You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'इस्रायलचे पंतप्रधान जिवंत असतील, तर त्यांना शोधून मारू'; इराणच्या वक्तव्यानंतर नेतन्याहूंनी प्रसिद्ध केला व्हीडिओ
इराण रिव्हॉल्यूशनरी गार्ड कोअरनं (आयआरजीसी) म्हटलंय की, "जर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू जिवंत असतील तर त्यांचा पाठलाग करून त्यांना मारू."
आयआरजीसीने नेतन्याहू यांना 'चिमुकल्यांचा मारेकरी' असं म्हटलंय.
इराणच्या सरकारी न्यूज एजन्सी इरनाने (आयआरएनए) एका सोशल मीडिया पोस्टमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.
तर दुसऱ्या बाजूला, आफ्रिकेमधील इराणच्या दुतावासाने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय की, "नेतन्याहू जिवंत आहेत की मरण पावलेत, यामुळे अजिबातच फरक पडत नाही. एका मिनाबी मुलीच्या केसांचा एक तुकडा त्यांच्या संपूर्ण अस्तित्वापेक्षा जास्त मौल्यवान आहे."
या प्रकरणात आता असा प्रश्न उपस्थित होतोय की, 'जर बिन्यामिन नेतन्याहू जिवंत असतील तर...,' असं आयआरजीसीनं का म्हटलंय आणि बिन्यामिन नेतन्याहू जिवंत आहेत की नाही, अशी अफवा अथवा असा दावा नक्की कुठून सुरू झाला?
मात्र, अनेक वृत्तांनुसार, इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने 'नेतन्याहूंच्या मृत्यूची बातमी' ही फेक न्यूज असल्याचं म्हटलंय.
दुसरीकडे, रविवारी सायंकाळी नेतन्याहूंनी एक्सवर आपला एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते कॉफी पिताना दिसून आलेत. तसेच, यादरम्यान ते एकेक करून दोन्ही हातांना कॅमेऱ्यासमोर दाखवत आहेत.
थोडक्यात, ते आपली बोटं कॅमेऱ्यासमोर दाखवत आहेत.
या व्हीडिओमध्ये नेतन्याहूंच्या दोन्ही हातांना पाच-पाच बोटं दिसत आहेत.
नेतन्याहूंनी कॅमेऱ्यासमोर आपली बोटं दाखवण्यामागे नक्की काय कारण आहे, हे जाणून घेऊयात.
आयआरजीसीनं काय म्हटलंय?
अमेरिका-इस्रायल आणि इराण यादरम्यान युद्ध सुरू झाल्या झाल्याच इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की, दक्षिण इराणमधील शहर असलेल्या मिनाबमध्ये मुलींच्या एका शाळेवर हल्ला झाला. त्यामध्ये 160 हून अधिक विद्यार्थिनींचा मृत्यू झाला.
या मृतांमध्ये विद्यार्थिनींसमवेत शाळेच्या इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
इराणमध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड आक्रोश दिसून आला.
या मुलींच्या अत्यंविधीवेळी मोठ्या संख्येनं इराणी जनता सहभागी झाली.
इराणच्या सरकारी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आयआरजीसीनं एका वक्तव्यामध्ये म्हटलंय की, "झिओनिस्ट गुन्हेगार पंतप्रधानांचं भवितव्य अद्याप अज्ञात आहे आणि त्यांचा मृत्यू होणं किंवा त्यांनी त्यांच्या कुटुंबासह ताब्यात असलेल्या प्रदेशातून पलायन केलेलं असण्याची शक्यता आहे. हे एक संकट असून एकूणच झिओनिस्टांची परिस्थिती किती डळमळलेली आहे, हे अधोरेखित करते."
आयआरजीसीनं पुढे म्हटलं की, "जर मुलींची हत्या करणारा अपराधी जिवंत असेल तर आम्ही पूर्ण ताकदिनीशी त्या मारेकऱ्याचा पाठलाग करून त्याला मारून टाकू."
मृत्यूचा दावा कसा काय करण्यात आला?
इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने नेतन्याहू यांच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचं स्पष्ट केल्यानंतर ही धमकी देण्यात आली आहे.
52 व्या हल्ल्यात इस्रायलमधील त्यांचं लक्ष्य आणि या प्रदेशातील तीन अमेरिकन तळ उद्ध्वस्त झाल्याचा दावाही आयआरजीसीनं केला आहे.
13 मार्च रोजी बिन्यामिन नेतन्याहू यांनी एक्स अकाऊंटवर एक व्हीडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये ते इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांची माहिती देत होते.
सोशल मीडियावरील अनेक युझर्सनी नेतन्याहूंचा हा व्हीडिओ एआय जनरेटेड असल्याचं म्हटलं होतं.
तसेच, नेतन्याहूंचा मृत्यू झाला असल्याचा दावाही अनेकांनी हा व्हीडिओ पाहून केला होता.
