'जर हाच नरक असेल, तर आम्ही तो सहन करायला तयार', ट्रम्प यांच्या पोस्टवर चीनची टीका

वाचन वेळ: 6 मिनिटे

भारतामधील चिनी दूतावासाचे प्रवक्त्ते यू जिन यांनी एक्सवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'पृथ्वीवरचा नरक' या पोस्टवर टीका केली आहे. त्यांनी चीन आणि अमेरिकेचे व्हीडिओ शेअर करून दोन्ही देशांची तुलना केली आहे.

यू जिन यांनी एक्सवर लिहिले आहे, "एक देश कधीही न संपणाऱ्या युद्धांवर दरवर्षी एक ट्रिलियन खर्च करतो. तर आम्ही आमच्या लोकांसाठी अधिक चांगले जीवन घडवण्यासाठी एक ट्रिलियन खर्च करतो. जर या जीवनाला 'नरक' म्हटले जात असेल, तर तो नरक कायमस्वरूपी सहन करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत."

यासोबतच यू जिन यांनी एक व्हीडिओही शेअर केला आहे. त्या व्हीडिओमध्ये एका मेट्रो ट्रॅकवर पडलेला कचरा दाखवण्यात आला आहे आणि त्या व्हीडिओवर न्यू यॉर्क असे लिहिले आहे. त्याचवेळी चीनमधील शियान शहराचा दुसरा व व्हीडिओआहे, त्यात झगमगते पायाभूत बांधकाम (इन्फ्रास्ट्रक्चर) दिसते.

खरं तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी मायकेल सॅव्हेज यांचे एक विधान शेअर केले होते.

त्या विधानात म्हटले होते, "इथे एक मूल लगेच नागरिक बनते आणि मग ते संपूर्ण कुटुंबाला चीन, भारत किंवा जगातील कुठल्यातरी इतर नरकातून (अमेरिकेत) आणतात. हे पाहण्यासाठी तुम्हाला फार दूर जाण्याची गरज नाही. इथे आता इंग्रजीही बोलली जात नाही."

ट्रम्प यांच्या या पोस्टनंतर भारतात विरोधी पक्षांनी जोरदार आणि तीव्र प्रतिक्रिया दिली होती.

जेव्हा याबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी केवळ एवढेच उत्तर दिले, "आम्ही बातम्या पाहिल्यापाहिले आहेत." मात्र नंतर भारत सरकारनेही या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लेखक आणि रेडिओ होस्ट मायकेल सॅव्हेज यांचा 'जन्मसिद्ध नागरिकत्वा'बाबतचा एक वादग्रस्त मजकूर शेअर केला आहे.

यामध्ये सॅव्हेज यांनी म्हटलं आहे की, सध्याच्या कायद्यांनुसार स्थलांतरितांना गरोदरपणाच्या 'नवव्या' महिन्यात अमेरिकेत येऊन स्थानिक कायद्यांचा फायदा घेता येतो.

मायकेल सॅव्हेज यांचं जे वक्तव्य ट्रम्प यांनी शेअर केले आहे, त्यात पुढे म्हटलं आहे की, "इथं एखादं बाळ जन्माला आलं की, लगेचच नागरिक बनतं. ते चीन, भारत किंवा जगातल्या दुसऱ्या कोणत्याही नरकातून कुटुंब इथं आणतात. तुम्हाला हे पाहण्यासाठी लांब जायची गरज नाही. इथं आता इंग्रजीही बोललं जात नाही."

भारताने ट्रम्प यांच्या या कृतीवर तीव्र टीका केली आहे. गुरुवारी (23 एप्रिल) संध्याकाळी उशीरा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

अमेरिकेने नंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त सोशल मीडिया रिपोस्टमुळे झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या मते, भारतातील अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने म्हटलं, "राष्ट्राध्यक्षांनी भारत एक महान देश असल्याचं म्हटलं आहे. तिथे सर्वोच्च पदांवर माझे खूप चांगले मित्र आहेत."

त्यांनी हे विधान भारतीय माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना केलं. मात्र, हे विधान भारतीय माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना करण्यात आलं.

