धुरंधरचा 'हमजा अली मजारी' : रणवीर सिंहचा पाकिस्तानशी 'असा' आहे खराखुरा संबंध

    • Author, वंदना
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

अभिनेता रणवीर सिंहचा 'धुरंधर' हा सिनेमा मागील वर्षी प्रचंड यशस्वी ठरला. आता 'धुरंधर भाग-2' पडद्यावर आला आहे. आदित्य धर यानेच याचंही दिग्दर्शन केलं आहे.

या सिनेमात एक दृश्य आहे, ज्यात रणवीर सिंहच्या पात्राला अक्षय खन्ना म्हणजेच रहमान डकेतचा भाऊ विचारतो - 'तू कुठून आला आहेस?'

रणवीर उत्तर देतो - 'खरोटाबाद, क्वेटा. नाव - हमजा अली मजारी.'

सिनेमात रणवीर एक भारतीय एजंट म्हणून पाकिस्तानला जातो. तिथे तो पाकिस्तानी नागरिक बनून राहतो.

वास्तविक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर रणवीर सिंहचे कौटुंबिक नाते पाकिस्तानशी जोडलेले आहेत.

हे नातं समजून घेण्यासाठी आपल्याला 1940 च्या दशकात जावं लागेल, जेव्हा अविभाजित भारतातील पंजाबमध्ये बर्क कुटुंब ख्रिश्चन धर्माचं पालन करत असत. ते गाव आता पाकिस्तानमध्ये आहे.

या कुटुंबाचा एक भाग होते तरुण सॅम्युअल मार्टिन बर्क, जे नंतर 11 देशांमध्ये पाकिस्तानचे राजदूत झाले, आणि त्यांची बहीण चाँद बर्क हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्री झाली.

याच चाँद बर्क म्हणजे धुरंधरचा स्टार रणवीर सिंहच्या आजी.

चाँद बर्क म्हणजेच 'डान्सिंग लिली ऑफ पंजाब'

सॅम्युअल मार्टिन बर्क यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता मला मला लंडनमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलीकडे म्हणजेच नोएल पार्सन्सकडे घेऊन गेली.

रणवीरच्या आजीचा भाऊ म्हणजे सॅम्युअल मार्टिन बर्क, यांचा जन्म 1906 मध्ये पंजाबमधील नानकाना साहिबजवळील मार्टिनपूर गावात झाला.

बीबीसीशी बोलताना नोएल पार्सन्स म्हणाल्या, "फाळणीच्या काळात एक देश निवडण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली. त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. त्याचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळे ते अविभाजित भारत आणि नोकरी सोडून इंग्लंडला गेले होते."

रणवीर सिंहची आजी चाँद बर्क फाळणीनंतर त्या वेळच्या बॉम्बेमध्ये (आताचे मुंबई) आल्या.

'सिनेमाजी' हा भारतीय चित्रपट इतिहासाशी संबंधित एक डॉक्यूमेंटेशन प्रोजेक्ट आहे, जो जुन्या काळातील कलाकारांची माहिती आणि आठवणी जतन (आर्काइव्ह) करून ठेवतो.

सिनेमाजीच्या सह-संस्थापक आशा बत्रा सांगतात, "चाँद बर्क या हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये चरित्र भूमिका साकारत. त्या लाहोरमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करत असत. त्यांच्या नृत्यासाठी त्या खूप प्रसिद्ध होत्या, म्हणूनच त्यांना 'डान्सिंग लिली ऑफ पंजाब' म्हटलं जात असत."

भारत की पाकिस्तान? निवड करताना कोंडी

म्हणजे रणवीर सिंहच्या कुटुंबाची मुळं अविभाजित भारतातील अनेक भागांशी आणि परदेशाशी जोडलेली आहेत.

ज्यावेळी भारताच्या फाळणीची चर्चा सुरू होती त्या काळात, 1946 मध्ये सॅम्युअल मार्टिन बर्क हे पंजाबमधील पहिल्या 'इलेक्शन पिटीशन्स कमिशन'चे (निवडणूक याचिका आयोग) अध्यक्ष म्हणजेच न्यायाधीश होते.

सॅम्युअल मार्टिन बर्क यांच्या कन्या नोएल सांगतात की, पाकिस्तान व्हावा की नाही यावर जोरदार चर्चा सुरू होती, आणि या कमिशनसमोर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते आपली बाजू मांडत होते.

आपल्या 'अ लाइफ ऑफ फुलफिलमेंट' या आत्मकथेत सॅम्युअल मार्टिन बर्क लिहितात, "त्या वेळी निष्पक्ष राहण्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग होता - मी स्पष्ट सांगितलं की, विभाजनानंतर मी भारत किंवा पाकिस्तान, कोणत्याही देशात सरकारी नोकरी करणार नाही. मला निवृत्ती घेणंच योग्य वाटलं. भारतीय सिव्हिल सर्व्हिसेसमधून वेळेआधी निवृत्तीची विनंती करणारा मी पहिला आशियाई ठरलो."

"याचा परिणाम असा झाला की, नव्याने स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानमध्ये मी केवळ बेरोजगारच राहिलो नाही तर या इस्लामिक देशात मी एका छोट्या ख्रिश्चन अल्पसंख्यक समुदायाचा भाग बनलो. आणि इंग्रजांच्या काळात मी भारतीय सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये न्यायाधीश होतो."

अशा प्रकारे विभाजनानंतर सॅम्युअल मार्टिन बर्क आपल्या कुटुंबासह ब्रिटनला गेले, तर त्यांचे इतर भावंडं कॅनडाला गेले. एक बहीण, चाँद बॉम्बेला (आताचे मुंबई) आली.

पाकिस्तान सोडल्यानंतरही पाकिस्तानी राजदूत कसे बनले?

