नागपूर SBL कंपनी स्फोट : सरकारनं पैसे देऊन जीव परत येईल का? 17 मृतांच्या नातेवाईकांचा टाहो

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

नागपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या एक्सप्लोसिव्ह कंपनीत सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला.

या स्फोटामध्ये 17 कामगारांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी आहेत. त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहेत. तसेच मृतांच्या वारशांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

स्फोटबद्दल कंपनीनं प्रतिक्रिया दिली असून ही घटना प्रकल्पाच्या पॅकिंग विभागात घडली असल्याचं सांगितलं आहे.

त्यांनी पुढे म्हटलं, "घटना घडली तेव्हा पॅकिंग विभागात कुठलीही उत्पादन प्रक्रिया सुरू नव्हती. स्फोटाचे नेमके कारण चौकशीनंतर समोर येईल. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत.

जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च कंपनी करणार असून इतर लोकांना आवश्यक ती आर्थिक मदत पुरवणे आमची जबाबदारी आहे.

सध्या परिस्थिती नियंत्रणात असून अंतर्गत आढावा घेत आहोत. चौकशीच्या निष्कर्षांच्या आधारे योग्य त्या दुरुस्ती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येतील."

मृतांमध्ये सर्वाधिक महिला

नागपूरहून काटोलकडे जाताना जंगलात राऊळगावजवळ ही कंपनी आहे. कंपनीत जायला पक्का रस्ता पण नाही. ही कंपनी कर्मशियल स्फोटके, बॅटरीतील सेल, डिटोनेटर बनवण्याचे काम करते.

स्फोट झाला त्यावेळी त्या युनिटमध्ये 36 कामगार काम करत होते. यापैकी 30 महिला होत्या, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेले कंपनीच्या कर्माचाऱ्यानी अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा करत असताना दिली.

इथे जास्तीत जास्त मजूर हे ठेकेदारीत काम करत असून त्यांची कामगार म्हणून नोंद नसल्याचं ते सांगतात. हे सगळे मजूर आजूबाजूच्या खेड्यातून इथं येतात.

आज रविवारी 1 फेब्रुवारीला सकाळची शिफ्ट सुरू झाली. शिफ्ट सुरू होताच अर्ध्या तासाच स्फोट झाला आणि आग लागली. आग इतकी भयंकर होती की आजूबाजूचा परिसर पूर्णपणे जळून कोळसा झाला. त्या युनिटचे तुकडे तुकडे झाले. जवळपास 5 किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज गेला होता.

या युनिटमधील 17 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर एक महिला अजूनही बेपत्ता आहे. तसेच 18 जणांचा नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आलं.

"सरकारनं कितीही पैसे दिले तरी जीव थोडी ना परत येणार आहे"

आम्ही अत्यंत खराब असलेला कच्चा रस्ता पार करून घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी मृतांचे नातेवाईक आपल्या घरातल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी कच्च्या रस्त्यानं पायी पायीच कंपनीकडे जात होते. कोणाची सून गेली होती, तर कोणाची मुलगी, तर कोणाची पत्नी.

आम्ही कंपनीजवळ पोहोचताच अश्रू पुसत पुसत 20 वर्षीय तरुणी मोहिनी बांगर दिसली. ती म्हणाली, "माझी आई सुनिता चिचघडे रोज इथं कामाला यायची. आज ती कायमची गेली.

मला माहिती झालं तसंच मी सकाळीच नागपूरवरून इथं आली. पण, माझी आई गेली होती. आता तिची बॉडी नागपूरला नेली. सरकारनं कितीही पैसा दिला तरी आमचा जीव परत थोडी ना येणार आहे."

थोडं पुढे गेलो तर तिथं एक महिला हंबरडा फोडत होती. ही महिला कोहळी गावची रहिवासी असून तिच्या पतीचा या स्फोटात मृत्यू झाला होता, तर एक उईके नावाचं कुटुंब आपल्या घरातील मुलीला शोधत होतं. ती त्याच युनिटमध्ये कामाला होती. पण, तिचं नाव ना जखमींमध्ये आलं होतं, ना मृतांच्या यादीत. ती अजूनही सापडली नव्हती. तिचा भाऊ प्रत्येकाला विचारपूस करत होता. तिची आई आणि काकू गेटजवळ बसून हंबरडा फोडत होत्या.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

यावेळी कामगारांमध्ये रोषही पाहायला मिळाला. कंपनीतल्या सगळ्या कामगारांना सुट्टी देण्यात आली होती. यामध्ये काही प्रत्यक्षदर्शी कामगार होते. त्यांना बसनं घरी पोहोचवण्याचं काम सुरू होतं. याच कंपनीत काम करणारे डोंगरगावचे कामगार मंगज आत्राम यांनी डोळ्यांनी बघितलेली परिस्थिती आम्हाला सांगितली.