ट्रम्प यांनी भारताला 'महान देश' नेमकं कधी आणि कुठे म्हटलं, याबाबत या प्रवक्त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही.

गुरुवारी (23 एप्रिल) संध्याकाळी उशीरा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी म्हटलं की, "आम्ही ते विधान पाहिलं आणि त्यानंतर अमेरिकन दूतावासाची प्रतिक्रिया देखील पाहिली. ही विधानं माहिती अभावी केलेली आणि अनुचित आहेत.

भारत-अमेरिका संबंध खूप पूर्वीपासून परस्पर सन्मान आणि सामायिक हितांवर आधारित आहेत. या विधानांतून दोन्ही देशांतील संबंधांची वास्तव परिस्थिती दिसत नाही."

याआधी त्यांच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता जायस्वाल यांनी फक्त एवढंच म्हटलं होतं की, "आम्ही काही बातम्या पाहिल्या आहेत...मी इतकंच सांगू इच्छितो."

पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

अमेरिकेत सध्या जन्माच्या आधारावर मिळणारं नागरिकत्व (बर्थराईट सिटीझनशिप) हा चांगलाच चर्चेचा किंबहुना वादाचा विषय बनला आहे.

ट्रम्प यांनी जी पोस्ट शेअर केली, त्यात मायकल सॅव्हेज यांनी लिहिलं आहे, "सुप्रीम कोर्टात मी बर्थराईट सिटिझनशिप बाबत युक्तिवाद ऐकला. त्या युक्तिवादावर लहान लहान चर्चा ऐकायला मिळतील. पण युक्तिवादामुळं मला थोडा त्रास झाला. कारण ते सगळं कायदेशीर भाषेत होतं."

त्यांच्या मते, "अमेरिकेचं संविधान हवाई प्रवास सुरू होण्याआधी लिहिलं गेलं होतं. एवढंच काय टेलिव्हिजन, इंटरनेट आणि रेडिओच्याही आधी ते लिहिलं होतं."

"स्थलांतरितांमुळं अमेरिकन नागरिकांना नोकरी मिळवणं कठीण जातं. ते अमेरिकेच्या नागरिकांचे हक्क हिरावून घेत आहेत असं त्यांचं मत आहे," असंही त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

"हे पाहण्यासाठी तुम्हाला फार लांब जायची गरज नाही. इथं आता इंग्रजी बोलली जात नाही. इथं येणाऱ्या स्थलांतरित वर्गाची या देशाबाबत काहीही निष्ठा नाही, ती कधीच नव्हती," असंही ते म्हणाले.

ट्रम्प यांनी ACLU (अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन) याबाबतही कठोर शब्हांत मत मांडलं आहे.

"या लोकांनी देशाचं एवढं नुकसान केलं आहे, जेवढं सर्व माफिया कुटुंबांनी एकत्रितही केलं नसेल. यांच्या तुलनेत ते काहीच नाही. हे लॅपटॉप असलेले गुंड आहेत, त्यांनी आपल्याला लुटलं आहे, दुय्यम नागरिकांसारखी वागणूक दिली आहे आणि 'थर्ड वर्ल्ड'ला आमच्यावर वर्चस्व गाजवू दिले आहे, तसंच आमच्या ध्वजाचा अपमान केला आहे," असं त्यांनी लिहिलं.

"अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनचे वकील वांग यांना आपली राष्ट्रीय ओळख नष्ट करून आपल्याला चीनची वसाहत बनवायचं आहे, पण हे चीनपुरतं मर्यादित नाही, तर भारतालाही लागू होतं," असंही लिहिलं आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जन्माच्या आधारावर नागरिकतेला मर्यादा घालण्याच्या कार्यकारी आदेशावर शंका व्यक्त केली होती.

न्यायालयातील बहुतांश न्यायाधीशांना अमेरिकेने बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुलांना आणि अमेरिकेत तात्पुरतं येणाऱ्या काही लोकांना नागरिकत्व देणं थांबवणं पटलं नाही .

अवैध स्थलांतर रोखण्यासाठी जन्माच्या आधारावर नागरिकत्व देण्यावर मर्यादा घालणं गरजेचं असल्याचं ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे.

