मार्चच्या सुरुवातीलाच का तापली मुंबई? उष्णतेची लाट असेल तर काय काळजी घ्यायला हवी?

वाचन वेळ: 4 मिनिटे

महाराष्ट्रात आता दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. विशेषतः उत्तर कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसाठी ॲारेंज अलर्ट दिला आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच एवढं ऊन का जाणवतंय आणि हवामान विभागाने कुठल्या जिल्ह्यांना काय इशारे दिले आहेत? हे आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

मुंबई आणि कोकणातल्या अनेक भागांत मार्चमध्ये ऋतू बदलतो, तेव्हा पारा लवकर वर चढताना दिसतो.

मात्र यावेळी मुंबईत मार्चच्या सुरुवातीला कमाल तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा चार ते पाच अंशांन वर गेलं.

मुंबईतील रात्रीचं किमान तापमानही सरासरीपेक्षा दोन अंश जास्तच राहिलं आहे.

उत्तरेकडून येत असलेल्या कोरड्या वाऱ्यांमुळे असं झाल्याचं काही हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण कॅांक्रिटचा जंगलात याची तीव्रता आणखी जाणवते आहे.

किनारी प्रदेशांत सलग दोन दिवस तापमान 37 अंशावर गेलं की उष्णतेची लाट जाहीर केली जाते.

मुंबईतल्या उत्तरेकडच्या भागात आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी 40 अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली.

बहुतांश ठिकाणी तापमान 39 अंशांच्या आसपास राहिलं पण आर्द्रता म्हणजे हवेतील बाष्पाचे प्रमाणही बरंच असल्याने हीट इंडेक्स जास्त आहे म्हणजे उष्णतेचा त्रास जास्त जाणवतो.

हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत 10 मार्चसाठी ॲारेंज अलर्ट दिला आहे. तर रायगडमध्ये यलो अलर्ट आहे. विदर्भातील अकोल्यात यलो अलर्ट आहे.

11 मार्चसाठीही या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे. तसंच 13-14 मार्च रोजी विदर्भातील आणखी काही भागांत यलो अलर्ट आहे. या दिवसांत राज्यात काही भागांमध्ये वादळी पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.

सध्या ऊष्णतेमुळे अनेकांना थकवा आणि इतर त्रास जाणवत असून आरोग्य अधिकाऱ्यांनी उन्हात जाताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

दुपारी बारा ते चार दरम्यान कडक उन्हात जाणं टाळावं असंही म्हटलं आहे.

पाणी पित राहण्याचा सल्लाही डॅाक्टर देतात. आजारी व्यक्ती, लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांनी विशेष काळजी घ्यावी असंही ते सांगतात.

उष्णतेची लाट किंवा Heatwave म्हणजे काय?

भारतीय हवामान विभागानुसार समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात सलग दोन दिवस 37 अंश सेल्शियसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं किंवा सलग दोन दिवस तापमानात नेहमीपेक्षा 4.5 अंशांहून अधिक वाढ झाली, तर उष्णतेची लाट आल्याचं मानलं जातं.

कमाल तापमानातील वाढ 6.5 अंश सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर त्याला अतिउष्ण लाट किंवा सिव्हीयर हीट वेव्ह (severe heat wave) म्हटलं जातं.

भारतातल्या शहरांमध्ये विविध बांधकामांमुळे गेल्या काही दशकांमध्ये मोठे बदल झाले आहेत. शहरांभोवतीची आणि शहरांमधली मोठी झाडं या बांधकांमांमुळे नष्ट झाली आहेत.

त्यापाठोपाठ डांबरी, सिमेंटचे रस्ते आणि काँक्रीटच्या इमारती, असं शहरांचं नवं रूप तयार झालं.

उन्हाळ्यात एसीचा वापर सुरू झाल्यामुळे पुन्हा इमारतीतील उष्ण हवेला आधीच तापलेल्या बाहेरच्या हवेत सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली.