मात्र, तुर्कीची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या अनादोलूने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने एआय जनरेटेड व्हीडिओचे दावे 'फेक न्यूज' असल्याचं सांगत ते फेटाळून लावलेत.
सोबतच, नेतन्याहू पूर्णपणे सुरक्षित असल्याचं इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानं वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
मात्र, बिन्यामिन नेतान्याहू यांच्या मृत्यूशी संबंधित दाव्यांबद्दल, अमेरिकन कॉन्झर्व्हेटीव्ह राजकीय टीकाकार कॅन्डिस ओवेन्स यांनी असा दावा केला आहे की, "इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या आरोग्याबाबत काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे."
'अधिकाऱ्यांवर गप्प बसण्यासाठी दबाव असल्याचा'ही आरोप त्यांनी केलाय.
ओवेन्स यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलंय की, "अमेरिकन सरकारने या प्रकरणाचा थेट विचार करायला हवा, पण त्यांना गप्प राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काय चाललं आहे? त्यांनी आधीच बरंच काही खोटं बोललेलं नाहीये का?"
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवा एकीकडे पसरलेल्या असताना दुसरीकडे त्यांचा मुलगा असलेल्या यायर नेतन्याहू यांचं 'एक्स' अकाऊंट चर्चेत आलेलं आहे.
'हिंदूस्थान टाइम्स'ने दिलेल्या एका वृत्तानुसार, नेतन्याहू यांचे सुपुत्र यायर नेतन्याहू आणि त्यांच्या 'एक्स' अकाऊंटबाबतही बरेच कयास बांधले जात होते. यायर नेतन्याहू यांनी 9 मार्चनंतर कोणतीही पोस्ट टाकलेली नाहीये, याचा अर्थ त्यांच्या कुटुंबामध्ये एखादी दु:खद घटना नक्कीच घडली असावी, असा दावा अनेक सोशल मीडिया युझर्सनी केला आहे.
हिंदूस्थान टाइम्सने दिलेल्या या वृत्तानुसार, "एक्सचा एआय चॅटबॉट असलेल्या ग्रोकनेही हे सगळे दावे चुकीच्या असल्याचं म्हटलंय. नेतन्याहू यांच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेला व्हीडिओ कोणत्याही प्रकारे एडीटेड अथवा बदललेला नाहीये, हे ग्रोकनं स्पष्ट केलं. ग्रोकच्या दाव्यानुसार, हा फक्त एक दृष्टीभ्रम होता. या दृष्टीभ्रमामुळे असं वाटत होतं की, नेतन्याहूंच्या हाताला सहा बोटं आहेत."
'द संडे गार्डियन'नुसार, काही सोशल मीडिया पोस्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला होताो की, नेतन्याहूंशी निगडीत एका मेसेजला नंतर डिलीट करण्यात आलं होतं.
बिन्यामिन नेतन्याहूंसोबत काहीतरी गंभीर घडलंय, असा कयास या मेसेजमध्ये लावण्यात आला होता.
असे दावे करणारे कथित स्क्रीनशॉट वेगाने पसरू लागल्यानंतर, अनेक युझर्सनी इराणसोबतच्या संघर्षामध्ये नेतन्याहू यांचं खरंच काही नुकसान झालं आहे का, असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
'द संडे गार्डियन'नुसार, "तज्ञांचं असं म्हणणं आहे की, जेव्हा व्हीडिओची एकच फ्रेम अगदी बारकाईनं तपासली जातं, तेव्हा हाताची स्थिती, 'मोशन ब्लर' आणि कॅमेरा अँगल सहजपणे काही विचित्र दृश्य प्रभाव निर्माण करू शकतात. त्यामुळे नेतान्याहू यांना सहा बोटं असल्यासारखं दिसून येऊ शकतं."
नेतन्याहू आहेत कुठे?
'द संडे गार्डियन'च्या मते, भू-राजकीय संघर्षांदरम्यान चुकीची माहिती अनेकदा वेगाने पसरते.
विशेषतः जेव्हा लोक राजकीय नेते आणि लष्करी घडामोडींबद्दल त्वरित अपडेट मिळविण्याचा प्रयत्न करत असतात, तेव्हा हे घडू शकतं, असं तज्ज्ञांना वाटतं.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशा कंटेंटचा प्रसार आणखी वाढवू शकतात. कारण, युझर्स अनेकदा दाव्यांच्या सत्यतेची पडताळणी न करताच ते शेअर करतात.
दुसरीकडे, बिन्यामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूबद्दलच्या दाव्यांचा प्रसार वेगानं होत असला तरी, ते बेपत्ता झाले असल्याचे किंवा इस्रायल सोडून गेल्याचे कोणतेही संकेत नाहीयेत.
सोशल मीडियावरील अलीकडील व्हीडिओ आणि सार्वजनिक विधानांवरून असं दिसून येतं की, इस्रायलचे पंतप्रधान नियमितपणे राष्ट्राला संबोधित करत आहेत.
तसेच, इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी कारवायांशी संबंधित चर्चेत भागदेखील घेत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)