाइल्समधून समोर आलं. तेव्हा तिने आता यावर बोलावंच लागेल, असं ठरवलं.

बीबीसी न्यूज नाईटच्या व्हिक्टोरिया डर्बिशायर यांच्याशी ती बोलत होती.

"कधी कधी दम भरतो आणि श्वास घेणं गरजेचं वाटतं. मला असं वाटतं की, बोलणं हाच माझा मोकळा श्वास घेण्याचा मार्ग आहे," असं हॅरिसन म्हणाली.

बीबीसी न्यूजनाईटने हॅरिसन आणि आणखी चार एपस्टिन पीडितांना पहिल्यांदाच एकत्र एका ठिकाणी आणलं.

त्यानंतरच्या काही तासांच्या चर्चेवेळी त्यांनी एकमेकांना आधार दिला. जेव्हा त्या एपस्टिनला पहिल्यांदा भेटल्या त्या काळचा त्यांचा स्वतःचा फोटो त्यांनी पाहिला. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

या विस्तृत मुलाखतीत, पीडितांनी त्यांच दुःख आणि संतापाची कहाणी सांगितली.

काहींना एपस्टिनच्या कुख्यात खासगी बेट, लिटल सेंट जेम्स येथील त्यांची उपस्थिती आठवली. तर काहींनी न्यू मेक्सिकोतील त्याच्या रँच (कॅटल फार्म) मधील 'भीतीदायक' क्षणांचे वर्णन केले.

त्या म्हणाल्या की, एपस्टिन ज्या प्रभावशाली लोकांशी संबंध ठेवायचा, त्यांना बहुधा तिथे काय चाललंय ते माहीत असावं असं वाटतं.

पीडितांची नावं अचानक चर्चेत आली

एपस्टिनच्या विविध तपासांशी संबंधित लाखो दस्तऐवज अमेरिकेच्या न्याय विभागाने (डिर्पाटमेंट ऑफ जस्टिस) प्रसिद्ध केले. परंतु, काही अनरिडॅक्टेड (मूळ स्वरूपातील पूर्ण माहिती) दस्तऐवजांमध्ये पीडितांची ओळख गुप्त ठेवण्यात ते अयशस्वी ठरले.

हॅरिसन ही नाव सार्वजनिक करण्यात आलेल्यांपैकी एक होती.

या फाइल्स कधीच सार्वजनिक होऊ नयेत, अशी तिची इच्छा होती. कारण यामुळं आपली ओळख उघड होईल, याची भीती होती, असं तिने बीबीसी न्यूजनाईटला सांगितलं.

"सहा वर्षे रोज टीव्हीवर तुमच्या छळकर्त्याचा चेहरा पाहणं ही साधी गोष्ट नाही," असं हॅरिसन म्हणाली.

मी 18 वर्षांची असताना फ्लोरिडामध्ये एपस्टिनला भेटले, आणि इतर पीडितांप्रमाणेच, सर्व गोष्टी एका मसाजपासून सुरू झाल्याचं ती म्हणाली.

"सर्व काही सामान्य वाटत होतं," हॅरिसनने म्हटलं. "पण जेव्हा त्याने लैंगिक कृत्यं करायला सुरुवात केली, तेव्हा मी पूर्णपणे घाबरले. घरी जाताना कारमध्ये मी दोन शब्दही बोलू शकले नाही."

तिने नंतर सांगितलं की, एपस्टिनने त्याच्या वाढदिवशी तिच्यावर बलात्कार केला.

पहिल्यांदाच सार्वजनिकपणे बोलताना हॅरिसन म्हणाली की, एपस्टिनचा मृत्यू झाल्यामुळे आता तिला आणि इतर पीडितांना न्याय मिळेल की नाही याबद्दल शंका आहे. "माझ्याकडे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं मला कधीही मिळवणार नाहीत."

