जगभरात 8 पैकी 1 व्यक्ती लठ्ठच; कच्ची फळं, सुकामेवा आणि बिया खाल्ल्यानं वजन कमी होतं का?

    • Author, षण्मुगप्रिय सेल्वाराज
    • Role, बीबीसी तामिळसाठी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

जगभरातल्या आठपैकी एक व्यक्ती लठ्ठ असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या 2025 मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार जगात 1990 पासून प्रौढ व्यक्तींमधील लठ्ठपणाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे.

किशोरवयीन मुलांमध्ये ही वाढ चार पट आहे. 2022 मध्ये, 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे 8 कोटी 90 लाख लोक लठ्ठपणासह जगत होते.

याव्यतिरिक्त, जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे 43% लोक जास्त वजनाचे आहेत आणि 16% लठ्ठ आहेत.

आहार आणि व्यायामातला समतोल साधता न आल्यामुळे लोक लठ्ठ होत असल्याचं तज्ज्ञांना वाटतं.

जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, बहुतांश लोक हे त्यांच्या अनुवांशिक रचनेमुळे, वातावरणामुळे किंवा मानसिक आरोग्यामुळे लठ्ठ होतात. लठ्ठपणा हा एक अनेक कारणांमुळे होणारा आजार आहे.

गेल्या 30 वर्षांमध्ये स्थूलतेचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे वजन कमी करायचं म्हणून विविध प्रकारच्या आहारांच्या पर्यायाचा विचार करतात.

असाच एक प्रकार आहे ज्याला इंग्रजीत 'फ्रुटेरियन डाएट' असं म्हणतात. या डाएटमध्ये कच्ची फळं, सुकामेवा आणि बियांचा समावेश असतो.

फक्त फळं खाणं शरीरासाठी चांगलं आहे का?

अनेकांना हा फलाहार वजन कमी करण्यात मदत करत असला तरी फक्त फळं खाणं माणसाच्या शरीरासाठी हितकारक आहे का? की त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात?

डॉ. अरुण कुमार म्हणतात, "फक्त फळ खाल्ल्याने वजन कमी होऊ शकतं हे जरी खरं असलं तरी याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.

फ्रुटेरियन डाएट करणारे लोक फक्त फळं खातात. एकूण कॅलरिज पैकी 80 ते 90 टक्के कॅलरी या फळांमधून त्यांना मिळतात. सामान्यतः फळांमध्ये कमी कॅलरी असतात म्हणून ते दिवसभरात 1500 कॅलरीपेक्षाही कमी खातात."

अरुण कुमार म्हणाले, "यामुळे तुम्ही शरीराच्या गरजेपेक्षा कमी कॅलरी खाता आणि त्यातून तुमचं वजन कमी होतं. पण निव्वळ फळं खाऊन तुमच्या शरीराला हवी असणारी प्रथिने मिळत नाहीत. यामुळे स्नायूंचं नुकसान होऊ शकतं."

"तसेच शरीराला गरजेची असणारी पोषकतत्वे मिळत नाहीत. ज्यामध्ये लोह, जस्त आणि ओमेगा 3 सारख्या गरजेच्या घटकांचा समावेश असतो," असं ते म्हणाले.

"तसेच, फक्त फळे खाल्ल्याने शरीरात फ्रुक्टोजची पातळी वाढू शकते, ज्यामुळे ट्रायग्लिसराइड आणि यकृतातील चरबी वाढू शकते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात," असं अरुण कुमार यांनी स्पष्ट केलं.

हा वजन कमी करण्याचा आरोग्यदायी मार्ग नाही असं देखील त्यांनी बजावलं. पण आहारामध्ये फळांचा समावेश करणं देखील गरजेचं आहे आणि असं केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पण फक्त फलाहार करणं धोकादायक असू शकतं असंही अरुण कुमार म्हणाले.

अनेक अभ्यासांमधून केवळ फळांचं सेवन करायला सांगणारा हा आहार आरोग्यासाठी हितकारक नसल्याचं सिद्ध झालेलं आहे.

या आहार पद्धतीमुळे शरीरात पोषक तत्वांचा गंभीर तुटवडा निर्माण होऊ शकतो असा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अमेरिकेच्या मायो क्लिनिक या संस्थेने म्हटलं आहे की, फक्त फळं खाण्याचा सल्ला देणाऱ्या या आहार पद्धतीमध्ये प्रथिने, आवश्यक चरबी (हेल्दी फॅट्स), कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन बी12 कमी असतं, ज्यामुळे स्नायूंचं नुकसान होऊ शकतं, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते आणि अशक्तपणाचा धोका वाढू शकतो.

इंटरनॅशनल सोसायटी ऑफ स्पोर्ट्स न्यूट्रिशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की कमी प्रथिनांचे सेवन चयापचय कार्यावर परिणाम करू शकते. हे घटक दीर्घकालीन आरोग्यासाठी संतुलित आहार किती महत्त्वाचा आहे हे सांगतात.

चिकन आणि मटण खाल्ल्याने पोट फुगेल का?

एका बाजूला फक्त फलाहार करण्याचा सल्ला देणाऱ्या या डाएटची क्रेझ आहे, तर दुसऱ्या बाजूला आजकाल अनेकांचा आणखी एक समज असा आहे की चिकन आणि मटण खाल्ल्याने तुम्ही जाड होऊ शकता.

याबद्दल बोलताना, डॉ. अरुण कुमार म्हणाले, "चिकन आणि मटण योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास तुमचं वजन कमी करण्यास मदत होऊ शकते."

पोटाच्या आजूबाजूला जमा होणाऱ्या चरबीचं विज्ञान सांगतात डॉ. अरुण कुमार म्हणाले, "जास्त कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स (कर्बोदके) इन्सुलिनचा स्राव वाढवतात, ज्यामुळे ते शरीरात चरबी म्हणून जमा होतात.

जेव्हा तुम्ही जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ खाता तेव्हा ते पोटाभोवती चरबी म्हणून जमा होतात. म्हणून, कार्बोहायड्रेट्स जास्त असलेले, कॅलरीज जास्त असलेले पदार्थ आणि इन्सुलिन उत्तेजक पदार्थ खाल्ल्याने पोटातील चरबी वाढते."

ते असेही म्हणाले की, "जर तुम्ही मटण आणि चिकन सारखे मांसाहारी पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ले तर ते वजन कमी करण्यासाठी परिपूर्ण आहार ठरू शकतात पण त्यांच्यासोबत आपण कोणते पदार्थ खातो याबद्दल आपण काळजी घेतली पाहिजे."

मांसाहारी पदार्थांसोबत कॅलरीज जास्त नसलेले निरोगी पदार्थ खाणे हा एक चांगला पर्याय असेल, असं देखील त्यांचं मत आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.