You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तेलाच्या किमती वाढल्या, इराणनं इराकचा गॅसपुरवठा थांबवला; काय घडतंय आखातात?
इराकी माध्यमांनी वीज मंत्रालयाचा संदर्भ देत सांगितले आहे की, इराणकडून होणारी गॅस आयात बंद झाली आहे. गॅस सुविधांवर झालेल्या हल्ल्यांनंतर इराणने हे पाऊल उचलले आहे.
रॉयटर्सच्या माहितीनुसार, इराक आपली गॅस आणि विजेच्या गरजेपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त गरज इराणकडून भागवतो.
इराकच्या ऊर्जा मंत्रालयाचे प्रवक्ते अहमद मूसा यांनी इराकी न्यूज एजन्सीला सांगितले, "प्रदेशातील सध्याच्या परिस्थितीच्या परिणामामुळे इराणहून इराकमध्ये येणारा गॅस पूर्णपणे थांबला आहे."
जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्रावर हवाई हल्ला झाला आहे, असं इराणी माध्यमांनी जाहीर केलं होतं. यानंतर तेलाच्या किमती 108 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत.
ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 108.60 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली. मंगळवारच्या किमतींच्या तुलनेत ही 5% वाढ आहे. यूके गॅसचा बेंचमार्क भावही झपाट्याने वाढला असून सुमारे 6% उसळून तो 139 पेंस प्रति थर्मपर्यंत पोहोचला आहे.
इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)‑शी संबंधित 'तस्नीम' या वृत्तसंस्थेने माहिती दिली होती की इराणच्या साउथ पार्स गॅस फील्डवरील पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सवर हवाई हल्ला झाला आहे, त्याचाच हा परिणाम दिसून येत आहे.
जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्रावर हवाई हल्ला झाला आहे, असा दावा इराणी माध्यमांनी केला होता. या दाव्यानुसार गॅस फील्डच्या पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सवरील हल्ल्यांत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
साउथ पार्स हे जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायू क्षेत्र आहे, ज्यावर इराण आणि कतार आपापले प्रकल्प चालवतात.
इराणच्या तेल मंत्रालयाने सांगितले की आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. ही माहिती IRGC‑शी संबंधित तस्नीम न्यूज एजन्सीने दिली आहे.
तस्नीम एजन्सीने सांगितले की, हल्ला बुधवारी झाला आणि त्यासाठी 'इस्रायल आणि अमेरिका' यांना जबाबदार धरले. एजन्सीने असेही म्हटले की प्रत्युत्तरात "अमेरिकेशी संबंधित सर्व तेल आणि गॅस रिफायनऱ्यांना लक्ष्य केले जाईल."
गुप्तचर मंत्री इस्माईल खातिब यांच्या मृत्यूला इराणचा दुजोरा
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी त्यांचे गुप्तहेर मंत्री इस्माईल खातिब मारले गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
याआधी इस्रायलनं, काल रात्री करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात खातिब मारले गेल्याची माहिती दिली होती.
एक्स या सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी म्हटलं आहे, "माझे प्रिय सहकारी इस्माईल खातिब, अली लारिजानी आणि अजीज नासिरजादेह यांची भ्याड हत्या करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य आणि त्यांच्याबरोबर उपस्थित असलेल्या लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूमुळे आम्हाला तीव्र दु:ख झालं आहे."
त्यांनी पुढे लिहिलं आहे, "मंत्रिमंडळातील दोन सदस्य, शूराचे सचिव, लष्करी आणि बासिज कमांडरांच्या हौतात्म्याबद्दल मी इराणच्या जनतेप्रति माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो."
इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी लारिजानी आणि देशाचे संरक्षण मंत्री नासिरजादेह यांच्या मृत्यूची पुष्टी आधीच करण्यात आलेली आहे.
याआधी, इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खातिब मारले गेल्याचा दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी केला होता.
काट्झ म्हणाले की, "काल रात्री इराणचे गुप्तचर मंत्री खातिब यांनादेखील मारण्यात आलं आहे."
इस्रायलमधील प्रसारमाध्यमांनी संरक्षण मंत्रालयातील सूत्रांचा संदर्भ देत आधीच सांगितलं होतं की इस्माईल खातिब यांना लक्ष्य करण्यात आलं होतं.
इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी 2021 मध्ये गुप्तचर मंत्री इस्माईल खातिब यांची नियुक्ती केली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)