पाच दिवसांत पाच देश- क्लिंटन, स्पेसी आणि मॅक्सवेलसोबत

चॉन्टे डेविस या प्रकरणातील आणखी एक पीडित. तिने बीबीसी न्यूजनाईटला एपस्टिनच्या खासगी विमानात आफ्रिकेला जात असताना तिचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले.

या फोटोंमध्ये एपस्टिनची कटातील साथीदार गिलीन मॅक्सवेल तसेच अभिनेता केविन स्पेसी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन दिसत होते. स्पेसी आणि क्लिंटन हे एड्स प्रतिबंध प्रसाराच्या मानवतावादी मोहिमेसाठी प्रवास करत होते.

"मी त्या वेळी माझ्या जर्नलमध्ये लिहिलं होतं की, तो एकदम वेगवेगळ्या प्रकारच्या निवडक लोकांचा समूह होता. जवळजवळ हे एका कॅम्पप्रमाणे होतं, कारण तुम्ही पाच दिवसांत पाच देशांत प्रवास करत होता." विमानात ते नाश्ता करायचे, पत्ते खेळायचे आणि चर्चा करायचे.

"हा आयुष्यात एकदाच होणारा प्रवास होता. परंतु, दुर्दैवाने बंद दाराआड जे काही घडत होतं, त्यामुळे धक्का बसत होता," असं ती म्हणाली.

डेविसला मसाज देण्यासाठी नेमलं होतं. ती एपस्टिनच्या खासगी बेटावर त्याला मसाज देण्यासाठी गेली, त्यावेळी एपस्टिनने तिच्यावर बलात्कार केला, असं डेविसने सांगितलं.

डेविस प्रशिक्षित मसाज थेरपिस्ट आहे. तिने न्यूजनाईटच्या कार्यक्रमात सांगितलं की, विमान पोर्तुगालमध्ये इंधन भरण्यास थांबलं असताना तिने क्लिंटन यांना मान आणि पाठीचा मसाज दिला. त्यावेळी तिने जर्नलमध्ये लिहिलं की माजी राष्ट्राध्यक्ष नम्र, प्रेमळ आणि आकर्षक होते.

फेब्रुवारीत अमेरिकेच्या हाऊस ओव्हरसाइट कमिटीसमोर माजी राष्ट्राध्यक्षांना डेविससोबतच्या या भेटीबद्दल विचारण्यात आलं. डेविसने एपस्टिनच्या चुकीच्या कृत्यांबद्दल त्यावेळी सांगायला हवं होतं, असं त्यांनी समितीसमोर म्हटलं.

आपण हे कधीही क्लिंटन यांना सांगण्याचा विचार केला नाही, असं ती म्हणाली. "मी कधीही कोणाशीही याविषयी बोलणार नव्हते."

"ते खरंच काही करू शकले असते? (क्लिंटन) त्याला थांबवू शकले असते का? एपस्टिनच्या चुकांबद्दल मला आश्चर्य वाटतं. कदाचित याचं उत्तर आपल्याला कधीच कळणार नाही," असं ती म्हणाली.

क्लिंटन यांच्यासोबत पोर्तुगालमध्ये असताना, डेविसने माजी राष्ट्राध्यक्षांना त्यांची मुलगी चेल्सीसाठी दागिने खरेदी करण्यासाठी मदत केल्याचे सांगितले.

एपस्टिनच्या गैरकृत्याबद्दल काहीही माहिती नसल्याचे क्लिंटन यांनी वारंवार सांगितलं आहे. त्याचं नाव एपस्टिनच्या फाइल्समध्ये शेकडो वेळा आलं आहे. फाइल्समध्ये त्याचं नाव येणं म्हणजे ते चुकीचे आहेत असं नाही.

एपस्टिनच्या सर्व फाइल्स जाहीर केल्या जाव्यात, असं केविन स्पेसीने जाहीरपणे म्हटलं आहे. "ज्यांना कोणतीही भीती नाही, त्यांच्यासाठी सत्य जितकं लवकर समोर येईल तितकं चांगलं," असं तो म्हणाला.

