'रस्त्यामुळे माझा मुलगा मेला, गाय आडून मेली, पण डॉक्टर आले नाही'; 'या' गावातल्या लोकांनी मतदानावर बहिष्कार का घातला?

फोटो स्रोत, kiran sakale
"रस्त्यामुळे मेला माझा मुलगा. एकुलता एक मुलगा होता. राखीपौर्णिमा आली, दिवाळी आली की माझ्या 2 मुलींना त्याची आठवण येते. डोळ्यात पाणी येतं आमच्या. माझा मुलगा ते परत देतील का?"
संगीता वैराट जीवाच्या आकांताने ओरडून हा सवाल उपस्थित करतात. संगीता परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातल्या चितनरवाडी गावात राहतात.
गावाला जोडणारा रस्ता आणि ओढ्यावरील पुलाचं बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे, होऊ घातलेल्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ठराव इथल्या ग्रामपंचायतीनं पारित केलाय. ग्रामस्थांकडून त्याबाबतचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलंय.
गावात प्रवेश केल्यास मुख्य चौकातच निवडणुकीवर बहिष्कार घातल्याचं मोठं बॅनर लावलेलं दिसून येतं.
'गावाला रस्ता नाही, पूल नाही, म्हणून मतदान नाही,' असं त्यावर ठळकपणे लिहिलेलं दिसतं.
गावातील पाराजवळ आमची भेट विठ्ठल जाधव यांच्याशी झाली.
ते म्हणाले, "नेत्यांना सांगू सांगू कदरलो साहेब आम्ही. मतदान आलं की नेत्यांना वेळ असतो. मतदान द्या म्हणून ते हात जोडत्येत. यावेळेस करत्योत म्हणत्यात. आम्ही पाठपुरावा करतोत. पण पुढे काहीच होत नाही. शेवटी कदरुन कदरुन हा निर्णय घेतला आम्ही."
रस्त्याअभावी शिक्षणावर परिणाम
चितनरवाडीची लोकसंख्या 300 च्या आसपास असून गावात 70-80 घरं आहेत. गावातील बहुसंख्य लोक मजुरी करतात. गावात पाचवीपर्यंत शाळा आहे. रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतोय.
ग्रामस्थ एकनाथ राठोड सांगतात, "आडगावपासून ते चितनरवाडी फक्त 2 किलोमीटवरचा रस्ता आहे. भारत स्वतंत्र होऊन 77 वर्षं झाले, पण 2 किलोमीटरचा रस्ता काही झाला नाही. या काळात आम्ही वेळोवेळी उपोषणं केले, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथं उपोषण केले. वेळोवेळी बहिष्कार टाकले. जिंतूर येथे मोर्चा काढला, पण कुणी दखल घेतली नाही."

फोटो स्रोत, kiran sakale
चितनरवाडीपासून आडगाव हे बाजाराचं गाव 2 किलोमीटर अंतरावर आहे.
विठ्ठल जाधव सांगतात, "आमच्या गावातून 30 मुलं हे आडगावात शाळेत जाणारे आहेत. शारदा विद्यालयामध्ये. पाणी पडलं तर ते मुलं ओढ्याच्या पलीकडे थांबतात, आम्ही अलीकडे थांबतोत. 4-4 घंटे मुलं पलीकडे थांबतात. बोलताना असं रडू येतं आम्हाला."
'रस्त्यामुळे माझा मुलगा मेला'
चितनरवाडी गावात बंजारा आणि बौद्ध समाजाचे लोक राहतात. गावात जाण्या-येण्यासाठी पक्का रस्ताच नसल्यामुळे उपचाराअभावी काही जणांचा मृत्यू झाल्याचं गावकरी सांगतात.
संगीता वैराट यांच्या मुलाचा 2014 मध्ये मृत्यू झाला.
त्या सांगतात, "माझा मुलगा होता, 10-12 वर्षाचा. त्याला संडास, उलटी झाली. आम्ही ओढ्यापर्यंत गेलो. ओढ्याला पूर. मग जायचं कसं. माझे मालक आणि मी गेले. मुलाचा मृत्यू घेऊन आम्ही वापस आलो रडत. काय सांगायचं अजून या रस्त्याचं? माझी गाय डिलिव्हरीनं आडून मेली. डॉक्टर आणाय गेलो, डॉक्टर आला नाही."
पण केवळ संगीताच नाही, तर गावात फिरताना अशा अनेक करुण कहाण्या ऐकायला मिळतात.
दिपाली राठोड सांगतात, "2023 मध्ये पहिलं बाळ होतं माझं. रस्त्याला, ओढ्याला लय पूर आलतं. गाडी येत नव्हती. आम्हाला तिकडं जाता येत नव्हतं. पोटात खूप त्रास होऊ लागला. दोन-दिवस झाला त्रास उतरना, खूप त्रास झाला, मग वारली पोटात. पहिली मुलगी होती."