पण एक कोडं कायम होतं, भारत आणि पाकिस्तान दोघांची नोकरी सोडून ब्रिटनला गेलेले सॅम्युअल नंतर पाकिस्तानचे राजदूत कसे बनले?

नोएल पार्सन्स सांगतात की, फाळणीच्या वेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री जफरउल्ला खान हे त्यांच्यासाठी गॉडफादरसारखे होते. त्यांनीच सॅम्युअल मार्टिन बर्क यांचं मन वळवलं आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची उभारणी करण्यासाठी मदत मागितली.

त्यावेळी सॅम्युअल मार्टिन बर्क लंडनमध्ये पाकिस्तानचे राजदूत झाले आणि त्यांनी तिथे पाकिस्तानी दूतावास स्थापन केला.

तर दुसरीकडे त्यांची बहीण चाँद बर्क या भारतात येऊन हिंदी सिनेमांमध्ये काम करू लागल्या.

सॅम्युअल आणि चाँद यांच्या वडिलांचे नाव जनाब खैरुद्दीन होते. ते 'बर्क' या नावाने शायरी लिहायचे, असं सांगितलं जातं. नोएल यांच्या मते, त्यांच्या कुटुंबाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.

2009 मध्ये ज्येष्ठ पत्रकार साजिदा मोमीन यांनी 103 वर्षीय सॅम्युअल मार्टिन बर्क यांची भेट घेतली.

बीबीसीशी बोलताना साजिदा मोमीन यांनी सॅम्युअल मार्टिन बर्क यांच्याशी संबंधित अनेक किस्से सांगितले.

साजिदा सांगतात, "सॅम्युअल मार्टिन यांना क्रिकेटची खूप आवड होती. नोएल यांनी सांगितलं होतं की, अविभाजित भारताच्या काळात एका सामन्यात त्यांनी पटियालाच्या महाराजांना बाद केलं होतं. परंतु, अंपायर महाराजांना घाबरत असल्यामुळे त्याने काही दिसलंच नाही अशा प्रकारचे हावभाव केले."

"सॅम्युअल मार्टिन बर्क यांनी या निर्णयाला आव्हान दिलं, पण महाराजांच्या दबावामुळे अंपायरने आपला निर्णय बदलला नाही. सॅम्युअल यांनी मोहम्मद अली जिन्ना आणि लियाकत अली खान यांच्यासोबतही जवळून काम केलं होतं."

राज कपूर यांनी दिली चाँद बर्क यांना संधी

नोएल पार्सन्स आपली आत्या आणि रणवीरची आजी चाँद यांना ओळखत होत्या का? यावर दुसऱ्या बाजूला फोनवर असलेल्या नोएल हसत म्हणाल्या, "का नाही? त्या माझ्या आत्या होत्या."

चाँद यांचा जुना फोटो पाहताना, त्यांचा आवाज आणि चेहऱ्यावरचं हास्य मला दिसत नसलं तरी ते जाणवत होतं.

आशा बत्रा सांगतात की, फाळणीनंतर चाँद अनेक वर्षे चित्रपटांपासून दूर होत्या, परंतु राज कपूर यांनी त्यांना पुन्हा संधी दिली.

तुम्ही 'बूट पॉलिश' हा चित्रपट पाहिला असेल, तर त्या निर्दयी आणि लोभी महिलेचं पात्र विसरणं कठीण आहे. ती दोन लहान अनाथ मुलांवर खूप मानसिक आणि शारीरिक अत्याचार करते.

हे पात्र चाँद यांनीच साकारलं होतं. नंतर त्यांनी सुंदरसिंह भवनानी यांच्याशी विवाह केला. आणि त्याच चाँद बर्क यांचा नातू म्हणजेच आजचा रणवीर सिंह आहे.

बर्क कुटुंबीय आणि रणवीर सिंह

साजिदा सांगतात की, 2009 मध्ये त्या सॅम्युअल मार्टिन बर्क यांना भेटल्या तेव्हा त्यांचा 103वा वाढदिवस होता. त्या वेळी भारतातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, कारण ते अविभाजित भारताच्या भारतीय नागरी सेवेमधील सर्वात जास्त काळ जिवंत राहिलेले सदस्य होते.

धुरंधर आणि बर्क कुटुंबाकडे पाहिलं तर, एक भाऊ जो भारतीय न्यायाधीश होता, पुढे पाकिस्तानचा प्रसिद्ध मुत्सद्दी अधिकारी बनला. आणि एक बहीण अभिनेत्री होती, जिने राज कपूर, नर्गीस, निम्मी, प्रदीप कुमार, प्राण आणि मनोज कुमार यांच्याबरोबर काम केलं.

नंतर काळ बदलतो, पिढ्या बदलतात आणि त्याच कुटुंबातून रणवीर सिंहसारखा बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता तयार होतो.

ब्रिटनमधील सॅम्युअल मार्टिन बर्क यांच्या कन्या नोएल यांना भारतातील रणवीर सिंहबद्दल माहिती आहे का?

माझा प्रश्न पूर्ण होण्याआधीच नोएल लगेच म्हणाल्या - हो, माहिती आहे. पण आमच्यात कधीच संपर्क झाला नाही.

जसं कधी कधी वेगवेगळ्या देशांमध्ये राहणाऱ्या पिढ्या वर्षानुवर्षे एकमेकांपासून दूर जातात, तसंच काहीसं इथेही झालं.

धुरंधरचा दुसरा भागही तयार झाला आहे. एका बाजूला या चित्रपटाची कथा, अभिनय आणि गाण्यांची खूप स्तुती झाली, तर काही लोकांनी यात प्रचार (प्रोपेगंडा) असल्याची टीका केली. तरीही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जोरदार कमाई केली होती.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.