एपस्टिनचा न्यू मेक्सिकोमधील 'भीतीदायक' रँच

या वर्षाच्या सुरुवातीला, अमेरिकेच्या न्याय विभागाच्या फाइल्समध्ये एपस्टिनबाबत आरोप समोर आले, ज्यामुळे न्यू मेक्सिको राज्याने त्याच्या झोरो रँचवर पुन्हा खटला सुरू केला.

राज्याने यापूर्वी 2019 मध्ये रँचवरील सुरुवातीचा तपास थांबवला होता. त्यावेळी न्यूयॉर्कमधील फेडरल वकिलांनी अशी विनंती केली होती.

"माझा बहुतांश छळ झोरो रँचमध्येच झाला. त्यामुळे माझ्या सर्वात वाईट आठवणीही तिथल्याच आहेत," असं डेविस म्हणाली.

जेव्हा ती झोरो रँचमध्ये होती, तेव्हा तिला 'ट्रॅप' झाल्यासारखं वाटत होतं, असं डेविसने बीबीसी न्यूजनाईटमध्ये सांगितलं.

"तिथे फार थंड, अंधार आणि भीतीदायक वातावरण होतं,"असं तिने सांगितलं.

लिसा फिलिप्स ही आणखी एक पीडित आहे. बीबीसी न्यूजनाईटशी बोलताना तिनेही रँचबद्दलचा अनुभव तसाच असल्याचे सांगितले.

"मला आठवतं, मी म्हणत होते, 'हे ठिकाण खरंच भीतीदायक आहे,' तिथलं वातावरण अगदी तशा प्रकारचंच होतं," असं ती म्हणाली.

झोरो रँचवर जे काही घडलं आहे. त्याबद्दल आणखी बरेच काही उघड होणं बाकी आहे, असा डेविस सांगते.

एपस्टिन म्हणाला, 'मला लोकांवर नियंत्रण ठेवायला आवडतं'

डेविस सांगते की, एपस्टिनला त्याचे प्रतिष्ठित आणि प्रभावशाली मित्र दाखवून फुशारकी मारायला आवडायचं.

यॉर्कची माजी डचेस साराह फर्ग्युसन यांना पैसे उधार देऊन तो फुशारकी मारायचा. 'हे गुपित नव्हतं', असं डेविसने बीबीसी न्यूजनाईटला सांगितलं.

एपस्टिनच्या खासगी ठिकाणांवर फ्रेममध्ये साराह फर्ग्युसनचा माजी नवरा अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर आणि त्यांच्या मुलींचे फोटो होते, असं डेविसने सांगितलं.

एपस्टिनचे माउंटबॅटन- विंडसरशी संबंध होते, असं त्यावेळी फॅशन मॉडेल असलेल्या फिलिप्सने सांगितलं.

आपलं नाव गुप्त ठेवू इच्छिणाऱ्या एका मैत्रिणीची गोष्ट तिने सांगितली. त्या मैत्रिणीने याबद्दल कधीही सार्वजनिकपणे भाष्य केलेलं नाही. तिला माउंटबॅटन- विंडसरसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले गेलं होतं.

तिने सांगितलं की, तिची मैत्रीण 2003 मध्ये एपस्टिनच्या न्यूयॉर्क शहरातील अप्पर ईस्ट साइडमधील अपार्टमेंटमध्ये गेली. तिथे तिला एका खोलीत जाऊन एका पुरुषाबरोबर लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितलं, आणि तो पुरुष माउंटबॅटन- विंडसर होता.

माउंटबॅटन- विंडसर यांनी सर्व गैरकृत्यांचे आरोप सातत्याने नाकारले आहेत.