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "स्फोटाचा आवाज खूप मोठा होता. आवाज आला तसा मी आमच्या युनिटच्या स्लॅबवर जाऊन पाहिलं तर आग दिसली आणि स्फोट सुरू होते. आम्ही धावत तिकडे गेलो तर कोणी पाणी मारत होतं, तर कोणी जखमी जीव वाचवत गेटकडे पळत येते. आलेल्या जखमींना आम्ही लवकरात लवकरत दवाखान्यात पाठवण्याचं काम केलं. इथं 7 वाजता स्फोट झाला आणि 9 वाजता अम्बुलन्स आली. तोपर्यंत इथं असलेल्या गाड्यांनी जखमीला दवाखान्यात पाठवलं."

स्फोट झाला त्याच्या काही अंतरावर आणखी काही कामगार झाडाखाली बसले होते. ते कंपनीवर रोष व्यक्त करत होते. 12 तासांचं काम आमच्याकडून 8 तासात काढून घेतात. एका डब्ब्यात 100 सेल असतात. त्या सेलचं काम आम्ही करतो. असे 40 डब्बे मारून देतो आम्ही 8 तासांच्या शिफ्टमध्ये. पण, आम्हाला 50 डब्बे मारायला लावतात.

एक जरी डब्बा कमी झाला तर घरी बसा म्हणतात. म्हणून घाईघाईत काम होते आणि असे स्फोट होतात, असं वंदना मानकर नावाच्या कामगार महिला बोलत होत्या. त्या शेजारच्या युनिटमध्ये काम करत होते.

आम्हाला कुठलीच सुरक्षा पुरवली जात नसल्याचंही त्या सांगतात.

मंगज आत्राम इथल्या सुपरवाईजर दर्जाच्या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करत होते. ते काम करायला खूप घाई करतात. आम्हाला सेफ्टी शूज, हेल्मेट असल्या कुठल्याच गोष्टी दिल्या जात नाही. कधी कधी तर अनुभव नसलेले नवीन लोक मशिनवर बवसतात. मग असे स्फोट होणार नाहीतर काय होईल.

आम्ही आणखी कामगारांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. पण, ते घाबरून बोलायला तयार नव्हते.

डेटोनेटर बनवताना स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पण, आता पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटना (PESO) आणि इंडस्ट्रीयल सेफ्टीच्या संबंधित शासकीय यंत्रणात स्फोट का झाला याचा तपास करत होत्या. त्यांनी चौकशी केल्यानंतर स्फोटाचं नेमकं कारण समोर येईल.

पोलिसांनी काय सांगितलं?

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागपूर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या घटनेची माहिती दिली आहे.

पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार माध्यमांसोबत बोलताना म्हणाले, "शासकीय यंत्रणा चौकशी करत आहेत. चौकशी झाल्यानंतर आम्ही याप्रकरणात गुन्हा दाखल करू."

काय घडलं?

राऊळगावची 'एसबीएल एक्स्प्लोझिव्ह' ही कंपनी नागपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर ही आहे. औद्योगिक स्फोटकं बनवणारी ही एक आघाडीची कंपनी आहे.

खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी स्फोटकं, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादनं या कंपनीमध्ये तयार केली जातात.

याच कंपनीमध्ये तयार झालेल्या डिटोनेटरचा स्फोट झाल्यानं ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या कंपनीमध्ये स्थानिक भागातील महिला मोठ्या प्रमाणात कामाला येतात.

रविवारी सकाळच्या शिफ्टमध्ये अनेक महिला काम करत असताना हा स्फोट झाला. त्यामुळं मृतांमध्येही मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे.

याआधीही जून 2024 मध्ये नागपूरात स्फोटकांच्या कंपनीत झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

त्यांनी म्हटलंय की, "नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे."

पुढे ते म्हणाले की, "मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. 'पेसो' आणि 'डिश' यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत."

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो."

फॅक्टरीतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार करेल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.

याशिवाय संबंधित कंपनी सुद्धा मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणार आहे, असं ते म्हणाले.

या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असंही त्यांनी म्हटलेलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)