इराणमध्ये पडणारा 'काळा पाऊस' काय आहे आणि तो आरोग्याला किती धोकादायक? वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मार्क पॉइंटिंग, ॲलेक्स मरे, केलीन डेव्हलिन आणि बार्बरा मेट्झल
- Role, बीबीसी व्हेरिफाय
- वाचन वेळ: 4 मिनिटे
तुम्ही कधी 'काळ्या पावसाबद्दल' ऐकलं आहे का?
गेल्या काही दिवसांत इराणमध्ये काही लोकांनी अशाच पावसाचा उल्लेख केला. त्यानंतर काळ्या पावसाच्या चर्चेला जोर धरू लागला.
मग हे नेमकं आहे काय आणि ते किती धोकादायक असू शकतं?
28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणची राजधानी तेहरानच्या आजूबाजूच्या किमान 4 तेल प्रकल्पांवर हल्ले झाल्याची पुष्टी झाली आहे.
स्थानिकांच्या मते, शहरातील काही भागात धूर आणि प्रदूषण इतकं वाढलं आहे की सूर्यही दिसत नाही आणि जळण्याचा तीव्र वास येत आहे.
हवेत प्रदूषण करणारे घटक मोठ्याप्रमाणात वाढले आहेत, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
तेल प्रकल्पांवरील हल्ल्यांमुळे स्थानिक लोकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) दिला आहे.
तेहरान आणि आसपासच्या भागात वायू प्रदूषण खूप वाढले आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे एक कोटी आहे आणि आसपासच्या परिसरातही लाखो लोक राहतात.
9 मार्च रोजी घेतलेल्या ताज्या सॅटेलाइट फोटोंचा बीबीसी व्हेरिफायने आढावा घेतला. त्यात तेहरानमधील दोन मोठ्या तेल प्रकल्पांमध्ये (ऑइल फॅसिलिटी) अजूनही आग लागलेली दिसत होती.
या फोटोंमध्ये इराणची राजधानी तेहरानच्या उत्तर-पश्चिमेला असलेल्या शाहरान डेपो आणि दक्षिण-पूर्वेकडील तेहरान ऑइल रिफायनरीमधूनही धूर निघताना दिसत आहे.
हा पाऊस किती धोकादायक आहे?
तेल रिफायनरींवर झालेल्या हल्ल्यांमुळे हवेचे प्रदूषण मोठ्याप्रमाणात वाढू शकते, कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे रसायनं असतात.
जेव्हा तेल पूर्णपणे जळत नाही, म्हणजेच पुरेसा ऑक्सिजन नसतो, तेव्हा कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याऐवजी कार्बन मोनॉक्साइड आणि काळे कण हवेत पसरू शकतात.
तेलाला लागलेल्या आगीतून सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साइडही बाहेर पडू शकतात. हे पावसाच्या पाण्यात मिसळले तर आम्ल (ॲसिड) तयार होऊ शकते.
याशिवाय हानिकारक हायड्रोकार्बन, धातूंची संयुगे (मेटॅलिक कंपाऊंड) आणि तेलाचे छोटे थेंबही हवेत पसरू शकतात.

फोटो स्रोत, EPA
तेहरानमधील 20 वर्षांची एका मुलीने सांगितलं की, तेल साठ्यांवर झालेल्या हल्ल्यांमुळे तिला 'जळण्याचा वास' जाणवत आहे."
"मला सूर्य दिसत नाही. सगळीकडे दाट धूर आहे आणि तो अजूनही कायम आहे.", असं तिनं बीबीसी पर्शियनशी बोलताना सांगितलं.
हवेतील प्रदूषण किती आहे याचा अचूक अंदाज लावणं कठीण आहे, कारण त्याचे मोजमाप करणाऱ्या उपकरणांचा कोणताही डेटा उपलब्ध नाही.
तसेच वारा, ढग आणि इतर कारणांमुळे सॅटेलाइटचा डेटा समजून घेणंही कठीण होतं.
पण ज्या तेल प्रकल्पांचे नुकसान झाले आहे, तिथून बाहेर पडणाऱ्या विविध रसायनांच्या मिश्रणामुळे हे प्रदूषण हानिकारक आणि अत्यंत गंभीर असल्याबद्दल शास्त्रज्ञांना शंका नाही.
हे बीजिंग किंवा दिल्लीसारख्या शहरांत दिसणाऱ्या स्मॉगपेक्षा (धुके) खूप वेगळे आहे.
रीडिंग विद्यापीठातील संशोधक शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस म्हणतात, "इराणमध्ये जे घडलं आहे ते नक्कीच खूप वेगळं आहे. कारण हे सगळं क्षेपणास्त्र हल्ले आणि तेल रिफायनरींवर झालेल्या हवाई हल्ल्यांमुळे होत आहे. अनेक युद्धांमध्ये धूळ आणि कणांचे प्रदूषण वाढतं, परंतु या प्रकरणात वेगवेगळ्या रसायनांचे 'मिश्रण' असणे ही असामान्य गोष्ट आहे."
पाण्याचे स्रोतही प्रदूषित होऊ शकतात
रविवारी तेहरानमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने काळा पाऊस पडल्याचे सांगितले.
काळा पाऊस हा अशा पावसासाठी वापरला जाणारा अनौपचारिक शब्द आहे, ज्यामध्ये प्रदूषित घटक मिसळलेले असतात आणि पावसाच्या थेंबांचा रंग काळा दिसतो.
पावसामुळे हवेत असलेले प्रदूषक खाली येणे ही सामान्य गोष्ट आहे.
परंतु, शास्त्रज्ञांनी बीबीसी व्हेरिफायला सांगितलं की, काळा पाऊस खूप दुर्मिळ असतो आणि तो सहसा हवेतील काजळी व इतर प्रदूषकांचे प्रमाण खूप जास्त झाल्यामुळे पडतो.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. अक्षय देवरस सांगतात, "पावसाचे थेंब छोटे स्पंज किंवा चुंबकासारखं काम करतात. ते खाली पडताना हवेत असलेले कण आपल्या सोबत घेऊन येतात. त्यामुळेच लोक याला काळा पाऊस म्हणतात."
काही मोठे प्रदूषित कण पाऊस न पडताही हवेतून थेट खाली पडले असण्याची शक्यता आहे.
बीबीसी वेदरच्या अंदाजानुसार, तेहरानमध्ये येत्या काही दिवसांत पुन्हा पाऊस आणि जोरदार वारा येण्याची शक्यता आहे.
यामुळे प्रदूषक पसरू शकतात आणि पावसामुळे ते हवेतून खालीही येऊ शकतात.
पण याचा अर्थ तेहरानमधील प्रदूषणाचा धोका संपेल असं नाही.
हे कण नद्या आणि इतर पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळू शकतात. जर ते जमिनीत साचले आणि नंतर जमीन कोरडी झाली, तर वारा त्यांना पुन्हा उडवू शकतो आणि ते परत हवेत पसरू शकतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