फिलिप्सने नंतर एपस्टिनला तिच्या मैत्रिणीला माउंटबॅटन- विंडसरसोबत लैंगिक संबंध ठेवायला का सांगितलं? असा प्रश्न विचारल्याचं बीबीसी न्यूजनाईटला सांगितलं.

एपस्टिनने यावर, "मला लोकांवर नियंत्रण ठेवायला आवडतं," असं हसत उत्तर दिलं.

फिलिप्सने एपस्टिनच्या गैरवर्तनाबद्दल सांगितलं, "त्याला आमच्या डोळ्यातील भीती आवडायची.

मला वाटतं आम्ही घाबरलेलो आणि गोंधळलेलं पाहणं त्याला आवडायचं, त्याला यातून आनंद मिळायचा."

न्यूजनाईट मुलाखतीत, फिलिप्सने ब्रिटिश पोलिसांना सांगितलं की, तिच्या मैत्रिणीशी केलेलं गैरवर्तन आणि माउंटबॅटन- विंडसरच्या त्यातील सहभागाबद्दल जे तिला माहिती आहे, ते जाणून घेण्यासाठी तिला बोलावावं.

माउंटबॅटन- विंडसर यांना फेब्रुवारीत सार्वजनिक पदावर गैरव्यवहार केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. त्यांनी यूकेचे व्यापार दूत म्हणून काम करत असताना एपस्टिनसोबत गुप्त आणि संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपावर तपास केंद्रित आहे.

एपस्टिनने आत्महत्या केली असेल यावर विश्वास नसल्याचे या प्रकरणातील पीडितांनी बीबीसी न्यूजनाईटशी बोलताना सांगितलं.

"आम्ही त्याला ओळखत होतो, त्याचा स्वभाव कसा होता हेही माहीत होतं," असं फिलिप्सने सांगितलं.

एपस्टिनला आधी न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन करेक्शनल सेंटरमध्ये, लैंगिक तस्करी आणि खटल्याच्या आरोपाखाली ठेवण्यात आलं होतं. तेथील कोठडीतच 10 ऑगस्ट 2019 रोजी तो मृतावस्थेत आढळून आला होता.

त्याने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष न्यूयॉर्कच्या वैद्यकीय परीक्षकांनी काढला.

'आता पूर्वीसारखं हसत नाही'

जेना-लिसा जोन्स आणि वेंडी पेसेंटे दोघीही 14 वर्षांच्या असताना एपस्टिनला भेटल्या होत्या. त्या वेळीही त्या मैत्रिणी होत्या आणि नंतर एपस्टिनच्या अत्याचारातून वाचल्यानंतर त्या आजही मैत्रिणी आहेत.

"वयाच्या 14व्या वर्षी असा अनुभव घेतल्यावर बराच काळ तुमची वास्तविकता विकृत होते," पेसंटे म्हणाली.

"वयाच्या 14 व्या वर्षी सेक्स वर्करची मानसिकता नसावी."

मुलाखतीदरम्यान, सर्व पाचही पीडितांना त्यांचे फोटो दाखवले गेले. हे फोटो तेव्हाचे होते, जेव्हा ते एपस्टिनला भेटले होते.

आपला स्वतःचा 18 व्या वर्षीचा फोटो पाहताना हॅरिसन म्हणाली, 'मी आता पूर्वीसारखं हसत नाही.'

फिलिप्सने स्वतःचा फोटो पाहिला, ज्यात ती हलक्या गुलाबी कपड्यांमध्ये होती आणि बोटीत बसली होती. एपस्टिनचं खासगी बेट मागे असल्याचं तिला लक्षात आलं.

"मी माझ्या आयुष्याचा आनंद घेत होते, आणि मला काहीही कल्पना नव्हती की माझ्याबरोबर काय घडणार आहे," तिने त्या फोटोत स्वतःबद्दल सांगितलं.

"जेव्हा मी ते बेट सोडले, तेव्हा मी तशीच दिसत नव्हते."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.