काँक्रीटच्या अतिरिक्त इमारती तसंच रस्ते यामुळे शहरांमध्ये तापमान वाढल्याचं दिसून येतं.

हे तापमान आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा जास्त असल्यामुळे वाढलेल्या तापमानाचा हा शहरी प्रदेश चटकन ओळखता येतो. त्यामुळेच त्याला 'अर्बन हीट आयलंड' किंवा 'हीट आयलंड' असं म्हटलं जातं.

वाढलेल्या उष्णतेचा शरीरावर काय परिणाम होतो?

मानवी शरीराचं सामान्य तापमान 37-38 सेल्शियस असतं. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मानवी शरीराभोवती हवेचं तापमान 18 ते 24 सेल्शियस असतं.

तापमान 39-40 सेल्शियसपर्यंत पोचलं की आपला मेंदू स्नायूंना काम थांबवण्याचे किंवा आहे त्या परिस्थितीत स्नायू शांत करण्याचे संदेश पाठवतो आणि त्यामुळे शरीराला थकवा येतो.

बाहेरचं तापमान वाढतं, तेव्हा आपलं शरीर आतली उष्णता बाहेर फेकायला लागतं.

या प्रक्रियेमुळे आपल्या त्वचेच्या दिशेने रक्तप्रवाह वाढतो. शरीरातून घाम बाहेर पडतो, या घामाचं बाष्पीभवन होतं, आणि त्याने शरीर थंड होतं.

दुसरीकडे शरीर जेव्हा तापत असतं, तेव्हा रक्तपेशी प्रसरण पावतात. त्याने रक्तदाब कमी होतो. परिणामी शरीरभर रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक श्रम घ्यावे लागतात.

याचा परिणाम म्हणून खाजरा पुरळ उठणं, पावलं सुजणं अशा गोष्टी होतात. तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्यानंतर सनबर्न होण्याची शक्यता असते.

सतत घाम आल्याने शरीरातलं पाण्याचं - द्रवाचं आणि Salts - सोडियम - पोटॅशियमचं प्रमाण कमी होतं आणि त्याचेही परिणाम शरीरावर होतात.

उन्हाळ्यात काय काळजी घ्यायची?

  • दुपारी 12 ते 3 या काळात बाहेर जाणं टाळा.
  • तापमान जास्त असताना बाहेर असाल तर थकवणाऱ्या क्रिया वा हालचाली करू नका.
  • ओला नॅपकिन वापरून डोकं, मान, चेहरा आणि हात-पाय पुसा.
  • चक्कर येत असेल, दमल्यासारखं वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
  • प्राण्यांना आडोशाला ठेवा. त्यांना पुरेसं पाणी द्या.
  • तहान लागली नाही तरीही पाणी पित रहा. पण एकाचवेळी भरपूर पाणी पिणं योग्य नाही.
  • ORS, लस्सी, लिंबू सरबत, ताक, कोकम सरबत अशी घरगुती पेय पिणं फायद्याचं ठरेल.
  • हलके, फिकट रंगाचे, सुटसुटीत सुती कपडे घाला. गॉगल्स, छत्री किंवा टोपी वापरा. सनस्क्रीन वापरा.
  • अल्कोहोल, चहा - कॉफी, कार्बोनेटेड ड्रिंक्स यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. ही पेयं टाळा.
  • प्रथिनांचं प्रमाण जास्त असलेलं अन्न, तेलकट - शिळं अन्न टाळा.
  • लिंबूवर्गीय फळं 'सी' जीवनसत्त्वासाठी चांगली. कलिंगड, खरबूज, संत्री, मोसंबी, द्राक्षं, आंबा, डाळिंब, करवंद, जांभूळ यांचा आहारात समावेश करावा.
  • आवळा, कोकम, कैरी यांच्यातही 'सी' जीवनसत्त्व, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे घटक असतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.