तर त्यांच्या विरोधकांच्या मते, यामुळं शतकानुशतकं चालत आलेली परंपरा उलथून टाकली जाईल आणि अमेरिकेचे नुकसानही होईल.

भारतातील विरोधकांनी ट्रम्प यांना केले लक्ष्य

ट्रम्प यांच्या या पोस्टनंतर भारतातील विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला 'नरक' म्हटलं आहे. हे विधान अत्यंत अपमानास्पद आणि भारतविरोधी आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला वेदना झाल्या आहेत," असं काँग्रेसनं एक्स हँडलवर लिहिलं.

पंतप्रधान मोदींनी या संदर्भात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करून तीव्र निषेध नोंदवावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली.

"खरं तर मोदींचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता, ते ट्रम्प यांना काही बोलू शकतील याची अपेक्षा करता येणार नाही. ट्रम्प सातत्यानं अपमानास्पद वक्तव्यं करत आहेत आणि मोदी गप्प बसून ऐकत आहेत. नरेंद्र मोदी एक कमकुवत पंतप्रधान आहेत आणि संपूर्ण देशाला त्याची किंमत मोजावी लागत आहे," असं काँग्रेसनं लिहिलं.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही टीका केली. "मोदीजींचे प्रिय मित्र, 'नमस्ते ट्रम्प' यांनी एक नोट शेअर केली आहे. त्यात भारताची निंदा करण्यात आली आहे आणि एक अत्यंत अपमानास्पद शब्द वापरण्यात आला आहे. यावर मोदीजी पूर्णपणे गप्प आहेत," असं त्यांनी एक्सवर लिहिलं.

"मोदीजी, तुम्हाला कशाची भीती वाटते? अमेरिकेच्या यशात भारतीयांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमेरिकन सरकारच्या सर्वोच्च स्तरावर हा मुद्दा उपस्थित करण्यापासून आपल्याला कोणी अडवलंय?" असंही खर्गे यांनी लिहिलं.

काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या उत्तरावर म्हटलं की, "मानवी देहाचा एक भाग असतो. पण तो या उत्तरात कुठंतरी बेपत्ता झाल्याचं दिसत आहे. किमान उभं राहून आपण 5000 वर्ष जुनी संस्कृती आहोत, नरक नाही हे हे सांगण्याचं धाडस दाखवा."

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी, "डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताला 'नरक' म्हणण्याचं धाडसचं कसं झालं? भारतीयांना 'लॅपटॉप असलेले गुंड' म्हणण्याचं धाडस त्यांनी कसं केलं? जन्माच्या आधारे नागरिकत्वाच्या मुद्द्यावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात त्यांनी ह्या गोष्टी म्हटल्या," असं म्हटलं.

राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी ट्रम्प यांना उद्देशून एक्स (X) वर एका पोस्टमध्ये लिहिलं, "आज सकाळी जेव्हा आम्ही (भारतातील लोक) झोपेतून उठलो, तेव्हा आम्हाला तुम्ही भारतीयांसाठी अपमानास्पद भाषा वापरल्याचं दिसलं. याची आठवण करून देणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला याची सवय झाली आहे."

"तुम्ही सार्वजनिक चर्चेचा स्तर सतत खाली आणत आहात. तुम्ही जे बोलला ते खेदजनकच नाही, तर पूर्णपणे अस्वीकार्य आहे. हे विसरणं किंवा त्यासाठी मापी देणं, शक्य नाही," असंही त्यांनी म्हटलं.

आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी, "भारताचा अपमान केल्यानं तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. पण भारताला तुमच्या शिक्क्याची गरज नाही. 1.4 अब्ज लोकांच्या या देशाला प्रतिष्ठा, प्रतिभा आणि संस्कृतीचा वारसा आहे. तुमच्या बोलण्याचं भारताची ओळख ठरणार नाही," असं म्हटलं.

"भारताला 'नरक' म्हणणं हा भारताचा अपमान नाही, तर तुमचं अज्ञान आणि पोकळ अहंकार दाखवतं, " असंही ते म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)