फोटो स्रोत, kiran sakale
पार्वतीबाई राठोड यांचा अनुभव अगदी अलीकडचा म्हणजे महिन्याभरापूर्वीचा.
त्या सांगतात, "आमच्या मुलीचा आता महिनाच होत आलंय. असं पोटात दुखाय लागलं, ॲम्ब्युलन्सला फोन लावला तर ते काही येईना. गाडीबैलामध्ये नेलं तर लेकरू आडवं लागलं. आडगावलं नेलं तिथं घेतलं नाही, जिंतूरला घेतलं नाही, मग परभणीला नेलं. तिथं सीझर करावं लागलं. तिथून घराला आणायचं तर ॲम्ब्युलन्स आली नाही, गाडीबैलामध्ये मुलीला घरी आणावं लागलं."

फोटो स्रोत, kiran sakale
गावातल्या विमल राठोड यांना किडनीचा आजार आहे. आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावं लागतं. पण पावसाळ्यात डायलिसिसची तारीख हुकते आणि मग त्रास वाढतो, असं त्या त्या सांगतात.
"तरास वाढतो. झोप नसती सारी रात. रात बसून काढणं लागती. घर बघावं असावं. मालक मजुरी करुन कितीक आणल, कितीक लावलं."
विमल यांचं घर कुडाचं आहे.
पूलाचं काम अपूर्ण, अपघातांमुळे लोक त्रस्त
आडगावहून चितनरवाडी गावाकडे जाणारा रस्ता कच्चा आहे. रस्त्यावरुन जाताना एक ओढा लागतो. पावसाच्या कालावधीत इथं छातीपर्यंत पाणी साचतं. अनेकांना अपघाताला सामोरं जावं लागतं. ओढ्यावर असतानाच आमची भेट आदित्यसोबत झाली.
तो याच गावचा. त्याचा एक-दोन दिवसांपूर्वी अपघात झाला होता. अपघाताविषयी बोलताना आदित्य म्हणाला, "रात्री सात-साडेसात दरम्यान येऊ लागलो. इथं दगडामुळे टायर स्लिप झालं, त्याच्यामुळे मला हात आणि गुडघ्यावरती जबर मार लागला. चालता येत नाही, बसता येत नाही, खूप त्रास होतोय. आमची मागणी हीच आहे की, लवकरात लवकर रस्ता व्हावा."

फोटो स्रोत, kiran sakale
मेघना बोर्डीकर या परभणीच्या पालकमंत्री असून जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "जिंतूर तालुक्यातील चितनरवाडी या गावाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार घातलाय. त्यांचा राग साहजिक आहे. पण त्यांना हेही माहितीये की, त्यांची आमदार म्हणून आपल्या गावाला अनेक वर्षांपासून रस्ता नसताना तिथे 6 कोटींचा रस्ता आपण मंजूर केला. त्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे.
"सगळे खालचे फायनल बेस झालेले आहे. फक्त फायनल सील कोट जो डांबराचा असतो, तो राहिलेला आहे. तोही लवकरात लवकर करुन घेण्याच्या सूचना संबंधित कॉन्ट्रॅक्टरला देण्यात येतील."
'बजेट पडलं की तिकडंच खाऊन घेते'
आडगाव ते चितनरवाडी दरम्यान काही महिन्यांपूर्वीच 5 ते 7 फुटांचा कच्चा रस्ता झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
पार्वतीबाई राठोड सांगतात, "त्या रस्त्याला 5-6 महिने झाले. आज करतो, उद्या करतो म्हणतात. बजेट पडलं की तिकडंच खाऊन घेते. तिकडे सांगतेत की रोड झाला चितनरवाडीचा. आम्हाला काही इलाज आहे का इथं? आम्ही रोड झाल्याशिवाय मतदान करणार नाही."
तर, संगीता वैराट म्हणतात, "आम्हाला फक्त पूल आणि रस्ता झालाच पाहिजे. आम्ही काही भीक मागेना, आमच्या मताचा हक्क मागतोय आम्ही. रस्ता झाल्याशिवाय मत भेटणार नाही."

फोटो स्रोत, Kiran sakale
रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यात गावात कुणीही पाहुणे येत नाहीत. गावातल्या मुला-मुलींचे लग्न जमत नाहीत, अशी चितनरवाडीच्या ग्रामस्थांची कैफियत आहे.
दरम्यान, "रस्त्याचे मार्क आउट टाकून दिले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने बजेट मंजूर केले आहे. ते लवकरच पूल बांधून देणार आहेत. चितनरवाडीच्या ग्रामस्थांशी चर्चा केली असून त्यांना बहिष्कार मागे घेण्याचं आवाहन केलंय," असं जिंतूरच्या तहसीलदार शीतल कच्छवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
गावकरी मात्र रस्त्याचं काम पूर्ण झालं, तरच मतदान. नाहीतर मतदान करणार नाही, या भूमिकेवर ठाम आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











